मिरजेची वाद्यपरंपरा; तलवारीला धार काढणारे कारागीर असे बनले वाद्यांचे जादूगार

    • Author, मयुरेश कोण्णूर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

कृष्णेच्या काठावर, मिरजेत, संगीत निर्माण करणारे स्वर आणि ज्यातून स्वर जन्माला येतात, त्या वाद्यांना घडवणारे हात, यांचा एकजीव मिलाफ घडून आला आहे. त्या मिलाफाला कृष्णेच्या पाण्याची गोडी आहे आणि मिरजेच्या मातीसारखा इतिहासही आहे. त्यामुळेच मिरज आजही भारतीय तंतुवाद्यांची राजधानी आहे.

मिरजेच्या अगदी मध्यभागात आहे सतारमेकर गल्ली. या सतारमेकर गल्लीचं आयुष्य काही शतकांचं आहे. आजही इथं सगळ्या प्रहरी संगीतवाद्यांचा मेळा लागला असतो. हे स्वरांचं जन्मस्थान आहे. आज इथून जगाच्या कानाकोपऱ्यात तानपुरे, सतार, सारंगी, वीणा, रुद्रवीणा, बुलबुल अशी असंख्य प्रकारची तंतुवाद्यं जातात. दिवसरात्र अखंड इथं ही वाद्यं घडवण्याचं काम सुरु असतं.

सतारमेकर गल्लीच्या दुतर्फा पन्नासहून अधिक दुकानं रांगेनं आहेत. त्यांच्या कलेइतकीच त्यांच्या इमारतीही जुन्याच आहेत. गल्लीतून चालता चालता सतारीच्या झंकाराबरोबर काळाचा पडदा उलगडावा आणि आपण कैक वर्षं मागं जावं असं होतं. ट्रॅफिकचा गोंगाट असून ऐकू येणं कमी होत जातं.

प्रत्येक दुकानातून मान मोडून लाकडातून वाद्य घडवणारे, तंद्री लागलेले कारागिर दिसत असतात. कुठलं वाद्य तयार झालेलं असतं, नुकत्याच तारा चढवलेल्या असतात, ते स्वरात लावलं जात असतं. कान त्या स्वरावर आपोआप केंद्रीत होतात. अगदी जादूची गल्ली आहे ही.

मिरजेचा सांगीतिक इतिहास मोठा आहे. त्या इतिहासात आणि वर्तमानातही, तंतुवाद्यं अगदी मध्यवर्ती आहेत. त्यामुळे त्यांची परंपरा मोठी खिळवून ठेवणारी आहे.

या मिरजेच्या तंतुवाद्यांच्या इतिहास सुरु होतो, फरीदसाहेब सतारमेकर आणि या मिरजेच्या सात शतकांहून जुन्या ख्वाजा शमसुद्धिन मीरा साहेबांच्या दर्ग्यापासून. जी इथं कथा सांगितली जाते, त्यानुसार या प्रसिद्ध दर्ग्याच्या कामासाठी ज्यांना 'मिरज तानपुऱ्या'चे आणि तंतुवाद्यांचे जनक म्हटलं जातं ते फरीदसाहेब आणि त्यांचे बंधू इथं आले.

इतिहास अभ्यास मानसिंग कुमठेकर सांगतात, "इथं आदिलशाही कालीन मोठा बारा इमाम दर्गा आहे. त्यात जे पंजे असतात, त्यावर आलम असतो. तो चमकवण्यासाठी, त्याची शिकल करण्यासाठी विशेषत: इथं शिकलगार समाज आला. पण 1818 मध्ये मराठेशाहीच्या अस्तानंतर शस्त्रांचं काम बहुतांशी संपलं कारण युद्धं वगैरे नव्हती. त्यामुळे शिकलगार समाजाचं तलवारींना धार करण्याचं काम काही उरलं नाही. त्यामुळे या समाजातले लोक दुसऱ्या व्यवसायांकडे वळले.

याच काळात पटवर्धनांनी त्यांच्या संस्थानात संगीत कलाकारांना आश्रय दिला होता. त्यांची वाद्यं नादुरुस्त व्हायची/ ती दुरुस्त कशी करायची, असा प्रश्न राजेसाहेब आणि कलाकारांसमोरही होता. तेव्हा इथे आलेले शिकलगार समाजातले दोन बंधू होते फरीदसाहेब आणि मोईद्दीन. ते प्रयोगशील होते. मिरजेच्या राजांनी त्यांना विचारलं की तुम्ही ही वाद्यं दुरुस्त करुन द्याला का? मग त्यांनी ते समजून घेतलं, प्रयोग केले आणि मग तंतुवाद्य निर्मितीची कला आपल्याकडे वाढवली. त्यांना मग सगळे 'सतारमेकर' म्हणू लागले."

हे साल होतं 1850. याचा अर्थ होतो मिरजेत तंतुवाद्य निर्मितीचं काम सुरु झालं या वर्षापासून. आणि मग अल्पावधीतच त्याची ख्याती वाढत गेली.

शिकलगार समाजातले फरीदसाहेब 'सतारमेकर' बनल्यावर, मग पूर्वी शस्त्र करणारी आणि शिकल काढणारी इतरही कुटुंबं हळूहळू या व्यवसायाकडे वळली. त्यातला मुख्य भाग हा की ते केवळ वाद्यांच्या दुरुस्तीपर्यंत मर्यादित राहिले नाहीत, तर त्यातल्या स्वरांचं, ध्वनीचं शास्त्र शिकून घेऊन त्यांनी वाद्यांची निर्मिती सुरु केली.

इतिहास अभ्यासक मानसिंग कुमठेकर सांगतात, "फरीदसाहेबांनी इथला पहिला तानपुरा तयार केला आणि अल्पावधीतच त्याची ख्याती सर्वदूर पसरली. ब्रिटिशांपर्यंतही ती पोहोचली. त्यांनी मिरजेच्या राजेसाहेबांना 1862 साली पत्र पाठवलं, जे माझ्याकडे आहे, त्यात ते म्हणतात की लंडनमध्ये काही कलात्मक वस्तूंचं प्रदर्शन भरणार आहे. त्यात तुम्ही या मिरजेचे तानपुरे आणि सतारी पाठवा. त्यावर राजेसाहेब लिहितात की इथे फरीदसाहेब नावाचे सतारमेकर आहेत आणि ते उत्तम वाद्यं बनवतात. मग मिरजेतून 1862 सालीच तानपुरे आणि सतारी लंडनमध्ये गेल्या."

आज मिरजेत सतारमेकर गल्लीला लागूनच एक रस्ता आहे, ज्याचं नावच आहे 'फरीदसाहेब सतारमेकर मार्ग'. या रस्त्यावर आहे 'सरस्वती तंतुवाद्य केंद्र'. जिथं पिढीजात घरात फरीदसाहेबांच्या सहाव्या पिढीतले वंशज अलताब महबूब सतारमेकर बसलेले असतात . एका नव्या सारंगीचं आणि रुद्रवीणेचं काम हातात सुरु आहे. ते आणि त्यांचा भाऊ सहावी पिढी. सोबत त्यांचं दोन मुलं मुहम्मद आणि मुझम्मिल ही पण वाद्यांवर काम करत बसलेली असतात. सातव्या पिढीपर्यंत फरीदसाहेबांच्या एकाही पिढीमध्ये स्वरनिर्मितीचा प्रवाह आटला नाही.

अलताब मेहबूब सतारमेकर म्हणतात, "शाळेत जायला लागल्यापासूनच आमची मुलं ही कामं पाहत असतात. मासा पाण्यात असतो. त्याला पिल्लं होतात. त्यांना वेगळं पोहायला शिकवायची गरज असते. ते आपोआपल पोहायला शिकतात ना? तसंच आमचं पण आहे. आम्ही म्हणतो की आमचं पोरगं जन्माला आलं की ते रडतं पण सुरात!"

निघताना अलताबभाईंच्या छोटा मुलगा मुझम्मिल आम्हाला सतारीवर एक थोडं वाजवून दाखवतो. तो कॉलेजमध्येही जातो आणि सतारही शिकतो. त्याला जेव्हा विचारतो की तुला सतार वाजवायला आवडेल की बनवायला.

"मला वाजवायलाच आवडेल. कारण त्यात आदर आहे. लोक वाजवणाऱ्यांची जास्त इज्जत करतात," मुझम्मिल सांगतो.

मिरजेच्या या पिढ्यांमध्ये तंतुवाद्यांची कला झिरपत गेली. याचं एक कारण म्हणजे त्याला अतिशय पूरक अशी संगीत परंपरा मिरजेत तयार झाली होती.

सांगली, मिरजेपासून धारवाड-कुंदगोळपर्यंतचा महाराष्ट्राच्या दक्षिणेचा हा पट्टा तर भारतीय शास्त्रीय संगीताची जणू सुवर्णभूमी. संगीताला इथं राजाश्रयही मिळाला. त्यामुळे मिरज, कोल्हापूर, कुरुंदवाड, बेळगाव, औंध या सगळ्या प्रांतात कलेची भरभराट होत गेली.

विशेषत: संगीतकलेची. या सगळ्या संस्थानांच्या दरबारी मोठमोठे गायक होते. तसे मिरजेतही अनेक जण आले आणि कायमचे स्थिरावले. त्यांच्यासोबत शास्त्रीय संगीतातील अनेक घराण्यांचे प्रवाह इथे आले. त्यातूनच मिरजेची अशी स्वत:ची सांगीतिक परंपरा निर्माण झाली. अशा संगीताची मशागत झालेल्या मातीत वाद्यपरंपरा निर्माण न होती आणि न टिकती तरच नवल. फरीदसाहेबांनी त्याची मुहूर्तमेढ करताच तो वृक्ष वाढत गेला.

ग्वाल्हेर आणि आग्रा घराण्याच्या शास्त्रीय गायिका मंजुषा कुलकर्णी पाटील पुढे सांगतात, "जी मूळ घराणी आपण म्हणतो, म्हणजे प्रथम ग्वाल्हेर घराणं, जे बाळकृष्णबुवा इचलकरंजीकरांनी महाराष्ट्रात आणलं. शेजारी कोल्हापूरला जयपूर घराणं. त्यानंतर कुरुंदवाडला भूगंधर्व रहमत खॉं साहेब होते. विनायकबुवा पटवर्धन मिरजेत होते. उस्ताद अब्दुल करीम खॉं साहेब, म्हणजे किराणा घराणं, ते मिरजेत. म्हणजे महाराष्ट्राचं जे काही संगीत आहे ते त्या भागातच तयार झालेलं आहे. 'गंधर्व महाविद्यालय' तिथं येण्याचं कारण म्हणजे पंडित विष्णु दिगंबर पलुस्कर तिथं होते. या सगळ्यांमुळेच संगीत त्या मातीत रुजलेलं होतं. विष्णुदास भावे असोत वा कृष्णाजी प्रकाश खाडिलकर असोत, ही नाट्यपरंपराही सांगली-मिरजेतच रुजलेली आहे."

या सांगली, मिरजेच्या संगीत परंपरेत एक नाव अगदी महत्वाचं, जे घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही, ते म्हणजे उस्ताद अब्दुल करीम खॉं साहेब. किराणा घराण्याचे मोठे गायक. उत्तरेतले खॉंसाहेब बडोदा, म्हैसूर असा संस्थानांचा प्रवास करत मिरजेत आले आणि इथेच कायमस्वरुपी वास्तव्यास राहिले. त्यांची मोठी शिष्यपरंपरा तयार झाली.

सवाई गंधर्व (ज्यांचे शिष्य पंडित भीमसेन जोशी आणि गंगूबाई हनगल), बाळकृष्णबुवा कपिलेश्वरी, हिराबाई बडोदेकर, सरस्वतीबाई राणे अशी अनेक मोठी नावं त्यामध्ये आहेत.

इतिहास अभ्यासक मानसिंग कुमठेकर म्हणतात की, "उस्ताद अब्दुल करीम खॉं यांचं 1897 ते 1937 सालापर्यंत म्हणजे 40 वर्षं इथं या मिरजेत वास्तव्य होतं. त्यांचा इथे अगदी पहिल्या दिवसापासूनच सतारमेकरांशीच संबंध आला. ते आले तेव्हा रहायला जागाच सतारमेकर बंधूंनी दिली. त्यानंतरच्या काळात जर तंतुवाद्यामध्ये काही प्रयोग, संशोधन करायचं असेल, तर या सतारमेकरांना अब्दुल करीम खॉं यांची खूप मदत झाली. विशेषत: श्रुतींचं संशोधन अब्दुल करीम खॉं यांनी केलं होतं कृष्णाजी बल्लाळ देवलांच्या साथीनं. त्यावेळेस खॉं साहेब आणि सतारमेकर व्यावसायिकांनी श्रुतींवर आधारित काही वाद्य तयार केल्याचं त्याकाळच्या नोदींमध्ये आपल्याला आढळून येतं."

एकोणीसाव्या शतकाच्या मध्यात सुरु झालेली मिरजेच्या तानपुऱ्याची आणि तंतुवाद्याची परंपरा बहरत गेली. फरीदसाहेबांनी रोपटं लावलं होतं, त्याचा वृक्ष होत गेला.

त्याच्या अनेक फांद्या, म्हणजे कुटुंबं, त्यातल्या पिढ्या या कारागिरीत पारंगत होत गेल्या. आज जवळपास पन्नासहून अधिक कुटुंब या व्यवसायात आहेत आणि अडिचशेहून जास्त कारागिर एकट्या मिरजेमध्ये आहेत. तानपुरा, सतार यासोबतच सारंगी, मोहनवीणा, रुद्रवीणा अशा अनेक तंतुवाद्यांच्या कलेत ते पारंगत झाले. तंतुवाद्यांचं मिरज घराणं जगभरात नावाजलं.

याच घराण्यातल्या सहाव्या पिढीचे कारागीर, फारुख सतारमेकर. त्यांच्या घराच्या अंगणातच सगळे भाऊ दिवसभर वाद्यं घडवण्याचं काम करत असतात. फारुखभाई सांगतात, की घरांतल्या पिढ्यांसारख्याच वाद्यंही बदलत राहतात. प्रत्येक वेळेस समोरुन नवी आव्हानं येत असतात. पण तानपुरा असो वा सतार, ती बनवण्याची प्रक्रिया किचकट असते आणि कसब मोठं असतं. ती सगळी प्रक्रिया आणि तानपुऱ्याच्या आयुष्यातले सगळे टप्पे आम्हाला दाखवतात.

फारुख सतारमेकर सांगतात, "हा भोपळा केवळ पोहण्याकरता आणि सतार-तंबोरे बनवण्याकरताच वापरला जातो. तो खाता येत नाही. सोलापूर तालुक्यात चंद्रभागा नदीकाठी या भोपळ्याची शेती होते. हा भोपळा अनेक महिने वाळवून मग ठरलेल्या आकारात कापला जातो आणि मग वाद्याचं काम सुरु होतं. बाकी शरीराकरता लाल देवदाराचं लाकूड वापरलं जातं. हे हलकं असल्यानं बांधकामासाठी वा फर्निचरसाठी ते वापरता येत नाही. त्यामुळे ते आम्हाला मुबलक उपलब्ध असतं. एका कारागिराला साधारण महिनाभर एक वाद्य करायला लागतो, पण वेगासाठी प्रत्येकजण एकेका टप्प्याचं काम करत असतो."

अशा घराण्यांमध्ये पिढीगणिक मुरत गेलेल्या कलेमुळेच मिरजेचा तानपुरा हा गेल्या शतकभरातल्या प्रत्येक मोठ्या गायकाकडे गेला. केवळ देशातच नव्हे तर विदेशातही. सगळे मोठे कलाकार इथूनच तानपुरा घेतात. ग्वाल्हेर आणि आग्रा घराण्याच्या नावाजलेल्या शास्त्रीय गायिका मंजुषा कुलकर्णी-पाटील या स्वत: सांगलीच्याच. त्या अगदी लहानपणापासून ही कारागिरी पाहात आल्या आहेत.

ग्वाल्हेर आणि आग्रा घराण्याच्या शास्त्रीय गायिका मंजुषा कुलकर्णी पाटील सांगतात, "तानपुरा तयार करण्याची संस्कृती आम्ही म्हणतो की मिरजेतच आहे. खरा तानपुरा कुठून तर मिरजेतून. कारण ती जी जवारी केली जाते, तानपुऱ्याची किंवा सतारीची, ती करण्याची कारागिरी आणि तिची संस्कृती तिथल्या प्रत्येक पिढीमध्ये रुजली गेली. संगीतकार त्या भागात वास्तव्याला होते ते त्यामागचं कारण होतंच, पण त्याअगोदरही ती कला तिथे होतीच. ते एकमेकांसोबत वाढत गेलं. मिरजेतून अनेक मोठ्या कलाकारांनी कायम तानपुरे खरेदी केले. मग केसरबाई असोत किंवा हिराबाई बडोदेकर, भीमसेनजी असोत किंवा स्वत: सवाई गंधर्व. मिरजेतूनच त त्यांनी तानपुरे केले. त्याच कारण तो भोपळा, त्याचा तो ब्रिज आणि ती जवारी करण्याची त्यांची ती कारागिरी. त्यातून तानपुऱ्याचा जो एक स्वर निर्माण होतो, तो स्वर वाद्य घडवणाऱ्या कारागिरांना व्यवस्थित माहिती आहे. म्हणून तेही कलाकार आहेत."

पण केवळ लाकडाला आकार देण्याच्या कसबानं उत्कृष्ट वाद्य तयार करता येत नाही. त्यासाठी संगीतसाधना आवश्यक असते. याची कमालीची जाणीव आम्हाला या सतारमेकर गल्लीत दिसते. त्यातले अनेक स्वत: संगीत शिकलेले आहेत. उत्तम वादक आहेत. स्वरसाधना हे केवळ गायक वा वादकाचं काम नाही तर ते वाद्यनिर्मिती करणाऱ्याचंही आहे. म्हणून बाळासाहेब मिरजकरांच्या नावाजलेल्या घराण्यात प्रत्येकाला अगोदर संगीत शिकावं लागतं.

सतारमेकर नियाज अहमद तथा बाळासाहेब मिरजकर म्हणतात की, "मी स्वत: माझ्या वडिलांकडे सुरुवातीला सतारीचं शिक्षण घेतलं. दहा-वीस राग मला आल्यानंतर त्यांनी मला जवारीचं म्हणजे फाईन ट्यूनिंगचं काम शिकवायला सुरुवात केली. त्यांचा आग्रह असा की तुम्हाला स्वराचं ज्ञान नाही तर तुम्ही उत्तम जवारीचं काम करु शकत नाही. मी माझ्या दोन्ही मुलांना अगोदर सतार शिकवली, त्यांना संगीतातला डिप्लोमा करायला लावला."

बाळासाहेबांचा मोठा मुलगा मोहसीन तिथं त्यांच्या सोबतच असतो. तोही आता या व्यवसायात आहे. पण मोहसीन स्वत: एक पारंगत सतारवादक आहे. त्याचे स्वत:चे स्वतंत्र कार्यक्रम होतात. त्यानं संगीतातला डिप्लोमाही केला आहे. पण बाळासाहेब आणि मोहसीन एक नवा विषय या कलेबद्दल समोर मांडतात. तो असतो पहिल्यापासून पूर्णपणे हस्तकला राहिलेली वाद्यनिर्मितीच्या कलेत आता यंत्रांचा, मशीन्सचा उपयोग करता येईल का? मिरजेच्या सतारमेकर्समध्ये हा मतमतांतराचा मुद्दा आहे.

नियाज अहमद तथा बाळासाहेब मिरजकर पुढे म्हणतात, "परंपरा आम्ही सोडलेली नाही, सोडू इच्छितही नाही. पण परंपरा जर पुढे न्यायची असेल तर आपल्याला येण्या-या काळातल्या आव्हानाचा विचार करायला हवा. मिरजेतल्या तंतुवाद्यांची परंपरा जर टिकवायची असेल तर आधुनिकिकरणाशिवाय पर्याय नाही. काही लोकांचे याविषयी मतभेद असतीलही, पण याचा विचार व्हायला हवा की यात यंत्रांचा वापर करता येईल का? जरी ती हस्तकला असली, तरीही त्यात अनेक गोष्टी आहेत या यंत्रांच्या सहाय्याने होऊ शकतात. त्या आपण केल्या पाहिजेत."

मोहसीन त्याचे नवे प्रयोग आम्हाला दाखवतो. त्यासाठी सतारमेकर गल्लीपासून थोडं दूर, मिरज 'एमआयडीसी'मध्ये आम्हाला जावं लागतं. तिथं या कारागिरांना राज्य सरकारनं या कलाकारांना थोडी जागा दिली आहे आणि काही गुंतवणूक. यंत्रांचा वापर करुन उत्पादन सोपं करता येईल का, अधिक करता येईल का यासाठी. इथं आल्यावर कारखान्यातल्या असेंब्ली लाईनवर आल्यासारखं वाटतं. वाद्यं आहेत, पण सोबत मोठी अटॉमेटेड मशीन्ससुद्धा आहेत. ते मोठ्या प्रमाणात वेगानं लाकडातून तानपुऱ्याचे काही भाग कापताहेत. हातानं होणारे कारागिरीचं प्रत्येक काम मशीन करु शकेल का?

सतारमेकर मोहसीन मिरजकर म्हणतात, "मशीन फक्त खोदण्याचं काम, वा लाकूड कापण्याचं काम करु शकेल. पण खोली किती असावी, जाडी किती, जवारी करणं हे माणसाला हातानंच करावं लागेल. मशीन वापरण्याची कारणं वेगळी आहेत. एक म्हणजे कारागिरांची संख्या कमी होणं. भारतभरातून आणि परदेशातून एवढ्या ऑर्डर्स येत असतात, पण त्याच्या दहा-वीस टक्के ऑर्डर्सही आपण पूर्ण करु शकत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की कला लुप्त होत चालली आहे. मग अशा वेळेस आपण जे काम हातानं करणं गरजेचं नाही आहे अशा गोष्टी मशीनवर होऊ शकतात. त्या सगळ्यांसाठीच आहेत. एक दांडी कोरायची म्हटली तर एका माणसाला एक पूर्ण दिवस लागतो. ती दांडी करायला मजुरीही तितकी मिळत नाही. मग ते काम आपण मशीननं केलं आणि माणसाला कारागिरीचं काम दिलं तर त्याला त्याची मजुरीही दुप्पट मिळते."

असे अनेक नवनवीन विचार या परंपरा बनलेल्या कलेत येत आहेत. तिचा एक भाग हाही आहे की ती व्यवसायही आहे. त्यावर चरितार्थ आहेत. अनेक कुटुंबांचं पोटही आहे. त्यामुळे कारागिरी तशीच राहिली तरी काळानुसार या व्यवसायाचं स्वरुप बदललं नाही तर प्रश्न अस्तिवाचा होईल. तसा तो होतोही आहे. कारागिरांची संख्या कमी होते आहे ही एक सातत्यानं होणारी हस्तकलांमधली तक्रार आहे. तशी ती इथेही आहे.

सबापरवीन मुल्ला याचं कारण व्यवसायाच्या स्वरुपाला देतात. त्यांच्या घरातच तंतुवाद्य व्यवसाय आहे. त्यांचे वडील, भाऊ सगळेच तो करतात. पण कॉमर्सच्या विद्यार्थीनी असणा-या सबापरवीन यांना या व्यवसायाचा शास्त्रीय अभ्यास करावासा वाटला. त्यांनी तो त्यांच्या पी.एच.डी साठी निवडला आणि जवळपास पाच वर्षं अभ्यास करुन डॉक्टरेट मिळवलीही. त्यांचं म्हणण हे आहे की व्यवसायाचं पारंपारिक रुप बदलायला हवं.

अभ्यासक डॉ.सबापरवीन मुल्ला सांगतात, "वाद्यनिर्मिती करण्याऱ्यांकडे अगोदर ऑर्डर्स येतात. त्यासाठी जो माल, रॉ मटेरियल लागणार आहे, ते नंतर येतं. मग उत्पादन होतं. मध्ये त्याचा एडव्हान्स येतो आणि त्यानंतर ती वस्तू विकली जाते. एडव्हान्स आलेले पैसे त्यांनी रॉ मटेरियलसाठी वापरलेले असतात. वस्तू जाते. याकडे बघितलं तर समजतं की कुठेच व्यवसाय नफ्यसाठी चालू आहे असं दिसत नाही. ही तर पारंपारिक व्यवसाय पद्धत पण म्हणता येणार नाही. मला समजतंच नाही की ही कला इतके वर्षं जिवंत कशी राहिली? अशा पद्धतीनं हा व्यवसाय आणि कला टिकू शकणार नाहीत. त्यांना अगोदर काही वाद्य करावी लागतील, त्यांचा डिस्प्ले करावा लागेल, कारागिरांच्या व्यवस्थित बसण्याची सोय करावी लागेल. यात जी हातउचल जी असते, त्याचा दबाव पूर्णपणे संपला पाहिजे. मी कोणाकडून तरी उधार घेतले आणि ते फेडायचे आहेत, याच दुष्टचक्रात ते अडकले आहेत. ते तोडायला हवं."

कला मातीत रुजून तिथं एक संस्कृती तयार होते, पिढ्यांमध्ये मुरते, ही एक मोठी प्रक्रिया असते. ती मिरजेनं पाहिली आहे, जपली आहे. ही कला अनेक स्थित्यंतरातून गेली आहे. म्हणूनच ती कृष्णेच्या प्रवाहासारखी टिकली आहे. मिरजेची सतारमेकर गल्ली पुन्हा एका स्थित्यंतरातून जाते आहे. पण सतारीचे ते सूर मात्र तसेच झंकारत राहणार आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)