'मुघल-ए-आझम सारखा चित्रपट बनवण्यासाठी पुन्हा के. आसिफलाच जन्म घ्यावा लागेल'

    • Author, रेहान फझल,
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

(आपल्या देशात बनलेल्या भव्य चित्रपटांपैकी एक चित्रपट असं मुघल-ए-आझमचे वर्णन होऊ शकतं. आता अतिशय प्रगत तंत्रज्ञान आलं आहे तरी देखील एखादी भव्य कलाकृती सादर करणे हे आजच्या काळात देखील आव्हानात्मक आहे. तर त्या काळात हा चित्रपट कसा साकारला गेला असेल याची ही गोष्ट.)

मुघल-ए-आझम चित्रपटाचं प्रसिद्ध चित्रकार मकबूल फिदा हुसैन यांनी खास शब्दांत कौतुक केलं होतं.

"हा चित्रपट म्हणजे एक वेगळा आनंद आणि डोळ्यांना दिलासा देणारा आहे. ज्याप्रकारे चित्रकार चित्र रेखाटत असतो अगदी त्याचप्रकारे दिग्दर्शक के. आसिफ यांनी हे शिवधनुष्य पेललं आहे. माझ्या मते जर पुन्हा असा चित्रपट तयार करायचा असेल तर, के. आसिफ यांना पुन्हा जन्म घ्यावा लागेल. त्यांच्याशिवाय दुसरं कोणीही ते करू शकणार नाही," असं ते म्हणाले होते.

मुघल-ए-आझम संदर्भातले के. आसिफ यांचे अनेक गाजलेले किस्से आहेत. एकदा प्रसिद्ध संगीतकार नौशद हे उडनखटोला नावाच्या चित्रपटाचं संगीत तयार करण्याच्या कामात व्यस्त होते.

त्यावेळी आसिफ त्यांच्या घरी गेले आणि म्हणाले, "तुम्ही नेहमी म्हणायचे, मोठ्या गप्पा मारण्याऐवजी काही तरी मोठं करा. तो दिवस आला आहे. मी मुघल-ए-आझम तयार करत आहे, आणि तुम्हाला त्याचं संगीत द्यायचं आहे."

नौशाद यांनी शमा नावाच्या उर्दू वृत्तपत्रात ऑगस्ट 1984 मध्ये प्रकाशित झालेल्या 'नौशाद की कहानी नौशाद की जुबानी' च्या लेखात याबाबत लिहिलं आहे.

"मी त्यांना म्हटलं की, मला माफ करा कारण मी फार व्यस्त आहे आणि माझी तब्येतही हल्ली ठीक नसते. त्यावर त्यांनी एक लाख रुपयांचं बंडल काढलं आणि माझ्या हार्मोनियमवर ठेवत म्हणाले, हा अॅडव्हान्स आहे. मी नाराज होत, ते बंडल उचलून फेकलं. नंतर पूर्ण खोलीत नोटा पसरल्या होत्या."

"आसिफ हसत होते. त्याचवेळी नोकर चहा देण्यासाठी आला. त्यानं खोलीत पाहिलं आणि चहाचा ट्रे तसाच ठेवत माझ्या पत्नीला सांगायला धावला. माझी पत्नी वर आली तेव्हा कळलं की, नोकरानं खरं सांगितलं होतं," असं त्यांनी लिहिलंय.

"आसिफ हसत चहा घेत होते. माझ्या पत्नीनं नेमकं प्रकरण काय आहे, असं विचारलं. त्यावर आसिफ म्हणाले- तुमच्या पतींना विचारा. माझी पत्नी आणि नोकर खाली पडलेल्या नोटा गोळा करू लागले. आसिफ मला म्हणाले, नौशाद साहेब जिद्द करू नका. पैसे ठेवून घ्या. माझ्याबरोबर तुम्हीच काम करणार आहात. मी ही हसलो आणि म्हणालो - तुमचे पैसे परत घ्या. आपण सोबत काम करुयात," असं नौशाद यांनी लिहिलं आहे.

भुत्तो आणि चाऊ एन लाई यांनी पाहिले शुटिंग

मुघल-ए-आझम च्या शुटिंगचा एवढा बोलबाला होता की, अनेक मोठे लोक हे शुटिंग पाहायला यायचे.

शुटिंग पाहणाऱ्यांमध्ये चीनचे पंतप्रधान चाऊ एन लाय, प्रसिद्ध उर्दू शायर फैज अहमद फैज आणि नंतर पाकिस्तानचे पंतप्रधान बनलेले झुल्फिकार अली भुत्तो यांचाही समावेश होता.

नौशाद यांनी याचाही उल्लेख लिखानात केला होता. "त्या काळी मुंबईच्या वरळी सी फेसवर भुत्तो यांची एक सुंदर कोठी होती. 1954 ते 1958 दरम्यान भुत्तो नेहमी तिथं राहायचे. त्यांचं संपूर्ण कुटुंब मात्र पाकिस्तानात निघून गेलं होतं. मधुबालावर मोहे पनघट पे नंदलाल छेड गयो गाण्याचं चित्रिकरण सुरू असताना, ते त्याठिकाणी उपस्थित असायचे."

"त्यांना मधुबालाबरोबर लग्न करायचं होतं. त्यांनी एकदा लंचदरम्यान मधुबालासमोर तशी कबुलीही दिली होती. त्याच्या मोबदल्यात त्यांना फक्त मधुबालाचं खास हास्य हवं होतं," असं त्यांनी लिहिलंय.

दिलीप कुमार-मधुबाला यांच्यात मौन

मधुबाला मुघल-ए-आझम मधील त्यांचे हिरो दिलीप कुमार यांच्या प्रेमात पडल्या होत्या.

दिलीप कुमार यांनी त्यांचं आत्मचरित्र 'द सब्सटन्स अँड द शॅडो अॅन ऑटोबॉयोग्राफी'मध्ये याचा उल्लेख केला आहे, "मधुबाला अत्यंत उत्साही आणि आनंदी मुलगी होती. तिच्यामुळं माझा लाजाळू स्वभाव आणि कमी बोलण्याची सवय बदलली होती."

"पण मुघल-ए-आझमचे अर्धे चित्रीकरण झाले तोपर्यंत आमच्यातील गैरसमज एवढा वाढला होता की, आमचं एकमेकांशी बोलणंही बंद झालं होतं."

"आमच्या दोघांचा ओठांना पंखांचा स्पर्श करण्याच्या सीन चित्रिकरण केलं जात होता, तेव्हा आम्ही एकमेकांशी एक शब्दही बोलत नव्हतो."

अकबराची भूमिका करणाऱ्या पृथ्वीराज कपूर यांच्यासाठी आसिफ यांनी खास बूट तयार करून घेतले होते, त्यासाठी 4000 रुपये खर्च झाले होते.

कॅमेरामॅन आर. डी. माथूर यांना याबाबत समजलं तेव्हा ते आसिफ यांना म्हणाले की, हे बूट तर शॉटमध्ये व्यवस्थित दिसणारही नाहीत.

"आसिफ यांनी याचं उत्तर देत म्हटलं की, हे विसरू नका की, माझ्या अकबराला बुटांची किंमत माहिती आहे. जेव्हा तो एवढे महागडे बूट परिधान करून चालेल, तेव्हा त्याची चाल ही खरंच एखाद्या शहंशाहसारखी असेल," असं राजकुमार केसरवानी यांनी त्यांच्या 'दास्तान ए मुग़ल-ए-आज़म' मध्ये लिहिलं आहे.

मुघल-ए-आझम च्या शुटिंगदरम्यान शीश महालाचा सेट तयार करायलाच सुमारे दोन वर्षे लागली होती. आसिफ यांना जयपूरमधील आमेरच्या किल्ल्यातील शीशमहालातून याची प्रेरणा मिळाली होती.

पण भारतात मिळणाऱ्या रंगीत काचा फारशा चांगल्या नव्हत्या. त्यामुळं आसिफ यांनी या सेटसाठी बेल्जियमहून काच मागवली होती. "शीशमहल चा सेट तयार होतानाच, ईद आली होती," असं खतिजा अकबर यांनी मधुबाला यांचं आत्मचरित्र 'द स्टोरी ऑफ मधुबाला' मध्ये लिहिलं आहे.

चित्रपटाचे फायनान्सर शापूरजी मिस्त्री हे, परंपरेनुसार आसिफ यांच्या घरी ईदी घेऊन गेले. त्यांच्या हातात एक चांदीची प्लेट होती, त्यात काही सोन्याची नाणी आणि एक लाख रुपये होते.

आसिफ यांनी टोकन म्हणून एक नाणं उचललं. पैसेही उचलले पण, ते शापूरजी मिस्त्री यांना परत दिले. "या पैशाचा वापर माझ्यासाठी बेल्जियमहून काच मागवण्यासाठी करा," असं त्यांनी मिस्त्रींना सांगितलं.

शापूरजींनी आसिफ यांच्या जागी सोहराब मोदींना घ्यायचे ठरवले

मुघल-ए-आझम चित्रपट खर्च वाढून एवढा ओव्हर बजेट झाला की, फायनान्सर शापूरजी यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी आसिफ यांच्याऐवजी सोहराब मोदींना देण्याचं ठरवलं. मोदींनी त्या काळात पुकार आणि सिकंदरसारखे ऐतिहासिक चित्रपट तयार केले होते.

एके दिवशी सोहराब मोदी मुघल-ए-आझमच्या सेटवर आले. त्यांनी संपूर्ण सेटचा अभ्यास केला आणि त्यांनी आसिफ यांना प्यार किया तो डरना क्या, या गाण्याचं चित्रिकरण किती दिवसांत करणार असं विचारलं? आसिफ यांनी सुमारे 30 दिवस असं उत्तर दिलं. त्यावर मोदींनी म्हटलं की, याचं चित्रिकरण सहा दिवसांत केलं जाऊ शकतं.

आसिफ यांनी लगेचच उत्तर दिलं. "तसं तर मग तुमच्या शेजारी राहणारे बी ग्रेड चित्रपट तयार करणारे नानू भाई वकील यांना बोलावल्यास ते हे गाणं फक्त दोन दिवसांतही शूट करतील," असं आसिफ म्हणाल्याचं खतिजा अकबर यांनी लिहिलं आहे.

सुल्तान अहमद यांच्या मते, शापुरजी यांनी मुघल-ए-आझमचे शुटिंग सोहराब मोदी यांच्या मोदी मिनर्वा टोन या कंपनीकडं शिफ्ट करण्याचा विचार जवळपास पक्का केला होता.

"पण त्यावेळी मधुबाला यांनी के आसिफ यांना साथ दिली. आसिफ यांना बदलल्यास त्याही चित्रपट सोडतील अशी घोषणा केली. दिलीप कुमार यांनाही जेव्हा याबाबत समजलं तेव्हा त्यांनी, शापुरजी यांना अशा वेळी दिग्दर्शक बदलणे चित्रपटासाठी धोकादायक ठरेल असं सांगितलं. हवं तर माझे शिल्लकचे पैसे देऊ नका, पण आसिफ यांना हा चित्रपट पूर्ण करू द्या, असंही ते म्हणाले होते."

राजासारखा विचार करणारे आसिफ

सोहराब मोदींनी शापुरजी यांना, आसिफ कदाचित जास्त पैसे मिळवण्यासाठी चित्रपट लांबवत असावेत, असं सांगण्याचा प्रयत्न केला होता.

पण आसिफ यांच्या खासगी जीवनाचा विचार करता, त्यांना पैशाचा जराही मोह नव्हता. ते दयाळू होते आणि त्यांच्याकडे असलेले पैसे गरिबासाठी खर्च करायला किंवा एखाद्या गरजूचं घरभाडं, एखाद्याचे उपचार किंवा एखाद्या मुलाच्या शाळेच्या फीससाठी द्यायला ते मागंपुढं पाहत नसायचे.

त्यांचं स्वतःचं घर किंवा कारदेखील नव्हती. ते कायम टॅक्सीमध्ये प्रवास करायचे.

शापुरजी यांना त्यांच्यावर एवढा विश्वास होता की, ते चित्रपटाच्या कलाकारांना थेट पैसे न देता, आसिफ यांच्या नावाने चेक द्यायचे, आणि आसिफ त्या कलाकारांना पैसे द्यायचे.

"माझ्या वडिलांच्या जीवनात अनेक विरोधाभास होते. ते एखाद्या राजाप्रमाणं विचार करायचे पण फकिराप्रमाणं जगायचे," असं आसिफ यांचे पुत्र अख्तर आसिफ म्हणायचे.

पृथ्वीराज कपूर यांना गरम वाळूवर चालवले

आसिफ यांना कायम परफेक्शन हवं असायचं. त्यासाठी त्यांनी पृथ्वीराज कपूर यांचा सलीम चिश्तीच्या मजारवर जाण्याचा सीन कडक उन्हात, गरम वाळूवर चित्रित केला होता. गरम वाळूवर चालणं अशक्य झालं की, हात बाजूला नेऊन इशारा करताच शुटिंग थांबलं जाईल, असं त्यांनी पृथ्वीराज कपूर यांना सांगूनही ठेवलं होतं.

कॅमेरामन आर.डी.माथुर पृथ्वीराज कपूर यांच्या इशाऱ्याची वाट पाहत राहिले, पण तसं झालं नाही. आसिफ कट म्हणेपर्यंत पृथ्वीराज कपूर त्या गरम वाळूवर चालत राहिले.

"के. आसिफ यांनी पृथ्वीराज कपूर यांना नैतिक पाठिंबा दर्शवण्यासाठी बूट काढले आणि तेही अनवानी पायांनी चालत होते. शॉट पूर्ण होताच ते कपूर यांना मिठी मारायला गेले. पण तोपर्यंत पृथ्वीराज कपूर यांच्या पायाला मोठे फोड आले होते," असं राजकुमार केसरवानी यांनी 'दास्तान ए मुग़ल ए आज़म' पुस्तकात लिहिलं आहे.

"अजित यांनी एक आठवण सांगितली होती की, चित्रपटात त्यांच्या मृत्यूच्या सीनचं चित्रीकरण सुरू होतं. त्यावेळी आसिफ एका पाठोपाठ टेक घेत होते. मी असिस्टंट डायरेक्टर सुल्तान अहमद यांना गमतीत म्हटलं की, मला वाटतं मी खरंच मरून खाली पडेल तेव्हाच शॉट ओके होईल असं वाटतंय?"

मधुबालाला लच्छु महाराजांनी शिकवले कथ्थक

मोहे पनघट पे नंदलाल छेड गयो, या गाण्याचं चित्रिकरण सुरू असताना के आसिफ आणि नृत्य दिग्दर्शक लच्छू महाराज नौशाद यांच्याकडं जाऊन म्हणाले होते, "नौशाद जी हे गाणं असं तयार करा की, वाजिद अली शाह यायंच्या दरबाराच्या काळातील ठुमरी आणि दादरा आठवायला हवा."

नौशाद म्हणाले होते, "कथ्थकमध्ये चेहऱ्यावरील हावभाव सर्वांत महत्त्वाचे असतात. चित्रपटात हे गाणं मधुबालावर चित्रित होणार आहे. त्या कथ्थक शिकलेल्या नाहीत. त्या या गाण्याला न्याय देऊ शकतील का?"

त्यावर, ते तुम्ही माझ्यावर सोडा असं लच्छु महाराज म्हणाले होते. त्यांनी शुटिंगच्या आधी अनेक तास मधुबाला यांचा सराव करून घेतला. संपूर्ण गाणं मधुबाला यांच्यावर चित्रित करण्यात आलं, त्यात डुप्लिकेटचा वापर करण्यात आला नाही.

25000 रुपये देऊन बडे गुलाम अली यांना साइन केले

आसिफ एक दिवस नौशाद यांना म्हणाले होते की, त्यांना स्क्रीनवर तानसेनला गाताना दाखवायचं आहं. पण ते गाणार कोण हा मुख्य प्रश्न आहे?

नौशाद त्यांना म्हणाले होते की, त्या काळातील तानसेन बडे गुलाम अली यांच्याकडून गाणं गाऊन घ्यायला हवं, पण ते तयार होणार नाहीत. आसिफ म्हणाले ते मी पाहून घेतो. आसिफ यांनी जेव्हा बडे गुलाम अली यांना गाण्याची विनंती केली तेव्हा त्यांनी गाणं गाण्यास नकार दिला.

"आसिफ यांनीही हार न मानता म्हटलं की, गाणं तर तुम्हीच गाणार. त्यावर बडे गुलाम अली नौशाद यांना म्हटले, हा वेडा आहे का? नौशाद म्हणाले - अगदी बरोबर म्हणालात. अगदी वेडा आहे, तो ऐकणार नाही. त्यावर गुलाम अली यांनी हसत उत्तर दिलं, मलाही वेड्यांना बरोबर ठीक करता येतं. गाण्यासाठी एवढे पैसे मागेल की, त्याचा वेडेपणा बरोबर पळून जाईल," असं राजकुमार केसवानी यांनी लिहिलं आहे.

"उस्ताद गुलाम अली म्हणाले, ठीक आहे गाणं गाईल पण 25 हजार रुपये घेईल. आसिफ यांनी हातात असलेल्या सिगारेटची राख झटकत खिशातून नोटांचं बंडल काढत त्यांच्यासमोर ठेवलं. फक्त 25 हजार! मंजूर आहे."

त्यानंतर बडे गुलाम अली यांनी एका पाठोपाठ दोन गाणी रेकॉर्ड केली. 'प्रेम जोगन बन के, जोगन सुंदरी पिया ओर चले' आणि 'शुभ दिन आयो राज दुलारा.'

प्रदर्शनाच्या तीन दिवसांपूर्वीच तिकिटांसाठी लांबच लांब रांगा

चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग सुरू होण्याआधी आसिफ यांनी मराठा मंदिर थिएटरमध्ये विधिवत पुजा करून घेतली होती. बुकिंग सुरू होण्याच्या तीन दिवस आधी मुसळधार पाऊस होऊनही, तिकिटांसाठी रांगा लागायला सुरुवात झाली होती.

लोक रांगांमध्ये खाणं, पिणं आणि अगदी झोपूही लागले होते. रांगेत उभ्या असलेल्या लोकांसाठी घरून डबे येत होते. सर्वांत पहिलं तिकिट खरेदी केलं होतं, संपतलाल लोढा यांनी. 75 पैसे आणि 2 रुपयांत मिळणारी तिकिटं, ब्लॅकमध्ये 100 ते 200 रुपयांमध्ये विकली जात होती.

4 ऑगस्ट 1960 रोजी मुघल-ए-आझम चा प्रिमियर झाला तेव्हा, चित्रपटाची प्रिंट हत्तीवरून थिएटरमध्ये नेण्यात आली होती. गर्दी एवढी होती, की महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना हॉलपर्यंत पोहोचायला एका तासापेक्षा जास्त वेळ लागला होता.

पण चित्रपटाचे हिरो दिलीप कुमार आणि हिरोइन मधुबाला प्रिमियरला उपस्थित नव्हते.

दिलीप कुमार या सोहळ्याला न येण्यामागं एक कारण होतं. आसिफ यांनी दरम्यानच्या काळात त्यांची लहान बहीण अख्तरशी लग्न केलं होतं. दिलीप कुमार यांना ते आवडलं नसल्यानं ते नाराज होते.

मधुबाला हृदयविकारानं प्रचंड खचल्या होत्या. त्यामुळं त्यांना एवढ्या मोठ्या सोहळ्यात सहभागी होणं शक्यच नव्हतं. पुढचे 77 आठवडे मराठा मंदिर थिएटरमध्ये मुघल-ए-आझम सलग हाऊसफुल्ल चालला.

फ्लिमफेअरचे मुघल-ए-आझमकडे दुर्लक्ष

संपूर्ण भारतात चर्चा झालेल्या या चित्रपटाला फिल्मफेअरनं मात्र केवळ तीन पुरस्कार दिले होते. चित्रपटाचं प्रत्येक गाणं लोकांच्या ओठावर होतं, तरी त्यावर्षी उत्कृष्ट संगीतकार हा पुरस्कार 'दिल अपना और प्रीत पराई' साठी शंकर जयकिशन यांना देण्यात आला होता.

फिल्मफेअरनं या चित्रपटात पृथ्वीराज कपूर आणि दिलीप कुमार यांच्या अभिनयाकडंही कानाडोळा केला. त्यावर्षीचा सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार दिलीप कुमार यांना मिळाला, पण तो 'कोहिनूर' चित्रपटासाठी. मधुबाला यांच्या स्पर्धेतील बीना राय यांना 'घुंघट' साठी सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

मुघल-ए-आझमला तीन पुरस्कार मिळाले. बेस्ट फिल्म, बेस्ट सिनेमॅटोग्राफी आणि बेस्ट डायलॉग. यामुळं नाराज झालेल्या आसिफ यांनी मुघल-ए-आझमसाठी जाहीर झालेला सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कारदेखील नाकारला होता.

रंजक बाब म्हणजे, मुघल-ए-आझमचे शुटिंग संपल्यानंतर गुरुदत्त यांनी चित्रपटाच्या सेटवरील नक्षीदार खांब उसणे घेत, त्यांचा 'चौदवी का चाँद' चित्रपटाचा सेट तयार केला होता.

मुघल-ए-आझम चे कला दिग्दर्शक एमके सय्यद यांना तर फिल्मफेअरनं पुरस्कारासाठी पात्र समजलं नाही. मात्र त्यांच्याकडून उसणं सामान घेऊन वापरणाऱ्या बीरेन नाग यांना 'चौदवी का चाँद' साठी सर्वोत्तम कला दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला.

80 हजार फुटांचं फुटेज

मुघल-ए-आझम तीन भाषांमध्ये तयार करण्यात आला होता. हिंदी, इंग्रजी आणि तमिळ. इंग्रजी व्हर्जनचं नाव होतं, द ग्रेट मुघल. पण तो कधीही रिलीज झाला नाही. तमिळ व्हर्जनचं नाव होतं, 'अकबर' पण लोकांना तो आवडला नाही.

शुटिंगदरम्यान प्रत्येक शॉट तीन वेळा शूट व्हायचा आणि डायलॉगही तीन वेळा म्हटले जात होते. त्याचा परिणाम म्हणजे, शुटिंगचा कालावधी वाढत राहिला आणि खूप फुटेज जमा झाले होते.

तिन्ही भाषांमध्ये शॉट ओके होईपर्यंत सेट तसेच राहायचे.

आसिफ यांना परफेक्शन हवे असायचे. त्याचा परिणाम म्हणजे, सुमारे 80000 फुटांचे निगेटिव्ह जमा झाले. त्यापैकी अगदी कमी वापरात आले होते.

एका अंदाजानुसार एवढ्या मोठ्या फुटेजमध्ये किमान चार वेळा मुघल-ए-आझमसारखा चित्रपट तयार करण्यात आले असते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)