वॉशिंग्टन : भीषण रेल्वे अपघात, ३ जणांचा मृत्यू, १०० जखमी

फोटो स्रोत, WASHINGTON STATE PATROL
अमेरिकेतल्या वॉश्गिंटनमध्ये पॅसेंजर अॅमट्रॅक ट्रेनला सोमवारी झालेल्या भीषण अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १०० हून अधिक जण जखमी झाल्याचं वृत्त आहे.
एका पुलावरून घसरून या ट्रेनचे जवळपास ८ ते ९ डबे पुलाखालील महामार्गावर येऊन पडले. त्यामुळे एक विचित्रच अपघात झाला. ट्रेनचं इंजिनही पुलावरून खाली रस्त्यावर काही दूर अंतरावर जाऊन पडलं.
ऐन गर्दीच्या वेळेत ही घटना घडली. त्यामुळे महामार्गावरील काही वाहनांच नुकसान झालं आहे. या अपघातानंतर १०० हून अधिक जखमींना जवळच्या हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं. यातील बहुतांश जखमींची प्रकृती गंभीर आहे.
अपघातग्रस्त डब्यांची पाहणी करण्यात आली असून त्यात ३ जणांव्यतिरिक्त कुणी मृत्यूमुखी आढळलं नसल्याचं स्थानिक प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं.
महामार्गावर डबे कोसळल्यामुळे एकूण ७ वाहनाचं नुकसान झालं आहे. त्यापैकी २ मोठे ट्रक आहेत.

फोटो स्रोत, Reuters
दोन इंजिनांसह १४ डब्यांची ही ५०१ क्रमांकाची ट्रेन तिथल्या स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ६ वाजता सिएटलहून निघाली होती. ही ट्रेन दक्षिणेकडच्या पोर्टलँडला पोहोचणार होती. टॅकोमा भागात ही ट्रेन आली असता स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता हा अपघात झाला.
या ट्रेनमधून रेल्वे कर्मचाऱ्यांसह एकूण ७७ प्रवासी प्रवास करत होते. अमेरिकेचं नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड या अपघाताची सखोल चौकशी करणार आहे.
या अपघातानंतर लगेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत मृतांच्या कुटुंबीयांबद्दल आपली सहानुभूती व्यक्त केली आहे.

फोटो स्रोत, TWITTER
तसंच अमेरिकेतले रस्ते, पूल आणि पायाभूत सुविधाबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. तसंच देशातली पायाभूत सुविधा अद्यावयत करण्यासाठी मोठं काम सुरू करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
आणखी वाचा -
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








