बिपरजॉयमुळे घरांचं नुकसान, उन्मळून पडलेली झाडं, सोसाट्याचा वारा, पाऊस आणि सर्वत्र पाणीच पाणी

अरबी समुद्रात तयार झालेलं बिपरजॉय चक्रीवादळ गुरुवारी (15 जून) सायंकाळी 6.30 वाजता गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्यास सुरुवात झाली आणि ही प्रक्रिया जवळपास मध्यरात्रीपर्यंत सुरू होती.

पाकिस्तानातील कराची आणि गुजरातमधील मांडवी दरम्यान असलेल्या जाखुआ नावाच्या ठिकाणाजवळून चक्रीवादळाचा लँडफॉल सुरू झाल्याचं हवामान खात्याचं म्हणणं आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 15 जूनच्या मध्यरात्रीपर्यंत लँडफॉलची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे ताशी 115 ते 125 किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहू लागले आणि समुद्रात उंच लाटा उसळल्या.

गुजरात सरकारच्या म्हणण्यानुसार, चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर किनारी भागातून किमान एक लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय.

लँडफॉलनंतर हवामान खात्याने वादळाची श्रेणी 'अत्यंत तीव्र चक्रीवादळ'वरून 'तीव्र चक्रीवादळ' अशी बदललीय.

दुसरीकडे, पाकिस्तानचे हवामान बदलासंदर्भातील मंत्री शेरी रहमान यांनी म्हटलंय की, पाकिस्तानने यापूर्वी इतक्या तीव्र वादळाचा सामना केला नव्हता.

ते पुढे म्हणाले की, "वादळाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या दक्षिण-पूर्व भागात 82,000 लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आलंय."

त्यामुळे कराचीमध्ये मुसळधार पाऊस पडून, तिथं पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जातेय.

अनेक ट्रेन रद्द

बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने शुक्रवारी (16 जून) 21 गाड्या रद्द केल्या, तर प्रभावित ठिकाणे पाहता 7 गाड्यांचे मार्ग बदलण्यात आलेत.

वादळाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने राजकोट, ओखा, द्वारका, जामनगर, मोरबीसह किमान 14 रेल्वे स्थानकांसाठी हेल्पलाइन क्रमांकही जारी केले आहेत.

गुजरातमधील 940 गावं अंधारात

ANI या वृत्तसंस्थेने गुजरातचे मदतकार्य विभागाचे आयुक्त आलोक सिंह यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, या चक्रवादळामुळे अद्याप कुठलीही जीवितहानी झाली नाहीय.

आलोक सिंह पुढे म्हणाले की, "या चक्रीवादळामुळे आतापर्यंत 22 जण जखमी झाले आहेत. मात्र, अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 23 जनावरांचा मृत्यू झाला आहे आणि एकूण 524 झाडे उन्मळून पडली आहेत. अनेक ठिकाणी विजेचे खांब पडले आहेत. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. सुमारे 940 गावांचा पुरवठा प्रभावित झाला आहे."

मांडवीतील परिस्थिती

गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात वादळामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

मांडवी शहरासह जखौ-मांडवी रस्ता आणि परिसरात जोरदार वाऱ्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडली आहेत, तर अनेक ठिकाणचे दिवे गेले आहेत. त्यामुळे समुद्राजवळील सखल भागात पाणी तुंबले होते.

मांडवीचे जिल्हाधिकारी अमित अरोरा यांनी वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले की, परिस्थिती नियंत्रणात आहे.

ते म्हणाले, "वादळामुळे 200 विद्युत खांब उन्मळून पडले आहेत आणि 250 झाडे उन्मळून पडली आहेत. सुरक्षेसाठी पाच तालुक्यांमध्ये वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. सर्वच भागात जोरदार वाऱ्यासह पाऊस पडत आहे. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही."

"वादळ जमिनीवर येण्याआधी, लोकांना किनार्‍यापासून 10 किमी अंतरावर हलवण्यात आले होते आणि त्यांना मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आले होते. तसंच, आम्ही किमान 25,000 गुरे सुरक्षित ठिकाणी हलवली होती."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)