You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राहुल गांधी : सावरकर घाबरत होते, म्हणूनच माफीनाम्यावर सही केली
सावरकरांनी इंग्रजांना मदत केली होती. ते घाबरत होते, म्हणूनच त्यांनी माफीनाम्यावर सही केली, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा आज अकोला येथे आहे. यादरम्यान आयोजित एका पत्रकार परिषदेत राहुल गांधी बोलत होते.
ते म्हणाले, "सावरकरांनी इंग्रजांना लिहिलेलं पत्र पूर्ण नक्की वाचा. त्यातील शेवटची ओळ मी तुम्हाला वाचून दाखवतो. तुमचा नोकर बनून राहण्याची माझी इच्छा आहे,' असं सावरकरांनी यात म्हटलेलं आहे. हे पत्र सावरकरांनीच लिहिलं आहे. हे पत्र देवेंद्र फडणवीसांना पाहायचं असेल तर ते पाहू शकतात. सावरकर यांनी इंग्रजांना मदत केली होती."
राहुल शेवाळे यांनी राहुल गांधी यांची यात्रा थांबवण्याची मागणी केली होती. त्याला प्रतिक्रिया देताना राहुल गांधी म्हणाले, "तुम्हाला थांबवायची असेल तर थांबवा, माझी काहीच हरकत नाही." आमची यात्रा रोखून दाखवा, असं आव्हान त्यांनी राज्य सरकारला केलं.
तसंच, उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याला सहमती दर्शवली नव्हती, याबाबत विचारलेल्या प्रश्नाला गांधी यांनी कोणतंच उत्तर दिलं नाही, हे विशेष.
ते पुढे म्हणाले, "सावरकरांनी हे पत्र लिहिलं आहे. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल हे वर्षानुवर्षे तुरुंगात होते. पण त्यांनी कोणतंही पत्र लिहिलं नाही. पण सावरकर यांनी हे पत्र लिहिलं, त्याचं कारण काय असेल, याचा विचार मी करत असतो. हे पत्र लिहिण्याचं खरं कारण ही भीती होती. जेव्हा त्यांनी या पत्राखाली सही केली, तेव्हा त्यांनी इतर सगळ्या नेत्यांना धोका दिला."
'लोकांचं दुःख समजून घेण्यासाठी आलोय'
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात दाखल झाली आहे. लोकांचं दुःख समजून घेण्यासाठी आलोय, अशी प्रतिक्रिया त्यावेळी राहुल गांधी यांनी दिली होती.
राहुल यांना पाहण्यासाठी तरुणांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. लोकांना आवरण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
लोकांचं दुःख समजून घेण्यासाठी आलोय, कोणत्याही परिस्थितीमध्ये ही यात्रा काश्मीरपर्यंत जाईल, असं राहुल यांनी सांगितलं.
शेतकरी प्रश्न, बेरोजगारी आणि महागाई या मुद्द्यांवर राहुल यावेळी बोलले. त्यांचं भाषण जवळपास 5 मिनिटे चाललं.
देगलुर तालुक्यातील मालेगावचे संगम बिरादार सभास्थळी लवकरच येऊन बसले होते. बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, राहुल यांना पाहण्यासाठी मी आलो आहे. त्यांना थोडं लेट झालं.
ते पुढे म्हणाले, "आमच्याकडे शेतीचा प्रश्न आहे. महागाई वाढत चाललीय. सगळ्याच गोष्टींवर GST लागला. शेतीच्या अवजारांवर सुद्धा GST लागलाय."
या यात्रेचा काही परिणाम होईल का, यावर ते म्हणाले, "नांदेडमध्ये तर काँग्रेसच आहे. त्यामुळे इथे वेगळं काही होणार नाही. देशात मात्र सांगू शकत नाही. कारण तिथं मोदी आहे."
या यात्रेचा 30 ते 40 टक्के परिणाम होईल, असं त्यांच्याच गावाचे व्यक्ती सांगत होते.
माजी मंत्री आणि उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे देखील या यात्रीत सहभागी होणार आहेत.
महाराष्ट्रात नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा अशा पाच जिल्ह्यातून 384 किलोमीटरचा प्रवास या यात्रेदरम्यान राहुल गांधी करणार आहेत. या काळात दोन मोठ्या सभा सुद्धा होणार आहेत.
राज्यभरातून कार्यकर्ते राहुल गांधींना साथ देण्यासाठी या यात्रेत सहभागी होणार आहेत. त्यामुळे यात्रामार्गावरील सर्व हॉटेल, मंगल कार्यालयं कार्यकर्त्यांना राहण्यासाठी बुक करण्यात आली आहेत.
राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील मार्गावर ज्या दोन मोठ्या सभा होणार आहेत, त्यातील पहिली सभा 10 नोव्हेंबरला नांदेडमध्ये होईल, तर दुसरी सभा 18 नोव्हेंबरला शेगावात होणार आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे कार्यकर्ते, नेते या यात्रेत सहभागी होणार असून, महाराष्ट्रातील विविध सामाजिक संघटनाही सहभागी होणार आहेत.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे राहुल गांधींचं महाराष्ट्रात स्वागत करतील, अशी यापूर्वी माहिती देण्यात आली होती. मात्र, शरद पवार हे सध्या ब्रिच कँडी रुग्णालयात आहेत. त्यामुळे ते यात्रेच्या स्वागतासाठी जाणार का, याबाबत अद्याप स्पष्टता नाहीय. तसंच, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे यात्रेत सहभागी होणार का, याबाबतही निश्चित नाही. मात्र, शिवसैनिक सहभागी होतील, हे उद्धव ठाकरेंनी काल (6 नोव्हेंबर) स्पष्ट केलं.
देगलूरहून ही यात्रा निघाल्यानंतर देगलूर ते नांदेड हा मार्ग सात ते 12 नोव्हेंबर पाच दिवस हा मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मार्गावरील वाहतूक दुसऱ्या मार्गानं वळवण्यात आली आहे. नांदेडमधील जवळपास नऊ मार्गावरील वाहतूकही वळवण्यात आली आहे.
यात्रा सुरळीत पार पडावी, यासाठी पोलीस फौजफाटाही मोठ्या प्रमाणात तैनात केला जाणार आहे.
ऐतिहासिक संदर्भ
देशामध्ये पदयात्रांना एक ऐतिहासिक संदर्भ आहे. जनतेमध्ये पोहोचण्याचे माध्यम म्हणून पदयात्रांकडे पाहिले जाते.
1983 मध्ये तत्कालीन विरोधी पक्ष नेते चंद्रशेखर यांनी सहा महिने यात्रा काढली होती. ही यात्रा 4000 किमीची होती.
चंद्रशेखर हेच तळागाळातून आलेले नेते आहेत हे त्यांना सिद्ध करायचं होतं. तेव्हा ते 56 वर्षांचे होते आणि त्यांना मॅराथॉन मॅन म्हणत असत. या यात्रेमुळे त्यांना कोणताही राजकीय फायदा झाला नाही.
पुढच्या वर्षी इंदिरा गांधींची हत्या झाली आणि सहानुभूतीच्या लाटेवर काँग्रेस पक्षाला सत्ता मिळाली.
1990 मध्ये भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनीही असीच रथयात्रा काढली होती. एका छोट्या ट्रकमध्ये 10 हजार किमीची यात्रा काढण्याचा त्यांचा इरादा होता.
सोमनाथ ते अयोध्या ही यात्रा होती. अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी ही रथयात्रा होती.
मात्र एका महिन्यातच अडवाणींची यात्रा मध्येच थांबवण्यात आली आणि त्यांना अटक करण्यात आली होती.
तेव्हा बिहारमध्ये लालू प्रसाद यादव मुख्यमंत्री होते. त्यांची ही यात्रा भाजपाची ओळख प्रस्थापित करण्यासाठी होती.
अशा प्रकारच्या यात्रांना ऐतिहासिक संदर्भ आहे. 1930 मध्ये महात्मा गांधीनीही अशीच पदयात्रा काढली होती. ही यात्रा 380 किमीची होती.
ही पदयात्रा गांधीजी पूर्ण करू शकतील की नाही अशी शंका होती. मात्र गांधींनी ती पूर्ण केली होती.
चीनचे सर्वोच्च नेते माओंनी 12000 किमी ची यात्रा काढली. ही यात्रा 1934 मध्ये काढली होती. ही यात्रा म्हणजे चीन च्या निर्मितीसाठीचं नवं पाऊल होतं.
"सोशल मीडियामुळे लोकांपर्यंत पोहोचण्याचे अनेक मार्ग उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे जोपर्यंत नेत्यांकडे विश्वासार्हता नाही तोपर्यंत अशा यात्रा यशस्वी होत नाहीत."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)