रामदास आठवले: उद्धव ठाकरेंची पेटलेली मशाल विझवण्याचं काम आम्ही करणार #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, facebook
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा..
1. उद्धव ठाकरेंची पेटलेली मशाल विझवण्याचं काम आम्ही करणार - रामदास आठवले
"उद्धव ठाकरे यांची मशाल जरी पेटलेली असल्याचं दाखवलेलं असलं तरी अंधेरी-पूर्व पोट-निवडणुकीत ही मशाल विझवण्याचं काम आम्ही करणार आहोत," अशा शब्दांत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) अध्यक्ष रामदास आठवले यांनी शिवसेनेला (उद्धव ठाकरे) टोला लगावला आहे.
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा भाजपच्या उमेदवाराला असेल, असं आठवले यांनी यावेळी जाहीर केलं. तसंच भाजपचा उमेदवार निवडून येणार, असा विश्वासही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले, "आम्हाला उद्ध ठाकरे यांची मशाल विझवायची आहे आणि भाजपचं कमळ फुलवायचं आहे. त्यासाठी रिपब्लिकन पक्ष नक्कीच भाजपाच्या पाठिशी उभा राहील. ही निवडणूक आम्ही कोणत्याही परिस्थितीत जिंकणार आहोत. आमच्याबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्याने आमची महायुती मजबूत आहे." ही बातमी लोकसत्ताने दिली.
2. मोदी सरकारच्या नोटाबंदीची सुप्रीम कोर्टाकडून फेरतपासणी
2016 साली नरेंद्र मोदी सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाची सुप्रीम कोर्टाकडून फेरतपासणी करण्यात येणार आहे.
सुप्रीम कोर्टाच्या घटना पीठाने बुधवारी (12 ऑक्टोबर) घेतलेल्या एका सुनावणीत यासंदर्भात माहिती दिली.

फोटो स्रोत, Reuters
नोटाबंदीचा निर्णय अर्थव्यवस्थेसाठी यशस्वी ठरला की अयशस्वी ठरला, याची चाचपणी या सुनावणीत करण्यात येईल.
या प्रकरणातील पुढील सुनावणी 9 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
फेरतपासणी करणाऱ्या घटनापीठात पाच न्यायाधीशांचा समावेश आहेत.
न्यायमूर्ती अब्दुल नजीर यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती बी. आर. गवई, ए. एस. बोपण्णा, व्ही. रामसुब्रमण्यम आणि बी. व्ही. नागरत्न यांचं घटनापीठ वरील सुनावणी घेत आहे. ही बातमी पुढारीने दिली.
3. पॉलिटेक्निकचं शिक्षण मराठीतूनही मिळणार
येत्या 31 डिसेंबरपर्यंत पॉलिटेक्निकच्या शिक्षणासाठी लागणारी सर्व पुस्तके मराठीतून उपलब्ध होतील, त्यामुळे हे शिक्षण सहज आणि सोपं होईल, त्याची विद्यार्थ्यांना मदत होईल, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
लघुउद्योग भारती नाशिक इंजिनिअरिंग टॅलेंट सर्च 2022 स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ नाशिकमध्ये पार पडला. याप्रसंगी पाटील बोलत होते.
ते म्हणाले, "इंग्रजीमध्ये शिकवणाऱ्या प्राध्यापकांनी शक्यतो मराठी शिकवावं. ते जर इंग्लिशमध्ये शिकवणार असेल तर इंग्लिशमध्ये शिकवलेलं मराठीत भाषांतर होण्यासाठी उपकरणही देण्यात येईल."
"दहावीनंतर पॉलिटेक्निक किंवा बारावीनंतर इंजीनियरिंगसाठी प्रवेश घ्यायचा म्हटले की ग्रामीण विद्यार्थ्यांपुढे इंग्रजीचं संकट उभे राहतं. अशात पॉलिटेक्निकची पुस्तके मराठीतून मिळाली तर नक्कीच विद्यार्थ्यांना मदत होईल," असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं. ही बातमी एबीपी माझाने दिली.
4. शिवसेना फुटीचा मराठी मनांवर आघात - जलील
शिवसेना फुटीला मराठी मनांवर आघात झाला असून उद्धव ठाकरे यांच्याबाबत मला सहानुभूती वाटते, असं वक्तव्य AIMIM पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
शिवसेनेतील बंडावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले, "मी स्वतः एक मराठी माणूस आहे. शिवसेनेच्या फुटीचा केवळ राजकारण्यांवर परिणाम झाला नाही तर मराठी मनांवर त्याचा आघात झाला आहे. हे बंड खरंच दुर्दैवी आहे. भाजपने शिवसेना फोडण्याचं पाप करायला नको होतं."
"शिवसेनेची ओळख मराठी माणसांसाठी लढणारी ढाल म्हणून आहे. मराठी अस्मिता ही शिवसेनेशी जोडलेली होती. याच मराठी माणसाला फोडण्यासाठी आज भाजपकडून-अमित शाहांकडून जी परिस्थिती निर्माण करण्यात आलेली आहे, खरंच त्याबद्दल मला वाईट वाटतं," असं जलील म्हणाले. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली.
5. वादग्रस्त पोस्ट शेअर करणाऱ्यांना अटक करू नये, सुप्रीम कोर्टाकडून निर्देश
माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 अंतर्गत येणाऱ्या कलम 66A संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी मोठा निर्णय दिला. IT कायद्याच्या कलम 66A अंतर्गत कोणावरही कारवाई करू नये, असं न्यायालयाने याबाबत म्हटलं आहे.
सोशल मीडियावर आक्षेपार्ह, चिथावणीखोर किंवा प्रक्षोभक सामग्री पोस्ट केल्या प्रकरणात कलम 66A नुसार एखाद्या व्यक्तीला अटक केली जाऊ शकत होतं. पण 2015 मध्ये सुप्रीम कोर्टाने श्रेया सिंघल प्रकरणात हे कलम असंवैधानिक घोषित केलं.
शिवाय, सर्व प्रलंबित प्रकरणांमधून कलम 66A चा संदर्भ काढून टाकला जाईल, याची खात्री करण्यासाठी न्यायालयाने सर्व राज्यांचे पोलीस महासंचालक आणि गृह सचिवांना अनेक निर्देश जारी केले आहे. ही बातमी ई-सकाळने दिली.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








