'गुजरातमध्ये राहुल गांधींचा विजय' - कुमार केतकर

फोटो स्रोत, Getty Images
- Author, कुमार केतकर
- Role, ज्येष्ठ पत्रकार
बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी गुजरात निकालाचं विश्लेषण करताना राहुल गांधींविषयी महत्त्वाची विधानं केली. ती विधानं इथे लेखाच्या रूपात मांडत आहोत. त्यांची संपूर्ण मुलाखत या लेखाच्या तळाशी पाहता येईल.

गुजरात निवडणुकीत भाजपचा विजय झाला असला तरी या निवडणूक निकालांकडे नीट पाहिलं तर हा राहुल गांधींचा विजय आहे, असं म्हणावं लागेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या पंतप्रधानपदाचा प्रभाव या निवडणुकीत पणाला लावला. त्यांनी प्रचाराच्या काळात गुजरातमध्ये ठाण मांडलं होतं. तरीसुद्धा त्यांना घवघवीत यश मिळालं नाही. त्यामुळेच निवडणुकीत भाजपचा विजय झाला असला तरी राजकारणात मात्र काँग्रेसचा आणि राहुल गांधींचा विजय झाला आहे, असं मला वाटतं.
गुजरातमध्ये 2012 ची विधानसभा निवडणूक आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला होता. या पार्श्वभूमीवर काँग्रेसची कामगिरी चांगली झाली. याउलट मोदींचं गुजरात मॉडेल जर इतकं चांगलं होतं तर मग विकासाच्या मुद्द्यावर त्यांना 150 जागा का मिळाल्या नाहीत, हा माझा प्रश्न आहे.
'राहुल गांधी बदलले आहेत'
राहुल गांधी राजकारणाबद्दल गंभीर नव्हते, असं मला वाटत नाही, पण सहा महिन्यांपूर्वी त्यांचा दृष्टिकोन नक्कीच वेगळा होता. ते निवडणुकांच्या राजकारणाच्या दृष्टीने विचार करत नव्हते. आता मात्र ते पहिल्यांदा या लढाईत पूर्णपणे उतरले आहेत. खरं सांगायचं तर राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक गेल्या तीन महिन्यांतच लढली गेली.
गुजरातमध्ये गेली साडेचार वर्षँ काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते काय करत होते, असा प्रश्न पडतो. गुजरातमध्ये शेतकऱ्यांवर संकट आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. पण काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी या प्रश्नांवर काम केलेलं दिसत नाही. आपण किती दिवस गांधी घराण्याच्या जीवावर निवडणुका लढवणार हा विचार त्यांनी करायला हवा.

फोटो स्रोत, Getty Images
मोदी सरकारने नोटबंदीसारखा निर्णय घेतला त्यावर काँग्रेसच्या नेत्यांना साधी आंदोलनंही करता आली नाहीत. याला राहुल गांधी जबाबदार आहेत, असं म्हणायचं का? खरंतर नरेंद्र मोदींनी नोटबंदीच्या निर्णयाबद्दल माफी मागायला हवी आणि किती काळा पैसा बाहेर आला याचा हिशोबही द्यायला हवा. पण याचा जबाब विचारण्यात काँग्रेस कमी पडतं आहे.
काँग्रेसला सत्तेबाहेर असताना लोकांशी संपर्क ठेवता येत नाही हा खरा प्रश्न आहे. काँग्रेसच्या पराभवाचं खापर एकट्या राहुल गांधींवर फोडून चालणार नाही. आणि ज्या हायकमांड कल्चरचा आरोप काँग्रेसवर होतो तेच कल्चर भाजपमध्येही आहे. गुजरात निवडणुकांच्या तिकीट वाटपाचे सगळे निर्णय नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी घेतले आहेत हे आपण लक्षात घ्यायला हवं.
घराणेशाहीच्या आरोपाचं काय ?
राहुल गांधींवर नेहमीच घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका केली जाते. पण काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून राहुल गांधी आपल्याला नको असतील तर आपल्याकडे पर्यायी नावं कोणती आहेत? ही नावं पुन्हा घराणेशाहीतून आलेली नाहीत ना, हेही पाहावं लागेल. काँग्रेसच का, बाकीच्याही पक्षात घराणेशाही आहेच.
पंडित नेहरूंनतर लालबहाद्दूर शास्त्री पंतप्रधान झाले तेव्हा घराणेशाही कुठे होती ? लालबहाद्दूर शास्त्रींच्या मृत्यूनंतर इंदिरा गांधींकडे पंतप्रधानपद आलं हे आपण लक्षात घ्यायला हवं.
राहुल गांधी आधी अंशत: राजकारणी होते. एखादा माणूस चोवीस तास राजकारणी असावा लागतो. तेवढं राजकारण राहुल गांधी करत नव्हते. कारण आपलं कुटुंब आणि आजूबाजूची काँग्रेस ते पाहत होते. इंदिरा गांधी आणि राजीव गांधींच्या मृत्यूनंतर आपली आई ज्या परिस्थितीतून गेली ते सगळं ते पाहत होते. अशा परिस्थितीत त्यांची अवस्था कानकोंडी झाली असावी. त्यांना राजकारणाबद्दलही एक प्रकारची अढी बसली असावी, असं मला वाटतं.
'पंतप्रधान होऊ शकतात'
आता मात्र जबाबदारी म्हणून ते पूर्णपणे राजकारणात उतरले आहेत, 'पॅशन' म्हणून नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे राजकीय महत्त्वाकांक्षा आहे ती राहुल गांधींकडे नाही, असं मी म्हणेन. आता राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत. काँग्रेसचा एक जबाबदार नेता म्हणून आपण काम करायला हवं, याची जाणीव त्यांना गेल्या वर्षभरात झाली आहे.
राहुल गांधी आतापर्यंत कोणत्याही निवडणुकीत हरलेले नाहीत हेही आपण लक्षात घ्यायला हवं. जर त्यांनी निवडणुकीचं राजकारण गंभीरपणे घेतलं तर ते पंतप्रधानही होऊ शकतात.
संपूर्ण मुलाखत इथे पाहू शकता :
मजकूर उपलब्ध नाही
Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.Facebook पोस्ट समाप्त
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)









