You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
IIT तील विद्यार्थ्याची आत्महत्या; कॅम्पसमध्ये निदर्शनं आणि कॅंडलमार्च
मुंबईतील आयआयटी बॉम्बे पवई कॅम्पसच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
18 वर्षाच्या दर्शन सोलंकी या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर कॅम्पसमध्ये निदर्शनं होत आहेत.
पवई पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू असल्याचं सांगितलं आहे.
दर्शन सोलंकी मुळचा अहमदाबादचा असून तीन महिन्यांपूर्वीच त्याने आयआयटी मुंबईमध्ये प्रवेश घेतला होता. तो बी. टेकच्या पहिल्या वर्षी शिकत होता.
परीक्षेचा दबाव?
उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्याने बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "रविवारी दुपारी साधारण 1 वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून अद्याप आत्महत्येचं कारण स्पष्ट झालेलं नाही. आम्हाला सुसाईड नोट आढळलेली नाही."
पोलिसांनी साक्षीदारांचे जाबाब सुद्धा नोंदवले आहेत.
"दर्शनच्या रुममेटने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या सत्राची सेमिस्टर परीक्षा नुकतीच पार पडली. ही परीक्षा त्याच्यासाठी फारशी चांगली गेली नव्हती. तसंच तो होमसीक होता. त्याला कुटुंबीयांची आणि घराची आठवण येत होती," असंही पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं.
विद्यार्थ्यांचा हॉस्टेलमध्ये कँडल मार्च
आयआयटी बॉम्बेचे संचालक शुभाशिष चौधरी यांनी या घटनेनंतर सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना एक संदेश पाठवला. यात ते म्हणतात, 'आज दुपारी आपण पहिल्या वर्षी शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला गमवले. पवई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. विद्यार्थ्याच्या पालकाला आम्ही कळवले आहे. अशा दु:खद प्रसंगी आम्ही त्याच्या कुटुंबासोबत आहोत.'
दरम्यान, आयआयटीतील वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी रविवारी (13 फेब्रुवारी) रात्री कॅम्पसमध्ये कँडल मार्चचं आयोजन केलं होतं. दर्शन सोलंकी या विद्यार्थ्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी यात सहभागी झाले होते.
'दलित विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वातावरण नाही'
दलित विद्यार्थ्याची आत्महत्या हे प्रकरण वैयक्तिक नसून इन्स्टिट्यूशनल मर्डर आहे असा दावा आयआयटी बॉम्बे APPSC (आंबेडकर पेरियार फुले) स्टडी सर्कल या विद्यार्थी संघटनेने केला आहे. तसंच या प्रकरणाच्या चौकशीची मागणीही त्यांनी केली आहे.
या संघटनेतील एका सदस्याने बोलताना सांगितलं, "आम्ही तक्रारी करूनही संस्थेने दलित-बहुजन विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वातावरण तयार केले नाही. फर्स्ट इअरला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आरक्षण विरोधी मानसिकतेचा सामना करावा लागतो. विद्यार्थ्यांची पात्रता नाही अशाप्रकारचे टोमणे अशा विद्यार्थ्यांना ऐकावे लागतात. यादृष्टीने कॅम्पसमध्ये फॅकल्टी आणि समुनपदेशकांची कमतरता आहे." असंही संघटनेचं म्हणणं आहे.
याबाबत APPSC कडून ट्वीटवरही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.
दरम्यान, पोलिसांनी अशा प्रकारची कोणतीही माहिती अद्याप तपासात समोर आलेली नाही असं स्पष्ट केलं.
दरम्यान, या प्रकरणी आम्ही आयआयटी बॉम्बेचे संचालक शुभाशिष बॅनर्जी यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु अद्याप त्यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)