झोपः तुम्ही फक्त पाच तास किंवा त्यापेक्षाही कमी वेळ झोपत असाल तर...

    • Author, मिशेल रॉबर्ट्स
    • Role, डिजिटल हेल्थ एडिटर

वयाच्या पन्नाशीनंतर जर तुम्हाला आरोग्याच्या समस्यांचा धोका कमी करायचा असेल तर त्यासाठी किमान पाच तास झोप घेणं आवश्यक असल्याचं एका संशोधनातून दिसून आलंय.

संशोधक सांगतात त्याप्रमाणे, आजारी व्यक्तींना झोप येत नाही. मात्र झोपच येत नाही ही समस्या एखाद्या आजाराची पूर्वसूचना किंवा धोका असू शकतो.

झोपेमुळे मन ताजंतवानं होतं, शरीराला आराम मिळतो. पण झोप नेमकी घ्यायची किती याविषयी अजूनतरी काही ठोस माहिती मिळत नाही.

ब्रिटनच्या पीएलओएस मेडिसिन संस्थेने नागरी सेवकांच्या आरोग्याचं आणि झोपेसंबंधीचं संशोधन केलं आहे.

यात सुमारे 8,000 लोकांनी सहभाग घेतला. त्यात सर्वांना विचारण्यात आलेल्या प्रश्नांपैकी एक महत्त्वाचा प्रश्न होता की, तुम्ही सरासरी किती तास झोपता?

यात काहींनी स्लीप ट्रॅक करणारं रिस्ट-वॉच घातलं होतं. मागच्या वीस वर्षांत यातल्या बऱ्याच लोकांना मधुमेह, कर्करोग आणि हृदयविकार अशा आजारांनी ग्रासलंय.

या अभ्यासात असं म्हटलंय की, ज्या लोकांचं वय 50 वर्षांहून अधिक आहे आणि जे 5 तासांपेक्षा कमी झोपतात त्यांना त्याच वयोगटातील इतर लोकांपेक्षा 30 टक्के जास्त आजारांचा धोका असतो.

तसेच ऐन पन्नाशीतही जे लोक कमी झोपतात त्यांना आरोग्य समस्या आणि मृत्यूचा धोका अधिक असतो.

त्यामुळे साधारणत: 7 ते 8 तासांची झोप घेणं आवश्यक असतं असं युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन आणि पॅरिस सिटी युनिव्हर्सिटीच्या संशोधकांचं म्हणणं आहे.

आपण का झोपतो?

तर आपण का झोपतो याचं नेमकं उत्तर संशोधकांकडेही नाहीये. पण संशोधनाअंती असं दिसून आलंय की, झोपेमुळे आठवणी साठवल्या जातात, आपलं चित्त प्रसन्न राहातं. थोडक्यात झोप ही मन, एकाग्रता आणि चयापचयासाठी चांगली असते.

नको असलेल्या गोष्टी विसरून जाण्यासाठी झोप आवश्यक असते.

शांत झोप येण्यासाठी 6 टिप्स

  • दिवसा खूप काम करा, कामात व्यग्र राहा आणि शरीराला थकवा येऊ द्या...मात्र झोपेच्या वेळी काम थांबवा आणि विश्रांती घ्या.
  • दिवसा झोप घेणं टाळा.
  • रात्री झोपण्यापूर्वी तुमची बेडरूम टापटीप असल्याची खात्री करा. तुमच्या बेडरूममध्ये जाड पडदे, तापमान, बेडिंग अशी व्यवस्था करा.
  • स्मार्टफोन जवळ ठेऊ नका, जेणेकरून तुमचं लक्ष विचलित होणार नाही. झोपण्यापूर्वी कॅफिन आणि अल्कोहोलचं सेवन करू नका.
  • जर तुम्हाला झोप येत नसेल, तर उठून बसा. तुमच्या मनाला आनंद देतील अशा गोष्टी करा. जसं की एखादं पुस्तक वाचणं असेल, पुस्तक वाचल्यानंतर झोप आल्यावर झोपी जा.
  • जर अवेळी कामाच्या शिफ्ट असतील तर शिफ्ट सुरू व्हायच्या आधी झोप घ्यायचा प्रयत्न करा. जर तुम्ही रात्री उशीरा घरी परतत असाल, तर कामावर जाण्याआधी एक डुलकी घ्या.

कमी झोप घेणं आपल्या आरोग्यासाठी चांगलं नसल्याचं या संशोधनातून पुन्हा एकदा सिद्ध झालंय. सरे स्लीप सेंटरचे संचालक प्रोफेसर डेर्क जॉन बीबीसीशी बोलताना सांगतात की, काहींना असं वाटतं की कमी झोपलो म्हणून काही नुकसान होत नाही. पण खरं पाहायला गेलं तर ते तुमच्या शरीरासाठी अजिबात आरोग्यदायी नसतं.

डर्क पुढे सांगतात की, 'काही लोक मुळातच कमी झोप घेतात. यामागची कारणं अजूनतरी स्पष्ट झालेली नाहीयेत. मात्र झोप हा आपल्या जीवनशैलीचा एक घटक आहे.

आता तर डॉक्टरसुद्धा झोपेच्या गोळ्यांचं प्रिस्क्रिप्शन देत नाहीत. कारण या गोळ्यांचेही दुष्परिणाम असतात. त्यामुळे आपण आपल्या जीवनशैलीत बदल करून झोपण्याच्या सवयीही बदलल्या पाहिजेत असं तज्ज्ञांना वाटतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)