अंधेरी पूर्व पोटनिवडणूक: शिवसेनेच्या चिन्हांमागचा इतिहास तुम्हाला माहीत आहे का?

शिवसेना, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे

फोटो स्रोत, SHIVSENA

फोटो कॅप्शन, शिवसेना
    • Author, स्नेहल माने
    • Role, बीबीसी मराठीसाठी

उद्धव ठाकरे गटाला निवडणूक आयोगाने 'मशाल' हे चिन्ह दिलं आहे तर एकनाथ शिंदे गटाला नव्या चिन्हांसाठी प्रस्ताव देण्यास सांगण्यात आलं आहे.

उद्धव ठाकरे यांच्या 'उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' हे नाव मिळालं आहे.

त्रिशूळ चिन्हाशी धार्मिक भावना जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे ते देता येणार नाही, असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं. उगवता सूर्य या चिन्हाशीही धार्मिक भावना संलग्न असल्याने तेही देता येणार नाही, असं आयोगाने स्पष्ट केलं.

'मशाल' हे चिन्ह उपलब्ध निवडणूक चिन्हांच्या यादीत नाही. समता पक्षाचं ते चिन्ह होतं पण 2004 मध्ये हा पक्षच बरखास्त झाला. त्यामुळे मशाल चिन्ह देण्यात येत आहे असं निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला सूचित केलं.

शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) हे नाव देता येणार नाही कारण एकनाथ शिंदे गटाने प्रथम प्राधान्य म्हणून हेच नाव सादर केलं आहे, असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं. त्यामुळे तुमच्या गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असं नाव वापरता येईल असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं.

शिंदे गटालाही निवडणूक आयोगाने शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) हे नाव वापरता येणार नाही असं स्पष्ट केलं. तुम्हाला बाळासाहेबांची शिवसेना असं नाव वापरता येईल असं स्पष्ट केलं.

उद्धव ठाकरे गटाने आता निवडणूक आयोगाकडे मशाल, उगवता सूर्य आणि त्रिशूळ या चिन्हांची मागणी केली होती तर पक्षाचे नाव शिवसेना (बाळासाहेब ठाकरे), शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे), शिवसेना (बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे) देण्यात यावेत अशी मागणी केली होती.

9 ऑक्टोबर रोजी उद्धव ठाकरे यांनी सर्वांना फेसबुक लाईव्हद्वारे संबोधित केलं आणि निवडणूक आयोगाकडे मागणी केलेले चिन्ह कोणते याबाबतची माहिती जनतेला दिली.

"आम्हाला जनतेचा कौल मान्य राहील त्यासाठी निवडणूक आयोगाने आम्हाला लवकरात लवकर चिन्ह द्यावे. म्हणजे आम्ही जनतेकडे जाऊ," असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

पण आता नेमकं कोणतं चिन्ह शिवसेनेला मिळेल याबाबत अनेकांना उत्सुकता लागली आहे. त्याच पार्श्वभूमीवर हे पाहणे देखील आवश्यक ठरते की शिवसेनेनी आतापर्यंत कोणत्या कोणत्या चिन्हांवर निवडणूक लढवली, त्यांचा इतिहास काय आणि शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह कसे कायम झाले?

शिवसेनेची स्थापना

शिवसेना हा फक्त एक पक्ष नाहीये तर ती एक धगधगती राजकीय चळवळ असल्याचं दावा शिवसेनेनी वेळोवेळी केला आहे.

मुंबईतील मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पेटून उठलेल्या तरुणांना आवाज मिळवून देण्यासाठी या संघटनेचा जन्म झाल्याचे शिवसेनेच्या संस्थापकांनी म्हटले होते.

प्रबोधनकार ठाकरेंसोबत बाळ ठाकरे.

फोटो स्रोत, Prabodhankar.org

फोटो कॅप्शन, प्रबोधनकार ठाकरेंसोबत बाळ ठाकरे.

आपल्या कुंचल्यातून राजकीय फटकारे मारणाऱ्या बाळ ठाकरे नावाच्या तरुण व्यंगचित्रकाराने या पक्षाची स्थापना केली.

19 जून 1966 रोजी शिवाजी पार्कात प्रबोधनकार ठाकरे यांनी 'मी माझा बाळ या महाराष्ट्राला देतोय' असं सांगत शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची सेना अशी संकल्पना मनात ठरवून प्रबोधनकार ठाकरेंनी बाळासाहेबांना शिवसेना असं पक्षाचं नाव सुचवलं होतं.

हे नाव कसं सुचलं याबाबतची आठवण उद्धव ठाकरेंनी आजच्या ( 9 ऑक्टोबरच्या) भाषणात देखील सांगितली.

"बाळासाहेब ठाकरे हे तेव्हा मार्मिकमधून मराठी माणसांचे प्रश्न मांडत होते. तेव्हा प्रबोधनकारांनी त्यांना विचारलं की एखादी संघटना काढण्याचा विचार आहे की नाही. त्यावर बाळासाहेबांनी म्हटलं हो, तसा विचार करतोय. तेव्हा प्रबोधनकार म्हणाले. संघटनेचे नाव काय ठरवले, बाळासाहेबांनी उत्तर देण्याच्या आतच प्रबोधनकार म्हणाले 'शिवसेना.' मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणाऱ्या संघटनेचं नाव शिव-छत्रपतींच्याच नावावरुन हवं. असं प्रबोधनकार म्हणाले आणि शिवसेना हे नाव ठरलं," असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

बाळासाहेब ठाकरे हे व्यंगचित्रकार होते आणि मार्मिकमध्ये त्यांचे वाचा आणि थंड बसा या नावाने येणारे सदर देखील गाजले होते.

त्यांच्याच कुंचल्यातून साकारलेला 'डरकाळी फोडणारा वाघ' ही या संघटनेची ओळख होती.

शिवसेना

फोटो स्रोत, Shivsena

सुरुवातीला केवळ नियतकालिकांमधून प्रश्न मांडण्यात आले आणि नंतर शिवसेनेने हा संघर्ष रस्त्यावर आणि राज्याच्या कानाकोपऱ्यात नेला.

'हटाव लुंगी बजाव पुंगी' हा मंत्र घेऊन बेरोजगार शिवसैनिक भगवा झेंडा फडकवत मुंबईतील रस्त्यावर उतरले आणि दाक्षिणात्य लोकांविरुद्ध आंदोलन करून आपला हक्क मिळवला.

बाळासाहेब ठाकरे यांची परखड भाषणे त्यांची स्टाईल यामुळे वेगाने संघटनेला लोकप्रियता मिळत गेली.

समाजकारण आणि राजकारणाचा फॉर्म्युला

80% समाजकारण आणि 20% राजकारण हा फॉर्म्युला शिवसेनेसाठी बाळासाहेब ठाकरेंनी दिला.

मुंबईत असलेल्या शिवसेनेच्या शाखांच्या माध्यमातून शिवसैनिक लोकांसोबत जोडले गेले. त्यांचे छोट्यातले छोटे प्रश्न सोडवून शिवसेनेनी समाजकारणाचे ध्येय गाठले पण आता पुढचं ध्येय हे राजकारण होतं.

1968 साली पक्षाची राजकीय संघटना म्हणून नोंद करण्यात आली. तत्पूर्वी निवडणूक लढवायची तर पक्षाला चिन्हं हवं.

डरकाळी फोडणारा वाघ ही सेनेची ओळख होती. पण निवडणूक आयोगाकडून तेच चिन्ह मिळतं जे मुक्त चिन्हांच्या यादीत आहे. निवडणूक आयोगाकडून मुक्त चिन्हांची यादी प्रकाशित केली जाते. त्यातीलच एक चिन्ह पक्षाला घ्यावे लागते.

शिवसेना, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे

फोटो स्रोत, SHIVSENA

फोटो कॅप्शन, उद्धव ठाकरे

याआधी म्हणजेच 1967 साली संघटनेच्या स्थापनेनंतर वर्षभराने शिवसेनेने पहिल्यांदा ठाण्यात महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती. ठाण्यातील निवडणुकीसाठी शिवसेनेनी ढाल तलवार हे चिन्ह घेतलं होतं.

शिवसेनेचे उमेदवार हे कधी अपक्ष, तर कधी ढाल-तलवार, इंजिन या चिन्हावर निवडणूक लढवत होते.

1968 च्या मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूक प्रचारात मिरवणुकीत हाती धनुष्यबाण घेतलेले राम लक्ष्मण प्रसिद्ध झाले होते. या निवडणुकीत शिवसेनेनी ढाल तलवार या चिन्हावर निवडणूक लढवली होती अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार सचिन परब यांनी दिली.

लोकमतने दिलेल्या बातमीनुसार, ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम यांनी एकेठिकाणी सांगितले की "निवडणुकीच्या प्रचारावेळी शिवसेनेकडून एक मिरवणूक काढण्यात आली होती. लहू आचरेकर आणि ऑर्थर डिसुझा नावाचे कार्यकर्ते या मिरवणुकीत राम-लक्ष्मण बनले होते. तेव्हा त्यांच्या हातात ताणलेला धनुष्यबाण होता. शिवसेनेची आपल्या प्रचाराची ही अनोखी स्टाईल तेव्हा गाजली होती. पहिली निवडणूक असूनही शिवसेनेने मुंबईत आपली चांगलीच छाप सोडली."

बाळासाहेबांच्या शिवसेनेला खरं यश पहिल्यांदा 1970 साली मिळालं.

परळचे कम्युनिस्ट आमदार कॉ. कृष्णा देसाई यांच्या हत्येनंतर पोटनिवडणूक लागली होती. त्याकाळात डाव्या विचारांच्या संघटनांच्या विरोधात

शिवसेना आक्रमक झाली होती. या पोटनिवडणुकीत डाव्या पक्षांनी कॉ. कृष्णा देसाईंच्या पत्नीलाच म्हणजे सरोजिनी देसाईंना उमेदवारी दिली. तर बाळासाहेबांनी परळचे नगरसेवक वामनराव महाडिक यांना उमेदवारी दिली.

शिवसेना, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शिवसेना स्मारक

कॉ. कृष्णा देसाई यांच्या हत्येमागे शिवसेनेचा हात आहे अशा चर्चा सुरू असल्यामुळे ही निवडणूक अटीतटीची झाली.

शिवसैनिकांनी प्रचारात आपल्या जीवाचं रान केलं. डाव्यांना विजयाची खात्री असताना देखील निकालानं पुन्हा एकदा मुंबईसह महाराष्ट्राला हादरा दिला. कारण कॉ. कृष्णा देसाईंच्या पत्नी सरोजिनी देसाई पराभूत झाल्या होत्या. 1679 मतांच्या फरकानं वामनराव महाडिक विजयी झाले. त्यांच्या रूपात शिवसेनेचा भगवा झेंडा विधानसभेत पोहचला.

सर्वांत महत्त्वाचं म्हणजे या निवडणुकीसाठी शिवसेनेचे उमेदवार असणाऱ्या वामनरावांचं चिन्ह होतं उगवता सूर्य. त्यांच्या विजयामुळेच शिवसेना नावाच्या पक्षाचा राजकीय उदय झाला असं देखील बोललं गेलं.

या विजयानंतर शिवसेनेची पाळेमुळे मुंबईत रुजत गेली. मात्र पक्ष अजूनही मुंबईच्या बाहेर आपलं अस्तित्व निर्माण करू शकला नव्हता. त्यामुळेच निवडणूक आयोगाकडून त्यांना अधिकृत चिन्ह देण्यात आलेलं नव्हतं.

म्हणूनच शिवसेनेचे उमेदवार वेगवेगळ्या निवडणुकांना वेगवेगळी चिन्हे मतदारांना सामोरे गेले. यात कधी 'उगवता सूर्य' कधी 'धनुष्यबाण' तर कधी 'ढाल तलवार' यांचा समावेश होता.

सत्तरच्या दशकात शिवसेनेने कॉंग्रेसबरोबर हातमिळवणी करण्याचा देखील प्रयोग केला.

बाळासाहेब ठाकरेंनी इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीला देखील पाठिंबा देऊ केला होता.

शिवसेना, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शिवसेना भवन

पक्ष अनेक स्थित्यंतरे पहात होता मात्र अजूनही राजकीय जम बसायचा होता.

रेल्वे इंजिन

1978 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनाला आयोगाकडून रेल्वे इंजिन हे चिन्ह देण्यात आलं होतं.

बाळासाहेब हे स्वतः चित्रकार असल्यामुळे त्यांनी निवडणुकीत प्रचार यंत्रणा खुबीने राबवली. प्रचाराचा श्रीगणेशा करताना त्यांनी श्रीफळ वाढवितानाच रेल्वे इंजिनाचीही पूजा केली होती.

मुंबईमध्ये कोकणी माणसांचे प्रमाण अधिक असल्यामुळे प्रचार करताना "कोकण रेल्वेला शिवसेनेचं इंजिन लावा" अशी साद घालण्यात आली.

मात्र जनता पक्षाच्या लाटेत शिवसेनेच्या रेल्वे इंजिनाची धूळधाण उडाली. शिवसेनेवर पराभवाची नामुष्की आली. मात्र त्यांचे रेल्वे इंजिन हे चिन्ह घराघरात पोहोचलं.

जेष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर सांगतात की, "याच निवडणुकांच्या आठवणींमुळे बाळासाहेबांचे पुतणे राज ठाकरे यांच्या मनात सुद्धा रेल्वे इंजिन हे चिन्ह बसलं होतं. त्यांनी जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडून स्वतःचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केला तेव्हा त्यांनी आपल्या पक्षासाठी रेल्वे इंजिन हेच चिन्ह निवडलं. पुढे शिवसेनेप्रमाणेच त्यांनी देखील निवडणुकांतील अपयशाला कंटाळून इंजिन हे पक्षचिन्ह बदललं."

ऐंशीच्या दशकात बाळासाहेबांनी आपल्या पक्षात अनेक आमूलाग्र बदल केले. यातील सर्वांत महत्त्वाचा बदल म्हणजे भाजपशी युती आणि हिंदुत्वाची ओढलेली शाल. फक्त मराठीच्या मुद्द्यावर राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचता येणार नाही हे ओळखून शिवसेनेने कट्टर हिंदुत्व ही आपली ओळख निर्माण केली.

1984 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत तर शिवसेनेने चक्क भाजपच्या कमळ चिन्हावर आपले उमेदवार उभे केले. यात वामनराव महाडिक, मनोहर जोशी अशा दिग्गजांचा समावेश होता. पण याचा देखील शिवसेनेला विशेष असा फायदा झाला नाही.

1988 साली पहिल्यांदा वापरला धनुष्यबाण

1988 साली झालेल्या औरंगाबाद महापालिका निवडणुकांमध्ये मात्र पक्षाने अभूतपूर्व असं यश मिळवलं. या निवडणुकीवेळी त्यांचं चिन्ह होतं धनुष्यबाण.

बाळासाहेबांच्या बेधडक भाषणांमुळे एकेकाळी निजामशाहीच्या प्रभावाखाली असलेल्या मराठवाड्याच्या ग्रामीण भागात शिवसेनेचा भगवा झेंडा झळकू लागला.

शिवसेना

फोटो स्रोत, Shivsena

1989 सालच्या लोकसभेवेळी शिवसेनेने भाजपशी युती करून निवडणुका लढवल्या. पक्षाला अधिकृत परवानगी नसल्यामुळे शिवसेनेच्या वेगवेगळ्या उमेदवारांना वेगवेगळी चिन्हे मिळाली होती.

यातील परभणी मधून उभे असलेले उमेदवार प्राध्यापक अशोक देशमुख यांनी धनुष्यबाण या चिन्हाची निवड केली होती. त्यांनी या निवडणुकीत धनुष्यबाण या चिन्हाचा वापर करत जोरदार प्रचार केला.

याचाच परिणाम तब्बल 66 हजारांच्यावर बहुमत घेऊन त्यांचा विजय झाला. धनुष्यबाणामुळे मिळालेल्या यशानंतर शिवसेनेने आपलं चिन्ह धनुष्यबाण करावं असं ठरलं.

'रामाचे आयुध हीच बनली शिवसेनेची ओळख'

जेष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर सांगतात की, "तो काळ आयोध्येच्या राम मंदिर आंदोलनाचा होता. बाबरी मशीद पाडून तिथे प्रभू रामाचं मंदिर उभं राहावं यासाठी शिवसेना देखील आक्रमक होती. हिंदुत्वाची आपली ओळख घट्ट व्हावी शिवाय प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद म्हणून शिवसेनेनं धनुष्यबाण हेच पक्ष चिन्हं फायनल केलं."

मतदारांमध्ये होणारा गोंधळ टाळण्यासाठी आयोगाने हेच चिन्हं आम्हाला द्यावं अशी मागणी शिवसेनाप्रमुखांनी केली.

शिवसेनेचे तत्कालीन सरचिटणीस सुभाष देसाई, अॅड. बाळकृष्ण जोशी आणि विजय नाडकर्णी यांच्या पाठपुराव्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह सुपूर्द केलं.

पुढे जवळपास तीस वर्षे याच चिन्हावर शिवसेनेने अनेक निवडणुका लढवल्या. आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील खेडेगावात गेलं तर शिवसेनेच्या शाखेचा बोर्ड आणि त्यावर धनुष्यबाणाचे चिन्हं झळकताना दिसतं.

'खान हवा की बाण हवा'

निवडणुकीच्या काळात शिवसेना आणि धनुष्यबाण हे शब्द एकाच अर्थाने वापरले जातात. त्यातूनच 'खान हवा की बाण हवा' अशा घोषणा देखील निघाल्या.

बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर शिवसेनेची धुरा उद्धव ठाकरे यांच्याकडे आली आणि एक वेळा भाजपसोबत तर एक वेळा काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत त्यांनी सरकार स्थापन केले.

बाळासाहेब ठाकरे

फोटो स्रोत, DOUG CURRAN/getty

फोटो कॅप्शन, बाळासाहेब ठाकरे

मात्र त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड झालं. या बंडानंतर मात्र सेनेचा पायाच खचून गेला असल्याची स्थिती निर्माण झाली. शिवसेनेवर खरा अधिकार कोणाचा याचा संघर्ष दसरा मेळाव्याच्या शिवाजी पार्क मैदानापर्यंत पोहचला.

या वादातूनच निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळेच येत्या अंधेरी पोटनिवडणुकीत तरी धनुष्यबाण हे चिन्हं मतदारांना दिसणार नाही.

शिवसेना या नावाचा सुद्धा वापर निवडणुकीवेळी करता येणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

निवडणूक आयोगाकडून हा 'बाण' सुटलाय त्यावर न्यायालयात दाद मागणे वगैरे गोष्टी शिवसेनेकडून होतीलही, मात्र उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाचा हा वाद येत्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठं राजकीय वळण देणार हे मात्र नक्की.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)