परग्रहवासीयांच्या संभाव्य हल्ल्याच्या भीतीपोटी अमेरिकेकडून कोट्यवधींचा चुराडा

फोटो स्रोत, Getty Images
परग्रहावर जीवसृष्टी असेल की नाही याचं कुतूहल गेल्या अनेक वर्षांपासून मानवाला आहे. अनेक चित्रपट आणि कथा-कादंबऱ्यातून हा विषय समोर येतो. तर जनसामान्यांच्या वर्तुळातही हा विषय वेळोवेळी चर्चिला जातो.
गेल्या काही वर्षांमध्ये आकाशात उडत्या तबकड्या दिसल्याचा दावा अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या संशोधकांनी केला आहे, अशी नोंद सापडली आहे.
इतकंच नाही तर परग्रहावरून आपल्यावर आक्रमण होईल अशी भीती अमेरिकेला वाटते. या आक्रमणापासून आपल्या देशवासियांना वाचवण्यासाठी अमेरिकेनी तब्बल 22 दशलक्ष डॉलर (1 अब्ज 40 कोटी रुपये) खर्च केले, असल्याचं वृत्त न्यूयॉर्क टाइम्सनं दिलं आहे.
अमेरिकेच्या संरक्षण खात्यानं अनआयडेंटिफाइड फ्लाइंग ऑब्जेक्ट (UFO) किंवा उडत्या तबकड्यांच्या संशोधनावर अंदाजे दीड अब्ज रुपये खर्च केल्यांचं या वृत्तात म्हटलं आहे. संरक्षण खात्यासाठी असलेल्या आर्थिक तरतुदीतून हा निधी उपलब्ध करुन देण्यात आला होता.

फोटो स्रोत, Science Photo Library
पेंटागॉनमध्ये 2007 ते 2012 या काळात UFOवर संशोधन झालं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे याबाबत मोजक्या अधिकाऱ्यांनाच माहीत होतं.
न्यूयॉर्क टाइम्सच्या हाती आलेल्या संरक्षण खात्याच्या कागदपत्रानुसार, या कार्यक्रमांतर्गत काही विचित्र गोष्टींचा अभ्यास करण्यात आला आहे.
"आम्ही अशी काही उपकरणं आकाशात उडताना पाहिली ज्यांची ओळख पटली नाही. अशा उपकरणांचं निरीक्षण करण्यात आलं," अशी नोंद संरक्षण खात्यानं केली आहे.
"पण ही अज्ञात किंवा ओळखू न येणारी उपकरणं म्हणजे परग्रहावर जीवसृष्टी असण्याचा पुरावा नाही," असं देखील काही संशोधकांचं म्हणणं आहे.
'अॅडव्हांस एरोस्पेस थ्रेट आयडेंटिफिकेशन प्रोग्राम,' असं या कार्यक्रमाचं नाव आहे. डेमोक्रेटिक पक्षाचे सिनेटर हॅरी रीड यांच्या पुढाकारानं हे संशोधन सुरू करण्यात आलं होतं.

फोटो स्रोत, AFP/getty
त्यावेळी डेमोक्रेटिक पक्षाकडे सिनेटमध्ये संख्याबळ होतं. त्यामुळे परग्रहापासून असणाऱ्या संभावित धोक्यांवर संशोधन करण्यात यावं या त्यांच्या म्हणण्याला सिनेटकडून परवानगी मिळाली होती.
न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये रीड यांनी म्हटलं आहे, "मी जे काही केलं त्याचा मला पश्चाताप नाही. याआधी अशा प्रकारचं संशोधन कधीच करण्यात आलं नव्हतं. जे लोक माझ्यावर शंका घेत आहेत त्यांना मला इतकंच सांगावं वाटतं की परग्रहावर जीवसृष्टी आहे याचे अनेक पुरावे आहेत," असं रीड यांनी म्हटलं.
गंमत म्हणजे रीड हे नेवाडाचे रहिवासी आहेत. नेवाडा हा भाग 'एरिया 51' या विवादित जागेसाठी प्रसिद्ध आहे. एरिया 51मध्ये जाण्याची परवानगी कुणालाच नाही. एरिया 51च्या गूढतेचं वलय नेवाडाला लाभलं आहे.
या शोधमोहिमेचा खर्च वाढल्यामुळे हा कार्यक्रम बंद करावा लागला. 2012 नंतर या कार्यक्रमासाठी निधी देणं सरकारनं बंद केलं होतं तरी देखील संशोधकांनी UFO चा शोध घेणं थांबवलं नव्हतं. आपल्या रोजच्या कामाबरोबरच वैज्ञानिक UFO च्या संशोधनासंदर्भात काम करत असत.
"चीन किंवा रशियानं तर काही संशयास्पद गोष्टी पाठवल्या नाहीत ना की, परग्रहावरून काही उपकरणं खरंच येत आहेत, ज्याची आपल्याला अद्याप माहिती नाही," असा सवाल संशोधकांनी केला असल्याची नोंद कागदपत्रांमध्ये आहे.
मागील वर्षी अमेरिकेच्या केंद्रीय गुप्तहेर विभागानं (CIA) कोट्यवधी कागदपत्रं सर्वांसाठी खुली केली आहेत.
UFO किंवा उडत्या तबकड्या काही ठिकाणी दिसल्या असल्याची नोंद या कागदपत्रांमध्ये असल्याचं आढळून आलं आहे.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








