एमसीए निवडणूक: शरद पवार-आशिष शेलार गटाचे अमोल काळे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष

- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी पवार-शेलार गटाच्या अमोल काळे यांची निवड झाली आहे. त्यांनी माजी क्रिकेटर संदीप पाटील यांचा पराभव केला पराभव केला. अमोल यांना 183 तर संदीप यांना 158 मते पडली.जितेंद्र आव्हाड आणि मिलिंद नार्वेकर कार्यकारिणीत निवडून आले आहेत.पण या निवडणुकीत निकालाइतकीच उद्धव ठाकरेंच्या गैरहजेरीचीही चर्चा झाली.देशातली एक महत्त्वाची क्रिकेट संघटना म्हणून एमसीएकडे पाहिलं जातं. त्यामुळे अनेक राजकारणी वेगवेगळ्या क्लब्जचे प्रतिनिधी म्हणून या संघटनेशी जोडले गेले आहेत आणि एमसीएच्या निवडणुकीत ते मतदान करतात.
आशिष शेलार आधी एमसीएच्या अध्यक्षपदासाठी शर्यतीत होते आणि त्यांना शरद पवार यांच्या ग्रूपचा पाठिंबाही मिळाला. पण शेलार यांची बीसीसीआयच्या खजिनदारपदी निवडणूक झाली. नव्या क्रीडा नियमांनुसार एका व्यक्तीला एका खेळाच्या प्रशासनात एकच पद भूषवता येणार आहे. त्यामुळे शेलार यांनी एमसीएच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतली.
त्यानंतर शेलार-पवार गटाकडून अमोल काळे अध्यक्षपदासाठी शर्यतीत असल्याचं जाहीर करण्यात आलं.
अमोल काळे हे एक उद्योगपती असून सध्या एमसीएचं उपाध्यक्षपद त्यांच्याकडेच आहे. अमोल काळे हे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात.
काळे यांच्यासमोर भारताचे माजी क्रिकेटर संदीप पाटील यांचं आव्हान आहे. पाटील हे मुंबई क्रिकेट ग्रुपचे उमेदवार म्हणून अध्यक्षपदासाठी रिंगणात आहेत.
विशेष म्हणजे गेल्या महिन्यात या निवडणुका जाहीर झाल्यापासून सुरुवातीला शरद पवार यांच्या गटाचा पाठिंबा संदीप पाटील यांना मिळेल अशी चर्चा होती. मात्र 10 ऑक्टोबरला अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी पवार आणि शेलार गट एकत्र आलेले दिसले.
या निवडणुकीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पवार-शेलार ग्रूपमध्ये शिवसेनेतून फुटलेल्या दोन्ही गटांशी नातं असलेल्या नेत्यांचा म्हणजे मिलिंद नार्वेकर आणि विहंग सरनाईक यांचा समावेश आहे.
मिलिंद नावेकर उद्धव ठाकरे यांच्या जवळचे मानले जातात तर विहंग सरनाईक यांचे वडील प्रताप सरनाईक शिवसेनेतल्या फुटीनंतर एकनाथ शिंदे गटासोबत गेले आहेत.
त्यामुळे एरवी कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असलेले नेते एमसीएच्या निवडणुकीत मात्र एकमेकांना साथ देताना दिसत आहेत.
पवार-शेलार गटात कोण कोण आहे?

पवार शेलार गटाकडून सचिवपदासाठी अजिंक्य नाईक तर खजिनदारपदासाठी अरमान मलिक यांची नावं पुढे करण्यात आली आहेत.
तर एमसीएच्या कार्यकारिणीतील जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जीतेंद्र आव्हाड आणि उद्धव ठाकरेंचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासह निलेश भोसले, खोदादाद यझगिरी, गौरव पय्याडे, सूरज सामंत, दीपन मिस्त्री यांना उमेदवारी मिळाली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
संदीप पाटील यांचा मुंबई क्रिकेट ग्रूप
माजी कसोटीवीर संदीप पाटील यांनी गेल्या महिन्यात एमसीएची निवडणूक लढवण्याचं जाहीर केलं आणि 8 सप्टेंबरला आपला अर्ज दाखल केल, तेव्हा आधी त्यांना पवार गटाचा पाठिंबा दिसत होता.
पवार-शेलार युती झाल्यावर संदीप पाटील यांनी माघार घेणार नसल्याचं आणि निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे.
त्यांच्या ग्रूपकडून उपाध्यक्षपदासाठी नवीन शेट्टी, सचिवपदासाठी अजिंक्य नाईक, संयुक्त सचिवपदासाठी गौरव पय्याडे, खजिनदारपदासाठी जगदीश आचरेकर ही नावं समोर आली. म्हणजे गौरव पय्याडे आणि अजिंक्य नाईक यांना वेगवेगळ्या जागांसाठी दोन्ही गटांकडून उमेदवारी मिळाली आहे.
क्रिकेटर विरुद्ध राजकारणी
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या या निवडणुकीला पुन्हा क्रिकेटर विरुद्ध राजकारणी असा रंग चढला आहे.
याआधी 15 जुलै 2011 रोजी माजी क्रिकेटर दिलीप वेंगसरकर आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यात थेट अध्यपदासाठी निवडणूक झाली होती. विलासराव देशमुख तेव्हा विजयी झाले होते.

फोटो स्रोत, Getty Images
त्याआधीची दोन वर्ष विलासरावांनी एमसीएचं उपाध्यक्षपद सांभाळलं होतं, तेव्हा शरद पवार अध्यक्षपदावर होते.
एमसीए निवडणुकीत कोण कोण मतदान करतं?
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्य असलेल्या 329 क्रिकेट क्लब्जचे प्रतिनिधी आणि 50 माजी क्रिकेटर्स या निवडणुकीत मतदान करतील. या क्लब्जच्या प्रतिनिधींमध्ये अनेक बड्या राजकीय नेत्यांचा समावेश आहे.
एमसीएचे माजी अध्यक्ष शरद पवार निवडणुकीच्या रिंगणात थेट नसले, तरी मतदार म्हणून त्यात सहभागी होताना दिसतील.
शरद पवार हे पारसी पायोनियर क्रिकेट क्लबकडून मतदान करतात, हा क्लब काही महिन्यांपूर्वी आशिष शेलार यांनी विकत घेतला होता. त्यामुळे शेलारांसाठी पवार मतदान करताना दिसतील, याची चर्चा रंगली आहे.
एमसीएमध्ये उद्धव ठाकरे मेरी क्रिकेटर्स या क्लबचं प्रतिनिधित्व करतात. आदित्य ठाकरे यांनी यंग फ्रेंड्स यूनियन क्रिकेट क्लबचं तर तेजस ठाकरे वेलिंग्टन क्रिकेट क्लबचं प्रतिनिधित्व केलं आहे.
त्याशिवाय प्रताप सरनाईक (संगम स्पोर्ट्स क्लब), राहुल शेवाळे (दादर क्रिकेट क्लब), सचिन अहिर (एम बी युनियन) असे अनेकजण या निवडणुकीत मतदान करताना दिसतात.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








