You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'मी सेक्स कल्टमध्ये कशी सहभागी झाले आणि कशी बाहेर पडले'
- Author, जॉर्ज राईट
- Role, बीबीसी न्यूज
दोन आठवड्यांपुर्वी अमेरिकेतील अभिनेत्री अलिसन मॅक ही सेक्स ट्रॅफिकिंग प्रकरणात दोषी असल्याचं स्पष्ट झालं. ती नेक्सियम नावाच्या सेक्स कल्टशी (कल्ट म्हणजे पंथ, तत्वप्रणाली, समविचारी किंवा समान हेतूने एकत्र आलेले लोक).
नेक्सियम नावाने हा ग्रुप स्वमदत म्हणजे सेल्फहेल्प प्रोग्राम म्हणून स्थापन झाला होता. मात्र त्याचे म्होरके या पंथात 'स्लेव्ह आणि मास्टर' व्यवस्था रुढ करत असल्याचा आरोप होतो. तसेच या पंथात बढती मिळत वरच्या पदांवर जाण्यासाठी हजारो डॉलर्स मोजावे लागतात असाही आरोप केला जातो. पण लोक अशा पंथांमध्ये का सहभागी होतात? त्यातून बाहेर पडल्यावर पुन्हा समाजात कसे मिसळतात?
यातील काही मजकूर त्रासदायक वाटू शकतो
रेनी लिनेल
'एका मेडिटेशन सेंटरनं माझं आयुष्य पूर्ण बदलण्याआधी मी नृत्यांगना होते'
तसं माझं आयुष्य वरवर ठीक होतं. मी फ्लोरिडामध्ये वाढले. माझ्या कुटुंबात आईबाबा आणि जुळे भाऊ होते. पण मला सतत आतून खिन्न वाटायचं. मी 15 वर्षांची होईपर्यंत माझ्या कुटुंबातील बहुतांश लोकांचं निधन झालं. नंतर वडीलही गेले.
33 व्या वर्षी मी एका बुद्धिस्ट मेडिटेशन सेमिनारमध्ये गेले आणि ध्यानाला बसले. तिथं एक तरुण मुलगी होती. तिनं म्युझिक सुरू केलं आणि ध्यान सुरू करायला सांगितलं. पण हळूहळू मी त्यात ओढली गेले. अशा ग्रुप्समध्ये तुम्हाला अनेक गोष्टींनी बांधून ठेवलं जातं. साहजिकच तुमचा भरपूर वेळ जातो. मग तुम्ही तुमचे मित्र, कुटुंबीय आणि तुमच्या लाडक्या लोकांपासून दूर जाता. काही कळण्याआधीच माझी सपोर्ट सिस्टिम नष्ट झाली होती...
दोन वर्षांनी ते सांगू लागले की आता तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त झालं आहे. जुन्या सर्व गोष्टी आता गैरलागू होतात. हे दारुड्यांसारखं आहे म्हणायचे ते. म्हणजे एकदा दारू सोडली की ते पुर्वीसारखं जुन्या मित्रांसोबत एन्जॉय करू शकत नाहीत तसंच...
आम्ही जितका पैसा मिळवू तितका तिकडं जायचा. ते म्हणायचे पैशासह सर्व गोष्टी या ऊर्जा आहेत. पंथातल्या शिक्षकांना जितका पैसा द्याल तितकी शक्ती तुम्हाला मिळत जाईल.
हे सगळं आयुष्य उद्धवस्त करणारं होतं. तिथं गुरू शिष्याला प्रियकरासारखं वागवायचे. मग हळूहळू माझ्यावर टीका करू लागले. मी काहीच चांगलं केलं नाही असं म्हणायला लागले.
अशा कल्टमध्ये अनेक धोकादायक वळणं येतात आणि तुम्हाला नकार देणं जड होत जातं. तिथले शिक्षक म्हणायचे, "तुला फारच आत्मप्रौढी (इगो) आहे. तू स्वतःला बदलू इच्छित नाहीस." मग मी नाही... मला बदलायचं आहे... मला आत्मज्ञान प्राप्त करायचं आहे असं म्हणायचे. हे सगळं म्हणताना मला आत्मज्ञान म्हणजे काय हेही माहिती नव्हतं.
कालांतराने सगळं उद्धवस्त झालं. मी आयुष्याच्या अगदी खोल तळातल्या बिंदूला जाऊन पोहोचले होते. एकप्रकारचं मरणच होतं ते. सगळं डोळ्यांनी दिसत होतं पण माझं मन ते कबूल करत नव्हतं. त्या पंथात सात वर्षं काढल्यावर मी हळूहळू त्यावर विचार करायला लागले. सुरुवातीला ते फारच जड गेलं.
मी न्यू यॉर्क सोडलं आणि कोलोरॅडोला शिफ्ट झाले. वाटलं नव्या गावात गेले तर बरं वाटेल. पण झालं उलटंच मी घराबाहेर जायलाही घाबरायला लागले. आत्महत्येचे विचार डोक्यात येई लागले. खाण्या-पिण्याचं ताळतंत्र सुटलं. जवळपास सहा महिने मी घरातच दिवसदिवस झोपून काढले. त्यातून बाहेर पडायला पाच वर्षं गेली. आताशा कुठे मला पुन्हा माणसांत आल्यासारखं वाटतंय.
सारा लायनहार्ट
'मला एका गुरूनं भारतात बंदी बनवलं होतं'
मी कॉन्शसनेस आणि अध्यात्म अशा विषयावर पीएचडी करत होते. एक हिंदू संन्यासी कॉन्शसनेस आणि मनावरती चिंतन करत असल्याचं समजल्यावर मी त्यांच्याशी बोलायला गेले. काही कळायच्या आत मी त्यांच्याकडे ओढले गेले. नंतर ते म्हणाले, "मी आता तुला अधिक काही शिकवू शकत नाही. तू आता माझ्या भारतातल्या गुरूकडे जायला हवं. त्यांना आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे. ही एक तुझ्यासाठी संधीच आहे."
मलाही वाटू लागलेलं आपण आजवर वाहात असलेलं भावनांचं ओझं आता उतरवलं पाहिजे. म्हणून मी जायचा निर्णय घेतला. भारतातल्या आश्रमात गेल्यावर तीन दिवसांनी जेवल्यावर मला भिंतीवर टांगलंय आणि मी माझ्या नखांनी भिंतीवर ओरबाडतेय असं मला आठवतं. मग हळूहळू माझं भान हरपत गेलं.
दुसरी गोष्ट मला आठवतेय, ती म्हणजे, मला दिलेल्या रुममध्ये मी होते आणि तो माझ्यावर होतो. मी तीन महिने त्या रुमच्या बाहेर पडले नाही.
जेव्हा मी घरी परतले, तेव्हा तिथं काय घडलं हेही लोकांना नीट समजावून सांगू शकले नाही. मी गोंधळलेली होते. तो माझ्यावर असेल, मी स्तब्ध असेन, वेगळी होईन आणि तिथेच एक किंवा दोन तास बसून विचार करत आहे की, यासाठी मी इथे आले नव्हते. मला वाटलं होतं, की त्याला माझ्याबद्दल चांगलं वाटतं होतं.
तेव्हा मग तो तुमच्यावर चांगलं वागत नसल्याचा आरोप करू लागतो. ते ज्याप्रकारे आपल्या मनाशी खेळतात त्यावर तुमचा विश्वासही बसणार नाही. तो म्हणेल, "कॅथलिक म्हणून तुझी वाढ, संगोपन झालंय म्हणून तुला हे आवडत नाही."
1987 सालचा तो शरद ऋतू होता. मी जर चांगलं काही करू शकले नाही, तर तिथे मी वेडी होईन किंवा मरुनही जाईन, असं मला वाटू लागलं. मात्र, पळून जाण्याचा माझा पहिला प्रयत्न फसला आणि त्यामुळे अडथळे आणखीच वाढले. त्यामुळे तिथे असण्याबद्दल मला खूप भारी वाटतंय, असं दाखवण्याचा मी प्रयत्न केला.
मी म्हणाले, "पाहा, तुम्हाला वाटतं इंग्लंडमधून संन्यासी आला पाहिजे आणि तुमचं दुसरं आवडतं ठिकाण, बंगळुरूहून, एनव्ही रघुराम. आपण सर्वजण साजरं करू शकतो की, हे सर्व किती सुंदर आहे." त्याने माझ्यावर विश्वास ठेवला.
अखेरीस ते दोघे आले आणि मी इंग्रज साधूला नेमकं काय घडतंय हे समजावून सांगितलं. तसंच मी हेही म्हटलं, "माझं खूप वजन घटलंय, मी आजार आहे, माझं मन खचू लागलंय आणि मला मदतीची गरज आहे." तो म्हणाला, "गुरू जे सांगतील, तेच तू करत राहायला हवंस." मी त्याक्षणी विचार केला, कदाचित मला ते सर्व चुकीचे वाटले असेल.
पुढच्याच रात्री मी बंगळुरूतील साधू एनव्ही रघुराम यांच्याशी बोलले. खरंतर त्यांना मी कधीच भेटले नव्हते. त्यांना माझी अवस्था सांगितली. त्यावर ते म्हणाले, असं आधीही घडलंय आणि गुरू हे सर्व थांबवतील, अशी आशा आहे. त्याने मला तिथून बाहेर काढलं आणि माझी काळजी घेतली.
माझ्या वयाएवढ्याच मुलीशी असं आधीही घडल्याचं त्याने मला सांगितलं. तिला अक्षरश: वेड लागण्याची वेळ आली आणि मग तिला मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. तिच्यावर अवलंबून असलेल्या तिच्या भावाने तर आत्महत्या केली.
लोकांना नेमकं हेच समजत नाही की, जेव्हा तुम्ही त्यांच्यासमोर बसता आणि ते सांगतात की, तुम्ही अधिक प्रेमळ असले पाहिजेत, तुम्ही या प्रार्थना केल्या पाहिजेत. यामुळे संवेदनशीलता वाढण्यास मदत होते. तुम्हाला काहीतरी गवसल्यासारखं वाटतं आणि तुम्हाला वाटतं की, होय, आपण तितकी शुद्ध मनाची व्यक्ती बनायला हवी, तुम्ही आभार मानू लागता.
खरंतर या सर्व गोष्टी तुम्ही आधीपासूनच करत असता, पण तुम्हाला वाटतं, तुमच्या गुरूने काही नवीन सांगितलंय आणि त्यांनी काहीतरी वेगळं केलंय.
जर तुमचं बालपण भावनिकरित्या सुरक्षित वातावरणात गेलं असेल, जिथं तुम्ही महत्त्वाची व्यक्ती असल्याचं जाणवलं असेल आणि तुमच्यातील भावनाही अस्सल होत्या, तर तुम्ही पटकन कुणासमोर झुकत नाही.
कल्टमध्ये असलेल्यांना तुम्ही कशी मदत करू शकता?
यूकेस्थित कल्ट इन्फर्मेशन सेंटरने कल्टच्या सदस्यांना, त्यांच्या कुटुंबाला आणि नातेवाईकांना सल्ला दिलाय. यात 22 गोष्टींचा समावेश आहे.
त्यातील काही गोष्टी म्हणजे,
- कल्टमधून बाहेर पडलेल्या कुणाही व्यक्तीचं कुटुंबात पुन्हा खुल्या मनानं स्वागत करा
- कल्टमध्ये ज्या ज्या लोकांनी त्या व्यक्तीचा संबंध आला, त्यांची नावं, पत्ते आणि फोन नंबर नोंद करून घ्या
- 'तू कल्टमध्ये होती, म्हणून तू ब्रेनवॉश्ड असशील' असं त्यांना म्हणू नका.
जेन रिकार्ड्स
'मला वाटलं ते देव आहेत'
माझ्या आई-वडिलांमध्ये सतत भांडणं होत असायची. ते पाहतच मी मोठी झाले. माझ्यासाठी ते सुरक्षित नव्हतं.
त्या काळात मला भूतांची भीती वाटू लागली. माझा मोठा भाऊ आणि बहिणीने मला भूत पाहिल्याचं सांगितलं होतं. मी त्यांच्यात सर्वात लहान होते. त्यामुळे मला जास्तच भीती वाटू लागली.
पुढे मी 'अलौकिक शक्तींविषयक' बोलणाऱ्या लोकांबाबत माहिती काढली. दरम्यान एका व्यक्तीने मला या ठिकाणी आणलं. आपण भारतीय वंशाचा अमेरिकन असल्याचं तो सतत सांगायचा. मी फक्त उत्सुक होते, म्हणून मी त्याच्यासोबत जाण्याबाबत विचार केला.
मी त्याला भेटायचं ठरवलं. तो व्यक्ती केस पांढरे झालेला वृद्ध, दाढी वगैरे ठेवणारा असेल असं मला आधी वाटलं. पण नाही. तो एक अमेरिकन तरूण होता. त्याने लांबसडक केस ठेवले होते. शांतता आणि प्रेम यांच्याबाबत तो बोलायचा. ते पाहून छान वाटलं.
मी मागच्या बाकावरच पहिले दोन-तीन महिने घालवले. नंतर थोडी खुलले. मी त्यांना माझ्या मैत्रिणीबाबत सांगितलं. पहिल्यांदाच मी त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोलले असेन. मी त्यांच्या डोळ्यांत हरवून जाईन, असं मला त्यावेळी वाटलं. ते म्हणाले, "तिच्याबाबत काळजी करू नकोस. ती ठिक आहे."
लवकरच माझ्या मनाचा त्यांनी ताबा मिळवला. बाहेरच्या जगासोबतचे सगळे संबंध मी तोडून टाकले. माझ्या कुटुंबीयांसोबतही माझा संपर्क नव्हता. मी त्यांना माझ्याकडचा सगळा पैसा दिला. मी त्यांची पत्नी असल्याचं मी सांगू लागले.
आमच्यात लैंगिक संबंधांना सुरुवात झाली. मला हे नको होतं. पण तो देव असल्याचं वाटून मी तेसुद्धा करू लागले. ते येशू ख्रिस्त किंवा बुद्ध आहेत, असंच मला निःसंशय वाटू लागलं होतं.
आम्ही खूप प्रवास करायचो. पण नंतर नंतर मला अचानक घाबरल्यासारखं वाटू लागलं. माझी तब्येत बिघडू लागली होती. साधारणपणे एका वर्षात माझं भान हरपल्यासारखं झालं होतं.
त्यावेळी मी आत्महत्येचाही प्रयत्न केला. पण त्यांनी मला आत्महत्या करायची नाही, अशी सक्त ताकीद दिली होती. मी तुझी दुसऱ्या बाजूला वाट पाहत आहे, असं ते म्हणायचे. त्यामुळेच मी थांबले. आमच्या ग्रुपमध्ये आधी काहीजणांनी आत्महत्या केल्याची माहिती मला त्यादरम्यान मिळाली.
आम्हाला झपाटलेल्या भूतापासून सुटका मिळण्यासाठी विविध प्रकारच्या गोष्टी केल्या जात. पुढे आम्ही प्रभावी मनुष्य बनून या ग्रहाचे रक्षण करण्यासाठी त्याची मदत करू शकतो, असं ते सांगायचे.
बहुतांश वेळा त्यांनी अंमली पदार्थ घेतलेले असायचे. आम्हालासुद्धा ते घ्यावे लागत. पुरूष मंडळी LSD घ्यायची. पण मी फक्त डोप घ्यायचे. फक्त एकदाच मी LSD घेतलं होतं.
माझ्यावर वैद्यकीय खर्च करावा लागत असल्याने त्यांनी मला काढून टाकलं. मी माझ्या देशात पळून आले. पुढे तब्येत ठीक होण्यासाठी मी तिथेच थांबले. मला परत जायचं होतं. मला अजूनही वाटायचं ते देव आहेत. पण बाहेरच्या जगात छानही वाटायचं.
तिथून बाहेर पडल्यानंतर पहिले तीन दिवस मी अतिशय आनंदी होते. नंतर नंतर मला मानसिक त्रास होऊ लागला. मी मानसिकरित्या पूर्ण तुटले होते. स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला, पण मला ते शक्य झालं नाही. पुढचे काही महिने मी घरातूनच बाहेर पडू शकले नाही. ती एक भयानक अवस्था होती.
भीती काय असते, हे समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत होते. यावर मात करण्याची क्षमता अजूनही माझ्यात नाही, हा विचार मी करायचे. मी खरंच मजबूत नाही, याची जाणीव मला झाली.
पुढे मी मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेतली. मनावर ताबा मिळवण्यासाठी मी उपचार घेतले. मला त्याचा चांगला उपयोग झाला. माझ्या मनातली अनेक गृहितकं नष्ट करण्यासाठी त्याची मदत झाली.
डॅनियल डर्स्टन
'खुल्या विचारांमुळे नुकसान'
आमच्यासाठी ते भावनिक आणि मानसिक अत्याचार होते. त्यामुळे आमचं प्रचंड नुकसान झालं. माझा भाऊ अॅलेक्स माझ्यासारखाच होता. चौकसबुद्धी, खूप प्रश्न विचारायचा.
पण समाजात तुम्ही त्यांच्या अनुरुपच असावं लागतं. यामुळेच आमचं नुकसान झालं. सगळ्या गोष्टी मला मान्य कराव्या लागायच्या. पण अॅलेक्स खुल्या विचारांचा होता. तो एका ठिकाणी अडकून पडणारा नव्हता. 23 व्या वर्षी अॅलेक्सने आत्महत्या केली.
त्याच्या अंत्यविधीच्या दिवशी कल्टचे गुरू अॅलेक्सला मुक्ती मिळाली आता तो स्वर्गात जाईल, असं म्हणत होते. पण हे कोणत्या आधारे? त्याचा जीव गेला, त्याचं काहीच नाही का? हे विचार कचराकुंडीत टाका.
त्यांच्या पंथाबाबत अनेक अंधश्रद्धा आहेत. मेलात म्हणजे तुम्हाला मुक्ती मिळते. हा कोणत्या प्रकारचा मनोरुग्ण देव आहे. अशा गोष्टींना काहीच अर्थ नाही. अनेक पंथांमध्ये असेच गैरसमज पाळले जातात.
माझं समुपदेशन झाल्यानंतर काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या. माझं यामुळे प्रचंड नुकसान झालं. कल्टमध्ये फक्त त्यांच्यापुरतंच जग दाखवलं जातं. तुम्ही समाजातून बाजूला फेकले जाता.
आम्हा सर्व भावंडांमध्ये असलेलं एक साम्य म्हणजे आमचं कोणतंच लक्ष्य नव्हतं. आम्ही शिक्षण घ्यावं, किंवा इतर कोणतं तरी कौशल्य आत्मसात करावं, असं आम्हाला कधीच सांगण्यात आलं नाही.
मी 26 वर्षांचा असताना तिथून बाहेर पडलो. मी न्यूझीलंडमध्ये होतो. माझे आई-वडिल अरिझोनाला होते. आमचा खूप कमी संपर्क होता. त्यांना माझ्याबद्दल, पत्नी आणि माझ्या मुलांबद्दल काहीच काळजी नव्हती.
कल्टमध्ये असताना आमच्यावर अनेक अत्याचार झाले. या गोष्टी घडल्या असताना तुम्ही नवी सुरूवात करू शकता का? यातून बाहेर पडणं प्रचंड अवघड असतं. यामध्ये खूप त्रास होतो.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.' रोज रात्री 8 वाजता बीबीसी मराठीचे कोरोना पॉडकास्ट तुम्ही फेसबुकवर पाहू शकता.)