आयसीसीचा नवा प्रयोग; आजपासून चारदिवसीय कसोटीला सुरुवात

मंगळवारपासून दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांच्यातील चार दिवसीय कसोटी सामन्याला सुरुवात होत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं प्रायोगिक तत्तावर चार दिवसीय कसोटी सामने आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.

15 ते 19 मार्च 1877 या कालावधीत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात पहिला कसोटी सामना खेळवण्यात आला होता. त्यानंतर 140 वर्षं पाच दिवसांचे कसोटी सामने क्रिकेटचा गाभा समजले जातात.

मात्र एकदिवसीय आणि ट्वेन्टी-20 प्रकाराच्या आगमनानंतर पाच दिवसीय सामन्यांची लोकप्रियता घटली.

प्रेक्षकसंख्या कमी झाल्यामुळे कसोटी क्रिकेटवर आधारित अर्थकारणालाही फटका बसला. कसोटी क्रिकेटच्या स्वरुपावरून सम्यक चर्चेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) पाच दिवसांचे कसोटी सामन्यांसंदर्भात नवा प्रयोग अंगीकारला आहे.

कसं बदलणार कसोटी क्रिकेट?

1) क्रिकेटचे नियम तयार करणारी मातृसंस्था 'मेरलीबोन क्रिकेट क्लब' आणि तिच्या समितीचा विरोध असतानाही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) चार दिवसीय कसोटीला मान्यता दिली आहे.

2) 2019 च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत चार दिवसीय कसोटी सामने प्रायोगिक तत्वार आयोजित करण्यात येतील आणि या सामन्यांना अधिकृत दर्जा असेल असं ICCनं स्पष्ट केलं आहे.

3)काही दिवसांपूर्वी न्यूझीलंडमधल्या ऑकलंड इथं झालेल्या बैठकीत ICCनं चार दिवसीय कसोटी प्रकाराला मान्यता दिली. याच बैठकीत कसोटी अजिंक्यपद स्पर्धेलाही मान्यता देण्यात आली.

4) ICC क्रमवारीत तळाशी असणाऱ्या तसंच आयर्लंड आणि अफगाणिस्तानसारख्या नव्या कसोटी सदस्यांकरता चार दिवसीय कसोटी उपयुक्त ठरतील असं ICCचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांनी सांगितलं.

5) दक्षिण आफ्रिकेतल्या पोर्ट एलिझाबेथ मधल्या 'सेंट जॉर्जेस स्टेडियम'वर ही कसोटी होत आहे. यानिमित्तानं दक्षिण आफ्रिकेला पहिल्यांदाच दिवसरात्र कसोटी आयोजनाचा मान मिळाला आहे.

6) चार दिवसीय कसोटीत साडेसहा तास खेळ होणं अपेक्षित आहे. पाच दिवसीय सामन्याच्या तुलनेत अर्ध्या तासानं खेळाचा वेळ वाढवण्यात आला आहे.

7) चार दिवसीय कसोटीत दररोज 98 षटकांचा खेळ होणं अपेक्षित आहे. पाच दिवसीय कसोटी सामन्यात प्रत्येक दिवशी 90 षटकांचा खेळ होतो.

8) दिवसरात्र कसोटी असल्यानं गुलाबी चेंडूचा वापर करण्यात येईल. दुपारी 1.30 वाजता खेळाला सुरुवात होईल. रात्री 9 वाजता खेळ थांबेल. साडेसातच्या सुमारास पोर्ट एलिझाबेथमध्ये सूर्यास्त होत असल्यानं साधारण दीड तासाचा खेळ कृत्रिम प्रकाशात होईल.

9) सव्वा दोन तास अशा कालावधीची प्रत्येकी दोन सत्रं असतील. पाच दिवसीय कसोटीत दोन तासांचं सत्र असतं. दुसऱ्या सत्रानंतर 40 मिनिटांचा 'डिनर ब्रेक' असेल. काही कारणांनी खेळ होऊ न शकल्यास पुढच्या दिवशी अतिरिक्त वेळेत खेळ होण्याची व्यवस्था नाही.

10) पहिल्या डावात दीडशे किंवा त्याहून अधिक धावांची आघाडी असेल तरच प्रतिस्पर्धी संघावर फॉलोऑन लादला जाऊ शकतो. पाचदिवसीय कसोटी सामन्यात दोनशे धावांची आघाडी असेल तरच फॉलोऑन देता येऊ शकतो.

11) 83 षटकांचा खेळ झाल्यावर शेवटच्या दिवशी खेळाचा शेवटचा तास सुरू होईल. पाच दिवसीय कसोटी सामन्यांमध्ये शेवटच्या दिवशी 75 षटकांचा खेळ झाल्यानंतर अनिवार्य अशा शेवटच्या तासाचा खेळ सुरू होतो.

12) षटकांची गती संथ राखण्यात अपयश आलं तर कर्णधार आणि संघावर मोठ्या रकमेचा दंड ठोठावण्यात येणार आहे.

13) जानेवारी 2014 पासून खेळवण्यात आलेल्या 162 कसोटी सामन्यांपैकी 112 कसोटी सामने चौथ्या दिवशीच निकाली ठरले आहेत. चारदिवसीय कसोटी सामन्यांच्या प्रयोगामुळे मालिकेत अतिरिक्त कसोटी खेळवता येऊ शकते तसंच एक दिवस कमी झाल्यानं प्रक्षेपण खर्च वाचणार आहे.

14) सुरुवातीच्या काळात कसोटी सामने तीन ते सहा दिवसांचे असत. त्यानंतर अनिश्चित दिवसांचे कसोटी सामने खेळवण्यात येऊ लागले. शेवटची वेळ निर्धारविरहित कसोटी दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात 1938-39 मध्ये खेळवण्यात आली होती.

15) 1972-73 पासून कसोटी सामने पाच दिवसांचे करण्यात आले. 2005-06 मध्ये आयसीसीतर्फे आयोजित 'वर्ल्ड इलेव्हन' आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान आयोजित विशेष कसोटी सामना सहा दिवसांचा होता. मात्र हा सामना चौथ्या दिवशीच संपला.

16) दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांच्यात होणारी दिवसरात्र कसोटी ही आठवी दिवसरात्र कसोटी असणार आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)