घटनाबाह्य सरकार अल्पायुषी, कोसळणार म्हणजे कोसळणारच - आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

एकनाथ शिंदेंनी स्थापन केलेलं सरकार हे घटनाबाह्य असून अल्पायुषी आहे. ते कोसळणार म्हणजे कोसळणारच, असा दावा शिवसेना (आदित्य ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

वरळी येथील एका जाहीर सभेत आदित्य ठाकरे रविवारी (26 फेब्रुवारी) बोलत होते.

ते पुढे म्हणाले, "ही गर्दी आयात नव्हे तर खऱ्या शिवसैनिकांची आहे. ही गर्दी गद्दारांना जागा दाखवून देईल. "

सध्याचं महाराष्ट्र सरकार महाराष्ट्राला अंधःकारात घेऊन जाणार आहे. जवळच्या माणसांना कंत्राटीच्या खिरापती वाटली जात आहे. उद्योग गुजरातला नेले जात आहेत, असं ठाकरे म्हणाले.

शिवसेनेचं चिन्ह आणि नाव काढून घेण्यासाठी मुख्यमंत्रिपदाचा वापर करण्यात आला आहे. गद्दार आणि भाजप राज्याला दिल्लीसमोर झुकवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

आदित्य ठाकरेंच्या सभेदरम्यान दगडफेकीचे आरोप, कारवाईची मागणी

शिवसेना नेते ( ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे यांच्या औरंगाबाद येथे 8 फेब्रुवारी रोजी झालेल्या सभेदरम्यान दगड भिरकावण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता

आदित्य ठाकरे यांची वैजापूर इथे सभा होती. सभेत काही समाजकंटकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला असं शिवसेना नेते (ठाकरे गट) आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे म्हणाले.

ते पुढे म्हणाले, "सभा सुरू असताना व्यासपीठावर एक दगड आला. सभास्थानाहून निघताना आणखी काही दगड आले. समाजकंटकांचा हा प्रयत्न आहे. आमदार रमेश बोरनारे झिंदाबादच्या घोषणा जमाव देत होता."

बोरनारे हे वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटातील आमदार आहेत.

"दलित समाज आणि हिंदू समाजात भांडण लावण्याचा प्रयत्न या जमावातील लोक करत होते. शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येत असताना काही लोक मुद्दामहून हे बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. याचा आम्ही निषेध करतो. राज्यातल्या सरकारकडून विविध समाजांमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न आहे," असं दानवे म्हणाले.

"आदित्य ठाकरे यांच्या सभा उधळण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आदित्य ठाकरेंच्या सुरक्षितततेकडेही लक्ष देणं आवश्यक आहे. कारण सध्या त्याकडे कमालीचं दुर्लक्ष झालं आहे. सभेदरम्यान आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत कसूर झाली आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे," असं दानवे म्हणाले.

झी न्यूजने दिलेल्या बातमीनुसार आदित्य ठाकरेंच्या वाहनांचा ताफा सभास्थळावरून निघत असताना काही तरुण त्याठिकाणी आले. त्यांनी वाहनं अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावरून पोलीस आणि संतप्त तरुण यांच्यात चांगलीच झटापट झाली. पोलिसांनी या तरुणांना रोखलं आणि त्यानंतर आदित्य ठाकरे तिथून रवाना झाले.

आदित्य ठाकरे

फोटो स्रोत, Facebook/Aditya Thackeray

ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी पोलिसांवर याचं खापर फोडलं आहे. व्हीआयपी संरक्षण कसं असलं पाहिजे यावर पोलिसांनी लक्ष दिलं नाही, असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. गद्दार आमदार रमेश बोरनारे यांनी काही जणांना दारू पाजून गोंधळ घालण्यासाठी पाठवलं होतं, असा गंभीर आरोपही चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

काही दिवसांपूर्वी ठाकरे गट आणि शिंदे गटात राडा झाला होता. शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे एका कार्यक्रमानिमित्ताने या गावात आले होते, त्यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना जोरदार विरोध केला होता. पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती आटोक्यात आणली होती.

आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं होतं 'चॅलेंज'

राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 'चॅलेंज' दिलं आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्रिपदाचा तसेच आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि वरळीतून आपल्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढवावी, असं चॅलेंज आदित्य ठाकरे यांनी दिलं होतं. त्यांच्या या चॅलेंजवर शिंदे गटाकडून टीका करण्यात आली होती

"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझ्या चॅलेंजला घाबरले. मी दुसरं चॅलेंज देतो, तुम्ही मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या, मी राजीनामा देतो. मी ठाण्यात येतो. तिथे लढून दाखवतो, बघू कोण जिंकून येतंय, एकदा होऊनच जाऊ द्या," असं नवं चॅलेंज आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलंय.

"महाराष्ट्रातलं वातावरण पेटलेलं आहे. आता एकच रंग दिसेल तो म्हणजे भगवा. काही लोकांना वाटेल कोणता भगवा? मात्र शिवसेना एकच, ती माझ्यासमोर बसलेली आहे," असं आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरे यांच्या चॅलेंजला मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिलं. "मी छोटी नव्हे, मोठी आव्हाने स्वीकारून स्वत:ला सिद्ध करून दाखवतो. सहा महिन्यांपूर्वीच मी मोठे आव्हान स्वीकारले आणि जनतेच्या मनातले सरकार स्थापन केले," असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना दिले.

बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर
फोटो कॅप्शन, बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)