तेजस ठाकरे : वन्यप्रेमी की ठाकरे कुटुंबातला पुढचा राजकारणी?

तेजस ठाकरे : वन्यप्रेमी की ठाकरे कुटुंबातला पुढचा राजकारणी?
    • Author, नूतन कुलकर्णी
    • Role, बीबीसी मराठीसाठी

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात यंदा तेजस ठाकरे यांचे फलक लागलेले दिसून येत आहेत.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर अशा प्रकारे तेजस ठाकरे यांचे बॅनर्स लागणं महत्त्वाचं मानलं जातंय. आतापर्यंत तसे ते राजकारणात सक्रिय झालेले दिसून आलेले नाहीत.

तेजस ठाकरे हे राजकीय कार्यक्रमांपासून तसे दूर राहताना दिसतात. आदित्य ठाकरे हे 2019 साली वरळीतून विधानसभा लढत होते, त्यावेळी ते प्रचारात आणि अर्ज दाखल करताना सोबत होते. मात्र, त्यानंतर आणि त्याआधीही क्वचितच ते राजकीय व्यासपीठांवर दिसतात.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना के. चंद्रशेखर राव त्यांच्या भेटीला आले असताना तेजस ठाकरे सोबत बसल्याचे पाहून, राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली होती.

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Shiv Sena

पण तेजस ठाकरे यांचं कार्यक्षेत्र हे संशोधनाचं आहे. तेजस ठाकरे यांच्या प्रवासावर बीबीसी मराठीनं याआधी सविस्तर बातमी केली होती. ती पुढीलप्रमाणे :

ठाकरे कुटुंबातल्या चौथ्या पिढीतले तेजस ठाकरे यांनी माशाची एक नवीन प्रजाती शोधून काढली आहे.

सह्याद्री पर्वतरांगांमधल्या अंबोली घाटातल्या हिरण्यकेशी नदीत त्यांनी हा मासा शोधला. या माशाला सोनेरी केस आहेत आणि म्हणूनच त्याला 'हिरण्यकेशी' असं नाव देण्यात आलं आहे. या नवीन शोधाबद्दल तेजस ठाकरे यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे.

मात्र, त्यांनी शोधून काढलेला हा काही पहिला प्राणी नाही. यापूर्वी वेगवेगळ्या प्राण्यांच्या तीन प्रजाती त्यांनी शोधून काढल्या आहेत. त्यात गोड्या पाण्यातला दुर्मिळ खेकडा आणि त्याचबरोबर पाल आणि साप यांच्याही नवीन प्रजाती त्यांनी शोधल्या आहेत.

जैवविविधतेने नटलेल्या पश्चिम घाटात ते काम करतात. या भागात दरवर्षी नवनव्या प्रजातींचे शोध लागत असतात. माशासंबंधीच्या या नव्या शोधाविषयी बोलताना बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संचालक दीपक आपटे म्हणतात, असे शोध विज्ञानाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असतात.

तेजस ठाकरे, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, facebook

बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "असं म्हणतात की There is more unknown than known. त्यामुळे आपल्या पश्चिम घाटातली जैवविविधता किती आहे, हेच अशाप्रकारच्या शोधांमधून सिद्ध होते. अतिशय महत्त्वाचं असं वैज्ञानिक योगदान आहे."

ते पुढे म्हणतात, "अशा संशोधनांमध्ये संपूर्ण टीमचंच योगदान असतं. आपण फक्त व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाच्या अशा प्रजातींकडे बघतो. त्यामुळे अशा कमी अभ्यास झालेल्या ग्रुपवर जेव्हा लोक काम करतात तेव्हा नवनव्या प्रजातींचा शोध लागतो आणि ते शास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाचं असतं, संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाचं असतं."

तेजस ठाकरे यांनी माशाची एक नवीन प्रजाती शोधून काढली आहे.

फोटो स्रोत, Tejas thackrey/instagram

फोटो कॅप्शन, तेजस ठाकरे यांनी माशाची एक नवीन प्रजाती शोधून काढली आहे.

गेल्या दोन वर्षांत तेजस यांनी प्राण्यांच्या चार प्रजाती शोधून काढल्या आहेत. याचवर्षी जून महिन्यात त्यांनी आणि त्यांच्या टीमने कर्नाटकातल्या सकलेशपूर जंगलात पालींची एक नवीन प्रजाती शोधून काढली होती.

वन्यप्रेमी तेजस ठाकरे

खरंतर 2014 साली ही पाल त्यांनी शोधली. मात्र, गेली पाच वर्षं ही पाल खरंच वेगळ्या प्रजातीची आहे का, यावर संशोधन झालं आणि अखेर प्राणी शरीर शास्त्राच्या नियमानुसार तिला 'मॅगनिफिसंट डवार्फ गेको' असं नाव देण्यात आलं. तेजस आणि त्यांच्या टीमने या पालीवर तयार केलेला शोधनिबंध 'झुटाक्सा' या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या जर्नलमध्येही प्रसिद्ध झालं.

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात त्यांनी पश्चिम घाटातच सापाची एक नवी प्रजाती शोधून काढली होती आणि ठाकरे यांच्याच नावावरून त्याला 'बोईगा ठाकरेयी' असं नाव देण्यात आलं होतं. गोड्या पाण्यातल्या खेकड्याचीही दुर्मिळ जात त्यांनी आणि त्यांच्या टीमने शोधून काढली होती.

लहानपणापासूनच तेजसला प्राण्यांची आवड असल्याचं कात्रजच्या स्नेक पार्कचे संस्थापक नीलिमकुमार खैरे सांगतात. स्वतः उद्धव ठाकरे यांनाही प्राण्यांची आवड होती. ते तेजसला घेऊन अनेकदा कात्रज स्नेक पार्कला गेले आणि तिथेच तेजस आणि खैरे यांची ओळख वाढली.

ठाकरे कुटुंबीय

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

सापाची जी नवी प्रजाती तेजस यांनी शोधून काढली त्याबद्दल सांगताना खैरे म्हणतात, "मी वर्षानुवर्षं हा साप बघत होतो. मी, तेजस आणि इतर काही जण आंबोलीला गेलो होतो. त्या सापाकडे बघून तो मला म्हणाला, अण्णा तुम्हाला काय वाटतं, हे काय असेल. मी म्हणालो, काहीतरी वेगळं आहे. खरंतर मी ते रोजच बघत होतो. पण हा साप वेगळा आहे, ही नजर त्याच्याकडे होती. जे आमच्या नजरेतून सुटलं ते त्याला बरोबर सापडलं. म्हणून मी म्हणेन की तेजस फक्त वन्यप्रेमी नाही तर तो संशोधक आहे."

वन्यप्राणी संवर्धनासाठी काम

प्राण्यांच्या नवीन प्रजाती शोधण्यासोबतच तेजस वन्यप्राण्यांच्या संवर्धनासाठीही पश्चिम घाट आणि मुंबईतल्या आरे मिल कॉलनी परिसरात काम करतात.

आरेच्या विषयावर शिवसेनेने जी भूमिका घेतली त्यात तेजसचा वाटा मोठा होता, असं सांगितलं जात असल्याचं ठाकरे कुटुंबाला जवळून ओळखणारे पत्रकार धवल कुलकर्णी म्हणतात.

याविषयी बोलताना ते म्हणाले, "जानेवारी 2018 मध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्ड फॉर वाईल्ड लाईफकडून त्यांनी प्राण्यांवर संशोधन करण्याची परवानगी घेतली होती. त्यानंतर त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातल्या चांदोली वनक्षेत्रात गोड्या पाण्यातल्या खेकड्यांच्या प्रजाती शोधल्या. आरे परिसरातल्या बिबट्यांवरही ते काम करतात. तसंच आरेबाबत जी भू्मिका शिवसेनेने घेतली त्यात तेजस यांचा वाटा मोठा आहे, असं सांगण्यात येतं."

ठाकरे कुटुंबीय

फोटो स्रोत, Getty Images

याच वर्षी जून महिन्यात सिंधुदुर्गात येणाऱ्या तिलारी परिसराला संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं. यातही तेजस यांचा हातभार असल्याचं कुलकर्णी सांगतात.

ते म्हणाले,"हा 25 किमीच्या परिसरा कॉन्झर्व्हटिव्ह रिझर्व व्हावा, यासाठी वन विभागाचे अधिकारी बऱ्याच वर्षांपासून प्रयत्न करत होते. इथे घनदाट जंगल आहे. पशुपक्षी आणि वनस्पतीच्या अनेक प्रजाती इथे आहे. ब्लॅक पँथरचं अस्तित्व या भागात आहे. वाघ आणि हस्तींचा प्रजोत्पादनाचा हा परिसर आहे. मात्र, काही स्थानिक नेत्यांचा याला विरोध होता. परराज्यातून येऊन लोक इथे रबर आणि अननसाची शेती करायचे. असं सांगतात की ज्यावेळी तेजस ठाकरे आंबोलीला गेले तेव्हा वनविभागाचे अधिकारी त्यांना भेटले आणि हा भाग संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित होणं का गरजेचं आहे, हे त्यांनी तेजस ठाकरे यांना पटवून दिलं. त्यानंतर तेजस ठाकरे यांनी आपलं वजन या क्षेत्राच्या बाजूने टाकलं असावं आणि शेवटी राज्य सरकारने हा भाग संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केलं."

राजकारणात उतरणार का?

तेजस यांना जंगलात राहून वन्यजीवांवर संशोधन करणं आवडतं. त्यासाठी ते बराच वेळ देतात.

मात्र शिवसेनेच्या कार्यक्रमांमध्येही तेजस दिसतात. त्यामुळे त्यांना राजकारणाची आवड आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो.

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

तेजस राजकारणात येईल का, या प्रश्नावर आपल्याला तसं वाटत नसल्याचं खैरे म्हणतात. ते म्हणाले, "मनोहर जोशी मुख्यमंत्री होते त्यावेळी लहानगा तेजस एकदा आपल्या वडिलांना म्हणाला होता की बाबा तुम्ही वनमंत्री व्हा. मुख्यमंत्री व्हा, असं म्हणाला नाही.त्यावरूनच वन्यजीवांविषयीची त्याची आस्था स्पष्ट होतं आणि म्हणून तो कधी राजकारणात जाईल, असं वाटत नसल्याचं खैरे म्हणतात."

मात्र, ही शक्यता नाकारत येत नाही, असं गेली अनेक वर्ष ठाकरे कुटुंबाला जवळून बघितलेले पत्रकार धवल कुलकर्णी म्हणतात. बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "तेजस ठाकरेंनी वरळीमध्ये आदित्य ठाकरेंसाठी प्रचार केला होता. मात्र, ते स्वतः राजकारणात उतरतील का, हे आत्ताच सांगणं कठीण आहे. शेवटी ते ठाकरे आहेत. राजकारण आणि रोजचं आयुष्य यात त्यांच्यासाठी फार अंतर नाहीये. त्यामुळे ते अशक्य नसावं, असं मला वाटतं. त्यामुळे थेट समोर येऊन किंवा पडद्यामागून काहीतरी भूमिका ते बजावतील, असं वाटतं."

2006 साली आदित्य ठाकरे यांना जेव्हा शिवसेनेने लाँच केलं त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तेजसविषयी बोलताना तो माझ्यासारखा तडक-फडक असल्याचं म्हटलं होतं, हेही विसरता येणार नाही.

प्राण्यांविषयीची जशी आस्था तेजस यांना आहे तशी ती उद्धव ठाकरेंना होती आणि त्याहीपूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही होती. उद्धव ठाकरे तर वाईल्ड लाईफ फोटोग्राफर होते. त्यांच्या मातोश्री निवासस्थानी बंगल्याच्या मागच्या बाजूला अनेक प्राणी आणि पक्षी त्यांनी पाळलेत. तेजस यांचे काका राज ठाकरे यांनाही प्राण्यांची विशेषतः कुत्र्यांची आवड आहे. त्यांच्या घरी जेम्स आणि बाँड नावाची दोन कुत्री आहे.

मात्र, तरीही हे सगळे राजकारणात उतरले. त्यामुळे तेजस काय भूमिका घेतात, हे येणारा काळच सांगेल.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)