ज्युलियन अल्वारेज : अर्जेंटिनाचा ‘लिटल स्पायडर’ ज्याने नशिबाने दिलेल्या संधीचं सोनं केलं

    • Author, अनघा पाठक
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

एक फोटो व्हायरल झालेला तुम्ही पाहिला असेल. 12 वर्षांचा ज्युलियन अल्वारेज आपला फुटबॉलमधला लाडका हिरो मेस्सीच्या शेजारी उभा आहे. त्याचे डोळे चमकताहेत.

बरोब्बर 10 वर्षांनी हा ज्युलियन अल्वारेज मेस्सीच्या खांद्याला खांदा लावून खेळतोय आणि अर्जेंटिनाला फुटबॉल वर्ल्डकपच्या फायनलपर्यंत घेऊन गेलाय.

अवघ्या 22 वर्षांच्या ज्युलियनने ही किमया केलीये. पण ज्युलियनची कामगिरी अर्जेंटिनासाठीपण अनोखी होती.

मुळात स्पर्धा सुरू झाली तेव्हा ज्युलियन अल्वारेज सौदी अरेबिया आणि मेक्सिको विरुद्ध अशा दोनच मॅच खेळला. कोचच्या दृष्टीने तो सबस्टिट्यूट खेळाडू होता.

पण सेमीफायनलमध्ये त्याने जी कामगिरी केली ती पाहून सगळेच थक्क झाले.

स्वतः मेस्सी नंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाला, “तो सर्वत्र पळाला, प्रत्येक गोष्टीसाठी लढला, त्याने स्वतःला संधीही अशाच मिळवून दिल्या, लढून. आमच्यासाठीही ज्युलियन आश्चर्याचा धक्का होता, आणि त्याला जे जे मिळालं त्यासाठी तो लायक होताच. तो एक खरोखर गोड मुलगा आहे.”

आता अर्जेंटिनाच्या या खेळाडूचं सर्वत्र कौतुक होतंय. अर्जेंटिना आणि मॅचेस्टर सिटी क्लबचे माजी खेळाडू पाब्लो झाबालेटा यांनी बीबीसी स्पोर्ट्सशी बोलताना म्हटलं, “तो लायनल मेस्सीच्या बरोबरीने खेळतोय. त्याला बाहेरून पाहाताना असं वाटतं की तो मेस्सीला म्हणतोय, तू पळू नको, मी आहे ना.”

“एवढी धावाधाव करायला मोठं काळीज लागतं. वर्ल्डकप सुरू झाला तेव्हा त्याला टीमबाहेर बसवलं होतं, नशिबाने एक...एक संधी मिळाली आणि त्याने सोनं केलं.”

मिळालेल्या संधीचं त्याने सोनं करून दाखवलं खरं. पण त्याचा इथवरचा प्रवास कसा होता?

2000 चं सहस्त्रक उजाडलं तेव्हा त्याचा जन्म झाला. अर्जेटिनाच्या कालचीन शहरात त्याचं बालपण गेलं.

अर्जेटिना फुटबॉल वेडं आहेच, त्यामुळे अगदी लहान असल्यापासून तो फुटबॉल खेळायचा. त्याला त्याच्या भावांनी टोपणनाव ठेवलं होतं, ‘एल अरानिता’ म्हणजे छोटा कोळी. आजही त्याला ‘लिटल स्पायडर’ याच टोपणनावाने ओळखलं जातं.

त्याच्या पायामध्ये बॉल तो असा नाचवायचा की त्याला दोन पायांऐवजी आठ पाय आहेत असा भास व्हावा. दर शनिवारी लहान-लहान पोरांच्या मॅचेस व्हायच्या. कालचीन शहरातला आलेला माणूस पहिला प्रश्न विचारायचा, ‘लिटल स्पायडर’ खेळतोय ना?

अल्वारेज सेमी फायनलमध्ये जे या टोकापासून त्या टोकापर्यंत सतत पळत राहिला त्याचं कौतुक झालं. पण तो वयाच्या दुसऱ्या वर्षापासून हे करतोय.

त्याचे भाऊ फुटबॉल खेळायला जायचे, त्यांच्याबरोबर हाही जायचा. ते जे करायचा ते हा करायचा.

त्याचे पहिले कोच वारास एका मुलाखतीत म्हणतात, “त्याने पहिल्यांदा बॉल पाहिला तेव्हा तो जेमतेम दोन वर्षांचा असेल. तो बॉलच्या मागे मागे पळत होता. ग्राऊंडच्या एका बाजूकडून दुसरीकडे. तेव्हा तो बॉल त्याच्यापेक्षा मोठा होता.”

ज्युलियन अल्वारेजला लहान असल्यापासून फुटबॉलमध्ये नाव करायचं होतं, आणि इतर मुलांपेक्षा त्याची उदिष्टं मोठी होती, आणि आपल्याला काय करायचं आहे हे त्याला फार लहानपणापासून स्पष्ट होतं.

त्याला अर्जेटिनाच्या रिव्हर प्लेट्स क्लबसाठी खेळायचं होतं, त्या मेस्सीबरोबर खेळायचं होतं, त्याला वर्ल्ड कपमध्ये खेळायचं होतं. आज 22 व्या वर्षी त्याने स्वतःची लक्ष्य गाठली आहेत.

कालचीन शब्दाचा स्थानिक भाषेत अर्थ होतो 'खारी जागा'. हे एक लहानसं गाव आहे, समुद्राला लागून.

इथे फार श्रीमंती नाही, इथल्या लोकांचा मुख्य धंदा शेती आणि पशुपालन. ज्युलियन अशाच वातावरणात मोठा झाला. त्यामुळे त्याचा स्वभावही साधा आहे. तो आज एवढा मोठा खेळाडू होऊनही चिडत नाही, आतातायीपण करत नाही.

त्याला प्रतिस्पर्धी टीमच्या खेळाडूने पाडलं, मारलं तरी तो प्रतिक्रिया देत नाही, शांत राहातो. कोणाला धक्का देत नाही, कोणाचा टीशर्ट ओढत नाही, रेफरीच्या अंगावर ओरडत नाही, तमाशे करत नाही.

फुटबॉलसारख्या खेळात असा स्वभाव म्हणजे विरळाच.

त्याच्या या स्वभावामुळे प्रतिस्पर्धी टीमचे खेळाडूही त्याचा आदर करतात.

मोठ्या क्लबमध्ये उशिरा सुरुवात

ज्युलियनने फुटबॉलमधली आपली चमक लहानपणापासूनच दाखवून दिली होती. पण तरी त्याला अर्जेटिनातल्या सर्वांत मोठ्या क्लब्सपैकी एक रिव्हर प्लेट्सने काँक्ट्रॅक्ट द्यायला अनेक वर्षं गेली.

तो 15 वर्षांचा असताना त्याला रिव्हर प्लेट्सने घेतलं. त्याचाही रंजक किस्सा आहे. एकतर ज्युलियनला कालचीन सोडून कुठे जायचं नव्हतं.

तो अॅटलेटिको कालचीन या क्लबकडून खेळत होता. 14 वर्षांचा होईस्तोवर त्याने 4 चँपियनशिप जिंकून दिल्या होत्या. पण यात गंमत अशी होती की अॅटलेटिको कालचीन एवढा एकमेव क्लब त्या गावात होता.

रिव्हर प्लेटकडून खेळणं त्याचं स्वप्न होतं पण त्याला संधी मिळत नव्हती. भारतात जीव की प्राण असलेल्या क्रिकेटची उपमा द्यायची झाली तर ‘शेवटच्या बॉलवर सिक्स मारण्याची’ सवय ज्युलियनला तेव्हापासून आहे.

आधी संधी मिळत नाही, आणि मिळाली की तो सोडत नाही.

रिअल माद्रीदची हुकलेली संधी

ज्युलियन अवघा 11 वर्षांचा होता तेव्हा त्याला स्पेनचा प्रसिद्ध फुटबॉल क्लब रिअल माद्रीदकडून खेळण्याची संधी चालून आली होती.

पण त्याच वर्षी फिफाने आपले नियम बदलले आणि जर लहान मुलांना क्लबमध्ये खेळण्याची संधी द्यायचीच असेल तर त्यांच्या आईवडिलांनीही त्यांच्याबरोबर त्या देशात असलं पाहिजे असा नियम काढला.

अल्वारेज कुटुंबाला कालचीनमधून उठून बार्सिलोनात बस्तान बसवणं परवडणारं नव्हतं, त्यामुळे ज्युलियनला आपल्या संधीसाठी दीर्घकाळ वाट पाहावी लागली.

आज तो इंग्लंडचा आघाडीचा क्लब मॅचेस्टर सिटीकडून खेळतो.

कोचला दिली कार

‘लिटल स्पायडर’ मोठा झाला तरी ज्या लोकांमुळे त्याला पुढे जाण्याची संधी मिळाली त्यांना कधी विसरला नाही.

पाच वर्षांपूर्वी त्याने आपले पहिले कोच वारास यांना कार भेट देऊन आश्चर्याचा धक्का दिला. या प्रसंगाबद्द्ल एका मुलाखतीत बोलताना वारास म्हणतात, “मी सरकारी शाळेत फुटबॉलचा कोच आहे. सकाळी मुलांना शिकवतो आणि दुपारी मी स्थानिक सुपरमार्केटमध्ये जाऊन वेगवेगळी उत्पादनं विकतो.”

वारास त्यांच्या गाडीत फुटबॉलचं साहित्य आणि त्यांना सुपरमार्केटमध्ये विकायला असलेली उत्पादनं घेऊन फिरतात. पण इतका पसारा मावण्याच्या दृष्टीने त्यांनी कार फारच लहान होती. तो रिव्हर प्लेट्समध्ये सिलेक्ट झाला त्यानंतर दोन वर्षांची गोष्ट.

वारास म्हणतात, “मला ज्युलियनने एक टी-शर्ट सही करून पाठवला होता. त्यावर लिहिलं होतं – माझ्या पहिल्या कोचसाठी ज्यांनी मला फुटबॉलची मुळाक्षरं शिकवली – खूपच छान वाटलं मला त्यादिवशी. त्याचे वडील मला भेटायला आले होते, इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या.”

“दुसऱ्या दिवशी ज्युलियनच्या वडिलांना मला पुन्हा फोन आला आणि म्हणाले मी तुमच्या घरी येतोय. ते आले तेच नवी कोर व्हॅन घेऊन. मला कळतंच नव्हतं काय घडतंय. मी खूप रडलो त्या दिवशी. ज्युलियनचे आभार मानायला माझ्याकडे शब्द नव्हते. मी आजही त्याचे या गोष्टीसाठी आभार मानलेले नाहीत.”

ज्युलियनने आपल्या कमाईत कोचसाठी नवी व्हॅन विकत घेतली ज्यामुळे त्यांना फिरणं सोपं होईल आणि त्याचं सामानही नीट मावेल.

त्या व्हॅनवर स्पॅनिश भाषेत ग्रासियास (थँक्यू) असं लिहिलेलं आहे आणि शेजारी काळ्या रंगाच्या छोट्या कोळ्याचं चित्र आहे.

कालचीनचा हा लिटिल स्पायडर आज वर्ल्डकपची फायनल खेळतोय. त्याच्या विशलिस्टमधलं आणखी एक स्वप्न पूर्ण झालंय.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)