म्युच्युअल फंडातले पैसे वापरून घर घेणं फायद्याचं आहे?

    • Author, आयव्हीबी कार्तिकेय
    • Role, बीबीसी तेलगूसाठी

आपल्या देशातल्या बऱ्याच लोकांना त्यांची रिटायरमेंट पेन्शन मिळत नाही. दुसऱ्या बाजूला राहणीमानाचा खर्च मात्र वाढतच चाललाय.

अशा परिस्थितीत आपल्याला भविष्यासाठी काही गुंतवणूक करावी लागतेच. आता ही गुंतवणूक तुम्हाला महिन्याला मिळणाऱ्या पगारातून करायची आहे. मात्र गुंतवणूकदार म्हणून पैसे कुठे गुंतवावे ही अडचण प्रत्येकाचीच असते. तर आज याच अडचणींवर उत्तर शोधूया.

आर्थिक उद्दिष्टं कशी गाठायची?

एक गुंतवणूकदार म्हणून तुम्ही काही आर्थिक उद्दिष्टं असतात. कधीकधी ही उद्दिष्टं थोडी मोठी असतात. म्हणजे आपण जे गोल्स ठरवलेत त्या तुलनेत आपली कमाई कमी असते. हे अतिशय स्वाभाविक आहे. कारण काही गोष्टी आपल्या हातात नसतात. उदाहरणार्थ- महागाई. अशा परिस्थितीत आपण जे गोल्स ठरवलेत त्याच्या काही पैलूंचा विचार करावा लागेल.

  • पहिलं म्हणजे आपल्याला आर्थिक शिस्त लागायला हवी. कारण आपल्याला जे आर्थिक ध्येय गाठायचं आहे त्यासाठी आर्थिक शिस्त अत्यंत महत्वपूर्ण आहे. जर आपला खर्च वाढीव असेल तर तो लागलीच कपात करून गुंतवणूक वाढवली पाहिजे.
  • आपल्याला जे आर्थिक ध्येय गाठायचं आहे त्याला आपण पुरेसं महत्व देतोय का? उदाहरण द्यायचं झाल्यासं जर तुम्हाला तुमच्या मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं असेल तर त्यासाठी तुमची गुंतवणूक पुरेशी आहे का? हे तुम्ही टप्प्याटप्प्यावर तपासलं पाहिजे.
  • तुमचं आर्थिक ध्येय गाठण्यासाठी इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी म्हणजेच तुमचं गुंतवणूकीचं जे धोरण आहे ते योग्य आहे का? हे सुद्धा तपासायला हवं. तुमच्या क्षमतेच्या पलीकडची गुंतवणूक कधीच करू नका
  • शेवटचं म्हणजे जर तुम्हाला तुमचं आर्थिक ध्येय गाठता आलं नाही तर त्याचे परिणाम काय असतील? कर्ज काढून ध्येय गाठता येईल का? ते कर्ज परत फेडता येईल का हे बघावं लागेल.

म्युच्युअल फंड - होम लोन

प्रत्येकाचं एक स्वप्न असतं ते म्हणजे आपलं स्वतःचं घर असावं. घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नोकरदार लोक बऱ्याच बचती करतात, गुंतवणूक करतात. आपल्या बचत ठेवींवर कर्ज काढून घर घेणं आता सामान्य झालंय. अगदी तसंच म्युच्युअल फंडात गुंतवलेले पैसे वापरून होम लोन घेणं केव्हाही चांगलं असं बऱ्याचदा सांगितलं जातं.

आता हे योग्य आहे की अयोग्य हा मुद्दा नाहीये. पण असा निर्णय घेण्याआधी शक्यता पडताळल्या पाहिजेत. भावनांच्या आहारी न जाता आपण यातले मुद्दे तपासून पाहू.

1) सध्या होम लोनचा व्याजदर 7 ते 8 टक्क्यांच्या दरम्यान आहे. आरबीआयने रेपो रेटमध्ये बदल केल्यामुळे या व्याजदराने 7 टक्क्यांचा टप्पा ओलांडलाय. पूर्वी हाच व्याजदर कमाल 7 टक्के इतका असायचा.

2) आता म्युच्युअल फंड विषयी बोलू. एकतर तुम्हाला म्युच्युअल फंड पोर्टफोलिओमधून वार्षिक परतावा किती मिळतो हे बघावं लागेल. जर हा फंड लॉंग टर्म असेल तर वर्षागणिक 15% परतावा मिळतो. आता यावर जो LTCG द्यावा लागतो तो वजावट करून मग परताव्याची रक्कम मोजावी लागेल.

3) तिसरा मुद्दा म्हणजे तुमच्या म्युच्युअल फंड पोर्टफोलिओमध्ये रिस्क फॅक्टर किती आहे? म्हणजे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये हाय रिस्क कॅपिटल फंड आहेत की लो रिस्क इंडेक्स फंड आहेत हे बघावं लागेल.

4) वर सांगितलेले सगळे फॅक्टर लक्षात घेऊन ज्यातून कमी परतावा मिळणार आहे ते फंड विकता येतील. त्यातून मिळणाऱ्या पैशातून तुम्ही होम लोनवर असणारा इएमआयचा भार कमी करू शकता.

इंटरनेटवर मिळणारे सल्ले / आर्थिक सल्लागार

इंटरनेटच्या या युगात तुम्हाला कुठलीही माहिती अगदी सहज मिळते.

पण पर्सनल फायनान्स ही अशी एक गोष्ट आहे ज्यात तुम्हाला स्वतःला निर्णय घ्यावा लागतो. त्यामुळे इंटरनेटवर अवलंबून राहण्यापेक्षा आर्थिक सल्लागार नेमलेलं कधीही चांगलं असं म्हटलं जातं.

हा जो तर्क लावला जातोय यात बऱ्यापैकी तथ्य आहे. बऱ्याचदा अर्धवट माहिती घेऊन लोक गुंतवणूक करतात आणि डबघाईला येतात. जेव्हा सेबी प्रमाणित आर्थिक सल्लागार तुम्हाला सल्ले देतो तेव्हा तुमची परिस्थिती पाहिली जाते. त्यामुळे होणारं नुकसान तुलनेन कमी असतं.

पण आर्थिक सल्लागार नेमायचा तर त्यासाठी फी पण जास्त असू शकते. त्यामुळे आर्थिक सल्लागार नेमण्याऐवजी ऑनलाइन अभ्यास करणं कधीही चांगलं. आणि अशा प्रकारे आपण आपल्या भविष्यातील गरजांनुसार गुंतवणूक करू शकतो.

प्रॉफिट मिळवून देणारी कंपनी नेहमीच चांगली कामगिरी करते?

शेअर बाजारात जे लोक गुंतवणूक करतात त्यांच्या मनात हा प्रश्न कायम घोळत असतो. एखाद्या कंपनीने तुम्हाला याआधी विंडफॉल प्रॉफिट मिळवून दिलंय ती कंपनी भविष्यात सुद्धा असाच नफा देईल हे सांगणं कठीण आहे. या विषयावर बऱ्याच तज्ज्ञांनी पीएचडी करून झालीय तरी पण त्यांना या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही.

टाटा आणि रिलायन्स सारख्या काही कंपन्या त्यांच्या सातत्याने चांगली कामगिरी करतात. पण इतर कंपन्यांच्या बाबतीत तसं घडत नाही. यात तुम्हाला वॉरन बफेचा एक सल्ला लक्षात ठेवायला हवा, तो म्हणजे तुम्ही कंपनीत नाही तर त्यांच्या धंद्यात गुंतवणूक करा. म्हणजे एखादी कंपनी कोणता व्यवसाय करते आहे, तिची क्षमता किती आहे, तो व्यवसाय लाभ मिळवून देणारा आहे का हे पाहावं लागेल.

बफेच्या यांनी सांगितलेल्या पध्दतीने गुंतवणूक करायची झालीच तर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये नेहमी रिटेल सेक्टर असेल. कारण लोकसंख्या वाढली की किरकोळ उत्पादनांची निर्मिती आणि विक्री वाढते.

रिटेल कंपन्यांचा बिजनेस होतोच होतो. याच बफेने सॉफ्टवेअर क्षेत्रात गुंतवणूक करण्याचं टाळलं. कारण सॉफ्टवेअर व्यवसायात असलेल्या मागणी विषयी स्पष्टता नसते असं त्यांचं म्हणणं होतं.

आर्थिक समस्यांबाबत जागरूकता

जेव्हा नवरा बायको दोघेही नोकरी करत असतात तेव्हा त्यांच्यापैकी एकजण गुंतवणूक करत असतो. तेच दोघांपैकी एकटाच कमावता असेल तरी परिस्थिती सेमच असते. पण इथं एक मोठा धोका असतो.

जर घरात काही अनपेक्षित दुर्घटना घडली तर कुटुंब कोसळतं. जो व्यक्ती कमावता आहे , जो गुंतवणूक करतोय त्याच व्यक्तीला काही झालं तर कुटुंबाच्या आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम होतो.

ही परिस्थिती टाळायची असेल तर त्यासाठी 'अॅक्टिव्ह इन्शुरन्स' म्हणजेच सक्रीय विमा घ्यायला हवा.

अ) तुम्ही जी गुंतवणूक केली आहे त्यात तुमच्या नॉमिनीचं नाव स्पष्ट आणि बरोबर आहे याची काळजी घ्यावी. जो व्यक्ती नॉमिनी म्हणून निवडलाय तो अल्पवयीन असेल तर सर्व नियम काटेकोरपणे पाळले पाहिजेत.

ब) तुम्ही जी गुंतवणूक केली आहे त्याच्या सर्व तपशिलांची एक चिट शीट तयार करून तुमच्या लाईफ पार्टनरकडे द्यायला हवी. या चिट मध्ये कोणता परतावा कधी मिळणार आहे त्याच्याविषयी स्पष्टता असावी.

क) तुमच्या फायनान्शियल गोल्सविषयीची संपूर्ण माहिती तुमच्या लाईफ पार्टनरला द्यावी.

ड) तुमच्या आर्थिक सल्लागाराचे सर्व तपशील तुमच्या साथीदाराकडे असायला हवेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)