इंडोनेशियात ज्वालामुखीचा उद्रेक : बालीमध्ये अतिदक्षतेचा इशारा

इंडोनेशिया बेटांमधील बालीमध्ये माउंट आगुंग या ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानं वातावरणात प्रचंड धूर आणि राखेचे ढग पसरले आहेत. बाली बेटावर सरकारनं अतिदक्षतेचा इशारा दिला आला आहे.

ज्वालामुखीतून निघालेल्या राखेमुळे विमान वाहतुकीला रेड वॉर्निंग जारी करण्यात आली आहे. या रेड वॉर्निंगचा अर्थ उद्रेकाची शक्यता असून ज्वालामुखी आणखी धुमसण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आणखी राख उत्सर्जित होऊ शकते.

इंडोनेशियाच्या बाली बेटावरील ज्वालामुखीचा या आठवड्यातला हा दुसरा उद्रेक आहे. माउंट आगुंगमधून निघालेल्या राखमिश्रित धुराचे ढग 4000 मीटर (13,100 फूट) उंचीवर गेले आहेत.

या ज्वालामुखीमुळे बालीमध्ये वातारणात राखेचं साम्राज्य पसरलं असून प्रशासनाने मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. मास्कचं वितरणही सुरू केलं आहे.

बाली बेट हे जगातील लोकप्रिय पर्यटनस्थळ म्हणून ओळखलं जातं. बालीमधील सेमिन्याक आणि कुटा ही मुख्य पर्यटनस्थळं आहेत. या जागा ज्वालामुखीपासून 70 किलोमीटर अंतरावर आहेत.

बेटावरील विमानतळ सध्यातरी सुरळीत सुरू आहे. पण काही विमान कंपन्यांनी त्यांची सेवा रद्द केली आहे. ज्वालामुखीची राख विमानाच्या इंजिनाला धोका पोहोचवू शकते.

राखेचे ढग सध्या बाली बेटाच्या पूर्वेकडील लोम्बोक बेटाकडे सरकत आहेत. तिथलं मुख्य विमानतळ पूर्णतः बंद करण्यात आलं आहे.

इंडोनेशियाच्या आपत्कालीन व्यवस्थापन एजन्सीच्या माहिती संचालकांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे की, लोम्बोकच्या मातारम शहरात ज्वालामुखीच्या राखेच्या ढगांतून पाऊस पडला आहे.

'माऊंट आगुंगच्या परिसराचा धोका सोडल्यास बालीमध्ये पर्यटन अजूनही सुरक्षित आहे', असं त्यांच्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे.

या ज्वालामुखीच्या तोंडाजवळ आता मॅग्मा म्हणजे वितळलेले खडक दिसू लागले आहेत, असं तिथल्या अधिकारी आणि भूगर्भतज्ज्ञांनी सांगितलं.

7.5 किलोमीटरच्या परिघातील लोकांनी तत्काळ हा परिसर रिकामा करावा, सुरक्षेसाठी 'शांतपणे आणि शिस्तीत' बाहेर पडावे, असे आदेश देण्यात आले आहेत.

यावर्षी आतापर्यंत 1 लाख 40 हजार लोकांनी ज्वालामुखीच्या उद्रेकापासून वाचण्यासाठी शहरं सोडली आहेत. त्यापैकी 25,000 लोकं अजुनही तात्पुरत्या निवाऱ्यात आश्रयाला असल्याचं म्हटलं जातं. ज्वालुखीचा विस्फोट होऊ शकतो, या भीतीनं गडबडीत लोकांनी घरं सोडली आहेत.

इंडोनेशियामध्ये 130हून अधिक जिवंत ज्वालामुखी आहेत. त्यातील माउंट आगुंग या ज्वालामुखीचा 1963मध्ये उद्रेक झाला होता. तेव्हा हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला होता.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)