You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शिवसेनेचं धनुष्यबाण हिसकावलं तरी प्रभू श्रीराम माझ्यासोबत - उद्धव ठाकरे
निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हिसकावला तरी प्रभू श्रीराम माझ्यासोबत आहेत, असं प्रतिपादन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. उत्तर भारतीय समाज मेळाव्यात रविवारी (19 फेब्रुवारी) उद्धव ठाकरे बोलत होते.
मी काल रस्त्यावर उतरून त्यांना आव्हान दिलं आहे. ज्या लोकांनी माझ्या पक्षाचं नाव आणि चिन्ह चोरलं त्यांनी निवडणुकीत माझ्या समोर यावं, पाहूया काय होतं, असं ठाकरे यांनी म्हटलं.
गेल्या 25-30 वर्षांपासून काँग्रेस-राष्ट्रवादी विरोधात शिवसेना होती. आता मी भाजपला सोडलं, म्हणजे हिंदुत्व सोडलं असं नाही. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही. भाजपचं हिंदुत्व आमचं हिंदुत्व नाही. राष्ट्रीयत्व हेच हिंदुत्व, असं बाळासाहेब म्हणायचे. कुटुंबात-लोकांमध्ये भांडण लावणं हे हिंदुत्व नाही, असं त्यांनी म्हटलं.
शिवसेनेच्या नाव आणि चिन्हासाठी आतापर्यंत 2000 कोटींचा सौदा - संजय राऊत
शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाच्या ट्विटर हँडलला टॅग करून अत्यंत गंभीर आरोप केलाय. शिवसेनेच्या नाव आणि चिन्हासाठी दोन हजार कोटींचे व्यवहार झाल्याचा आरोप राऊतांनी केलाय.
संजय राऊत ट्वीटमध्ये म्हणालेत की, "मला विश्वास आहे की, निवडणूक चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आतापर्यंत 2,000 कोटींचा सौदा आणि देवघेव झाली आहे. हा प्राथमिक आकडा आहे आणि 100 टक्के खरा आहे."
तसंच, "लवकरच अनेक गोष्टींचा उलगडा होईल. देशाच्या इतिहासात असं कधीच झालं नव्हतं," असंही राऊत म्हणाले.
या ट्वीटला संजय राऊत यांनी पंतप्रधान कार्यालय आणि निवडणूक आयोगाला टॅग केलंय.
'शिवसेनेचा संयम पाहिलात, राग पाहू नका' - उद्धव ठाकरे
भाजप आणि पंतप्रधानांना वाटत असेल की त्यांच्या हाताशी असलेल्या सरकारी यंत्रणा अंगावर सोडून सगळे पक्ष संपवता येतील. पण शिवसेना संपवणं त्यांना कदापि शक्य नाही. शिवसेनेचा संयम पाहिलात, राग पाहू नका, असा इशारा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
वांद्रे कलानगर येथील मातोश्री निवासस्थानाबाहेर उद्धव ठाकरे गटाने शक्तिप्रदर्शन केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी एका ओपन कारमधून शिवसैनिकांना संबोधित केलं.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, "आपल्या शिवसेनेचं नाव आणि चिन्ह चोरणाऱ्यांना निवडणुकीत गाडल्याशिवाय राहायचं नाही. हे ज्यांनी चोरलं त्यांना माहिती नाही, त्यांनी मधमाशांच्या पोळ्यावर दगड मारला आहे. त्यांना आजवर मधाची चव चाखली पण आता त्यांना डंख मारायची वेळ आली आहे.
तुम्ही सगळेजण चिडला आहात, हे मला माहिती आहे. 75 वर्षांत अशा प्रकारे आघात कोणत्याही पक्षावर झालेला नाही.
ते म्हणाले, "भाजप आणि पंतप्रधानांना वाटत असेल की त्यांच्या हाताशी असलेल्या सरकारी यंत्रणा अंगावर सोडून सगळे पक्ष संपवता येतील. पण शिवसेना संपवणं त्यांना कदापि शक्य नाही. "
निवडणूक आयोगाने काल जी गुलामी केली, त्यामुळे निवडणूक आयुक्त निवृत्त झाल्यानंतर कदाचित कुठे तरी राज्यपाल होऊ शकतील. शिवसेना कुणाची हे तुम्ही तुमच्या मालकांच्या आदेशाने ठरवू शकत नाही. महाराष्ट्राची जनता ते ठरवेल.
त्यांना शिवसेना हे नाव, बाळासाहेब ठाकरेंचा चेहरा हवा आहे. पण शिवसेनेचं कुटुंब नको आहे. आमच्यावर आरोप केले जातात की तुम्ही मोदींचं नाव सांगून मते मिळवलीत. तेव्हा आमची युती होती.
एक जमाना जरूर होता, त्यावेळी मोदींचे मुखवटे घालून सभेला लोक येत होते. पण आता मोदींना बाळासाहेबांचा मुखवटा घालून महाराष्ट्रात यावं लागत आहे. मोदींच्या नावाने आता महाराष्ट्रात मते मिळू शकत नाहीत.
धनुष्यबाण चोरलेल्यांना मी आव्हान देतो की मर्द असाल तर निवडणुकीला सामोरे जाऊया. मी मशाल घेऊन येतो.
तुमच्या ताकदीच्या जोरावर मी उभा आहे. असे कितीतरी चोर आणि चोरबाजाराचे मालक आले तर भगवा फडकवायची ताकद माझ्यात आहे.
काँग्रेस, सपा फुटली होती पण चिन्ह गोठवलं गेलं असं गटाला नाव चिन्ह दिलेलं नाही. पंतप्रधानांचे गुलाम असलेल्या निवडणूक आयुक्तांनी हे केलेलं आहे.
माझ्या हातात आज काही नाही. मी तुम्हाला काही देऊ शकत नाही. शिवसेनेचा संयम पाहिला आहे राग पाहू नका.
माझा चेहरा कसा होता काल आणि धनुष्यबाण चोरला त्याचा चेहरा कसा होता, हे पाहा, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी कुटुंबीयांसह नेत्यांना बेदखल केलं-शेलार
"मुखवटा आणि मुखवट्याचा खेळ हा नाक्यावर खेळ करणाऱ्या लोकांचा असतो. असे खेळ करणाऱ्यांनाच मुखवट्याची भाषा कळते. तिथून जाणारा माणूस चिल्लर रुपया फेकतो. त्यापेक्षा जास्त किंमत समाजात नाही", असं भाजप नेते आशिष शेलार म्हणाले.
ते पुढे म्हणाले, "कोणत्याही माणसाला अपील करण्याचा अधिकार असतो. त्यांना तो अधिकार आहे. त्यांचे विश्वविख्यात प्रवक्ते जे बोलत आहेत. न्यायालयासमोर अपील करताना असे बेताल वक्तव्य करुन दाखवावं. बुंद से गयी वो हौद से नही आती. सर्वस्व जनतेने संपवलं आहे. त्यांच्यावर परिस्थिती दारोदार भटकण्याची आली आहे. ज्या उद्धवजींनी गणेश नाईक यांच्यापासून नारायण राणे यांच्यापर्यंत सगळ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. ज्या उद्धवजींनी त्या शिवसेनेसाठी फायरब्रँड म्हणून काम करणारे चुलतभाऊ राज ठाकरे यांना बेदखल केलं. ज्या उद्धवजींनी स्वत:च्या परिवाराच्या प्रॉपर्टीसाठी सख्ख्या भावाला कोर्टात नेलं. त्या उद्धवजींना शिवसेनेनेच बेदखल केलं. न्यायालयाने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं. अहंकाराच्या घरातून बाहेर पडून आत्मचिंतनाच्या नंदनवनात ते आले तर बरं एवढंच आम्ही सांगू शकतो".
शिवसेनेचं धनुष्यबाण एकनाथ शिंदेंकडे
धनुष्यबाण चिन्ह कुणाचं यावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे. उद्धव ठाकरेंविरुद्ध बंड करून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे यांच्याकडेच धनुष्यबाण हे चिन्ह राहील, असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे.
एकनाथ शिंदे यांचं बंड आणि त्यानंतरच्या घडामोडीनंतर शिवसेनेचं नाव आणि त्यांचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आलं होतं. मात्र अखेर, शिवसेनेच्या नावासह धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना मिळेल, असं आयोगाने म्हटलं.
"2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या विजयी उमेदवारांपैकी 76% मते शिंदेंबरोबर असलेल्या आमदारांना मिळाली होती. उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांना 23.5% मते मिळाली होती," असं या प्रकरणात दिलेल्या आदेशात आयोगाने म्हटलं आहे.
2018 साली शिवसेना पक्ष घटनेत ज्या दुरुस्त्या केल्या गेल्या त्यांची आयोगाकडे नोंद नाही. 2018 च्या पक्षघटनेनुसार राष्ट्रीय कार्यकारिणी पक्षाची सर्वोच्च समिती आहे ज्यात 13 सदस्य होते. पण ती प्रतिनिधी सभेमार्फत अस्तित्वात आली.
27 फेब्रुवारी 2018 रोजी जी पदाधिकारी नावे आयोगाला कळवली गेली त्यात प्रतिनिधी सभेचे विवरण नाही. त्यामुळे संघटनेत बहुमत असल्याच्या कसोटीची शहानिशा होऊ शकली नाही. अखेर निवडून आलेल्या सदस्यांमध्ये बहुमत या निष्कर्ष ग्राह्य धरावा लागला, असं आयोगाच्या आदेशात म्हटलं आहे.
शिंदे यांना धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर त्यांची प्रतिक्रियाही समोर आली.
"अखेर सत्याचा विजय झाला. हा बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांचा विजय आहे. बाळासाहेबांच्या विचारांशी आणि आम्ही घेतलेल्या निर्णयाशी एकरुप झालेल्या आमदार-खासदार, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि लाखो शिवसैनिकांचा हा विजय आहे. हा लोकशाहीचा विजय आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
देशात बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेप्रमाणे कारभार चालतो. या घटनेच्या आधारावरच आमचं सरकार स्थापन झालं. त्यामुळे निवडणूक आयोगाने दिलेला आजचा निर्णय हा मुद्द्यांवर आधारीत आहे. याबाबत निवडणूक आयोगाला धन्यवाद देतो, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, निवडणूक आयोगावरील आमचा विश्वास उडाला आहे. सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य तोडून आता असत्यमेव जयते करावे लागेल."
"खरेदी विक्री कुठपर्यंत गेली आहे. हे आज स्पष्ट झाले. जो पक्ष बाळासाहेब ठाकरे आणि लाखो शिवसैनिकांनी रक्त आणि बलिदान देऊन उभा केला. तो पक्ष आणि त्याचे चिन्ह 40 बाजारबुणगे विकत घेतात. याची नोंद इतिहासात राहील. आज या देशातल्या निवडणूक आयोगावरचा विश्वास जनतेने गमावला," असं राऊत यांनी म्हटलं.
"जनता आमच्या सोबत आहे. आम्ही नवीन चिन्ह घेऊन जनतेच्या न्यायालयात जाऊ आणि शिवसेनेला पुन्हा उभी करुन दाखवू, असंही त्यांनी म्हटलं.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले, "हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर वाटचाल करीत हिंदूत्त्व आणि सत्यासाठी संघर्ष करणार्या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना शिवसेना पक्ष हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्याबद्दल मी त्यांचे आणि राज्यातील तमाम शिवसैनिकांचे मनापासून अभिनंदन करतो."
तर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
ते म्हणाले, "निवडणूक आयोगाचा निकाल हा अतिशय अनपेक्षित असा आहे. सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना आयोगाने एवढी घाई का केली, हे कळायला मार्ग नाही. निवडणूक आयोगाने तो निकाल दिलेला असला तरी उद्ध ठाकरे याबाबत सुप्रीम कोर्टात जातील, असं माझं मत आहे.
महाराष्ट्रातला शिवसैनिक हा उद्धव ठाकरेंच्याच बाजूने आहे, असं पवार म्हणाले.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)