उजव्या विचारसरणीचे सबॅस्टिन पिनिएरा होणार चिलीचे राष्ट्राध्यक्ष

फोटो स्रोत, MARTIN BERNETTI
उजव्या विचारांचे अब्जाधीश सबॅस्टिन पिनिएरा यांची चिलीच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे. पिनिएरा यांनी यापूर्वीही हे पद भूषवलं होतं. डाव्या विचारांचे नेते अलेहांद्रो गुलिएर यांचा त्यांनी पराभव केला.
पिनिएरा यांना 54 टक्क्यांपेक्षा अधिक मतं मिळाली आहेत.
चिलीच्या सध्याच्या राष्ट्राध्यक्ष मिशेल बॅशेले या समाजवादी विचारांच्या आहेत. त्यांनी गुलिएर यांना पाठिंबा दिला होता. म्हणून चिलीने दिलेला हा कौल देशाला उजवं वळण मानलं जात आहे.
चिलीचे 1.40 कोटी नागरिक या निवडणुकीत मतदानासाठी पात्र होते. यावेळी प्रथमच परदेशात राहणाऱ्या चिलीच्या नागरिकांनाही मतदानाचा अधिकार देण्यात आला होता. पण प्रत्यक्षात फक्त 48.5 टक्केच मतदान झालं.
पिनिएरा यांनी त्यांचा देशावासियांना ऐक्याचं आवाहन केलं आहे. ते म्हणाले, "चिलीला वादापेक्षाही ऐक्याची गरज आहे. काहीवेळा भूतकाळातील गोष्टी आपल्याला एकमेकांपासून दूर सारतात. पण भविष्यात एकजुटीनं राहण्यावर भर राहणार आहे."
विरोधकांबद्दल बोलताना पिनिएरा म्हणाले, "आमचं कोणत्या विषयांवर एकमत होईल, यावर मला त्यांच्याशी बोलायचं आहे."
चिलीमध्ये दोन दशकं सत्तेत असलेल्या मध्यम-डाव्या विचारांच्या सरकारला हटवून पिनिएरा यांनी 2010 ते 2014 या कालावधीत देशाचं नेतृत्व केलं होतं.
पण ओपिनियन पोल्समध्ये 'चिली वामोस' आघाडीसोबत असलेली त्यांची युती जेमतेम पुढे होती.

फोटो स्रोत, AFP/GETTY
यंदाच्या निवडणुकांमध्ये त्यांना व्यावसायिकांकडून मोठा पाठिंबा मिळाला होता. अर्थव्यवस्था रुळावर येण्यासाठी त्यांनी करांचं प्रमाण कमी करण्याचं आश्वासन दिलं होतं.
बॅशेले यांनी केलेल्या सुधारणांवर नियंत्रण आणण्याचे आश्वासन त्यांनी दिलं होतं. तर त्यांचे मुख्य विरोधक गुलिएर यांच्या प्रचाराचा भर बॅशिले यांनी केलेल्या कामावरच जास्त होता.
बॅशिले यांच्या सुधारणावादी धोरणांची जगभरातून स्तुती झाली होती. पण 2015मध्ये झालेल्या भ्रष्टाचारात त्यांच्या सुनेचं नाव आल्यानं त्यांची प्रतिमा डागाळली होती.
उजव्या विचारांच्या टीकाकारांनी बॅशिले यांनी सुधारणा कार्यक्रम जास्तच रेटल्याची टीका केली होती.
चिलीच्या घटनेतील तरतुदींनुसार बॅशेले यांना पुन्हा निवडणूक लढवण्यास परवानगी नव्हती.
गुलिएर डाव्या विचारांच्या सहा पक्षांचे प्रतिनिधित्व करत होते. त्यांनी बॅशिले यांनी राबवलेल्या सुधारणांचा कार्यक्रम सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले होते.

फोटो स्रोत, AFP / Getty
दशकभरा पूर्वी अर्जेंटिना, बोलिविया, ब्राझील, चिली, क्युबा, इक्वेडोर, होंडुरास, निकारागुवा, उरग्वे आणि व्हेनेझुएलामध्ये डाव्या पक्षांचं सरकार होतं.
पण गेल्या काही वर्षांत अर्जेंटिना, ब्राझिल, व्हेनेझुएलात उजव्या विचारांचे नेतेत सत्तेत आले आहेत. पिनिएरा यांच्या विजयानं हाच रोख अधोरेखीत झाला आहे.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








