'टाटा एअरबस' प्रकल्प महाराष्ट्राऐवजी गुजरातला होणार #5मोठ्याबातम्या

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...

1. महाराष्ट्रातला आणखी एक प्रकल्प गुजरातला

'फॉक्सकॉन-वेदांता'नंतर आता आणखी एक महाराष्ट्रातला प्रकल्प गुजरातला गेला आहे. नागपूर येथे होणारा C-295 लष्करी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट हा प्रकल्प आता गुजरातमध्ये होणार आहे.

गुजरातमध्ये वडोदऱ्याला हा प्रकल्प होणार असून 30 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकल्पाचं उद्घाटन होणार आहे. एबीपी माझाने हे वृत्त दिलं आहे.

हा प्रकल्प नागपूर येथे होईल, असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केलं होतं. 22 हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी केंद्राकडे पाठपुरावा केल्याचंही ते म्हणाले होते. परंतु आता हा प्रकल्प गुजरातला होणार आहे.

देशात विमान निर्मितीला चालना देण्यासाठी हा प्रकल्प असून लष्करी विमानांची निर्मिती खासगी कंपनीद्वारे होणारा हा पहिलाच प्रकल्प आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

संरक्षण मंत्रालयाने 24 सप्टेंबर 2021 रोजी, मेसर्स एअरबस डिफेन्स अँड स्पेस एस. ए. या कंपनीसोबत करार केला होता.

शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, "प्रकल्प दुसऱ्या राज्यात जाण्याचं दु:ख नाही. आपल्या राज्याला का मिळत नाही? हा प्रश्न आहे. 50 खोके एकदम ओके सरकार आहे. आज एमआयडीसींमध्ये काय परिस्थिती आहे."

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यासंदर्भात सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. ते म्हणाले, "वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पानंतर नागपूरमध्ये होणारा 22 हजार कोटींचा टाटा एअरबस प्रकल्प आज गुजरातला गेला.

एकामागून एक मोठे प्रकल्प गुजरातला जात आहेत. महाराष्ट्रातील सध्याचं सरकार दिल्लीसमोर किती हतबल झाले आहे हे यातून स्पष्ट होतं. महाराष्ट्रातील सत्तांतर राज्याला वेठीस धरण्यासाठी झालं आहे का? असा प्रश्न सध्या पडत आहे. गुजरात निवडणुकांच्या अनुषंगाने सर्व प्रकल्प गुजरातला नेले जात आहेत आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री मात्र बघ्याच्या भूमिकेत आहेत. आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार आहात?"

तर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावर स्पष्टीकरण दिलंय. ते म्हणाले, "एअरबस प्रकल्प गुजरातला नेण्याचा निर्णय वर्षभरापूर्वीच कंपनीने घेतला होता."

2. 'दारू पिता का?' सत्तारांचा वादग्रस्त व्हीडिओ व्हायरल

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही दारू पिता का? असा प्रश्न केल्याचा व्हीडिओ समोर आला आहे.

या व्हीडिओमुळे अब्दुल सत्तार पुन्हा एकदा वादात अडकले आहेत. विरोधकांनी यावर आक्षेप घेतला आहे.

बीडमध्ये पाहणी दौऱ्यावर असताना जिल्हाधिकाऱ्यांना अब्दुल सत्तार यांनी दारू पिता का? असा प्रश्न केला. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी 'कधी कधी थोडी घेतो,' असं उत्तर दिलं आहे. महाराष्ट्र टाईम्सने हे वृत्त दिलं आहे.

शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी सत्तारांच्या या वक्तव्यावर टीका केलीय. "हे खोके सरकार आता झिंगझिगांट झालं आहे," असं त्या म्हणाल्या.

3. गद्दारांनी खोके त्यांच्याजवळ ठेवले मदतीला दिले नाहीत - आदित्य ठाकरे

राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं आहे. या मुद्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे.

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने केली जात आहे.

शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे सध्या पुण्यात पाहणी दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी नुकसाग्रस्त शेकऱ्यांची भेट घेतली.

शेतकऱ्यांना तातडीने मदल मिळवून देऊ, असं आश्वासन यावेळी आदित्य ठाकरे यांनी केलं. 'या गद्दारांनी खोके फक्त त्यांच्या मदतीसाठी ठेवले दुसऱ्यांना दिले नाहीत,' असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. महाराष्ट्र टाईम्सने हे वृत्त दिलं आहे.

तर आम्हाला मदत सोडा मुख्यमंत्री साधे भेटायलाही आले नाहीत, अशी व्यथा शेतकऱ्यांनी आदित्य ठाकरे यांच्याजवळ मांडली.

4. नरेंद्र मोदी आणि ऋषी सुनक यांच्यात फोनवरून चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनचे नवनिर्वाचित पंतप्रधान ऋषी सुनक यांचं अभिनंदन केलं. दोन्ही नेत्यांची यावेळी फोनवरून चर्चा झाली.

दोन्ही देशांचे संबंध अधिक दृढ करण्याबाबत तसंच मुक्त व्यापार करारावरही चर्चा झाली. बीबीसी हिंदीने हे वृत्त दिलं आहे.

नरेंद्र मोदी यांनी ट्वीटरद्वारेही ऋषी सुनक यांना शुभेच्छा दिल्या होत्या. 'सर्वसमावेशन सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी आम्ही एकत्र काम करू. समतोल मुक्त व्यापार करार लवकर अस्तित्वात यावा यावरही आमचं एकमत झालं आहे.'

तर ऋषी सुनक यांनीही ट्वीटच्या माध्यमातून मोदींचे आभार मानले.

ते म्हणाले, 'मी नव्या भूमिकेत आल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल आभार मानतो. सुरक्षा, संरक्षण आणि आर्थिक क्षेत्रात सहकार्य वाढवून दोन लोकशाही देश मोठी झेप घेऊ शकतात, याबाबत मी उत्साहित आहे,' असे ट्वीट सुनक यांनी केलंय.

5. ...तर काश्मीर 100 टक्के हिंदूरहित होऊ शकतो - फारूख आब्दुल्ला

नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी काश्मिरी पंडितांच्या पलयानाच्या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे.

तसंच काश्मिरी पंडित आणि अल्पसंख्यांक हिंदूंच्या पलायनाच्या मुद्यांसंदर्भात एक सर्वपक्षीय बैठक बोलावली पाहिजे असंही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, "जर या प्रकरणी तत्काळ काही केलं गेलं नाहीतर येणाऱ्या दिवसांमध्ये काश्मीर 100 टक्के हिंदूरहित होऊ शकतो. काश्मिरी पंडितांसाठी 1990 सारखी परिस्थिती पुन्हा निर्माण झाली आहे. मी हत्यांसाठी जबाबदार नाही. मी दहशतवादाला समर्थन करणारं कोणतंही विधान केलेलं नाही." लोकसत्ताने हे वृत्त दिलं आहे.

काश्मीरमध्ये सामान्य परिस्थिती असल्याच्या केंद्र सरकारच्या मोठाल्या दाव्याचा पर्दाफाश झाला आहे, असंही ते म्हणाले.

"मी सरकारला सूचना करायला तयार आहे. मात्र सरकारने पहिलं पाऊल उचलायला हवं आणि सर्वपक्षीय बैठक बोलवायला हवी. मी घाबरलेल्या काश्मिरी पंडितांना भेटण्यास जाईन," असंही फारूख अब्दुल्ला म्हणाले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)