मोगादिशूमध्ये शक्तीशाली स्फोट, मृतांची संख्या 230

फोटो स्रोत, Reuters
सोमालियाची राजधानी मोगादिशूमध्ये शनिवारी झालेल्या बाँब हल्ल्यातील मृतांची संख्या 230 एवढी झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
स्फोटकांनी भरलेला ट्रक एका हॉटेलमध्ये घुसवून हा स्फोट घडवण्यात आला. सोमालियात 2007 पासून इस्लामिक गट अल-शबाबनं कारवाया सुरू केल्यानंतर हा सर्वात मोठा जहालवादी हल्ला आहे.
राष्ट्राध्यक्ष मोहंमद अब्दुललाही 'फरमाजो' मोहंमद यांनी या हल्ल्यासाठी अल शबाबला जबाबदार धरलं असून हे कृत्य निंदनीय असल्याचं म्हटल आहे.
पण या हल्ल्याची जबाबदारी अजूनपर्यंत कुणीही स्वीकारलेली नाही.
राष्ट्राध्यक्ष म्हणाले, "बंधुंनो, कामावर जात असलेल्या नागरिकांवर झालेला हा क्रुर हल्ला झाला आहे."

फोटो स्रोत, AFP
त्यांनी या हल्ल्यानंतर 3 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. हल्ला झाला त्याठिकाणी नागरिक आपल्या नातेवाईकांना शोधण्यासाठी रविवारी आले होते, असं वृत्त स्थानिक माध्यमांनी दिलं आहे.
जखमींची संख्या 300पेक्षा जास्त
पोलीस अधिकारी इब्राहिम मोहंमद यांनी एएफपी वृत्तसंस्थेला सांगितले की, "जखमींची संख्या 300च्या वर असून, त्यातील काही गंभीर आहेत. हे लक्षात घेता मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे."
तसंच मदिना परिसरात झालेल्या दुसऱ्या बाँब हल्ल्यात दोन नागरिक ठार झाल्याच्या वृत्ताला अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.
मोगादिशूचे महापौर थाबित अब्दी यांनी निषेधासाठी जमलेल्या नागरिकांना ऐक्याचे आवाहन केले आहे. मोगादिशूला दफनभूमी बनू देऊ नका, असं आवाहन त्यांनी केले आहे. "ही श्रद्धेची भूमी आहे. जर आपण एकत्र राहिलो तर शत्रूंना हरवू शकू," असे ते म्हणाले.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या बीबीसीच्या सोमालियातील प्रतिनिधीनं दिलेल्या माहितीनुसार हल्ला झालेलं सफारी हॉटेल कोसळलं असून लोक ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत.
हा हल्ला पाहणारे स्थानिक नागरिक मुहिदिन अली यांनी हा हल्ला आतापर्यंतच सर्वात मोठा हल्ला असून संपूर्ण परिसर उध्वस्त झाला आहे, अशी माहिती एएफपी या वृत्तसंस्थेला दिली आहे.
तर मदिना हॉस्पिटलचे संचालक मोहंमद युसुफ हसन यांनी हल्ल्याची तीव्रता पाहून धक्का बसल्याचं सांगितलं आहे. "72 जखमींना आमच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. यातील 25 गंभीर जखमी आहेत. अनेकांना त्यांचे हातपाय गमवावे लागले आहेत," असं ते म्हणाले.
"जे घडल ते भयानक आहे, यापूर्वी मी असं काही पाहिलं नव्हतं. अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. मृतदेहांची ओळख पटवणं ही कठीण बनलं आहे." असंही त्यांनी म्हंटलं आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर निषेध
- आफ्रिकन कमिशनचे अध्यक्ष मुसा फकी महामत यांनी शांती आणि सुरक्षेसाठी सोमलियाला सहकार्य सुरू ठेवण्यात येईल, असं सांगितलं.
- तुर्कस्ताननं वैद्यकीय मदतीची घोषणा केली आहे.
- अमेरिकेनं हा हल्ला भ्याड असल्याचं म्हटलं. दहशतवादाशी लढण्यासाठी आफ्रिकेतील देशांना मदत सुरू राहिलं असं अमेरिकेनं स्पष्ट केलंय.
- यूकेचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन यांनी त्यांच्या भावना पीडितांच्या कुटुंबीय आणि सरकार सोबत असल्याचं म्हटलं आहे.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)










