You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'एकेकाळी मी देशासाठी फुटबॉल खेळले, आज फूड डिलिव्हरी करतेय'
- Author, मेघा मोहन
- Role, बीबीसी प्रतिनिधी
पौलमी अधिकारी यांची अर्धी शिफ्ट झाली होती, त्या कामाच्या गडबडीत होत्या. तेव्हा अंतिद्र चक्रवर्ती यांना त्या रस्त्यात दिसल्या. अंतिद्र कोलकातातल्या सामान्य माणसांबद्दल व्हीडिओ बनवतात. अंतिद्र यांनी पौलोमी यांना रस्त्यात थांबवलं आणि काही प्रश्न विचारले.
पौलमी त्यादिवशी सकाळी 6 पासून काम करत होत्या आणि त्यांचं काम कदाचित रात्री 1 वाजता संपलं असतं. पण तरीही पौलोमी यांनी अंतिद्र यांच्याशी संवाद साधायचं ठरवलं.
पौलोमीने लाल रंगाचा टीशर्ट घातला होता. त्यावर 'झोमॅटो' असं लिहिलं होतं. 24-वर्षांच्या पॉलोमी फूड डिलिव्हरीचं काम करतात. पण त्यांचं पॅशन फुटबॉल आहे.
पौलोमी भारताकडून अंडर-16 मुलींच्या टीममध्ये खेळल्या होत्या. त्यांनी देशाचं आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व केलं होतं. पण त्यातून पुढे काही घडलं नाही. मग त्यांच्या कुटुंबाला आर्थिक अडचणी आल्या. त्यामुळे त्यांनी हे काम स्वीकारलं. एवढं सांगून पौलोमी आपल्या सायकलवरून निघून गेल्या.
हा व्हीडिओ खूप व्हायरल झाला. लोकांना प्रश्न पडला की एक तरूण महिला खेळाडू, जिला खेळात उज्ज्वल भवितव्य होतं, ती आता फूड डिलिव्हरीचं काम कसं काय करतेय?
लोकांना पौलोमी अधिकारीची गोष्ट जाणून घ्यायची होती.
पौलोमी दक्षिण कोलकातातल्या शिब्रामपूर या भागात लहानाच्या मोठ्या झाल्या. शिब्रामपूरमध्ये कष्टकरी समुदायाची वस्ती आहे. त्यांना लहानपणी 'बुल्टी' या नावाने हाक मारायचे, ज्याचा अर्थ होतो 'देवाने दिलेली अमुल्य भेट'.
पौलोमी दोन महिन्यांच्या असतानाच त्यांची आई वारली. त्यांचे वडील टॅक्सी चालवायचे आणि या कुटुंबाचं हातावर पोट होतं. पौलोमीला त्यांच्या मावशीने लहानाचं मोठं केलं.
त्या वयाच्या सातव्या वर्षांपासून फुटबॉल खेळतात. त्या सात वर्षांच्या असताना त्यांनी आसपासच्या काही मुलांना फुटबॉल खेळताना पाहिलं. त्याही खेळायला लागल्या. पौलोमी शॉर्ट्स घालत असल्याने इतर मुलांना वाटलं की त्याही मुलगाच आहेत.
"पण मी जशीजशी मोठी झाले तर त्यांच्या पालकांनी ग्राऊंडचे अधिकारी आणि माझ्या मावशीकडे तक्रार करायला सुरुवात केली की एक मुलगी कशी काय शॉर्ट घालून मुलांबरोबर खेळू शकते?"
पौलोमीला खूप वाईट वाटलं.
"मी रोज रडायचे कारण मला खेळायचं असायचं."
पौलोमीच्या मावशीने ठरवलं की यातून मार्ग काढायचा आणि पौलोमीसाठी खास फुटबॉलच्या ट्रेनिंगची व्यवस्था केली. पौलोमी उत्तम खेळायला लागल्या आणि लवकरच स्थानिक कोच अनिता सरकार यांच्या नजरेत भरल्या.
सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली पौलोमी कोलकाता फुटबॉल लीगमध्ये खेळल्या आणि वयाच्या 12 वर्षी भारताच्या अंडर-16 टीममध्ये निवडल्या गेल्या.
फुटबॉल खेळताना त्यांना चांगल्या मैत्रिणी मिळाल्या. कधी विचार केला नसेल अशा संधी मिळाल्या. त्यांच्या कुटुंबात कोणीही कधीच विमानात बसलं नव्हतं पण त्या वेगवेगळ्या स्पर्धा खेळण्यासाठी अनेक ठिकाणी जाऊ लागल्या.
"भारताची जर्सी घालणं, देशाचं प्रतिनिधित्व करणं, तेही इतक्या लहान वयात ही गोष्ट माझ्यासाठी फार महत्त्वाची होती. माझ्या करियरमधले सर्वोत्तम क्षण होते ते. मी पहिल्यांदा जर्सी घातली तेव्हा माझ्या अंगावर काटा आला होता."
2013 साली त्या साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशनच्या वूमन्स ज्युनियर चॅम्पियनशिपच्या पात्रता फेरीत खेळण्यासाठी श्रीलंकेत गेल्या. 2016 साली त्यांनी ग्लासगो शहरात होमलेस वर्ल्ड कप स्पर्धेत भाग घेतला. होमलेस वर्ल्ड कप म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरची गल्ली फुटबॉल स्पर्धा. पौलोमी म्हणतात की तेव्हा त्यांना प्रत्येक मॅचसाठी 100 डॉलर्स इतकं मानधन मिळायचं.
पण नंतर अडचणी येत गेल्या.
"माझ्या कुटुंबाच्या आर्थिक अडचणींमुळे मला कधी फुटबॉलची सगळी साधनं परवडली नाहीत किंवा दिवसातून पोटभरून 3 वेळा जेवायलाही मिळालं नाही."
त्यात 2018 साली पौलोमी यांना दुखापत झाली. त्याच्या पायाची अनेक ऑपरेशन्स झाली आणि त्यांना बेडरेस्ट सांगितली होती. पौलोमी यांचं म्हणणं आहे की आता त्या दुखापतीतून सावरल्या आहेत. पण तरीही इतर अडचणींमुळे त्या खेळू शकत नाहीत.
त्यांच्या कुटुंबाला पैशाची गरज आहे. त्यांच्या मोठ्या बहिणीचं लग्न झालं आणि त्या दुसऱ्या ठिकाणी गेल्या. घरखर्च भागवण्यासाठी पौलोमीला काम करणं गरजेचं होतं.
त्यामुळे त्यांनी आपलं फुटबॉलचं स्वप्न अर्धवट सोडलं आणि कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी लहानसहान कामं करायला लागल्या. 2020 साली जेव्हा कोरोना व्हायरस साथीने थैमान घातलं होतं तेव्हा अनेक लोक फूड डिलिव्हरीकडे वळले. पौलोमी त्यातल्याच एक.
आजकाल त्यांचं काम रात्री 1 वाजता संपतं त्यामुळे त्यांना प्रॅक्टिस करण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यांना दिवसाचे 300 रूपये मिळतात आणि डबल शिफ्ट असतील तर 15 तास काम करावं लागतं.
जेव्हा पौलोमी यांचा व्हीडिओ व्हायरल झाला तेव्हा त्यांना कोच बनण्याची ऑफर आली. पण जिथे कोचिंग करायचं होतं ती जागा त्यांच्या घरापासून 40 किलोमीटर दूर होती आणि त्यांना आता झोमॅटोकडून जेवढे पैसे मिळतात त्यापेक्षा कमी पैसे मिळाले असते.
पौलोमी यांना वाटतं की भारतात किंवा एकंदर जगातच महिलांच्या खेळात रस घेण्याची, त्यासाठी प्रयत्न करण्याची मानसिकता दिसून येत नाही.
त्या म्हणतात, "आपण जर पुरूष आणि महिला फुटबॉल यांची तुलना केली तर लक्षात येईल की लोक सहसा महिला फुटबॉलच्या मॅचेस पाहात नाहीत. क्रिकेटबद्दलही असंच आहे. लोक क्रिकेटची मॅच पाहायला ऑफिसातून सुट्टी घेतात पण ते महिला क्रिकेटची मॅच पाहाण्याचे कष्टही घेत नाहीत. त्यामुळे एकंदरच महिलांचे खेळ दुर्लक्षित आहेत."
पौलोमी यांना अजूनही व्यावसायिक फुटबॉल खेळण्याची इच्छा आहे, आशा आहे.
त्यांच्या घरात फारसे इंटरनॅशनल चॅनल्स दिसत नाहीत त्यामुळे त्यांना फारसं महिला फुटबॉल पहाता येत नाही पण त्या अमेरिकन खेळाडू अॅलेक्स मॉर्गनच्या फॅन आहेत. त्यांना रोनाल्डिनोही आवडतो.
"भारतात तरूण मुलींना खेळात करियर घडवण्याच्या फारशा संधी मिळत नाहीत. आणि त्यातही तुम्ही पौलोमीसारख्या गरीब घरातून आल्या असाल तर ते अधिकच कठीण बनतं," माजी फुटबॉलपटू शांती मलिक म्हणतात.
शांती भारतातल्या पहिल्या महिला फुटबॉपटू आहेत ज्यांना अर्जुन पुरस्कार मिळाला आहे.
"पौलोमीची परिस्थिती वेगळी असती तर ती आज व्यावसायिक क्रिकेट खेळत असती. मला आशा आहे की तिची गोष्ट जगासमोर आल्यानंतर आपल्याला महिलांच्या खेळात गुंतवणूक करण्याची प्रेरणा मिळेल. चांगल्य मुलींचा खेळ हरवायला नको."
याच वर्षी 7 जानेवारीला ऑल इंडिया फेडरेशनने 'व्हीजन 2047' नावाचा आराखडा प्रकाशित केला. त्याचं प्रमुख उदिष्ट भारतात फुटबॉलचा विकास करणं हे आहे. त्या आराखड्याचं 2026 साठीचं लक्ष्य आहे महिलांच्या फुटबॉलमध्ये गुंतवणूक करणं ज्यात महिला खेळाडूंना एक किमान वेतन देणंही अभिप्रेत आहे.
पौलोमी म्हणतात की त्यांना आशा आहे की हा आराखडा सत्यात उतरेल.
"माझ्यासारख्या अशा अनेक पौलोमी आहेत ज्या कष्ट करत आहेत."
"जर मला चांगला पगार देणारी नोकरी मिळाली ज्यात मी आठ ते दहा तास काम करू शकेन तर मी आरामात चार-पाच तास माझ्या फुटबॉल प्रॅक्टिससाठी देऊ शकते," त्या म्हणतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)