सिमेन अॅलर्जी म्हणजे काय? योनिमार्गात वीर्याच्या स्पर्शाने खाज सुटत असेल तर...

    • Author, पद्मा मिनाक्षी,
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

26 वर्षीय प्रणालीने (बदललेने नाव) आपल्या प्रियकरासोबत लग्न तर केलं, पण वैवाहिक आयुष्याच्या बाबतीत तिचा अपेक्षाभंगच झाला.

लग्नाच्या पहिल्या रात्री तिने आपल्या पतीबरोबर शारीरिक संबंध ठेवले. पण त्यानंतर तिच्या योनीमध्ये जळजळ आणि खाज होऊ लागली. आता पुढं करायचं काय हे तिला समजत नव्हतं.

ती म्हणते, "हे सगळं मी घरी सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी मला टाळलं. कारण त्यांच्या मते, नव्याने लग्न झाल्यावर असं काहीतरी होणं अगदी स्वाभाविक आहे. यात काळजी करण्यासारखं काहीच नाही."

त्यामुळे तिला शारीरिक संबंध ठेवण्याची भीतीच वाटू लागली. ती या सगळ्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करू लागली.

या कालावधीत तिची अवस्था विचित्र अशी बनली होती. प्रणालीने याविषयी नवऱ्यालाही सांगून पाहिलं, पण तिला नेमकी कोणती अडचण आहे, हे त्यालासुद्धा समजलं नाही. उलट, तिला शारीरिक संबंध ठेवायला आवडत नाहीत, असं तिच्या नवऱ्याचं मतं बनलं.

लग्नानंतर काही दिवसांनी प्रणाली आणि तिचा पती लंडनला गेले. तिथेही तिचा हा त्रास कायम होता.

लंडनमध्ये तिने उपचार घ्यायचं ठरवलं आणि ती डॉक्टरकडे गेली पण तिथेही युरिनरी इन्फेक्शन समजून तिच्यावर उपचार करण्यात आले. बरीच मलमं, औषध वापरूनही तिचा त्रास काही कमी झाला नाही.

"त्यामुळे आता माझं वैवाहिक आयुष्य संपलं आहे या निष्कर्षाप्रत मी आले होते."

लंडनमध्ये जर तुम्हाला जर साधी औषधं गोळ्या खरेदी करायची असतील तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला प्रिस्क्रिप्शन लागतं. त्यामुळे तुम्हाला डॉक्टरकडे जाणं क्रमप्राप्त आहे. पण तिथल्या एखाद्या जनरल प्रॅक्टिशनरची अपॉइंटमेंट मिळवणं सोपं काम नाही. त्यासाठी तुम्हाला बरेच आठवडे वाट बघावी लागते.

ती सांगते, "हा असा त्रास होता त्याबद्दल मी कोणालाच काही सांगू शकत नव्हते. मी माझ्या मैत्रिणींबरोबर सुद्धा यावर चर्चा केली पण त्यातून काही निष्पन्न झालंच नाही. कारण याआधी कोणाला असा त्रास सहन करावा लागला नव्हता."

"माझ्यापुढ्यात बरेच प्रश्न होते. लैंगिक सुख मिळवण्यासाठी पती दुसऱ्या कोणाकडे गेला तर ही भीती एका बाजूला होती. दुसऱ्या बाजूला आरोग्याच्या समस्यांमुळे मानसिक आणि शारीरिक ताणतणाव होता."

ती म्हणते, "नव्याने लग्न झालेल्यांच्या बऱ्याच गोड आठवणी असतात. पण माझ्याजवळ अशा काहीच गोड आठवणी नाहीयेत."

दिवस सरले पण तिचा त्रास काही कमी झालाच नाही. त्यामुळे या समस्येवर उपचार घेण्यासाठी ती भारतात आली.

डॉक्टरांनी सर्व टेस्ट केल्या आणि तिला सांगितलं की, तिला 'सिमेन अॅलर्जी' असण्याची शक्यता आहे. हे ऐकून तिला धक्काच बसला.

सिमेन अॅलर्जी म्हणजे काय?

आंध्र विद्यापीठातील मायक्रोबायोलॉजीचे प्राध्यापक आणि किंग जॉर्ज इम्युनोलॉजीचे माजी प्रमुख डॉ. अप्पाराव यांनी बीबीसीशी बोलताना सिमेन अॅलर्जीविषयी माहिती दिली.

ते सांगतात, "पुरुषांच्या वीर्यामध्ये जे प्रोटीन असतं त्यामुळे सिमेन अॅलर्जी होते. याला ह्युमन सेमिनल हायपर सेन्सिटिव्हिटी (HSP) असंही म्हणतात. ही अॅलर्जी योनीला स्पर्श केल्यावर उद्भवते. याला अॅन्टीबॉडी, अॅन्टीजेन प्रतिक्रिया म्हणता येईल. बऱ्याचदा ही अॅलर्जी स्त्रियांमध्ये आढळते."

याची लक्षणं काय असतात?

सिमेन अॅलर्जी असलेल्या स्त्रिया जेव्हा संभोग करतात तेव्हा त्यांच्या योनिमार्गातील त्वचेवर लालसरपणा, सूज, वेदना, खाज, जळजळ अशी लक्षण दिसून येतात.

संभोग केल्यानंतर जवळपास 20 ते 30 मिनिटांमध्ये ही लक्षणं दिसून येतात.

डॉक्टरांच्या मते, हैदराबादमध्ये त्यांना अशाच प्रकारची एक महिला आढळून आली होती. त्या प्रकरणात संबंधित महिलेला हा त्रास 30 मिनिटांपासून ते 6 तासांपर्यंत सुरूच होता.

डॉ.आप्पाराव सांगतात, "ही लक्षणं फक्त योनीच्या भागापुरतीच मर्यादित असतात, असं नाही. जर स्त्रीच्या हात, तोंड, मूत्राशय किंवा छातीवर वीर्य पडलं तरी सुद्धा अॅलर्जी होण्याची शक्यता असते. काहींना यामुळे सर्दी होते, शिंका येतात."

एवढंच नव्हे तर काहींना या अॅलर्जीमुळे श्वास घ्यायला त्रास होतो, खोकला, घशात सूज येते, नाडीचे मंदावते, चक्कर येते, मळमळ होऊ लागते, उलट्या, जुलाब असा त्रास सुरू होतो.

डॉ. आप्पाराव सांगतात "बर्‍याच जणींना हे देखील माहीत नसतं की त्यांना सिमेन अॅलर्जी आहे. त्या आपल्या त्रासाबद्दल कुठेही काही बोलत नाहीत. मनात संकोच ठेऊन उपचार घेणंही टाळतात."

तुम्हाला सिमेन अॅलर्जी आहे हे कसं समजेल?

संभोग केल्यानंतर जेव्हा योनीमार्गात दाह सुरू होतो तेव्हा आपल्याला गोष्टी समजू शकतात. पण बऱ्याचदा स्त्रियांना असं वाटतं की मूत्रमार्गात संसर्ग असल्यामुळे त्यांना त्रास होत असेल आणि त्या याकडे दुर्लक्ष करतात.

आप्पाराव सांगतात की, "एखाद्या स्त्रीला संभोग करताना तिच्या पतीपासून सिमेन अॅलर्जी झाली असेल तर गरजेचं नाही की, तिला इतर पुरुषांपासूनही अशाप्रकारे अॅलर्जी होईल. त्यामुळे तिच्या पतीला किंवा जो कोणी सेक्शुअल पार्टनर असेल त्याला सुद्धा टेस्ट करून घेतली पाहिजे."

मेयो क्लिनिकच्या मते, काही वेळा योनीमार्गात जळजळ, खाज, सूज, स्त्राव अशी लक्षणे आढळतात. योनीमध्ये जेव्हा संसर्ग निर्माण होतो तेव्हा ही समस्या उद्भवते.

पण ही लक्षणे सिमेन अॅलर्जीची आहेत किंवा नाही, हे संभोग केल्यावरचं समजतं. यासाठी एक ऍलर्जेन टेस्ट देखील केली जाते.

थोडक्यात सिमेन अॅलर्जी हा काही सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज (STD) नाही.

या सिमेन अॅलर्जीवर कोणते उपचार केले जातात?

डॉ. आप्पाराव सांगतात की, जर तुम्हाला सिमेन अॅलर्जी असेल तर त्वरित करता येण्यासारखा उपाय म्हणजे तुमच्या पार्टनरने कंडोम वापरणे.

तसेच संभोग करण्यापूर्वी अँटीहिस्टामाइन नावाची गोळी घ्यावी. पण योग्य ती खबरदारी आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ही औषधं घ्यावी असं डॉ. आप्पाराव सांगतात.

ते पुढे सांगतात की, या अॅलर्जीसाठी स्क्रीनिंग टेस्ट आणि संबंधित विशेषज्ञ किंवा इम्युनोलॉजिस्टचा सल्ला घ्यावा.

डॉ. आप्पाराव स्पष्ट करतात की, ज्या स्त्रियांना अॅलर्जी असते त्याची तीव्रता स्त्रीगणिक बदलते. म्हणजे स्त्रियांच्या रोगप्रतिकारक शक्तीवरही बऱ्याचश्या गोष्टी अवलंबून असतात.

तसेच ज्या स्त्रियांना अॅलर्जीची समस्या आहे त्या स्त्रियांनी प्रेग्नेंन्सीचा विचार करण्याआधी स्त्रीरोगतज्ज्ञ किंवा अॅलर्जी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. असंही डॉ. आप्पाराव सांगतात.

या अॅलर्जीचा लैंगिक जीवनावर काय परिणाम होतो?

हैदराबादमधील एक जोडप्याला लग्नाला सहा वर्षे उलटून गेली तर पदरात मुलबाळं नव्हतं. त्यांनी डॉक्टरांना गाठलं, बऱ्याच टेस्ट केल्या. या टेस्टमध्ये समजलं होतं की पत्नीला संभोग केल्यानंतर त्रास होतो.

यात तिला सिमेन अॅलर्जी आहे का हे जाणून घेण्यासाठी डॉक्टरांनी एक चाचणी केली. यात तिच्या पतीचं 0.5 मिली सिमेन घेऊन तिच्या योनीत इंजेक्ट केलं. या टेस्टमध्ये समजून आलं की, तिला सिमेन अॅलर्जी आहे. यासंबंधीचा रिपोर्ट तेलंगणा टुडे या मासिकात छापून आला होता.

या टेस्टमध्ये तिच्या पतीला असलेले काही त्रास समोर आले. जसं की त्याला लहानपणापासूनच दमा, खाज आणि पुरळ उठणे अशी अॅलर्जी होती. ही अॅलर्जी वाढल्यास अॅन्जिओएडेमा किंवा अॅनाफिलेक्टिक शॉक सारखे धोके उद्भवू शकतात असं डॉक्टरांनी सांगितलं.

ही परिस्थिती टाळायची असेल तर त्यासाठी काही इंजेक्शन्स घरी ठेवण्याचा सल्ला डॉक्टरांनी या दाम्पत्याला दिला.

प्रणाली आणि तिच्या पतीनेही या अॅलर्जीवर काही उपचार घेतले. दोन ते तीन महिने औषधं घेतल्यावर ती बरी झाली. आज ती दोन मुलांची आई आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)