You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बहादूर शहा जफरः शेवटच्या मुघल बादशहाला इंग्रजांनी कसे पकडले?
1857 चा उठाव मोडून इंग्रजांनी दिल्ली पुन्हा ताब्यात घेतली. या उठावाचे नामधारी प्रमुख होता दिल्लीश्वर सम्राट बहादूर शाह जफर.
दिल्ली काबीज केली हे दाखवून देण्यासाठी बादशाहाला पकडणं इंग्रजांसाठी महत्त्वाचं होतं. यासाठी कॅप्टन विल्यम हॉडसनवर जबाबदारी सोपवण्यात आली. हॉडसनच्या नेतृत्वाखाली 100 सैनिक बादशाहाला पकडण्यासाठी रवाना झाले.
बादशहाने हुमायूनच्या कबरीत आश्रय घेतला होता. हॉडसन जेव्हा हुमायूनच्या कबरीकडे निघाला तेव्हा वाटेत एकाही बंडखोराने त्याच्यावर किंवा त्याच्या सैन्यावर गोळीबार केला नाही.
हुमायूनच्या कबरीच्या आसपासचे लोक आपल्याशी कसे वागतील याविषयी हॉडसनला काळजी होतीच. पण जीव महत्त्वाचा म्हणून तो कबरीजवळ लपून बसला.
1857 च्या बंडावर 'दि सीज ऑफ दिल्ली' हे पुस्तक लिहिणारे आणि लंडनमध्ये स्थायिक असणारे अमरपाल सिंग सांगतात, "बादशाहाने आत्मसमर्पण करावं यासाठी आणि महाराणी झीनत महलला भेटण्यासाठी हॉडसनने आपल्या दोन प्रतिनिधींना पाठवलं. हे दोन प्रतिनिधी म्हणजे मौलवी रजब अली आणि मिर्झा इलाही बक्श होते."
पण बादशाह काही आत्मसमर्पण करायला तयार नव्हता. त्याला मनवण्यात दोन तास उलटून गेले होते.
हॉडसनला वाटलं की आत गेलेल्या मौलवी रजब अली आणि मिर्झा इलाही बक्श यांची हत्या करण्यात आली असेल. पण तेवढ्यात हे दोघे बाहेर आले आणि बादशाहा आत्मसमर्पण करायला तयार आहे असं सांगितलं.
पण बादशाहाने हॉडसनसमोर एक अट ठेवली. जनरल आर्कडेल विल्सनने जीवनदान देण्याचं वचन दिलं होतं ते तुम्ही पाळालं याची खात्री जोपर्यंत आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आत्मसमर्पण करणार नाही असं बादशाहाने सांगितलं.
आणि बादशहाने जुन्या किल्ल्यात आश्रय घेतला..
बादशाहाच्या या अटीवर इंग्रजांच्या तंबूत चर्चा सुरू झाली. त्यांना कळेना की, बादशाहाला हे वचन नेमकं दिलं कोणी?
पण, बंडखोरांपैकी कोणी जर आत्मसमर्पण करत असेल तर त्यांच्यासाठी कोणत्याही अटी शर्थी ठेवल्या जाणार नाहीत असे आदेश गव्हर्नर जनरलने आधीचं दिले होते.
उठाव मोडून काढण्यासाठी इंग्रज दिल्लीत शिरले तेव्हा बादशाहाने किल्ल्याच्या आत असलेल्या महालात राहायचा निर्णय घेतला.
इंग्रजांनी किल्ल्यापासून शंभर यार्डावर असलेला बंडखोरांचा तळ ताब्यात घेतल्याच्या बातम्या 16 सप्टेंबर 1857 रोजी आल्या होत्या. पण ते किल्ल्यात येऊ शकत नव्हते कारण त्यांच्याकडे पुरेसं सैन्यबळ नव्हतं.
जुन्या किल्ल्यात आश्रय घ्यावा म्हणून बादशाहाने 19 सप्टेंबर रोजी आपलं कुटुंब आणि हुजूऱ्यांसह महाल सोडला.
बादशाहाने महाल सोडलाय आणि तो हुमायूनच्या कबरीकडे निघालाय अशी बातमी इंग्रजांना त्यांच्या गुप्तहेरांकरवी समजली होती.
एकीकडे इंग्रज बंडखोरांना फासावर लटकवत होते आणि तेच दुसरीकडे बादशाहाला मात्र जीवदान द्यायला तयार होते. असं का?
यावर अमरपाल सिंग सांगतात, 'एक तर बहादूरशाहा वयोवृद्ध झाला होता. आणि बंडखोरांचा तो नामधारी प्रमुख होता. इंग्रजांनी जरी दिल्ली काबीज केली असली तरी दिल्लीचं उत्तर टोक इंग्रजांच्या हाती लागलं नव्हतं. तिथे युद्ध सुरूच होतं. अशात जर बादशाहाला मारलं तर बंडखोरांच्या भावना आणखीनच पेटतील अशी भीती इंग्रजांना होती. त्यामुळे बादशाह शरण येत असेल तर त्याला जीवनदान द्यायचं असं विल्सनने आधीच ठरवलं होतं.'
बहादूरशाह जफरने शस्त्र म्यान केली..
'ट्वेल्व्ह इयर्स ऑफ द सोल्जर लाइफ इन इंडिया' या आपल्या पुस्तकात विल्यम हडसन लिहितो की, 'हुमायूनच्या कबरीतून सर्वांत आधी कोण बाहेर आलं असेल तर ती महाराणी झीनत महल. तिच्या पाठोपाठ आला, बादशाह बहादूर शाह जफर."
हडसनने पुढं येऊन बादशाहाला आपली हत्यार खाली ठेवायला सांगितली.
यावर बादशाहाने त्याला विचारलं की, तूच हडसन आहेस का? मला जे वचन दिलं होतं ते तू पुन्हा एकदा सर्वांसमक्ष सांगशील का?
कॅप्टन हडसन उत्तरला की, 'होय! मीच कॅप्टन हडसन आहे. आणि मला हे सांगायला आनंद होतोय की तुम्ही आत्मसमर्पण केल्यास महाराणी झीनतसह तुम्हाला आणि तुमच्या मुलांना जीवनदान दिलं जाईल. मात्र तुम्हाला वाचवण्याचा प्रयत्न झाल्यास मी याठिकाणी तुम्हाला कुत्र्याला गोळ्या घालून ठार करतात तसं ठार करीन."
हे ऐकून वृद्ध बादशाहाने आपली शस्त्रास्त्र हॉडसनकडे सुपूर्द केली.
बहादूरशहा जफरची नजर जमिनीला खिळलेली..
बादशाहा शहरात आल्यावर त्याला बेगम समरूच्या घरात नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. त्याच्यावर पाळत ठेवण्यासाठी एचएम 61 च्या 50 सैनिकांची निवड करण्यात आली होती.
बहादूरशाहाची जबाबदारी कॅप्टन चार्ल्स ग्रिफिथ नावाच्या इंग्रज अधिकाऱ्यावर होती.
हा इंग्रज अधिकारी आपल्या 'द नॅरेटिव्ह ऑफ द सीज ऑफ दिल्ली' या पुस्तकात लिहितो की, 'मुघल घराण्याचा शेवटचा वंशज व्हरांड्यात ठेवलेल्या लाकडी बाजल्यावर मांडी घालून बसला होता. त्याची कमरेपर्यंत रुळणारी दाढी सोडली तर आज त्याच्या सेवेत भव्यदिव्य असं काहीच नव्हतं.'
वयाची 80 ओलांडलेला हा बादशाह उंचीला जेमतेमचं होता. त्याने अंगात सफेद रंगाचा झब्बा घातला होता आणि त्याच रंगांची टोपी डोक्यावर होती. मोरपीसाऱ्याच्या पंख्याने दोन सेवक त्याला वारा घालत होते. त्याच्या तोंडातून एकही शब्द फुटत नव्हता. त्याच्या नजरा जमिनीवर खिळल्या होत्या.
बादशाहापासून तीन फुटावरचं एक इंग्रज अधिकारी बसला होता. त्याच्या शेजारी दोन बंदूकधारी शिपाई तैनात होते. यदाकदाचित बादशहाला वाचवायचा प्रयत्न झालाच तर आहे त्या ठिकाणी बादशाहाला गोळ्या घालाव्यात असे आदेश त्यांना देण्यात आले होते.
राजपुत्रांची ओळख पटवण्यासाठी हॉडसन राजघराण्यातल्या लोकांना सोबत घेऊन गेला होता..
बादशाहाला तर पकडलं, पण आता त्याच्या राजपुत्रांचं काय करावं हे विल्सनला समजेना. राजपुत्र हुमायूनची कबर असलेल्या वास्तूत लपून बसले होते.
ते पळून जायच्या आत त्यांना ताब्यात घ्यायला हवं असं कॅप्टन हडसनचं मत होतं.
या राजपुत्रांसोबत बंडखोरांचा नेता मिर्झा मुघल, मिर्झा खिज़्र सुलतान आणि मिर्झा मुघलचा मुलगा मिर्झा अबू बकरही होते.
कॅप्टन हडसनने जनरल विल्सनची परवानगी घेऊन 100 सैनिकांची एक फौज उभारली. ही फौज राजपुत्रांच्या अटकेसाठी तयार करण्यात आली होती. लेफ्टनंट मॅकडोव्हलसुद्धा या फौजेच्या मदतीला आले होते.
घोड्यांवर स्वार झालेली ही फौज धिम्या पावलांनी हुमायूनच्या कबरीजवळ आली.
राजपुत्रांची ओळख पटावी म्हणून हडसनने राजघराण्यातील एक सदस्य आणि बादशहाच्या पुतण्याला सोबतीला घेतलं होतं. बादशाहाचा हा पुतण्या राजपुत्रांनी हत्यारं म्यान करावी म्हणून इंग्रजांच्या वतीने शिष्टाई करायला गेला होता. तो जर यात यशस्वी झाला तर त्याला जीवदान दिलं जाईल असं आश्वासन हडसनने त्याला दिलं होतं.
हडसनने याआधी कधीच राजपुत्रांना पाहिलं नव्हतं त्यामुळे राजपुत्रांची ओळख पटवण्याची जबाबदारी सुद्धा या बादशहाच्या पुतण्यावर येऊन पडली होती.
बऱ्याच प्रयत्नांती राजपुत्र आत्मसमर्पणसाठी तयार झाले..
हुमायूनच्या कबरीपासून अवघ्या अर्ध्या मैलावर हडसनने तळ ठोकला होता. त्याने बादशाहाचा पुतण्या आणि मुख्य गुप्तचर अधिकारी रजब अलीला निरोप घेऊन राजपुत्रांकडे पाठवलं. राजपुत्रांनी बिनशर्त शरणागती स्वीकारावी अन्यथा परिणामांना सामोरं जावं असा तो निरोप होता.
हडसन याविषयी आपल्या पुस्तकात लिहितो की, राजपुत्रांना आत्मसमर्पण करण्यासाठी राजी करणं अवघड होतं आणि यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली.
अर्धा तास उलटून गेल्यावर राजपुत्रांनी हडसनसाठी एक संदेश पाठवला. हडसन आम्हाला जीवनदान देण्याचं वचन देणार असेल तर आम्ही आत्मसमर्पण करू असा संदेश राजपुत्रांनी पाठवला होता.
हडसनने मात्र 'असं वचन देणार नाही' हा पवित्रा घेत बिनशर्त आत्मसमर्पण करण्याचा मुद्दा रेटला.
यानंतर हडसनने राजपुत्रांना आणण्यासाठी दहा सैनिकांची एक तुकडी पाठवली.
इंग्रज अधिकारी मॅकडोवेल लिहितो की, "तिन्ही राजपुत्र बैल ओढत असलेल्या एका रथातून बाहेर आले. रथाच्या दोन्ही बाजूला पाच पाच शिपाई होते. आणि त्यांच्या मागोमाग दोन-तीन हजार लोकांचा जमाव येत होता."
'राजपुत्रांना पाहताच मी आणि हडसन घोड्यांना टाच देऊन पुढच्या दिशेने गेलो. त्या तिघांनीही हडसन समोर माना झुकवल्या. हडसननेही मान लवून उत्तर दिलं आणि रथ पुढं आणायला सांगितलं. जमावही मागोमाग येण्याच्या प्रयत्नात होता, मात्र हडसनने हाताचा इशारा करून जमावाला तिथंच थांबण्याचा इशारा दिला. आता जमाव आणि रथामध्ये अंतर होतं'
हडसनने सिगारेट शिलगावत निवांत असल्याचा आव आणला.
बादशहाचे घोडे, हत्ती, शस्त्र, रथ अशा गोष्टी कबरीत बऱ्याच दिवसांपासून पडून होत्या. राजपुत्र बाहेर आले तेव्हा या गोष्टीही बाहेर आणण्यात आल्या.
कबरीतून बाहेर आल्यानंतर राजपुत्रांनी पुन्हा एकदा विचारलं की त्यांना जीवदान मिळणार आहे का?
यावर हॉडसन लिहितो, "आणि मी म्हटलं 'अजिबात नाही' लागलीच त्यांना शहराच्या दिशेने रवाना केलं, सोबतीला माझे सैनिक होते. आता राजपुत्रांनी समर्पण केलंच आहे तर कबरीत आत जाऊन बघू असं मी मनाशी म्हटलं. आत जाऊन पाहतो तर काय, तिथं 500 तलवारी लपवून ठेवल्या होत्या. तिथं बंदुका, घोडे, बैल, रथ आदी गोष्टीही होत्या."
इथं आणखीन काही काळ थांबणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण दिल्यासारखं आहे, आपण इथून निघुया असा इशारा मॅकडॉवेलने दिला. मला मात्र याचा फरक पडत नाही या अविर्भावात मी सिगरेटचे झुरके घेतंच राहिलो.
थोडा वेळ निघून गेल्यावर हडसन आणि मॅकडॉवेलला त्यांचे सैनिक रस्त्यात भेटले. हे तेच सैनिक होते जे राजपुत्रांना शहराच्या दिशेने घेऊन जात होते.
आणि हडसनने तिन्ही राजकुमारांना ठार मारलं..
हडसन आणि मॅकडॉवेल दोघेही आपल्या पुस्तकात लिहितात की, ते शहराच्या दिशेने जात असताना त्यांना काहीतरी विपरीत घटणार असल्याचा अंदाज आला होता.
अमरपाल सिंग सांगतात, 'दिल्लीपासून अवघ्या पाच मैलांवर असताना हडसनने मॅकडॉवेलला विचारलं, या राजपुत्रांचं काय करायचं? यावर मॅकडॉवेल म्हणाला की, मला वाटतंय त्यांना इथंच ठार मारलं पाहिजे. हडसनने या तिन्ही राजपुत्रांना रथातून उतरायला सांगितलं आणि कपडे काढण्याचे आदेश दिले."
कपडे काढल्यावर पुन्हा त्यांना रथात बसायला सांगितलं. त्यांच्या अंगावर असलेले दागिने, रत्नजडीत तलवारी काढून घेण्यात आल्या. हॉडसनने रथाच्या दोन्ही बाजूला पाच पाच सैनिक तैनात केले. मग हडसन आपल्या घोड्यावरून खाली उतरला आणि त्याने त्याच्या कोल्ट रिवॉल्वरमधून राजपुत्रांवर प्रत्येकी दोन गोळ्या झाडल्या. या राजपुत्रांचा जागीच मृत्यू झाला.
राजपुत्रांचे मृतदेह भर चौकात ठेवण्यात आले..
हडसनने राजपुत्रांना रथातून खाली उतरायला सांगितलं होतं तेव्हा ते तिघेही मोठ्या आत्मविश्वासाने रथातून खाली उतरले. कारण त्यांना वाटत होतं की, हडसन एकट्याच्या बळावर आम्हाला मारायचं धाडस करणार नाही. त्यासाठी त्याला विल्सनची परवानगी घ्यावीचं लागेल.
हडसनने पुढे त्यांना कपडे काढायला लावले, तेव्हाही त्यांचा असाच समज झाला की, दिल्लीच्या रस्त्यावरून उघडी धिंड काढून याला आपला अपमान करायचा आहे. म्हणून त्यांनी कोणतेही आढेवेढे न घेता आपले कपडेही उतरवले.
तिथून जवळच बादशाहाचा एक किन्नर आणि इसम उभा होता. त्या दोघांनीही तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र मॅकडोवेल आणि त्याच्या सैनिकांनी पाठलाग करून त्यांना ठार मारलं.
या सर्व घटनाक्रमविषयी मॅकडॉवेल लिहितो, "जवळपास 4 वाजत आले होते. हॉडसनने त्या तिघांचे मृतदेह एका रथात ठेऊन शहरात प्रवेश केला. त्या तिघांचे मृतदेह शहरातील एका उंच ठिकाणावर लोकांना दिसतील अशा पद्धतीने ठेवण्यात आले. गुप्तांग सोडलं तर त्यांच्या अंगावर कपड्याची एक चिंधी सुद्धा नव्हती. 24 सप्टेंबरपर्यंत मृतदेह त्याच ठिकाणी पडून होते. बरोबर चार महिन्यांपूर्वी आमच्या स्त्रियांची याच पद्धतीने याच ठिकाणी हत्या करण्यात आली होती."
हडसनने राजपुत्रांच्या हत्येची कबुली दिली...
या घटनेनंतर हडसनने आपल्या भावाला पत्र लिहिलं होतं. त्या पत्रात तो म्हणतो, "तिथं जमलेल्या लोकांना मी म्हणालो, हे तेच लोक आहेत ज्यांनी आमच्या निःशस्त्र महिला-मुलांची हत्या केली. आम्ही त्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा दिली आहे."
मी त्या तिघांवरही गोळ्या झाडल्या. त्यांचे मृतदेह चांदणी चौकातल्या कोतवालीच्या समोर लोकांना दिसतील अशा पद्धतीने टाकण्याचे आदेश दिले. मी क्रूर नाहीये पण या लोकांना मारून मला पराकोटीचा आनंद मिळालाय.
रेव्हरंड जॉन रॉटन यांच्या 'द चॅपलेन्स नॅरेटिव्ह ऑफ द सीज ऑफ दिल्ली' पुस्तकात लिहिल्याप्रमाणे, "थोरला राजपुत्र अंगापिंडाने मजबूत होता. दुसरा त्याहून थोडा लहान होता, तर तिसरा राजपुत्र वीस वर्षांचा असावा."
या तिघांचे मृतदेह ज्या ठिकाणी फेकले होते तिथे कोक रायफलचा एक गार्ड तैनात करण्यात आला होता. तीन दिवस ते मृतदेह कोतवालीच्या बाहेर तसेच पडून होते. त्यांची विटंबना करून शेवटी त्यांचा दफनविधी करण्यात आला. या सगळ्यामागे सुडाची भावना होती. कारण तीन महिन्यांपूर्वी अशाच पद्धतीने इंग्रज महिला मुलांच्या हत्या करून त्यांचे मृतदेह उघड्यावर फेकण्यात आले होते. लोकांनी त्यांची ही अवस्था बघावी अशी बंडखोरांची इच्छा होती.
उरलेल्या राजपुत्रांनाही पकडण्यात आलं..
27 सप्टेंबरला ब्रिगेडियर शॉवर्स आपल्या सैनिकांसह उरलेल्या राजपुत्रांच्या शोधात निघाले.
त्याच दिवशी राजपुत्र मिर्झा बख्तावर शाह, मिर्झा मेंडू आणि मिर्झा जवान बख्त शॉवर्सच्या हाती लागले.
ऑक्टोबर महिना सुरू झाल्या झाल्या आणखीन दोन राजपुत्र इंग्रजांच्या हाती लागले. त्यांनाही गोळ्या घालून ठार करण्यात आलं. या दोघा राजपुत्रांनी बंडखोरांच्या एका टोळीचं नेतृत्व केलं होतं. त्याचबरोबर अनेक इंग्रजांचे खून केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला होता.
दरम्यानच्या काळात एक विचित्र घटना घडली. या दोन्ही राजपुत्रांना देहदंडाची शिक्षा झाली तेव्हा 60 रायफल तुकडीतील काही सैनिकांनी आणि काही गोरखा सैनिकांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. मात्र यातली कोणतीही गोळी राजपुत्रांचा जीव घेऊ शकली नाही, ते फक्त जखमी झाले. शेवटी एका प्रोव्होस्ट सार्जंटने राजपुत्रांच्या मस्तकात गोळ्या झाडल्या आणि त्यांना ठार केलं.
कर्नल ईएल ओमनी त्यांच्या डायरीत लिहितात की, "गोरखा सैनिकांनी जाणूनबुजून राजपुत्रांच्या शरीराच्या खालच्या भागावर गोळ्या झाडल्या होत्या. राजपुत्रांना वेदनादायक मृत्यू यावा या उद्देशाने त्यांनी ही कृती केली होती."
या राजपुत्रांना अस्वच्छ कपडे घालण्याची सक्ती करण्यात आली होती मात्र त्यांनी धैर्याने आपल्या मृत्यूला कवटाळलं.
शीख रिसालदारामुळे दोन राजपुत्रांचा जीव वाचला..
बहादूरशहा जफरचे दोन पुत्र मिर्झा अब्दुल्ला आणि मिर्झा क्वैश इंग्रजांच्या तावडीतून निसटले.
उर्दू लेखक अर्श तैमुरी यांनी विसाव्या शतकाच्या सुरुवातीला 'किला-ए-मुल्ला की झलकीस' हे पुस्तक लिहिलं. यात दिल्लीत सांगितल्या जाणाऱ्या लोककथांच लिहिण्यात आल्यात. या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे, "या दोन राजपुत्रांना हुमायूनच्या कबरीत ठेवलं होतं. तिथंच एक शीख रिसालदार होता."
त्या रिसालदाराला राजपुत्रांची दया आली. त्याने या दोघांना इथं कशासाठी उभे आहात असं विचारलं. यावर ते राजपुत्र म्हणाले की, साहेबांनी इथं उभं राहायला सांगितलंय.
तो शीख त्यांना म्हणाला की, स्वतःवर थोडी तरी दया दाखवा. तो इंग्रज जेव्हा परत येईल तेव्हा नक्कीच तुमचा जीव घेईल. त्यापेक्षा इथून पळा, श्वास घेण्यासाठी सुद्धा थांबू नका. असं बोलून तो शीख पाठमोरा फिरला.
हे दोन्ही राजपुत्र वेगवेगळ्या दिशेने धावायला लागले. यातला मीर क्वाएश साधूचा वेष धारण करून उदयपूरला पोहोचला. तिथल्या महाराजांनी दोन रुपये पगारावर त्याला ठेऊन घेतलं. हॉडसनने क्वाएशला शोधण्यासाठी आकाश पातळ एक केलं पण तो काही हॉडसनला सापडला नाही.
बहादूर शाह जफरचा दुसरा मुलगा अब्दुल्ला टोंक संस्थानात पळून गेला. तिथं त्याला गरिबीत आयुष्य काढावं लागलं पण तो शेवटपर्यंत इंग्रजांच्या हाती लागला नाही. बहादूरशहाच्या इतर मुलांना एकतर फाशी देण्यात आली तर अर्ध्यांना काळ्या पाण्याची शिक्षा भोगायला पाठवून दिलं.
काही राजपुत्रांना आग्र्याला तर काहींना कानपूर आणि अलाहाबादच्या तुरुंगात डांबून ठेवण्यात आलं. त्यांचे एवढे हाल करण्यात आले की दोन एक वर्षात हे राजपुत्र मरण पावले.
इंग्रजांनी बहादूर शाह जफरला वचन दिलं होतं की ते त्याला मारणार नाहीत, त्यांनी हे वचन पाळलं. बादशाहाला त्यांनी दिल्लीपासून दूर बर्माला पाठवलं. याच ठिकाणी 7 नोव्हेंबर 1862 दिल्लीच्या बादशहाने अखेरचा श्वास घेतला.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)