सुषमा अंधारे: शरद पवार मेथीच्या लाडूसारखे तर राज ठाकरे शंकरपाळे वाटतात #5मोठ्याबातम्या

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यावरील महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा-

1.शरद पवार मेथीच्या लाडूसारखे, तर राज ठाकरे शंकरपाळे वाटतात- सुषमा अंधारे

"राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे मेथीच्या लाडूसारखे राजकारणात पौष्टिक आहेत. उद्धव ठाकरे हे चौकोनी नानकटाई सारखे गोड आहेत," असे उद्गार शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी काढले आहेत.

'एबीपी माझा'शी बोलताना त्यांनी हे उद्गार काढले.

शंकरपाळे पाहिल्यानंतर मला राज ठाकरे यांची आठवण येते. देवेंद्र फडणवीस गुलाबजाम सारखे गोड गोड आणि गुळगुळीत बोलतात. धनंजय मुंडे यांना त्यांनी बाहेरून कडक आणि आतून नरम असलेल्या अनारशाची उपमा दिली. यावेळी अंधारे यांनी त्यांच्या संघर्षमय प्रवासाबद्दलही सांगितले.

राजकारणात नारायण राणे हे फटाक्यातल्या दिशाहीन रॉकेट सारखे असून उद्धव ठाकरे हे बॉम्ब असल्याचं त्या म्हणाल्या. फटाक्याची लड म्हणजे शिवसैनिक असून तुडतुड करणाऱ्या छोटे फटाके म्हणजे नारायण राणेंची दोन मुलं असल्याचं म्हणत त्यांनी फटाक्यातल्या झाडाची उपमा दिली.

नवनीत राणा यांचा सुषमा यांनी उल्लेख गोल गोल आणि काटेरी दिसणाऱ्या चकली म्हणून केला. सुषमा अंधारे सध्या बीडच्या परळीमध्ये आपल्या माहेरी आल्या असून त्यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत दिवाळीचा फराळ तयार केला.

2. अजून 15 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत येत नाही- शंभूराज देसाई

"राष्ट्रवादी काँग्रेस अजून पंधरा वर्षे सत्तेत येणार नाही", असं राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे.

"राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षातील काही नेत्यांना सत्तेविना राहवत नाही, सत्तेविना ते राहू शकत नाही. सत्तेविना ते तळमळत आहे", असं देसाई म्हणाले. आम्ही लोकशाही मार्गानेच सत्तेत आलो आहे. लोकशाही मार्गाने बहुमत सिद्ध केले आहे हेही त्यांनी सांगितलं.

'टीव्ही9 मराठी'ने ही बातमी दिली आहे.

नुकतेच रामराजे नाईक-निंबाळकर यांनी राज्यात जे राजकारण सुरू आहे, ते असेच सुरू राहिले तर लोकशाही टिकणार नाही, त्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसने पुढे आले पाहिजे असं म्हटलं होतं. त्यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

"लोकशाही मार्गानेच सभापती यांची निवड केली आहे. आपणही विधानपरिषदेचे सभापती होता, आम्ही लोकशाही मार्गानेच सत्तेत आलो आहेत", असं मंत्री देसाई यांनी म्हटलं आहे.

3. भाजपचं काम म्हणजे लबाडाच्या घरचं आवताण जरी असलं तरी जेवल्याशिवाय खरं नसतं - पवार

"गेल्या दहा वर्षात भू-विकास बँकेचे कर्ज एकाला तरी मिळालं का? भूविकास बँक अस्तित्वात आहे का? भूविकास बँक होती का? याची माहिती नाही. 25 ते 30 वर्षे झाली बँकेची कोणी कर्ज वसुली केली नाही. राहिलेली वसुली होणार नाही हे कळल्यावर, कर्ज माफी देण्यात आली. लबाडाच्या घरचं आवताण जरी असलं तरी जेवल्याशिवाय खरं नसतं असं भाजपावल्याचं काम आहे," अशी अशी टीका शरद पवारांनी केली आहे.

'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.

शरद पवारांनी पुरंदर येथे शेतकऱ्यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. भू-विकास बँकेचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना 964 कोटी रुपयांची कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.

राज्यात अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. त्यावर बोलताना "अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. त्या नुकसानीची भरपाई केंद्र आणि राज्य सरकारने करावी म्हणून आम्ही सगळे मिळून प्रयत्न करू. यासाठी संघर्ष करावा लागला तर चालेल," असेही शरद पवारांनी सांगितलं.

4.दादा भुसेंनी पिस्तूलधारी दरोडेखोराला पकडलं

हातात पिस्तूल घेऊन दरोडा टाकण्यासाठी बंगल्यात घुसलेल्या दरोडेखोराला धाडस करुन पालकमंत्री दादा भुसे यांनी पकडले. मालेगावच्या कलेक्टर पट्टा भागात ही घटना घडली आहे.

लक्ष्मीपूजन असल्यामुळे बंगल्यात मोठ्या प्रमाणात दागिने, रोख रक्कम असेल ती लुटण्यासाठी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास एक चोरटा हातात पिस्तूल घेऊन दोशी यांच्या बंगल्यात घुसला आणि त्याने घरातील महिलांना पिस्तूलचा धाक दाखवून दागिने मागितले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे महिलांमध्ये भीती पसरली आणि त्यांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली.

'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.

त्यांचा आवाज ऐकून काही नागरिक गोळा झाले आणि त्याच भागात पालकमंत्री दादा भुसे देखील आलेले होते. त्यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी थेट बंगल्याकडे धाव घेतली आणि चोरट्याला शरण येण्याचे आवाहन केले. तब्बल दोन तासानंतर लपलेला चोरटा शरण आला त्याला कार्यकर्त्यांनी चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केलं.

5. मुंबईत बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षीय मुलीचा मृत्यू

आईसोबत दिवाळीचे दिवे लावण्यासाठी घराबाहेर आलेल्या दीड वर्षीय चिमुकलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आरे कॉलनी परिसरात आज घडली. इतिका लोट असे या चिमुकलीचे नाव असून, आरे कॉलनीतील युनिट क्र. 15 जवळ सकाळी सहाला ही घटना घडली.

घराबाहेर एकटी असलेल्या इतिकावर बिबट्याने मागून हल्ला केला. इतिका घरात आली नसल्याचे पाहून आईने तिची शोधाशोध सुरू केली असता, ती जंगल परिसरात जखमी अवस्थेत सापडली. तिला तात्काळ सेव्हन हिल रुग्णालयात नेण्यात आले; मात्र तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. ऐन दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे उद्यान परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 'सकाळ'ने ही बातमी दिली आहे.

बिबट्यांच्या निरीक्षणासाठी 12 कॅमेरे बसवण्यात आले आहेत. ठाणे प्रादेशिक आणि उद्यान अशा दोन्ही विभागांच्या कर्मचाऱ्यांची परिसरात गस्त वाढवण्यात आली असल्याची माहिती संजय गांधी राष्ट्रीय उद्यान विभागाचे मुख्य वन संरक्षक, संचालक जी. मल्लिकार्जुन यांनी दिली.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)