मुलांच्या हट्टापुढे व्यसन झुकले, 40 कुटुंबांनी सोडले व्यसन

सर्फराज सनदी

फोटो स्रोत, Sarfraj sanadi

    • Author, सरफराज सनदी
    • Role, बीबीसी मराठीसाठी

"घरात काका तंबाखू खायचे तर आजोबा दारू प्यायचे. मी आणि माझ्या मोठ्या भावाने दोघांकडे व्यसन सोडण्यासाठी आग्रह धरला होता. पण ते काही केल्या ऐकत नव्हते, एक दिवशी घरात पाहुणे आले होते त्यावेळी मी आणि भावाने घरात ठेवलेल्या तंबाखू आणि दारूच्या बाटल्या फेकल्या."

"ते फेकताना आम्हाला काकांनी पकडले. मग आम्हाला मार देखील दिला, आई पण रागावली. कशाला त्यांच्या मध्ये पडतोस, पण आम्ही व्यसन सोडण्यासाठी हट्ट कायम ठेवला, त्यामुळे आता काका आणि आजोबांनी त्यांचे व्यसन सोडली आहेत."

सांगलीच्या जत तालुक्यातील पांडोझरीच्या बाबरवस्तीवरील इयत्ता सातवीत शिकणारी श्रेया मोटे ही गोष्ट आनंदाने सांगते. तिच्या कुटुंबाप्रमाणे त्याच्या गावातील 40 कुटुंब आज निर्व्यसनी बनली आहेत.

सांगली जिल्ह्यातील दुष्काळी जत तालुका,यात तालुक्यातील पूर्व भागातील कर्नाटक सीमेवर पांडोझरी हे गाव आहे, या गावात सुमारे 55 कुटुंबाची विखुरलेली बाबरवस्ती आहे. साधारण 450 लोकसंख्या असणाऱ्या या वस्तीवरील बऱ्यापैकी कुटुंब उसतोडणी मजुरीचे काम करतात.

तर अनेकांची शेती देखील आहे. पाच वर्षां पर्यंत गावात अनेकांना वेगवेगळ्या प्रकारची व्यसन होती. मात्र यातील 40 जण आता व्यसनमुक्त बनले आहेत. कोणी दारू, कोणी तंबाखू, कोणी गुटखा, तर कोणी सिगारेट या गोष्टी 40 जणांनी पूर्णपणे बंद केली आहेत. हे सर्व शक्य झाले आहे,त्यांच्या मुलांनी धरलेल्या हट्टामुळे.

शाळेत त्यांना व्यसनापासून होणारे दुष्परिणाम याबाबतचे माहिती देण्यात आली होती. मुलांमध्ये व्यसनमुक्तीची जागृती करण्यात आल्यानंतर त्यांनी मुलांनी गावात व्यसनमुक्तीची चळवळ सुरू केली. इतकच नव्हे, तर घराघरांमध्ये मुलांनी आपल्या पालकांच्याकडे व्यसन सोडण्याचा हट्ट धरला आणि त्यातून पाच वर्षांच्या प्रयत्नानंतर हे घडले आहे.

गावापासून वस्ती लांब असल्याने वस्तीच्या मध्यभागी वस्तीवरील मुलांच्यासाठी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. पाहिले ते पाचवी पर्यंत याठिकाणी वर्ग भरतात. जिल्हा परिषद बाबरवस्ती शाळा म्हणून ही शाळा गेल्या 15 वर्षांपासून अस्तित्वात आहे. शाळा सुरू झाल्यापासून शाळेत पटसंख्येच्या बाबतीत नेहमीच तक्रार होती.

सर्फराज सनदी

फोटो स्रोत, Sarfraj sanadi

शाळेमध्ये एक ना अनेक कारणांनी शाळेत विद्यार्थ्यांची गैरहजरी असायची. हे पटसंख्या वाढवण्यासाठी शाळेतल्या शिक्षक दिलीप वाघमारे यांनी मग शोध सुरू केला. मुलांच्या गैर हजर राहण्यामागे त्यांच्या घरात होणारी आई वडिलांची भांडणं, त्यामागील पालकांच्या व्यसनाचे कारण त्यांच्यासमोल आलं.

दिलीप वाघमारे हे गेल्या 12 वर्षांपासून बाबर वस्ती शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. नांदेड,जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील बोळेगाव हे त्यांचे मूळगाव. पण बाबरवस्तीत हे शिक्षक म्हणून आहेत.

वाघमारे यांना शाळेतल्या पटसंख्या बाबत नेहमीच चिंता राहायची. कारण की शाळेमध्ये मुलांची उपस्थिती हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच असायची. मुलांच्या गैरहजरी बाबत वाघमारे सरांनी मुलांच्याकडे विचारणा केली असता,त्यांना त्यांच्या घरात होणारी भांडणं हे प्रमुख कारण समोर आले. त्यानंतर या वाघमारे सरांनी भांडणांचा कारण शोधण्याचा प्रयत्न केला असता, व्यसनातून ही भांडणं बऱ्यापैकी होत असल्याची बाब समोर आली.

याबाबत बीबीसी मराठीशी बोलताना दिलीप वाघमारे म्हणाले, "शाळेतल्या मुलांची पटसंख्या कमी असणे किंवा मुलांना शाळेमध्ये पाठवण्याबाबतीत लेकरांच्या कडे होणार दुर्लक्ष यामागे घरातील नवरा बायकोची भांडण आणि भांडण व्यसनातून होत असल्याची गोष्ट माझ्यासमोर आल्या.

मग पालकांचे व्यसन कसे सोडवता येईल, याबाबत प्रयत्न सुरू केले. सुरुवातीला तंबाखू मुक्तीसाठी काम करायचे ठरवले. यामध्ये मला मुथा फाऊंडेशनचे आपल्याला मोठी मदत मिळाली. सुरुवातीला गावामध्ये पालकांच्याकडे जाऊन व्यसन सोडण्याबाबत विनंती सुरू केली, पण पालकांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

सर्फराज सनदी

फोटो स्रोत, Sarfraj sanadi

खरं व्यसन इतक्या लवकर आणि सहज सुटणारी गोष्ट नाही,हे आपल्याला माहिती होते,त्यामुळे मुलांच्या मध्ये मूल्यवर्धन शिक्षण उपक्रमांतर्गत व्यसनाचे परिणाम रुजवण्याचे काम सुरू केले. कारण आपल्या लक्षात एक गोष्ट आली होती.

ती म्हणजे कोणतेही पालक आपल्या लेकराचा हट्टा पुरवतात. मग त्यासाठीही काहीही करायला ते तयार असतात. नेमकी ही गोष्ट ओळखून मुलांच्या मध्ये व्यसनमुक्तीचे धडे गिरवले. मग मुलांना घेऊन आपण गावात व्यसनमुक्तीची चळवळ सुरू केली यांच्याबरोबर प्रत्येक कुटुंबातल्या घरात जाऊन व्यसनमुक्तीबाबत जनजागृती सुरू केली.

सुरुवातीला गावामध्ये जनजागृती सुरू केल्यानंतर,गावातील अनेक लोकांनी टिंगलटवाळी केली. काही पालकांनी गुरुजी तुमचे काम शिकवायचं आहे. तुम्ही भलते धंदे करू नका. मुलांना शिकवायचे काम करा, असा दमवजा सल्ला देखील दिला.

पण आम्ही कुठल्याही गोष्टीला घाबरलो नाही. व्यसनमुक्तीची चळवळ सातत्य ठेवून चालवली, त्याचा परिणाम आम्हाला पाच वर्षांमध्ये पाहायला मिळाला. आज शाळेतली जवळपास 40 मुलांचे पालक हे व्यसनमुक्त बनले आहेत. त्यामुळे आता शाळेतल्या मुलांच्या पटसंख्येचेही प्रमाण उत्तम आहे. रोजच्या मुलांची हजेरी देखील व्यवस्थित असते आणि मुलं देखील आता कोणत्याही दडपणाविना शाळेत उपस्थित राहतात.

या शाळेचे सध्या पालक समिती अध्यक्ष असणारे मारुती गडदे म्हणाले, "माझा मुलगा देखील या शाळेमध्ये शिकतो. मलाही तंबाखूचं व्यसन होतं. दिवसातून किमान 100 ते 150 रुपये गुटखा व तंबाखू यावर माझे पैसे खर्च व्हायचे, शिवाय जिथे जाईल तिथे थुंकायची सवय होती त्यामुळे लोक माझ्याकडे बघून नाक मुरडायचे."

सर्फराज सनदी

फोटो स्रोत, Sarfraj sanadi

"शाळेत सुरू झालेल्या व्यसनमुक्तीच्या माध्यमातून माझ्याकडे मुलानेही तंबाखू सोडण्याचा हट्ट धरला. सुरुवातीला मी त्याच्याकडे दुर्लक्ष केले, पण त्याचा हट्ट वाढत गेला,शेवटी काही महिन्यानंतर मी तंबाखू थोड्या प्रमाणात खाणं सोडून दिलं. त्याच्यासमोर आणि घरात तंबाखू खायचं बंद केलं. मग बाहेर गेल्यावर तंबाखू खायचो. पण कुठेतरी माझ्या मनामध्ये ही बाब खटकू लागली.

"तंबाखू गुटख्यामुळे आपली प्रतिष्ठा कमी होते, शिवाय मुलांच्या मनात देखील आपली प्रतिमा वाईट बनते. त्यामुळे आपण तंबाखू खाण्याचं सोडून दिलं. आता जवळपास दोन वर्षे झाली तंबाखू आणि गुटखा या व्यसनापासून आपण दूर आहे. याचा परिणाम आता असा झाला की ज्या शाळेने व्यसनमुक्तीचे धडे मुलांना दिले, तिथे पालक समितीच्या अध्यक्षपदी माझी निवड झाली आहे. यापेक्षा आता चांगली गोष्ट माझ्यासाठी कोणतीच नाही," असं मत मारुती गडदे व्यक्त करतात.

बाबरवस्ती शाळेतील श्रेया मोटे या विद्यार्थिनीला तर आपल्या नातेवाईकांचे व्यसन सोडण्यासाठी मार देखील खावा लागला आहे. पण तिच्या कुटुंबातील काका आणि आजोबांनी आता व्यसन पूर्ण सोडले आहे.

सर्फराज सनदी

फोटो स्रोत, Sarfraj sanadi

याबाबत बीबीसी मराठीशी बोलताना श्रेया म्हणाली, "वाघमारे सरांनी शाळेत आम्हाला व्यसन नामुळे काय परिणाम होतात, त्याचे तोटे या सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. आम्ही गावात देखील साठी जागृती करत होतो. माझ्या घरात देखील माझे काका आणि आजोबा हे दोघेही व्यसन करायचे. काका नेहमी तंबाखू खायचे तर आजोबा रोज सायंकाळी दारू प्यायचे. घरात देखील मी रोज काकांना आणि आजोबांना व्यसन सोडण्यासाठी सांगायचे. मी आणि माझा मोठा भाऊ असे दोघे यासाठी घरात नेहमी हट्ट धरत होतो की तुम्ही व्यसन सोडलं पाहिजे."

"काही केल्या काका आणि आजोबा हे दोघेही आपली व्यसन सोडत नव्हते. एके दिवशी घरामध्ये पाहुणे आलेले असताना आम्ही दोघं बहीण भावंडांनी घरात असणाऱ्या दारूचे बाटली आणि तंबाखूच्या पुड्या हे बाहेर फेकून दिले. हे करत असताना आम्हाला काकांनी बघितलं. त्यानंतर मला आणि माझ्या भावाला पकडून मार दिला, मग आईने देखील कशाला त्यांचे मागे लागताय, असे सांगत रागावले.

"पण मी आणि माझ्या भावाने त्यांच्याकडे आणि आजोबांच्या कडे तंबाखू आणि दारू सोडण्याचा हट्ट लावूनच ठरला होता. त्यामुळे यातून आता काकांनी पूर्णपणे तंबाखू खायचं सोडून दिलं. तर आजोबांनी देखील दारू पिण्याचे बंद केले. म्हणून आता रोज सायंकाळी आजोबा दारू पिऊन जो दंगा करायचे तो बंद झाला आहे," असे श्रेया सांगते.

अलीकडे व्यसनांचे प्रकार वाढत चालले आहेत. पालकांना असणारे व्यसन हे मुलांना देखील आपोआप जडतात. या गोष्टी सगळीकडे घडत असताना जत सारख्या दुष्काळी तालुक्यातलं एक छोटसं गाव असणारे बाबर वस्ती या ठिकाणी शाळेच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा धडे घेऊन मुलांनी पालकांच्याकडे धरलेला हट्ट यातून पालकांची झालेली व्यसनमुक्ती ही खूपच कौतुकास्पद बाब म्हणावी लागेल.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)