You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमेरिका : फ्लोरिडा युनिव्हर्सिटीजवळ पूल कोसळला, चौघांचा मृत्यू
अमेरिकेतल्या मायामी इथल्या फ्लोरिडा इंटरनॅशनल युनिर्व्हसिटीजवळचा पूल कोसळून गुरुवारी दुपारी 4 जणांचा मृत्यू झाला. तर, या दुर्घटनेत 10 जण जखमी झाल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलं.
पूलाच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मदतकार्य करणारं पथक गुरुवारी रात्री या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेत होतं.
एका 9 पदरी महामार्गावरून जाणारा हा पूल कोसळल्यानं महामार्गावरील किमान 8 वाहनांचं नुकसान झाल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं. मात्र, पूल कोसळताना किती जण पुलाखाली होते हे सांगणं कठीण असल्याचंही त्यांनी सांगितलं.
मात्र, या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाल्याचं गुरुवारी रात्री मियामीच्या अग्निशमन दलाचे प्रमुख डेव डॉवनी यांनी सांगितलं.
द केंडॉल रिजनल मेडिकल सेंटर इथे दुर्घटनेत जखमी झालेल्या 10 जणांवर उपचार सुरू आहेत. यातील दोन जणांची परिस्थिती गंभीर असल्याचं इथल्या जनरल सर्जरी विभागाचे संचालक डॉ. मार्क मॅककेन्नी यांनी सांगितलं.
विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार, 950 टन वजनाचा आणि 174 फूट लांबीचा हा पूल शनिवारी अवघ्या 6 तासांत महामार्गावर उभारण्यात आला होता.
हा पूल कोसळल्यानंतर या महामार्गावरील वाहतूक पूर्णतः थांबल्याचं प्रत्यक्षदर्शींनी माध्यमांना सांगितलं. यावेळी पूलाखाली अडकलेल्यांचा आक्रोश कानी पडत असल्याचं एका प्रत्यक्षदर्शीनं एबीसी न्यूजच्या प्रतिनिधीला सांगितलं.
"मला काहीतरी कोसळल्याचा आवाज ऐकू आला. मी लगेच त्या दिशेनं पाहिलं, तर हा पूल कोसळला होता. सगळीकडे धूळ पसरली होती आणि तो प्रसंग भयावह होता," डॅमेनी रीड या प्रत्यक्षदर्शीनं सीबीएस न्यूजला सांगितलं.
फ्लोरिडाचे गव्हर्नर रीक स्कॉट आणि सिनेटर मार्को रुबियो यांनी काही तज्ज्ञ आणि नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डच्या अधिकाऱ्यांसह गुरुवारी रात्री घटनास्थळाची पाहणी केली.
तर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी गुरुवारी रात्री या घटनेबद्दल दुःखं झाल्याचं ट्विटरद्वारे जाहीर केलं.
फ्लोरिडा विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी ट्रॅफिकच्या त्रासातून मुक्तता मिळावी यासाठी या पुलाची त्यांनी मागणी केली होती, असं मायामी हेराल्ड या वृत्तपत्रानं म्हटलं आहे. ऑगस्ट 2017मध्ये एका कारने एका विद्यार्थ्याला उडवल्यानंतर पुलाच्या मागणीचा प्रश्न ऐरणीवर आला होता.
मनिला कन्स्ट्रक्शन कंपनी आणि एफआयजीजी इंजिनिअरिंग या दोन कंपन्या या पुलाचं काम करत असून त्यांनी या दुर्घटनेबद्दल खेद व्यक्त केला आहे. तसंच, तपास यंत्रणांना सहकार्य करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)