पाहा व्हीडिओ : पाकिस्तानात हिंसाचाराच्या केंद्रस्थानी तहरीक-ए-लब्बैक या रसूल अल्लाह आहे कोण?

    • Author, शुमैला जाफरी
    • Role, बीबीसी, इस्लामाबाद

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये गेल्या 20 दिवसांपासून एक आंदोलन पेटलं आहे. या आंदोलनाचं आयोजन तहरीक-ए-लब्बैक या रसूल अल्लाह (TLP) या मुस्लीम संघटनेनी केलं आहे.

निदर्शक आणि पोलिसांमध्ये झालेल्या संघर्षात अनेक मृत्युमुखी पडल्याचं सांगितलं जात असून 150 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत.

पाकिस्तानचे कायदा मंत्री जाहिद हमीद यांच्यावर ईश्वरनिंदेचा आरोप करत TLPनं त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.

TLP हा एक राजकीय पक्ष आहे, ज्याचं नेतृत्व खादिम हुसैन रिझवी हे करतात. पण काय आहे हा पक्ष ज्याने पाकिस्तानी सैन्याला संघर्षात सामील होण्यास भाग पाडलं आहे?

1. काय आहे TLP?

TLPची स्थापना 2015 साली झाली. 'ईशनिंदकांचा सर्वनाश' हा त्यांचा नारा आहे.

पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे गव्हर्नर सलमान तासीर यांची 2011 साली त्यांच्या सुरक्षारक्षकाने गोळ्या घालून हत्या केली होती.

तासीर हे पाकिस्तानच्या ईश्वरनिंदा कायद्याचे टीकाकार होते आणि या कायद्यात सुधारणेच्या बाजूने होते. यावरूनच त्यांचा सुरक्षारक्षक मुमताज कादरी याने त्यांना गोळ्या घालून ठार केले.

याच मुमताज कादरीच्या कार्याचं कौतुक करत करत 1 ऑगस्ट 2015मध्ये TLPची स्थापना झाली.

सुरुवातीला या पक्षाला केवळ एका संघटनेचं रूप होतं. लोकांचं समर्थन वाढू लागल्यानंतर त्यांच्या राजकीय हालचाली सुरू झाल्या.

सप्टेंबरमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये त्यांनी लाहोरमधील एका उमेदवाराला आपला पाठिंबा दिला होता. काही आठवड्यानंतर त्यांची निवडणूक आयोगात नोंदणी झाली, आणि त्यांना निवडणूक चिन्ह मिळालं.

पेशावरमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचा उमेदवार 7.6 टक्क्यांचं मताधिक्य घेऊन जिंकून आला.

2. काय आहे पक्षाचा उद्देश?

या पक्षाचा उद्देश पाकिस्तानला एक मुस्लीम राष्ट्र बनवणं हा आहे. हे राष्ट्र शरियत-ए-मोहम्मदीनुसार चालावं, अशी या पक्षाच्या नेत्यांची इच्छा आहे.

"पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला विदेशी शक्तींपासून वाचवणं हे आपलं कर्तव्य आहे," असं या पक्षाला वाटतं.

"पाकिस्तान सरकारनं जी धोरणं अवलंबली होती, त्यामुळं देशाचं नुकसान झालं आहे. आता आपल्याला स्वयंपूर्ण होण्याची आवश्यकता आहे."

त्यांच्या उद्दिष्टांविषयी त्यांनी सविस्तरपणे आपल्या वेबसाईटवर लिहिलं आहे.

या वेबसाइटवर ते पुढे म्हणतात, "स्वयंपूर्ण होण्याचा अर्थ असा नाही की आपण वेगळी चूल मांडावी. पण आपल्या देशानं आपल्याजवळ असलेल्या क्षमतांचा योग्य वापर करावा."

3. कोण आहे या पक्षाचा नेता?

TLPचे नेते खादिम हुसैन रिझवी आहेत. ते मौलवी असून TLPच्या वेबसाइटवर त्यांचा एक मोठा फोटो आढळतो.

त्या फोटोच्या बाजूला लिहिलेलं आहे, "देशवासियांनो, परिवर्तनाची वेळ आली आहे."

या वेबसाईटनुसार मौलना अल्लामा खादिन हुसैन रिझवी "हे इस्लाम धर्माचे विद्वान आहेत आणि ते निर्भय होऊन आपले मुद्दे मांडतात."

"इस्लाम अनेक पंथामध्ये विभागला गेला आहे. त्या सर्वांना एकत्र आणण्याचं कार्य रिझवी करत आहेत," असं ही वेबसाइट सांगते.

त्यांच्यासोबत एकूण 2809 कार्यकर्ते असल्याचा दावा त्यांच्या वेबसाइटवर करण्यात आला आहे.

4. हे आंदोलन का पेटलं?

2 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान निवडणूक कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली. सध्या प्रत्येक संसद सदस्याला 'प्रेषित पैगंबर हे इस्लाममधले अखेरचे प्रेषित होते', या आशयाची शपथ घ्यावी लागते.

या नव्या विधेयकाद्वारे ही तरतूद वगळण्यात येणार असल्याचे आरोप झाले. इस्लामिक संघटनांनी या तरतुदी इस्लामविरोधी आणि ईश्वरनिंदात्मक असल्याचं म्हणून विरोध केला. यावरूनच मग ठिकठिकाणी वाद भडकला होता.

TLPने कायदामंत्री झाहिद हामीद यांना जबाबदार धरलं आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

"आम्ही शपथ बदलली नाही. शपथेचा मसुदा तयार करताना कारकुनी चूक झाली," अशी सारवासारव करण्यात आली.

सरकारला मूळ मसुदा जशाला तसा ठेवावा लागला. असं असलं तरी TLPनं आपली मागणी लावून धरली आहे.

जाहिद हमीद यांनी राजीनामा द्यावा, यासाठी फैजाबाद इंटरचेंज महामार्गावर आंदोलन सुरू करण्यात आलं. यामुळं रावळपिंडी आणि इस्लामाबादकडे जाणाऱ्या वाहतुकीची कोंडी झाली.

गेल्या काही दिवसांमध्ये सरकारनं हस्तक्षेप करून हे आंदोलन शमविण्याचा प्रयत्न केला. पण हे आंदोलन अद्याप चालूच आहे.

फैजाबाद इंटरचेंज रिकामं करावं यासाठी सरकारनं आंदोलकांशी बोलणी सुरू केली. पण त्याचा काही फायदा झाला नाही.

20 नोव्हेंबरला इस्लामाबाद हायकोर्टनं सरकारला नोटीस पाठवली आणि विचारलं की अद्याप फैजाबाद इंटरचेंज मोकळं का झालं नाही?

5. सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेप

21 नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला आणि गृह मंत्रालयाकडून सविस्तर अहवाल मागवला. 23 नोव्हेंबरला पाकिस्तानच्या गुप्तहेर संस्था ISIनं सांगितलं की राजकीय स्वार्थासाठी हे आंदोलन चिघळवण्यात येत आहे.

24 नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाने आंदोलकांना इशारा दिला की ताबडतोब रस्ता रिकामा करा, अन्यथा कारवाई करण्यात येईल.

अखेर 25 नोव्हेंबर रोजी पाकिस्तान सरकारनं आंदोलकांना दिलेली मुदत संपली आणि मग पोलिसांनी कारवाई सुरू केली.

जमावाला पांगविण्यासाठी अश्रुधूर आणि रबरी गोळ्यांचा माराही करण्यात आला. उत्तरादाखल निदर्शकांनी पोलिसांवर दगडफेक केली.

आणि परिस्थिती हाताबाहेर गेली. आता पाकिस्तानने सैन्य बोलवलं असून 200हून अधिक लोक जखमी झाले आहेत. काहींचा बळी गेल्याचं सांगण्यात येत आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)