You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'तो माझा छळ करायचा, पैसे उकळायचा; तरी मी त्याच्या पाठिशी राहिले'
- Author, मेघा मोहन आणि फे नर्स
- Role, बीबीसी प्रतिनिधी
नेटफ्लिक्सवर 'टिंडर स्विंडलर' ही डॉक्युमेंट्री फेब्रुवारी 2022 मध्ये आली तेव्हा सिमॉन लेव्हिव्हची गर्लफ्रेंड त्याच्या पाठीशी उभी राहिली.
आता तिच्या मते त्यावेळी तिच्याकडे कोणताही पर्याय नव्हता. कारण तिच्यावर एक प्रकारचं भावनिक नियंत्रण होतं.
टिंडर या डेटिंग अॅपवर तरुणींना भुलवून त्यांच्याशी प्रेमाचं नाटक करून त्यांच्याकडून हजारो डॉलर्स उकळणाऱ्या सिमॉन लेव्हिव्हची कहाणी अफलातून आहे. त्याच्या फसवणुकीची पद्धत माहिती असूनसुद्धा त्याच्याबरोबर असणारी केट कोनलिन आता समोर आली आहे.
एक ब्लाँड तरुणी तिच्या पलंगावर बसली होती. डावा हात तिच्या डाव्या पायावर फिरवत होती आणि फोनवर बोलत होती. तिचे काही केस गालावर चिकटले होते आणि ते तिच्या डोळ्यातल्या अश्रूंनी ओले झाले होते.
तिच्या टाचेवर कापल्याची जखम होती. तिचे डोळे आणि चेहरा लाल झाला होता. तिच्या आवाजात मात्र कमालीची स्पष्टता होती. ती एका माणसाला तिच्या अपार्टमेंटचा पत्ता सांगत होती. तिच्यासमोर एक उघडलेली सुटकेस जमिनीवर पडली होती.
आम्ही तिच्या फोनवर 29 मार्च 2022 ला शूट केलेला एक व्हीडिओ पाहत होतो. ज्या माणसाने तो शूट केला, तो म्हणत होता, "हे सगळं थोतांड आहे. तिला काहीही झालेलं नाही."
सुरुवातीला केट कोनलिनच्या मित्रांनी सिमॉनचं कौतुक केलं.
"केट, तो अतिशय उत्तम आहे." ती सांगत होती, "हे थोडंसं भीतीदायक होतं."
सिमॉन हेडा हायतचा (ज्याने त्याचं कायदेशीर नाव बदलून सिमॉन लेव्हिव्ह ठेवलं होतं.) तिच्या इन्स्टाग्रामच्या इनबॉक्स मध्ये 2020 च्या सुमारास प्रवेश झाला. काही आठवड्यातच ते एकत्र आले.
"सुरुवातीच्या काळात आमच्या प्रेमाला पूर आला होता" कोनलिन बीबीसीशी बोलत होती. "त्याला माझं व्यसन लागलं होतं."
लेव्हिव्ह तिच्याबरोबर मॉडेलिंगच्या शूटला यायचा. तिचं काम संपेपर्यंत तिची वाट पहायचा. त्याने तिचं घरही स्वच्छ केलं होतं आणि तो तिला लांबलचक प्रेमळ व्हॉईसनोटही पाठवायचा.
हे सगळं जरा अती होत होतं. मात्र 23 वर्षीय केटला असं वाटलं की प्रेम कदाचित असंच असतं.
काही काळानंतर मात्र त्यांच्यात भांडणं सुरू झाली.
केट सांगते की को तिच्या व्यक्तिमत्त्वावर टीका करायला लागला. तिचं वजन, तिची त्वचा यावर बोलायला लागला. कारण केटला प्रचंड तारुण्यपिटिका येत असत. तिचा आत्मविश्वास कमी होऊ लागला. आता पुढे काय होईल याची तिला शाश्वती नव्हती.
"मला ही सगळी एक तारेवरची विचित्र कसरत वाटायची," ती सांगते.
त्या 18 महिन्यात जेव्हापर्यंत ते एकत्र होते, तिच्या मैत्रिणींशी भेटी कमी होऊ लागल्या. जेव्हा भेट व्हायची तेव्हा त्या म्हणायच्या की, तू आधीसारखी तेजस्वी, लोकांमध्ये मिसळणारी अशी व्यक्ती राहिलेली नाहीस.
"त्या म्हणायच्या की, मी काळवंडले आहे." तिच्या हाताकडे बघून ती बोलत होती.
काही काळानंतर लेविव्ह पैसे मागायला लागायला होता. एकेकावेळी तो हजारो डॉलर्स मागायला लागला. त्याने तिच्याकडून तब्बल 150,000 डॉलर्स उधार घेतले. ती आंतरराष्ट्रीय ख्यातीची मॉडेल आहे. व्होग, ग्राझिया इटली, आणि वॉलपेपर मॅगझिनच्या कव्हरपेजवर तिचा फोटो आला होता. तिची आर्थिक बाजू भक्कम होती आणि त्याला याची कल्पना होती.
केटने लेविव्हच्या अनेक व्हॉईसनोट्स बीबीसीला पाठवल्या. तो त्यात ओरडतोय, तिला पैसे मागतोय कारण त्याचा स्वत:चा पैसा गुंतवणुकांमध्ये अडकला आहे असं तो सांगतोय.
एका नोटमध्ये तो तिच्यावर ओरडला आहे. तो पैसे न देण्याचं कारण सांगतो.
"केट, मी कोट्यधीश आहे. हे वास्तव आहे. मात्र या क्षणी मी अडकलो आहे. कळलं? मी अडकलो आहे. तुझ्या सडक्या मेंदूला हे कळतंय का? मंदबुद्धी, मी अडकलोय केट.. मी काही तुझ्याकडून पैसे चोरलेले नाहीत. तू ते मला तुझ्या इच्छेने दिले आहे. मी आत्ता अडकलो आहे बस्स."
टिंडर स्विंडलर ही डॉक्युमेंट्री फेब्रुवारी 2022 मध्ये प्रसारित झाली. जवळजवळ 90 देशात सर्वांत जास्त पाहिलेली डॉक्युमेंट्री म्हणून ती गणली गेली. सिमॉन लेव्हिव्ह अनेक बायकांना टिंडर या अॅपवर भेटला आणि जवळजवळ दहा मिलियन डॉलरचा गंडा घातल्याचा त्याच्यावर आरोप होता. त्याने या आरोपांचा इन्कार केला.
केट सांगते की तिने ती डॉक्युमेंट्री सिमॉनच्या शेजारी बसून पाहिली होती.
"हे सगळं खरं आहे हे मला कळत होतं." ती सांगत होती.
मात्र या त्याची बाजू स्वीकारणं तिला भाग होतं. तिच्या मते या नात्यात त्याचाच दबदबा जास्त होता. सार्वजनिकरित्या त्याची बाजू सांभाळायला केटला सांगणं त्याच्यासाठी सोपं होतं.
"त्याने मला सांगितलं की तू जर माझ्या बाजूने उभी राहिलीस तर लोक तुझ्यावर विश्वास ठेवतील कारण तू बाई आहेस."
या डॉक्युमेंट्रीच्या शेवटाला केट दिसली आहे. लोकांनी तिला इनबॉक्समध्ये फार शिव्या दिल्या.
तुला कॅन्सर व्हायला हवा, तुला कारने उडवायला हवं, कारण तेव्हा आम्ही दोघं एकत्र होतो, असं केटने सांगितलं.
29 मार्चला मात्र त्यांच्यातला वाद विकोपाला गेला.
"मी म्हणाले, बास झालं. आता मी चालले. मी माझं सामान बांधायला घेतलं." केट सांगते.
मग हा वाद झटापटीपर्यंत गेला. तिच्या मते त्याने तिला धक्का दिला. त्या गोंधळात तिच्या पायाला जखम झाली.
"माझ्या पायातून रक्त यायला लागलं. मी अर्धमेले झाले. मला जीव द्यावासा वाटू लागला." ती म्हणाली.
हे सगळं झाल्यानंतर भांडण थांबलं. त्यानंतर लेव्हिव्हने केटचा व्हीडिओ काढला. तिने अँम्ब्युलन्स बोलावली आणि तिला काहीही झालेलं नाही म्हणत ती ओरडायला लागली.
हॉस्पिटलमध्ये गेल्यावर तिने लेव्हिव्हच्या विरुद्ध तक्रार दाखल केली.
जेव्हा आम्ही लेव्हिव्ह ला यासंबंधात प्रतिक्रिया मागितली, तेव्हा त्याने 45 मिनिटात नऊ इमेल पाठवले. त्यात दोन व्हीडिओ होते. जे त्याने Cameo अॅपच्या माध्यमातून पाठवले.
याबरोबरच त्याने अनेक स्क्रीनशॉट पाठवले. त्यात केट ओरडतेय आणि लेव्हिव्हला धक्काबुक्की करतेय.
लेव्हिव्हच्या मते त्याने कोणत्याही मुलीला शारीरिक त्रास दिलेला नाही.
जेन स्टार्लिंग छळवणुकीच्या विरोधात काम करतात. त्यांच्या मते केट आणि लेव्हिव्ह यांच्या नात्याचं जे झालं तेच इतर जणींबरोबरही झालं आहे.
"असा धाकटदपशा दाखवणं हे रोजचंच आहे. हे इतकं नियमित झालं आहे की त्याची आता कोणी दखलही घेईनासं झालं." त्या सांगतात.
"अनेक हिंसक वृत्तीचे पुरुष त्यांच्या जोडीदारांचा शारीरिक छळ करत नाहीत. मात्र ते काय त्यांना कह्यात ठेवण्याचा प्रयत्न करतात. ते अति चिकित्सक असतात, आणि सतत धमक्या देत असतात."
आम्ही केटने केलेल्या आरोपांचा उल्लेख लेव्हिव्हसमोर केला. त्याने तिच्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाचाही उल्लेख केला. तेव्हा ती खोटं बोलतेय असं तो म्हणाला.
इतक्या बायकांची फसवणूक करून सुद्धा लेव्हिव्हला सोशल मीडियावर हजारो फॉलोअर्स आहेत. तो अजूनही महागड्या कारमध्ये फिरण्याचे आणि सुंदर मुलींचे व्हीडिओ पोस्ट करत असतो. काही व्हीडिओमध्ये लोक त्याच्याबरोबर फोटो काढण्याची गळ घालतानाही दिसत आहेत. जणू काही तो सेलिब्रिटी आहे. तो प्रत्येक व्यक्तिगत व्हीडिओसाठी 100 डॉलर्स आणि व्हीडिओ मेसेजसाठी 165 डॉलर घेतले.
"माझ्यामते हे सगळं पुरुषसत्ताक वृत्तीचं उदात्तीकरण आहे आणि तेच योग्य आहे असं लहान मुलांच्या मनावर बिंबवण्याचाही प्रयत्न केला जात आहे." असं जेसिका रिविस म्हणाल्या.
त्या ADL's Center on Extremism च्या संपादकीय संचालक आहेत.
"हे फार धोकादायक आहे. कारण यातून असा संदेश जातोय की तुम्ही अशी जीवनशैली अंगीकारू शकता. स्त्रियांचा द्वेष हा या जीवनशैलीचा महत्त्वाचा भाग आहे."
लेव्हिव्हला आम्ही त्याच्या सोशल मीडियाच्या पोस्टबदद्ल विचारलं मात्र त्याने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
आज केट जगातील पहिली मॉडेल अशी असेल की वजन वाढल्यामुळे तिला आनंद झाला आहे. ती म्हणतेय की ती लेव्हिव्ह बरोबर असताना तिचं वजन कमालीचं कमी झालं होतं.
'टिंडर स्विंडलर' रिलीज झाल्यापासून तिचं मॉडेलिंग करिअर पुन्हा बहरलं आहे. अशा प्रकारच्या नात्यात काय होतं हे तिला तिच्या तरुण मैत्रिणींना सांगायचं आहे.
"मला जे अनुभव आले आणि ज्या पद्धतीने नात्यातून बाहेर आले, आणि आता मी या नात्यातून बाहेर पडलेय तेव्हा मी अधिक सुंदर दिसतेय आणि माझा आत्मविश्वासही वाढला आहे. एखादी मुलगी अशा पद्धतीने अडकली असेल तर तीही नक्कीच यातून बाहेर पडू शकते."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)