दीपक निरुला : 'या' उद्योजकाने भारताला पिझ्झा, बर्गरचं वेड लावलं..

    • Author, झोया मतीन,
    • Role, बीबीसी न्यूज, दिल्ली.

निरुलाज् या भारतातील पहिल्यावहिल्या फास्ट-फूड चेनने संस्थापक दीपक निरुला यांचं गेल्या आठवड्यात निधन झालं.

1970-80 च्या दशकात देशाच्या राजधानी दिल्लीत वाढलेल्या प्रत्येक व्यक्तीला दीपक निरुला यांची ओळख माहीत आहे. इतकंच नव्हे तर निरुला आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून चालवल्या जाणाऱ्या रेस्टॉरंटशी दिल्लीकरांचे भावनिक बंधही जुळलेले आहेत.

दीपक निरुला यांनी स्थापन केलेल्या निरुलाज् रेस्टॉरंटने दिल्लीत खाण्यापिण्याची संस्कृती बदलून टाकली, असंही म्हणता येईल.

मॅकडोनाल्ड आणि KFC हे ब्रँड भारतात दाखल होण्यापूर्वीच या रेस्टॉरंटने देशाला फास्ट फूड आणि अमेरिकन पद्धतीच्या खाद्यपदार्थांची ओळख करून दिली होती.

ही कहाणी आहे 1942 ची. त्यावेळी राजधानी दिल्लीतील कॅनॉट प्लेस याठिकाणी जॉर्जियन शैलीच्या इमारतींना वर्तुळाकार आकार प्राप्त होणं सुरू झालं होतं.

त्यावेळी लक्ष्मी चंद निरुला आणि मदन निरुला या दोन भावांनी कॅनॉट प्लेसमधील एका इमारतीत एक मोठा गाळा भाड्याने घेतला.

याच ठिकाणी त्यांनी सुरुवातीला कॉन्टिनेंटल आणि भारतीय खाद्यपदार्थांचं रेस्टॉरंट उघडलं. या हॉटेलचं नाव त्यांनी निरुला कॉर्नर हाऊस असं ठेवलं होतं.

निरुला कॉर्नर हाऊस अल्पावधीतच खवय्यांच्या पसंतीस उतरलं. अनेक पदार्थ दिल्ली शहरात सर्वप्रथम आणण्याचं श्रेय याच हॉटेलला जातं.

जेवणापासून ते कॅब्रे आणि फ्लेमेंको नृत्यांची मेजवानी आणि सोबत जादूचे कार्यक्रम यांमुळे हॉटेलला चांगलीच लोकप्रियता मिळत गेली.

'सेमिनार' या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखात दीपक निरुला यांचे भाऊ ललित यांनी एका नियमित ग्राहकाबद्दल लिहिलं, "40 च्या दशकाच्या सुरुवातीला युद्धादरम्यान दिल्लीत नियुक्त असलेला एक ब्रिटिश तरुण लष्करी अधिकारी आठवड्यातून एकदा आमच्या रेस्टॉरंटमध्ये यायचा. इथे त्याला भारतीय भोजनप्रकारासोबतच ब्रिटिश खाद्यप्रकारातील इतर अनेक गोष्टीही मिळाल्याने तो आनंदित होता."

पण 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर परिस्थिती बदलली. ग्राहकसंख्या सातत्याने कमी होत असल्याने निरुला कुटुंबीयांनी आपलं रेस्टॉरंट बंद करण्याचा निर्णय घेतला.

जुनं हॉटेल बंद करून त्याच ठिकाणी आधुनिक पद्धतीचे तीन नवीन आऊटलेट (हॉटेल) उघडण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

त्यानुसार, एक आधुनिक कॅफे, फ्रेंच ब्रेझरी आणि चायनीज रेस्टॉरंट उघडण्यात आले. यातील चायनीज रेस्टॉरंट 50 वर्षांपेक्षाही जास्त काळ चाललं.

पुढच्या काळात निरुला कुटुंबीयांनी हॉटेल व्यवसायात अनेक प्रयोग केले. त्यांनी दिल्ली परिसरात अनेक 'स्पेशॅलिटी' रेस्टॉरंट्स उघडली.

पिझ्झा, बर्गर, शीतपेय आणि नवनवीन आईस्क्रीमचे प्रकार भारतीय मध्यमवर्गाच्या आवाक्यात आणण्याचं काम या हॉटेल्सनी केलं.

ललित निरुला लिहितात, "हे रेस्टॉरंट्स लवकरच इतके लोकप्रिय झाले त्यांनी लोकांमधील फरक मिटवून टाकला. म्हणजे, मालक आणि वाहनचालक असे दोघेही या हॉटेलमध्ये येऊ शकत. याठिकाणी ते सोबत मिळून जेवण करू शकत होते."

दरम्यान, या काळात निरूला ब्रँडचा दिल्लीच्या कॅनॉट प्लेस भागात चांगला विस्तार झाला. कॅनॉट प्लेसमध्ये तरुण, मध्यमवयीन आणि वृद्ध मंडळी फिरण्यासाठी यायची.

यावेळी निरुलाज आऊटलेटमध्ये बसून आईस्क्रीमचा आनंद घेत गप्पा मारण्याचा कार्यक्रम जोरात रंगायचा.

निरुलाज आऊटलेटची आठवण सांगताना एका सोशल मीडिया वापरकर्त्याने लिहिलं की, "दिल्लीत वाढणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी निरुला ही एक भावना होती. कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षेत यश मिळाल्यानंतर किंवा त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी बक्षीस म्हणून या हॉटेलांमध्ये नेण्यात यायचं."

अनेक लोकांसाठी हे रेस्टॉरंट अशा क्षणांचं साक्षीदार ठरलं आहे. याठिकाणी फास्ट फूडचा आपल्या आरोग्यावर होणारा परिणाम याची फारशी काळजी न करता लोक खाद्यपदार्थांचा आनंद घेतात, याचं आश्चर्य वाटतं.

एका मुलीने म्हटलं, "सुरुवातीला मी या हॉटेलमध्ये माझ्या आई-वडिलांसोबत जायचे. नंतर मित्रांसोबत आणि बॉयफ्रेंडसोबत जाऊ लागले. त्यांच्याकडे प्रत्येक प्रसंगासाठी योग्य असे छान-छान फ्लेवर्स होते आणि अजूनही आहेत."

स्थापनेच्या अनेक दशकांनंतरही निरुला हा ब्रँड अद्याप लोकांच्या मनातील लोकप्रियता टिकवून आहे.

त्यांच्या मेन्यूतील हॉट चॉकलेट फज (HCF) या चॉकलेट ड्रिंक पदार्थाचा आपल्याला विशेष उल्लेख करावा लागेल.

यामध्ये एका मोठ्या ग्लासात व्हॅनिला फ्लेवरचं आईस्क्रीम टाकून आणि त्यावर चॉकलेट सीरप ओतलं जातं. वरून काजूचे तुकडे या पदार्थाला चवदार बनवतात.

सोशल मीडियावर याविषयी एकानं लिहिलं की, "कदाचित हा नॉस्टॅल्जिया असू शकतो. पण निरुलाचा हॉट चॉकलेट फज अतुलनीय आहे. त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही."

लेखिका रॅचेल हर्झ 'व्हाय यू इट, व्हॉट यू इट' या पुस्तकात लिहितात, "आपण लहानपणी आवडीने खातो त्या गोष्टी नेहमीच आनंद देतात. त्यांच्या चवीशी आणि सुगंधाशी आपल्या भावना जुळलेल्या असतात."

दिल्लीसारख्या वैविध्यपूर्ण शहरात विविध खाद्यपदार्थांची रेलचेल असते. त्यातही निरुलाज् रेस्टॉरंटमधील बर्गर आणि आइस्क्रीम आपली वेगळी ओळख अजूनही टिकवून आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)