RSS ने आपल्या स्थापनेच्या 100व्या वर्षापर्यंत काय रोडमॅप बनवला आहे?

    • Author, अनंत झणाणे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

प्रयागराजमध्ये चार दिवसांसाठी संघाची बैठक पार पडली. या बैठकीत 'एक समान राष्ट्रीय लोकसंख्या धोरण' आणि 'धर्मांतरामुळे हिंदूंची कमी होत असलेली लोकसंख्या' आदी विषयांवर चर्चा झाली.

प्रयागराजला पोहोचल्यानंतर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांचीही भेट घेतल्याची चर्चा आहे. त्याचप्रमाणे मोहन भागवत यांनी उत्तरप्रदेशात घेतलेला हा सर्वात मोठा कार्यक्रम असल्याचं म्हटलं जातंय. या सगळ्या गोष्टी बघता उत्तरप्रदेशला इतकं महत्व का दिलं जातंय? अशाही चर्चा सुरू आहेत. एकूणच संघाचा पुढचा अजेंडा काय असेल, याचा अंदाज घेण्याचे प्रयत्न सुरू झालेत.

असं म्हटलं जातं की, देशाच्या सत्तेचा मार्ग उत्तरप्रदेशातून जातो. कारण या राज्यात लोकसभेच्या एकूण 80 जागा आहेत. या राज्याची लोकसंख्या सुमारे 24 कोटींच्या आसपास आहे. भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेलं हे राज्य आहे. लोकसभा तर झालंच पण इथं राज्यसभेच्या जागा ही जास्त आहेत.

त्यामुळे केंद्रात सत्तेत राहायचं असेल तर उत्तरप्रदेशात जास्तीत जास्त जागा जिंकणं गरजेचं असतं.

संघ भाजपची मातृसंघटना आहे. मागच्या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपने जे यश मिळवलंय त्यात संघाचाही मोठा आणि महत्वाचा वाटा आहे. त्यामुळे हीच गोष्ट हेरून प्रयागराजमध्ये संघाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचं म्हटलं जातंय.

संघाचा अखिल भारतीय कार्यकारी मंडळाचा हा कार्यक्रम 16 ते 19 ऑक्टोबर 2022 दरम्यान पार पडला. यात संघाच्या पुढील रणनीतीवर चर्चा करण्यात आली.

संघाने सांगितली पुढची योजना...

2025 मध्ये संघाच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण होतील.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाहक दत्तात्रय होसाबळे यांनी कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, "2024 च्या अखेरपर्यंत देशातील कानाकोपऱ्यात संघाच्या शाखा काढण्याचं प्रयोजन आहे. बऱ्याच भागात हे काम 99 टक्क्यांपर्यंत पूर्णत्वास गेलं आहे. चित्तोड, ब्रज आणि केरळ प्रांतात मंडल स्तरापर्यंत शाखा उघडण्यात आल्या आहेत."

"पूर्वी देशात संघाच्या एकूण 54,382 शाखा होत्या. आज घडीला त्या 61,045 वर गेल्या आहेत. साप्ताहिक बैठकांमध्ये 4000 ने वाढ झालीय आणि मागच्या वर्षभरात मासिक संघ मंडळींमध्ये 1800 ने वाढ झालीय."

सरकार्यवाहक पुढे म्हणाले की, "2025 मध्ये संघाच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण होतील. संघाचं काम करण्यासाठी तीन हजार युवक शताब्दी विस्तारक म्हणून कार्यरत आहेत. अजून एक हजार शताब्दी विस्तारक प्रचारासाठी बाहेर पडणार आहेत. (विस्तारक प्रचारकांसारखंच काम करतात पण ते पूर्णवेळ नसतात. यांमध्ये नोकरदार, विद्यार्थी असे लोक असतात जे संघासाठी 15 दिवस किंवा महिनाभर एकनिष्ठपणे काम करतात.)

'लोकसंख्या धोरण'

अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीत संघाचे सरकार्यवाहक दत्तात्रय होसाबळे यांनी संघप्रमुखांच्या विजयादशमीच्या भाषणात आलेला लोकसंख्येच्या मुद्दा उपस्थित केला. सोबतच ते धर्मांतराविषयीही बोलले.

ते म्हटले की, देशाची लोकसंख्या झपाट्यानं वाढते आहे. हा खरं तर सर्वांच्या चिंतेचा विषय आहे. त्यामुळे लोकसंख्या धोरण लागू करायला हवं.

ते पुढे म्हणाले की, "देशाची लोकसंख्या ज्या गतीने वाढत आहे ते चिंताजनक आहे. त्यामुळे यावर सर्वांगीण विचार करून एक लोकसंख्या धोरण बनवायला हवं आणि ते सर्वांवर समान पद्धतीने लागू व्हायला पाहीजे. धर्मांतरामुळे हिंदूंची संख्या कमी होत आहे. देशाच्या काही भागांमध्ये धर्मांतराचं षडयंत्र रचलं जातंय."

यावेळी त्यांनी बांगलादेशातून होणाऱ्या घुसखोरीचा मुद्दाही उपस्थित केला. ते म्हणाले की, 'बांग्लादेशातून उत्तर बिहारमधील पूर्णिया कटिहार तसेच ईशान्येकडील राज्यांमध्ये घुसखोरी होते. या घुसखोरीमुळे तिथं मोठी आंदोलन सुद्धा झाली होती. यामुळे लोकसंख्येचा असमतोल साधला जातोय."

त्यांनी लोकसंख्येच्या या असमतोलाचा संबंध फाळणीशी जोडला. ते म्हणाले, "लोकसंख्येच्या असंतुलनामुळे अनेक देशांमध्ये फाळणीची परिस्थिती उद्भवली. लोकसंख्येच्या असंतुलनामुळे भारताचीही फाळणी झालीय."

संघाचा अजेंडा

सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्रयागराजमध्ये इतक्या दिवसांचा मुक्काम ठोकलाय त्यावरून संघाच्या प्राधान्यक्रमाचा अंदाज येतो. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ स्वतः सरसंघचालकांच्या भेटीसाठी प्रयागराज मध्ये आले.

संघाच्या या कार्यक्रमाबद्दल वरिष्ठ पत्रकार रामदत्त त्रिपाठी सांगतात, "ही बैठक म्हणजे मोहन भागवत यांनी दसऱ्याला दिलेल्या भाषणाचा पुढचा टप्पा आहे. दसऱ्याच्या कार्यक्रमात त्यांनी वर्षभराचा अजेंडा समोर ठेवला आणि आता या बैठकीमुळे तो मजबूतपणे पुढे राबवला जातोय."

मोहन भागवत दसऱ्याच्या दिवशी म्हणाले होते की, देशात सर्वसमावेशक असं लोकसंख्या धोरण बनवायला हवं. आणि हे धोरण सर्वांसाठी समान पध्दतीने लागू व्हायला हवं.

संघ ज्या पद्धतीने लोकसंख्येचा विस्फोट आणि त्यात असमतोलाचा मुद्दा पुढं आणतोय ते बघता रामदत्त त्रिपाठी म्हणतात, "देशाची लोकसंख्या वाढतेय म्हणजे मुस्लिमांची लोकसंख्या वाढतेय हा तर्क वैज्ञानिक कसोटीवर फेल ठरलाय. भारताची लोकसंख्या वाढ त्याच्या टार्गेटच्या 2.1 टक्क्यांनी मागे आहे. आणि जर हे टार्गेट आणखीन खाली गेलं तर आपलंच नुकसान होईल. हिंदू असो वा मुस्लिम जिथं गरिबी, निरक्षरता आणि आरोग्य सुविधांचा अभाव आहे त्याच ठिकाणी लोकसंख्या वाढत असल्याचं दिसून आलंय. आणि वस्तुस्थिती अशी आहे की मुस्लिमांमध्ये हे तीनही फॅक्टर्स जास्त आहेत."

लोकसंख्येचा विस्फोट

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 15 ऑगस्ट 2019 रोजी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात लोकसंख्या विस्फोटाचा उल्लेख केला होता. भाषणात मोदी म्हणाले होते की, "आपल्या देशात एक वर्ग असा आहे जो आपलं कुटुंब मर्यादित ठेऊन देशाच्या भल्यासाठी मोठं योगदान देतोय."

पंतप्रधान मोदी आणि संघ नेतृत्वाने जी विधानं केली आहेत त्याचं स्पष्टीकरण देताना उत्तरप्रदेशचे वरीष्ठ पत्रकार राजेंद्र सिंह म्हणतात, "याआधी त्यांच्या (पंतप्रधानांच्या) भाषणात लोकसंख्येचा मुद्दा आलेला नव्हता. पण आता भागवत आणि होसाबळे यांनी तो मुद्दा उचललाय."

ते सांगतात, "मला वाटतं पुढच्या निवडणुकीत हाच मुद्दा रेटण्याची तयारी सुरू असावी. कदाचित संसदेत याविषयी कायदा केला जाईल. तसं बघायला गेलं तर संघाने बऱ्याच आधीपासून लोकसंख्येच्या असमतोलाचा मुद्दा उचलून धरलाय. पण आता तर फाळणी सुद्धा याच कारणामुळे झाल्याचं म्हटलं जातंय."

लोकसंख्येच्या असमतोलाचा संबंध फाळणीशी जोडण्याच्या मुद्द्यावर रामदत्त त्रिपाठी म्हणतात, "त्यांचं म्हणणं आहे की, मुस्लिम मेजॉरिटी राज्य असल्यामुळे फाळणी आहे. या गोष्टींचा वापर करून प्रोपौगंडा करण्यात संघ तरबेज झालाय."

लव्ह जिहाद, धर्मांतर

उत्तरप्रदेशमध्ये "बेकायदेशीर धर्मांतर अध्यादेश 2020" हा धर्मांतरासंदर्भात जो कायदा पारित करण्यात आलाय. या कायद्याला लव्ह जिहाद कायदा असं देखील म्हटलं जातं.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, "या कायद्यांतर्गत एका वर्षात 340 लोकांविरुद्ध एकूण 108 एफआयआर नोंदवण्यात आल्यात. याच बातमीत दिलेल्या उत्तरप्रदेश पोलिसांच्या आकडेवारीनुसार, 189 लोकांना अटक करण्यात आली असून 72 लोकांवर चार्जशीट दाखल करण्यात आलीय.

तेच सप्टेंबर 2022 मध्ये पहिल्यांदाच एका व्यक्तीला पाच वर्षांची शिक्षा झालीय.

उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुका लागण्यापूर्वी राज्याच्या विधी आयोगाने वाढत्या लोकसंख्येला लगाम लावण्यासाठी एक विधयेक तयार करून सरकारला दिलं होतं. या विधेयकावर योगी सरकारने अद्याप पाऊल उचललेलं नाही. लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी 'टू चाइल्ड पॉलिसी' लागू करण्याची चर्चा या विधेयकात करण्यात आली होती.

त्यामुळे कायदे, त्यांची होणारी अंमलबजावणी, लोकसंख्या नियंत्रणाशी संबंधित विधयेकं अशा सगळ्या गोष्टी असताना सुद्धा संघ सार्वजनिक व्यासपीठावर हे मुद्दे का मांडत आहे?

यावर रामदत्त त्रिपाठी सांगतात, "संघाला मुळात एक खलनायक हवाय. आणि त्यांनी मुस्लिमांची छबी तशाच रंगात रंगवलीय. आणि याच जोरावर ते बहुसंख्यांकांना घाबरवतायत. हिंदूंना उत्तेजित करण्यासाठी आरएसएसने खेळलेली ही एक चाल आहे आणि ते त्यांच्या डीएनएमध्येच आहे. "

दुसरीकडे, वरिष्ठ पत्रकार सुमन गुप्ता मात्र या सगळ्या मुद्द्यांना विचारपूर्वक आखलेली रणनीती असल्याचं म्हणतात. त्या सांगतात की, "संघाच्या शाखेत न जाता सुद्धा समाजातील एक मोठा वर्ग त्यांचे अजेंडे फॉलो करतोय. जो व्यक्ती सामाजिक सलोखा आणि देशाच्या विविधतेबद्दल बोलतो त्यामुळे त्यांना राग येतो, त्यांच्या भावना दुखावल्या जातात. आणि हीच संघाची ताकद आहे. जर तुम्ही हे अजेंडेच नाकारले तर त्यांची ताकद कुठंवर जाईल ते तुम्हीच बघा."

यावर रामदत्त त्रिपाठी म्हणतात, "संघ भूतकाळात रमतोय. देशाचं भविष्य, त्यासाठी कोणत्या योजना आहेत याचा कोणताच प्लॅन त्यांच्याकडे नाहीये. ते फक्त भीती दाखवून हिंदूंच मत मिळवू इच्छितात. त्यामुळे हे मदरशांचे सर्व्हे असतील किंवा मुस्लिम माफिया असतील त्यांना टार्गेट करतील."

यावर राजेंद्र सिंह म्हणतात, "भाजप संघाचा अजेंडा हळूहळू पुढे नेत आहे यात काडीमात्र शंका नाही. तेव्हा असे मुद्दे संघाच्या सर्कल मध्ये चर्चिले जायचे आता ते पब्लिक डोमेन मध्ये आहेत. त्यामुळे जर त्यासाठी ताकद लावायचीच असेल तर संघ छुप्या पद्धतीने काम न करता उघडपणे करतो."

भाजपमध्ये संघाचा हस्तक्षेप वाढल्याबद्दल राजेंद्र सिंह म्हणतात, "भाजपमध्ये प्रादेशिक असो, वा राष्ट्रीय प्रत्येक एका स्तरावर पद असतं. संघटन मंत्री म्हणून संघ आपल्या प्रतिनिधीला तिथं पाठवतो. तो व्यक्ती संघाची विचारधारा भाजपमध्ये राबवतो. पण संघ एका मोठ्या अजेंड्यावर काम करतोय. मागच्या सात आठ वर्षात लोकसंख्येचा मुद्दा त्यांच्या अजेंड्यावर नव्हता मात्र आता तो आहे."

या अजेंड्यात मुख्य मुद्दा कोणता आहे?

सुमन गुप्ता सांगतात की, "लोकसंख्या नियंत्रण हा त्यांच्या एका मोठ्या अजेंड्याचा भाग आहे. त्यांना 2024 च्या निवडणुकीत हा मुद्दा पुढं आणायचा आहे म्हणून त्यासाठी आत्तापासूनच वातावरण निर्मिती सुरू आहे. शेवटी हिंदू मुस्लिमांच राजकारण करणं हेच त्यांचं अंतिम उद्दिष्ट आहे."

शेवटी रामदत्त त्रिपाठी सांगतात त्याप्रमाणे, "संघ दूरगामी दृष्टिकोन ठेऊन काम करतो. ते राजकारण सुद्धा करतात पण त्याचा आधार खूप खोल असतो."

ते सांगतात, "काँग्रेसची पॉलिटिकल सिस्टम नष्ट करण्यासाठी संघाने धिम्या गतीने पावलं टाकली. त्यासाठी त्यांना पैसा पुरवला जातोय. मागच्या आठ वर्षात संघाची कार्यालय फाईव्ह स्टार झाली आहेत. त्यामुळे भाजप पुन्हा कशाप्रकारे सत्तेत येईल यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील राहतील. त्यांना हे माहीत आहे की, सत्तेच्या जोरावरच ते आपला अजेंडा राबवू शकतात. त्यामुळे जे काही करावं लागेल ते ते संघ करताना दिसेल."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)