कुलभूषण यांच्या भेटीबाबत भारताच्या आक्षेपांवर पाकिस्तानचं उत्तर

सोमवारी कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांनी त्यांची पाकिस्तानमध्ये जाऊन भेट घेतली. पाकिस्ताननं या भेटीपूर्वी आणि भेटीदरम्यान कुलभूषण जाधव यांची पत्नी आणि आईवर अनेक निर्बंध लादले होते. त्यावर पाकिस्ताननंही प्रतिक्रिया दिली आहे.

पाकिस्तानचं हे वर्तन नियमबाह्य आणि अयोग्य होतं, असं भारतीय परराष्ट्र खात्यानं म्हटलं. पाकिस्ताननं या भेटीच्या वेळी केलेल्या कृत्यांची यादी परराष्ट्र खात्यानं प्रसिद्ध केली आहे.

पाकिस्तानात कुलभूषण जाधव यांची भेट घेऊन त्यांची आई आणि पत्नी भारतात परतल्या आहेत. भारत सरकारनं ही मुलाखतीच्या पद्धतीवरही आक्षेप नोंदवला होता.

या आक्षेपात कपडे बदलणं तसंच बांगड्या काढणं आणि टिकली काढणं यांचा समावेश होता. त्यावर, पाकिस्तान सरकारकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे.

पाकिस्तान सरकारनं एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. त्यात, "हेरगिरीचा आरोप असलेले कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नी यांनी नुकताच पाक दौरा केला. त्यानंतर 24 तासाच्या आतच भारताच्या प्रशासनानं केलेले आरोप आम्ही संपूर्णपणे नाकारत आहोत, "असं म्हटलं आहे.

शाब्दिक युद्धावर आमचा विश्वास नाही. आम्ही पारदर्शक आहोत. त्यामुळे आम्ही आरोपाचं खंडन करतो. हे सगळं इतकं त्रासदायक होतं तर जेव्हा कुटुंबीय भेटायला आले, मीडियाशी बातचीत झाली तेव्हाच हा मुद्दा उपस्थित का केला नाही?

प्रत्यक्षात, कुलभूषण यांच्या आईनं पाकिस्तानच्या मानवतावादी दृष्टिकोनाबद्दल आभार मानले. प्रसारमाध्यमांनी त्यांचं चित्रीकरणसुद्धा केलं. आम्हाला यापेक्षा जास्त काही बोलायचं नाही.

पाकिस्ताननं कुलभूषण जाधवांच्या कुटुंबीयांवर लादली होती ही 5 बंधनं

1. ज्यावेळी कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नी इस्लामाबादमध्ये आले त्यावेळी त्यांच्या जवळपास माध्यमं येणार नाहीत असं ठरलं होतं. पण पाकिस्तानी माध्यमं त्या ठिकाणी उपस्थित होती आणि त्यांनी कुलभूषण जाधव यांच्याबद्दल अनुचित प्रश्न आई आणि पत्नीला विचारले.

2. सुरक्षेचं कारण पुढे करून जाधव यांची आई आणि पत्नीला मंगळसूत्र, बांगड्या आणि टिकली काढून ठेवण्यास सांगण्यात आलं होतं.

3. जाधव यांच्या आईला मराठीतून बोलण्याची परवानगी नाकारण्यात आली. तसंच त्या बोलत असताना सातत्यानं व्यत्यय आणला जात होता.

4. जाधव यांच्या पत्नीला भेटीपूर्वी शूज काढून ठेवण्यास सांगितलं. भेटीनंतर त्यांनी आपले शूज परत मागितले, ते देण्यास पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी नकार दिला. परत परत मागूनही त्यांनी ते दिले नाहीत. हा उद्दामपणा असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे.

5. संपूर्ण भेटीदरम्यान कुलभूषण जाधव हे तणावाखाली दिसत होते. त्यांना ठरलेलीचं उत्तरे देण्यात येण्यावर दबाव टाकण्यात आला होता, असं दिसत असल्याची आम्हाला जाणीव झाली असं परराष्ट्र खात्यानं त्यांच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटलं आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)