कॅलिफोर्नियाच्या वणव्यात 22 जण ठार

अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये वाइन रीजनमध्ये पेटलेल्या भीषण वणव्यात 22 जणांचा होरपळून मृत्यू झाला.

या आगीत दोन हजारांवर इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. तसंच 150 जण बेपत्ता आहेत.

ही आग झपाट्याने रहिवाशी भागांमध्ये पसरत असून इथल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

नापा, सोनोमा आणि युबा या भागातून अंदाजे 20,000 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर जेरी ब्रॉन यांनी या भागात आणीबाणी जाहीर केली आहे.

या आगीत संपत्तीचे नुकसान झाले असून लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे कार्य अद्याप सुरू असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

सोनोमा भागातील अकरा जण आगीचे भक्ष्य ठरले आहेत, तर नापा भागातील दोन जण मृत्यूमुखी पडले आहेत. मेंडिसोनो भागातील एक जण ठार झाला आहे.

आतापर्यंत हजारो एकर शेती जळून खाक झाली आहे. या भागातील 1500 पेक्षा जास्त घरं आणि वायनरीज जळाल्या असल्याचंही कॅलिफोर्नियाचे वन आणि अग्निशमन दल प्रमुख किम पिमलोट यांनी सांगितलं आहे.

रविवारी रात्रीपासून ही आग सुरू झालेल्या या आगीचे कारण अद्याप समजले नाही, असे अधिकाऱ्यांनी म्हटले.

सोसाट्याचा वारा, किमान आद्रता, कोरडे आणि उष्ण हवामानामुळे आग झपाट्याने पसरत आहे.

या भागातील वायनरीजमध्ये काम करणाऱ्या कामगारांना हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षित स्थळी सोडण्यात आले आहे.

जिथं आग लागली तिथून ती वेगाने पसरेल अशी धोक्याची सूचना राष्ट्रीय हवामान सेवेनी दिली आहे.

"माझी द्राक्षाची बाग जळून खाक झाली. पण मी आणि माझे कुटुंबीय त्या आगीतून बचावलो," असं केन मोहोल सीबर्ट या वाइन यार्डच्या मालकाने सांगितलं.

"सुरुवातीला वारा नव्हताच. नंतर सुसाट वारा आला. दुसऱ्या बाजूने देखील वारा आला आणि आम्हाला आगीने चोहोबाजूने घेरलं," असं सीबर्ट यांनी सांगितलं.

कॅलिफोर्निया अग्नी विभागाच्या वेबसाइटवरही या आगीमध्ये हजारो एकर जंगल भस्म झाल्याचं म्हटलं आहे. ही कॅलिफोर्नियात लागलेली आतापर्यंतची सर्वात भीषण आग असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

सप्टेंबर महिन्यात लॉस एंजेलिसच्या जंगलात भीषण आग लागली होती.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)