नारायण राणेंचा फोटो 25 पैशाच्या नाण्यावर, भाजपची तक्रार #5मोठ्याबातम्या

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...

1. 25 पैशाच्या नाण्यावर नारायण राणेंचा फोटो, भाजपाची तक्रार

चलनी नोटांवर महात्मा गांधी यांच्यासोबत लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो लावावा अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली. त्यानंतर भारतीय नोटांवर कोणाचा फोटो असावा यावरून सध्या चर्चा रंगली आहे.

यासंदर्भात आतापर्यंत अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. परंतु महाराष्ट्रात यावरून आता राजकारण होताना दिसत आहे.

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना या मुद्द्यावर सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं आहे. 25 पैशांच्या नाण्यावर राणेंचा फोटो लावून 'हे नाणं फायनल करा' अशी मागणी सोशल मीडियावर काही जणांकडून करण्यात आली.

या प्रकारानंतर आता भाजपाने कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. संबंधित फोटो कोणी बनवला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

न्यूज 18 लोकमतने हे वृत्त दिलं आहे.

'नारायण राणे यांचा फोटो अशोकस्तंभाच्या जागी लावून त्याची विटंबना करण्यात आली आहे. या विरोधात आम्ही कुडाळ पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी कठोर कारवाई करण्याची आमची मागणी आहे.' असं भाजपाच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.

2. शिंदे सरकारकडून मिलिंद नार्वेकरांच्या सुरक्षेत वाढ

शिंदे सरकारने महाविकास आघाडीच्या काही महत्त्वाच्या नेत्यांची सुरक्षा काढली आहे. परंतु शिवसेनेचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आणि निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत मात्र वाढ करण्यात आली आहे.

मिलिंद नार्वेकर यांना आधी एक्स कॅटेगरीची सुरक्षा होती. आता ती वाढवून वाय प्लस सुरक्षा दिली आहे.

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाण्याचे नेते जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षा व्यवस्था जैसे थे ठेवण्यात आली.

महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं आणि त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सातत्याने संघर्ष दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. यापूर्वी ठाकरे सरकारच्या अनेक महत्त्वाच्या निर्णयांना स्थगिती देण्यात आली होती.

एबीपी माझाने हे वृत्त दिलं आहे.

वरुण सरदेसाई, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, जयंत पाटील, सतेज पाटील,नितीन राऊत, विजय वडेट्टीवार, भास्कर जाधव, नरहरी झिरवळ, सुनील केदारे अशा काही नेत्यांची सुरक्षा काढूनघेण्यात आल्याचं समजते.

राज्यातील नेत्यांना सुरक्षा देणं ही सरकारची जबाबदारी आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये याची काळजी सरकारने घेणं अपेक्षित आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

3. 'राजकारणातील कटुता संपवा' उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना आवाहन

शिंदे सरकार आल्यानंतर भाजपा आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) यांच्यातील संघर्ष टोकाला गेल्याचं पहायला मिळालं. महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेनंतर सुरू झालेला हा तीव्र संघर्ष ठाकरे सरकार कोसळल्यानंतरही कायम आहे. परंतु आता शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना साद घातली आहे.

राजकारणातील कटुता संपवा असं आवाहन ठाकरे गटाकडून फडणवीसांना करण्यात आलं आहे.

शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखातून हे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आलं आहे. काय होईल असं जर-तर राजकारणात चालत नाही. महाराष्ट्राची एकोप्याची परंपरा कायम रहावी या फडणवीसांच्या मताशी आम्ही सहमत आहोत, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.

ते पुढे लिहितात, 'नोपिलयन, सिकंदरही कायम राहिले नाहीत. राम-कृष्णही आले आणि गेले. तिथे आपण कोण? फडणवीस, तुमच्या मनात आलेच आहे तर कटुता संपवण्याचा विडा उचलाच! लागा कामाला!' असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

4. 'भारत जोडो' यात्रेत राहुल गांधींना अझरुद्दीनची साथ

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 'भारत जोडो' यात्रा तेलंगणा राज्यात पोहचली आहे. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेश असा प्रवास करत ही यात्रा तेलंगाणात आली आहे.

'भारत जोडो यात्रा' 49 दिवसांपासून सुरू असून यात्रेत 2259 किलोमीटरचा प्रवास केला आहे. दिवाळीनिमित्त ही यात्रा तीन दिवसांसाठी थांबवली होती.

28 ऑक्टोबरला यात्रा पुन्हा एकदा तेलंगणा येथून सुरू झाली. यात्रेत भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन सामील झाला होता.

मोहम्मद अझरुद्दीन यांनी या यात्रेतील फोटो समाजमाध्यमांत शेअर केले आहेत.

लोकसत्ताने हे वृत्त दिलं आहे.

येत्या काही दिवसांत 'भारत जोडो' ही यात्रा महाराष्ट्रात पोहचणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून याची तयारी सुरू आहे.

5. '10 हजार द्या आणि सरकारमध्ये भागीदार व्हा', गडकरींचं आवाहन

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी गडकरींनी एक मोठी घोषणा केली.

किरकोळ खरेदीदार 10 हजार रुपये भरून राष्ट्र उभारणीच्या उपक्रमात सहभागी होऊ शकतो असं आवाहन त्यांनी केलं.

कोणताही सामान्य माणूस 10 हजार रुपये भरून भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अपरिवर्तनीय कर्जरोख्यांमध्ये सहभागी होऊ शकतो. यात गुंतवणूक केल्यास 8 टक्के परतावा मिळू शकतो, अशी माहिती गडकरी यांनी दिली.

या प्रयत्नात निवृत्त लोक, पगारदार, छोटे आणि मध्यम व्यापारी 10 हजार रुपये भरून राष्ट्र उभारणीच्या कार्यात सामील होऊ शकतात असंही ते म्हणाले. सकाळने हे वृत्त दिलं आहे.

देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियनपर्यंत नेण्यासाठी प्रत्येक सामान्य माणसाने सहकार्य करावे, असं आवाहन गडकरी यांनी केलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)