हिजाब घातलेली मुस्लीम महिला एक दिवस भारताची पंतप्रधान होईल - असदुद्दीन ओवैसी #5मोठ्याबातम्या

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा..

1. एक दिवस हिजाब घातलेली मुस्लीम महिला भारताची पंतप्रधान होईल - असदुद्दीन ओवैसी

आज भारतात मुस्लीम मुलींना तुम्ही हिजाब का घालता, असं विचारला जातं. पण आज नाही तर उद्या, एखाद्या दिवशी हिजाब घातलेली मुस्लीम महिला भारताची पंतप्रधान नक्की होईल, असं वक्तव्य AIMIM पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी केलं आहे.

कर्नाटकातील हिजाब वाद प्रकरणात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. हिजाबवर शैक्षणिक संस्थांमध्ये बंदी असावी की नसावी, यासंदर्भात सुप्रीम कोर्टातील द्वीसदस्यीय खंडपीठात एकमत होऊ न शकल्याने हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर गुरुवारी एका जाहीर सभेत बोलताना ओवैसी म्हणाले, "एक ना एक दिवस हिजाब घातलेली मुस्लीम महिला भारताची पंतप्रधान होईल, असं मी अनेकवेळा सांगितलं आहे. पण असं मी बोलल्यानंतर अनेकांच्या पोटात दुखतं, हृदयात वेदना होतात. रात्री झोप येत नाही."

"पण एखादी मुस्लीम महिला पंतप्रधान होत असेल, तर लोकांना याचं वाईट वाटण्याचं कारण काय," असा सवाल ओवैसी यांनी यावेळी केला. ही बातमी लोकमतने दिली.

2. वडिलांमुळेच राजकारणात, अन्यथा कधीच आलो नसतो - अमित ठाकरे

सध्याच्या राजकारणाची स्थिती भयावह आहे. मी राज ठाकरेंचा मुलगा नसतो, तर राजकारणात आलोच नसतो, असं वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी केलं आहे.

ते म्हणाले, "राजकारणाची सध्याची स्थिती पाहून मला राजकारणात यावंसं वाटलं नसतं. केवळ राजसाहेबांनी संधी दिल्याने मी राजकारणात आलो आहे."

अमित ठाकरे पुढे म्हणाले, "सध्या राज्याच्या राजकारणातील घडामोडी सर्वसामान्यांना न पटणाऱ्या आहेत. एकाच दिवशी दोन मोठमोठ्या सभा घेणे, मात्र त्यात सर्वसामान्यांसाठी काहीही विधायक नसणे हे महाराष्ट्रातील जनतेसाठी क्लेशदायक आहे. दररोज एकमेकांवर चिखलफेक सुरू आहे. त्यामुळे राजकारण नकोनकोसं झालं आहे." ही बातमी ई-सकाळने दिली.

3. जी. एन. साईबाबा यांच्या निर्दोष मुक्ततेविरुद्ध फडणवीस सर्वोच्च न्यायालयात

नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपांवरून UAPA कायद्यांतर्गत दोषी ठरवण्यात आलेले प्रा. जी. एन. साईबाबा आणि त्यांच्या सहकाऱ्यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निर्दोष मुक्तता केली आहे. हा निर्णय निराशाजनक असून शहिदांच्या कुटुंबीयांसाठी अतिशय दुर्दैवी असल्याचं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे.

या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याची माहितीही फडणवीस यांनी यावेळी दिली.

"नक्षलवाद्यांविरोधात लढणाऱ्या लोकांना आपला जीव गमवावा लागतो. पोलिसांविरोधात माईन्स लावून त्यांची वाहने उडवली जातात. अशा पोलिसांकरीता आणि त्यांच्या कुटुंबियांकरीता अत्यंत धक्कादायक असा हा निकाल आहे. या निकालाविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. इतके पुरावे असतानाही एका तांत्रिक चुकीमुळे अशा व्यक्तीला सोडणे योग्य नाही. आम्ही हे सर्व सर्वोच्च न्यायालयात योग्य प्रकारे मांडू," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली.

4. वेब मालिकांतून तरुणाईला बिघडवण्याचे काम, सर्वोच्च न्यायालयाने एकता कपूर यांना खडसावलं

देशाच्या तरुण पिढीची मानसिकता तुम्ही बिघडवत आहात, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी निर्मात्या एकता कपूर यांना खडसावलं आहे.

एक्सएक्सएक्स या वेब मालिकेतील आक्षेपार्ह दृश्यांबाबतच्या प्रकरणात न्यायालयाने ही टिप्पणी केली.

एकता कपूर यांच्या एएलटीबालाजी या ओटीटी प्लॅटफॉर्मवरून ही वेब मालिका दाखविली जाते. या मालिकेमुळे लष्कराचे जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भावना दुखावल्या गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.

या प्रकरणात एकता कपूर यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी झाले आहे. या अटक वॉरंटविरोधात कपूर यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली असता त्यावरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने कपूर यांना खडे बोल सुनावले आहेत. ही बातमी लोकसत्ताने दिली.

5. शिवसेना हे बावनकशी सोनं, जळतं तेव्हा उजळून निघतं - उद्धव ठाकरे

आपली शिवसेना खरी आहे, सोनं जळतं त्यावेळी उजळून निघतं, बाकीच्यांचं पितळं उघडं पडेल तो भाग वेगळा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

ठाण्यातील महाप्रबोधन यात्रेच्या उद्घाटनची सभा संपल्यानंतर महिला शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मुंबईत दाखल झाल्या होत्या. याप्रसंगी ते बोलत होते.

आगामी निवडणुकीत महिला शिवसैनिकांनी आरपारच्या लढाईला तयार असल्याचा विश्वास उद्धव ठाकरे यांच्यासमोर व्यक्त केला. यावेळी ठाण्याचे खासदार राजन विचारे, रश्मी ठाकरे देखील उपस्थित होत्या. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)