एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात जेव्हा अचानक उद्धव ठाकरेंचं भाषण सुरू झालं...

एकनाथ शिंदे
    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठी

एकनाथ शिंदेंकडून बीकेसीचं तीन लाख क्षमतेचं मतदान बूक करण्यात आलं होतं. राज्यभरातून बसेस, ट्रेन आणि खासगी वाहनांनी लोकांना मुंबईत आणण्यात आलं. BKC मुंबईचं कॉर्पोरेट केंद्र. पण, बुधवारी (5 ऑक्टोबरला) एसटी, खासगी बसेस आणि गाड्याभरून लोक इथे पोहोचत होते.

सभेला येणाऱ्या लोकांच्या जेवणा-खाण्याच्या व्यवस्थेसाठी 10 हजार किलो पुलाव आणि साडेतीन लाख वडे बनवण्यात आले होते. पत्रकार, नेते आणि महत्त्वाच्या व्यक्तींसाठी जेवणाची वेगळी व्यवस्था होती.

एक लाखापेक्षा जास्त खुर्च्यांची तयारी होती. दुपारच्या सुमारास अंतिम टप्प्यातील लगबग सुरू होती. शिंदे गटातील नेते आणि मंत्री तयारीचा आढावा घेत होते.

पत्रकारांची लगबग सुरू होती. लाईव्ह, लोकांच्या मुलाखती सुरू होत्या. कॅमेरा दिसला की लोक घोषणा देत होते.

स्टेज भव्य होतं. यावर 'शिवसेनेचा दसरा मेळावा' असं पोस्टर नजरेस पडलं. पण काही वेळाने पोस्टर बदलण्याची लगबग सुरू झाली. कारण काही कळलं नव्हतं. पण दुसरं पोस्टर पाहिल्यानंतर फरक दिसून आला. पहिल्या पोस्टरमध्ये 'शिवसेनेचा' हा शब्द छोटा आणि पांढऱ्या रंगात होता. तर नवीन पोस्टरमध्ये शिवसेना शब्द मोठा आणि भगव्या रंगात लिहीण्यात आला.

त्यातच पावसाचा छिडकाव सुरू झाला. त्यामुळे स्टेजवरील खुर्चा, स्पिकर झाकून ठेवण्यात आले. स्टेजच्या खाली एक मोठी तलवार झाकून ठेवण्यात आली होती. एकनाथ शिंदे यांनी संध्याकाळी याचं प्रतिकात्मक शस्त्रपूजन केलं.

एकनाथ शिंदे आणि आनंद दिघेंवरील गाणं सतत वाजत होतं. आणि अचानक, एकनाथ शिंदेंवरील गाण्यात उद्धव ठाकरेंचा आवाज ऐकू आला. पत्रकारही चकित झाले. ऑडियो 20-25 सेकंदाचा असेल. उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांनी कोरोनाकाळात केलेल्या कामाची स्तूती करत होते. पत्रकारांनी रेकॉर्ड करण्यासाठी फोन काढेपर्यंत गाणं बंद झालं. त्यानंतर उद्धव ठाकरेंचा ऑडियो असलेलं गाणं पुन्हा ऐकू आलं नाही.

एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

VIP साठींच्या पुढच्या खुर्चा रिकाम्या होत्या. त्यामुळे मागे बसलेल्या कार्यकर्त्यांना या खुर्च्यांवर बसण्यासाठी पोलिसांनी सोडावं, अशी अनाउंसमेंट स्टेजवरून करण्यात आली. त्यानंतर या खुर्ची भरल्या. संध्याकाळी पाच वाजता कार्यक्रम सुरू झाला. नंदेश उमप यांच्या गाण्याच्या कार्यक्रमानंतर नेत्यांची भाषणं सुरू झाली.

एव्हाना लोकांची गर्दी झाली होती. स्टेजवर शिंदे गटातील आमदार, खासदार बसले होते. मंत्री अब्दुल सत्तार आपल्या कार्यकर्त्यांमधून फेरफटका मारताना दिसले.

गुवहाटीत डायलॉगमुळे चर्चेत आलेले शहाजी बापू पाटील, गुलाबराव पाटील, रामदास कदम यांसारख्या नेत्यांची भाषणं झाली. पण ही भाषणं ऐकण्यासाठी लोकांमध्ये फारसा उत्साह पाहायला मिळत नव्हता. गुलाबराव पाटील सोडता कोणाच्याच भाषणाला फारश्या टाळ्या पडल्या नाहीत.

संध्याकाळी साडेसातच्या सुमारास एकनाथ शिंदे मंचावर आले. त्यांनी बाळासाहेबांचे पुत्र जयदेव ठाकरे आणि सून स्मिता ठाकरेंना स्टेजवर बोलावून त्यांचा सन्मान केला. ठाकरे कुटुंबिय माझ्यासोबत आहेत हे दाखवण्याचा बहुदा हा त्यांचा प्रयत्न होता.

एकनाथ शिंदेंचं भाषण सुरू झालं. बाजूलाच बसलेल्या एका व्यक्तीला मी विचारलं, कुठून आलात? भाषण ऐकण्यासाठी आलात का? तो म्हणाला बीकेसीत कामासाठी होतो. काय सुरू आहे पाहायला आलोय.

यासारखेच अजूनही काही लोक होते. पण, लोकांमधून फेरफटका मारताना काही शिवसेना कार्यकर्ते शिंदेंना ऐकायला आले होते. शिंदे यांनी योग्य केलं असं त्यांचं म्हणणं होतं.

एकनाथ शिंदे यांचं भाषण अर्ध्यापर्यंत पोहोचलं असतानाच मागच्या बाजूने मेळाव्यासाठी आलेले लोक बाहेर पडू लागले. खुर्च्या हळूहळू रिकाम्या होताना दिसून आल्या. शिंदे गटाच्या मेळाव्यात लोकांशी बोलताना असं दिसून आलं की बहुतांश लोक ग्रामीण भागातून आले होते. शहरी भागातील लोकांचा टक्का यात कमी दिसून आला.

या दसरा मेळाव्याचं खास आकर्षण एकनाथ शिंदे होते. पण, त्यांचं भाषण बहुदा जमलेल्या लोकांना भावलं नाही. शिंदेंच्या भाषणात टाळ्या, घोषणाबाजी, कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया पहायला मिळाल्या नाहीत. एरव्ही एखादा मोठा नेता बोलत असताना कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करताना आढळून येतात.

शिंदे गटाने शक्तीप्रदर्शन करण्यासाठी मोठी गर्दी जमवली होती. पण शिंदेच्या भाषणादरम्यानच ही गर्दी हळूहळू ओसरू लागली होती.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)