जाधवांच्या पत्नीच्या चपलेत मेटल चिप होती : पाकिस्तान दावा

कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांना कपडे आणि आभूषणांसंदर्भात देण्यात आलेल्या सूचना सुरक्षातपासणीचा भाग असल्याचं पाकिस्तानने म्हटलं आहे. भारतीय प्रसारमाध्यमे तसंच संसदेत यासंदर्भात परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्ताननं मानवाधिकारांचं उल्लंघन केलं असल्याचा मुद्दा मांडला होता. याबाबत पाकिस्तानने आपली भूमिका स्पष्ट केली.

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा मुहम्मद असिफ यांनी भारताने केलेल्या आरोपांचं खंडन केलं आहे. कुलभूषण जाधव आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट ही मानवतेच्या दृष्टिकोनातून झाली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

कुलभूषण यांच्या पत्नी आणि आईला कुंकू, मंगळसूत्र काढायला सांगण्यात आलं, तसंच त्यांचे कपडे बदलण्यात आले. अशा आशयाच्या बातम्या भारतीय प्रसारमाध्यमांनी दिल्या होत्या.

या संदर्भात पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री म्हणाले, "ही भेट मानवतावादी दृष्टिकोनातून झाली असली तरी ही एका सामान्य मायलेकाची तसंच नवराबायकोची भेट नव्हती. कुलभूषण जाधव हे भारतीय नौदलाचे अधिकारी आहेत. आमच्या दृष्टीने शिक्षा झालेले भारतीय कट्टरपंथी आहेत. ते पाकिस्तानमध्ये अनेकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेले गुप्तहेर आहेत हे नाकारून चालणार नाही."

ते पुढे म्हणाले, "म्हणूनच सर्वसमावेशक सुरक्षातपासणी होणे आवश्यक होतं. याविषयी दोन्ही देशांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर सहमत झालं होतं. कुलभूषण यांची पत्नी आणि आईला सन्मानपूर्वक वागणूक देण्यात आली."

"कपडे बदलण्याची आणि आभूषणं काढण्याची सूचना ही केवळ सुरक्षेच्या कारणास्तव होती. भेटीनंतर दोघींनी आपापले कपडे परिधान केले. त्यांच्या वस्तू त्यांना परत देण्यात आल्या. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव कुलभूषण यांच्या पत्नीच्या चपला परत देण्यात आल्या नाहीत. चपलेत मेटल चिप आढळल्याने त्याची चौकशी करण्यात आली," असं त्यांनी स्पष्ट केलं.

"जगभरात विमानतळावर अनेकदा सुरक्षा तपासणीदरम्यान प्रवाशांना परिधान केलेले अलंकार, आभूषणं तत्सम वस्तू काढायला सांगितलं जातं. सुरक्षातपासणीसंदर्भात दोन्ही देशांमध्ये सहमत झालं होतं. ही सुरक्षातपासणी म्हणजे धर्माचा तसंच संस्कृतीचा अपमान असल्याचं भासवणं हे विश्वासाचा भंग करण्यासारखं आहे," असं ते म्हणाले.

"मानवतेच्या दृष्टिकोनातून आयोजित या भेटीबाबत पाकिस्ताननं खुलं आणि पारदर्शक धोरण स्वीकारलं होतं. गैरसमजुतींवर आधारित खोट्या दोषारोपांमध्ये आम्हाला अडकायचं नाही. अनेक अडथळे असतानाही कुलभूषण आणि त्यांच्या कुटंबीयांची भेट झाली हे लक्षात घेणं आवश्यक आहे. तथ्याशी फेरफार आणि प्रचारतंत्र यातून काहीही निष्पन्न होत नाही मात्र वातावरण कलुषित होतं," अशी भूमिका पाकिस्ताननं घेतली आहे.

इस्लामची शिकवण तसंच दया आणि अनुकंपा तत्त्वांनुसारच कुलभूषण आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट झाली. 25 डिसेंबर 2017 रोजी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयातच ही भेट झाली असल्याचंही पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

"अनेक अडथळे असतानाही कुलभूषण यांना त्यांची पत्नी आणि आईला भेटता आलं याची नोंद घेणे आवश्यक आहे. या भेटीसाठी अर्ध्या तासाचा वेळ निश्चित करण्यात आला होता. मात्र त्यांच्या विनंतीवरून भेटीची वेळ वाढवून 40 मिनिटं करण्यात आली आणि कुलभूषण यांना आई आणि पत्नीशी संवाद साधता आला," असं त्यांनी सांगितलं.

या भेटीकरता कुलभूषण यांच्या आईने पाकिस्तानचे आभार मानले, यातूनच ही भेट यशस्वी झालं असल्याचं स्पष्ट होतं, असा दावा पाकिस्तानतर्फे करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)