मोरबी: ओरेवा कंपनी नेमकं काय काम करते? या कंपनीचे मालक जयसुख पटेल कोण आहेत?

    • Author, जय शुक्ल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

गुजरात मधील मोरबी मध्ये रविवारी (30 ऑक्टोबर) झुलता पूल कोसळल्यामुळे 135 लोकांना जीव गमवावा लागला.

या प्रकरणात आतापर्यंत 9 लोकांना अटक करण्यात आली. त्यात ओरेवा कंपनीच्या दोन मॅनेजरचाही समावेश आहे.

पुलाच्या देखभालीचं काम पाहणाऱ्या आणि व्यक्ती आणि एजन्सीवर निष्काळजीपणाचा आरोप आहे.

पुलाच्या देखभालीत निष्काळजीपणा झाल्यामुळेच पर्यटकांचा मृत्यू झाला आणि पुलावर येणाऱ्या पर्यटकांच्या जीवाला धोका होऊ शकतो याची आधीच माहिती होती असाही आरोप आहे.

पुलाच्या देखरेखीचं काम ओरेवा कंपनीला मिळालं होतं. या कंपनीच्या दोन मॅनेजर्सना अटक करण्यात आली आहे. नूतनीकरण झाल्यानंतर ओरेवा कंपनीच्या मालकांनी सहकुटुंब या पुलाचं उद्घाटन केलं होतं. या कंपनीचे मालक जयसुख ओधावजी पटेल यांचं नावही चर्चेत आहे.

मोरबी नगरपालिकेचे मुख्याधिकारी संदीप सिंह यांनी आरोप केला आहे की, "या पुलाचं उद्घाटन नगरपालिकेला कोणत्याही प्रकारची माहिती न देता केलं होतं. यामुळे सेफ्टी ऑडिट झालं नाही."

जयसुख पटेल कोण आहेत?

जयसुख पटेल यांचे वडील ओधावजी पटेल यांनी घड्याळाची कंपनी स्थापन केली. विशेषत: भिंतीवरची घड्याळं लोकप्रिय करण्यात त्यांचा मोठा वाटा होता.

1971 मध्ये तीन भागीदारांबरोबर त्यांनी या कंपनीची स्थापना केली होती. त्यात जयसुख पटेल यांचा वाटा फक्त 15 हजार रुपयांचा होता.

त्यानंतर अजंटा कंपनीची भिंतीवरची घड्याळं लोकप्रिय झाली. 1981 मध्ये या कंपनीची तीन भागात विभागली गेली. त्यानंतर ओधावजी यांच्या नावावर कंपनीचं नाव अजंता कंपनी ठेवण्यात आलं.

त्याच दशकात ओधावजी यांनी क्वार्ट्झ क्लॉक तयार करायला सुरुवात केली. त्यामुळे अजंता घड्याळनिर्मिती करणारी जगातली सगळ्यात मोठी कंपनी म्हणून नावारुपाला आली. इतकंच नाही तर केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने अजंता ग्रुपला सलग 12 वर्षं इलेक्ट्रॉनिक्स श्रेणीत सर्वोच्च निर्यातदार पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

कंपनीचा कारभार 45 देशात पसरलेला आहे. ऑक्टोबर 2012 मध्ये ओधावजी पटेल यांच्या मृत्यूनंतर अजंता कंपनीची ओधावजींच्या मुलांमध्ये वाटणी झाली. जयसुख पटेल यांना जी कंपनी मिळाली त्याचं नाव त्यांनी ओरेवा केलं.

ओरेवा नाव कसं पडलं?

1983 मध्ये कॉमर्स विषयात पदवी घेतल्यावर जयसुख पटेल यांनी त्यांच्या वडिलांच्या कंपनीत काम करायला सुरुवात केली.

राजकोट येथील ज्येष्ठ पत्रकार सुरेश पारेख सांगतात, "जयसुख पटेल यांनी त्यांच्या कंपनीचं नाव ठेवण्यासाठी वडिलांच्या नावातलं ओ आणि आईच्या नावातलं रेवा ही अक्षरं घेतली आणि ओरेवा नाव ठेवलं.

अहमदाबाद मध्ये असलेला ओरेवा ग्रुप त्यांची मूळ कंपनी अजंता मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेड या नावाने लायटिंग प्रॉडक्ट, बॅटरीवर चालणारी बाईक, घरगुती वापराचे उपकरणं, वीजेचं सामान, टेलिफोन, कॅल्क्युलेटर, एलईडी टीव्ही आणि अन्य काही उत्पादनं तयार करतात.

ओरेवा देशभरात पसरलेल्या 55 हजार चॅनल पार्टनरच्या माध्यमातून त्यांची उत्पादनं विकण्याचं काम करते. कंपनीने एक ई-बाईक सुद्धा काढली आहे. त्याशिवाय स्वस्त टाईल्स, मनगटी घड्याळं, आणि मोबाईल फोन तयार करण्याचं काम ते करतात.

कंपनी देशातला सगळ्यात मोठा प्लांट चालवण्याचं काम करतात. हा प्रकल्प गुजरात मधील कच्छ येथे सामखीयाली मध्ये आहे. तो 200 एकर परिसरात आहे.

वीजेवर चालणारे दिवे आणि एलईडी लाईट्समध्ये त्यांनी वेगवान प्रगती केली. एकेकाळी फक्त भिंतीवरचं घड्याळ तयार करणाऱ्या कंपनीने डिजिटल घड्याळं सुद्धा तयार करायला सुरुवात केली.

1980 मध्ये अजंता कंपनीत महिलासुद्धा काम करू लागल्या. त्यावेळी 12 महिला काम करत होत्या.

आज चार दशकानंतर त्यांची संख्या पाच हजार झाली आहे. आज ओरेवा कंपनीत सात हजार लोक काम करतात. त्यापैकी पाच हजार पेक्षा जास्त महिला आहेत.

ज्येष्ठ पत्रकार सुरेश पारेख यांच्या मते कंपनी महिला कर्मचाऱ्यांच्या लग्नाचा खर्चही करते.

ज्या पद्धतीने चीनमध्ये स्वस्त माल तयार होत होता त्याच्याशी स्पर्धा करण्यासाठी भारताने सुद्धा त्यांच्या धोरणात बदल आणण्याची गरज होती. ते सार्वजनिकरित्या सांगायचे, "मोठ्या कंपनीचे मालक त्यांना कबड्डी म्हणतात, मात्र मला त्याची परवा नाही. मी माझ्या ग्राहकांना स्वस्त आणि चांगल्या क्वालिटीचा माल देण्यासाठी कटिबद्ध आहे."

जयसुख पटेल यांचे राजकीय लागेबांधे

ओरेवा ग्रुपच्या वेबसाईटनुसार त्यांनी गुजरातमध्ये चेक धरणासाठी दोन कोटी रुपयांची मदत केली आहे. त्यामुळे सरकारच्या जलसंधारण योजनेअंतर्गत शेतीच्या अधिपत्याखाली असलेल्या 21 हेक्टर जमिनीवर सिंचनाची सोय होऊ शकते.

बीबीसीचे सहयोगी पत्रकार बिपीन टंकरिया सांगतात, "जयसुख पटेल यांच्या वडिलांचा पटेल समाजात मोठा दबदबा होता."

जयसुख पटेल यांनी रण सरोवर नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे. कंपनीने मोरबी आणि कच्छ भागात एक लाखापेक्षा जास्त झाडं लावल्याचा उल्लेख या पुस्तकात आहे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी 2007 मध्ये त्यांना इंदिरा गांधी पर्यावरण पुरस्कारही मिळाला आहे.

जयसुख पटेल यांचे काँग्रेस आणि भाजपा दोन्ही पक्षांशी चांगले संबंध आहेत.

मोरबी येथील बीबीसी प्रतिनिधी राजेश अंबालिया यांच्या मते, "जयसुख आणि त्यांच्या वडिलांचे भाजपाशी चांगले संबंध होते. भाजपची दीर्घकाळ सत्ता असणं हेही एक कारण त्यामागे आहे. मात्र त्यांच्या कार्यक्रमात भाजपा आणि काँग्रेस दोन्ही पक्षांचे नेते येतात."

ओरेवा कंपनीच्या वेबसाईटवर अनेक भाजपा नेत्यांबरोबर त्यांचे फोटो आहेत. त्यावरून असं दिसतं की, त्यांचे भाजपशी चांगले संबंध आहेत.

रणसरोवर योजना आणि वाद

जयसुख पटेल यांनी छोट्या वाळवंटात पाण्याचं तळं तयार करण्यासाठी रण सरोवर योजना सुरू केली. तेव्हा नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी या योजनेचा दौराही केला होता.

या योजनेमुळे 4900 चौ. फूट भाग व्यापला जाणार आहे. या योजनेमुळे कच्छचं छोटं वाळवंट आशिया खंडातलं सगळ्यात मोठं पाण्याचं तळं होईल.

पाणी झिरपल्यामुळे गुजरातच्या आसपासच्या भागात शेतीला फायदा होईल.

या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी जयसुख पटेल अनेक वर्षांपासून काम करत आहेत. मात्र सध्या त्यांना आश्वासनच मिळत आहेत.

मात्र त्या रण सरोवर योजनेचा आगरी समाजाचे लोक आणि त्यांच्यासाठी काम करणारे एनजीओ विरोध करत आहेत.

आगरी लोकांची मुलं आणि महिलांच्या विकासाशी संबंधित अनुबंधच्या व्यवस्थापक निरुपा शाह म्हणतात, "या योजनेमुळे परिसरातील मीठागरं गायब होतील आणि मीठ तयार करणाऱ्या लोकांचा रोजगार संपून जाईल. स्वच्छ पाणी आल्यामुळे खारं पाणी येथे येणार नाही आणि मीठ निर्माण होणार नाही. "

मोरबी पूल घटनेनंतरची सद्यस्थिती

मोरबी पुलाच्या देखभालीचं काम ओरेवा समुहाला देण्यात आलं होतं.

कंपनीचे प्रमुख जयसुख पटेल पुलाचं उद्घाटन करताना म्हणाले होते, "हा जवळजवळ 150 वर्षं जुना पूल आहे. हा मोरबीच्या राजाच्या वेळेचा पूल आहे, सरकार आणि मोरबी नगरपालिका यांच्यात चार पानी करार झाला आहे."

"करारानुसार 15 वर्षांपर्यंत पुलाच्या देखभालीसाठी, चालवण्यासाठी आणि त्याच्या सुरक्षेसाठी आम्ही जबाबदार आहोत. ही जबाबदारी आम्हाला सोपवली आहे. हा पूल मोरबीचं स्मृतीचिन्ह आहे. गेले सहा महिने नुतनीकरणच्या कामामुळे हा पूल बंद पडला होता."

त्यांच्या मते पुलाचं नूतनीकरण करण्यासाठी दोन कोटी रुपयांचा खर्च झाला. रविवारी झालेल्या दुर्घटनेत 135 लोकांनी जीव गमावला.

या घटनेनंतर ओरेवा कंपनीचे जनसंपर्क अधिकारी आणि प्रवक्ते दीपक पारेख यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं, "पुलावर अनेक लोक जमा झाले होते त्यामुळे हा पूल पडला.".

घटना घडल्यानंतर जयसुख पटेल सार्वजनिकरित्या समोर आलेले नाहीत. त्यांनी कोणतंही निवेदनही दिलेलं नाही.

न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालानुसार तिथल्या फरश्या बदलण्यात आल्या आहेत. केबल्स मात्र बदलण्यात आलेल्या नाहीत.

पीटीआयने दिलेल्या बातमीनुसार कंत्राटदार पुलाच्या नुतनीकरणासाठी सक्षम नव्हता. सरकारी वकिलांनी ही माहिती कोर्टात दिली.

या पुलावर जाण्यासाठी लहान मुलांना 12 रुपये तर प्रौढांना 17 रुपये तिकीट होतं. मोरबी नगरपालिका आणि कंपनीमध्ये झालेल्या करारानुसार तिकिटाचा दर 15 रुपये ठेवण्यात आला होता.

तसंच प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या मुलांसाठी तिकिटाचा दर 5 रुपये, 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी 10 रुपये असा दर होता. 2028 मध्ये तिकिटांचा दर 15 रुपये होणार होता.

ओरेवा कंपनी मात्र 17 रुपये दराने तिकीट आकारत होती. लहान मुलांसाठी हा दर 12 रुपये होता.

या प्रकरणात जयसुख पटेलांचं नाव आलं तर ते खटला लढवणार नाहीत असा तिथल्या वकिलांनी निर्णय घेतला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)