फोर्ब्सने दखल घेतलेली शेतकऱ्यांची ‘ग्रामहित’ कंपनी काय करते?

फोटो स्रोत, CR Shelare
- Author, नितेश राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी
उच्चशिक्षित असलेल्या पंकज महल्ले आणि श्वेता ठाकरे-महल्ले दाम्पत्य आता यवतमाळमध्ये शेतकऱ्यांसाठी काम करत आहे. त्यांनी सुरू केलेल्या 'ग्रामहित' या कंपनीची नोंद या वर्षी 'फोर्ब्स एशिया-100 टू वॉच'च्या यादीत करण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील महिलांचे आर्थिक सबलीकरण व्हावे यासाठी ग्रामहित काम करते. याबद्दल ग्रामहितच्या सह-संस्थापक श्वेता ठाकरे यांनी बीबीसीला माहिती दिली.
"आज शेतकरी महिला मार्केटमध्ये जाऊन माल विकायचा म्हणते तेव्हा तिला ते कठीण जातं. कारण हमालापासून दलालापर्यंत सगळी पुरुष मंडळी असतात. जवळपास 70 टक्के शेतकरी महिला शेतात राबतात पण मालाची विक्री त्यांच्या घरातले पुरुष करतात.
"त्यांना थेट कष्टाचं मोल मिळत नाही. अशा परिस्थितीत गावातच तिला तिच्या मालाची विक्री कशी करता येईल याचा विचार आम्ही केला. आता ग्रामहितच्या माध्यमातून महिला स्वतःचा शेतमाल योग्य भावात विकू शकतात," श्वेता सांगतात.
"महिला शेतकरी सक्षम झाल्याचं आम्ही पाहतोय," ग्रामहितच्या व्हिलेज ट्रेड सेंटरमुळे हे शक्य झाल्याचं श्वेता ठाकरे सांगत होत्या.
ग्रामहितची दखल 'फोर्ब्स एशिया- 100 टू वॉच'ने यावर्षी घेतली आहे. आशियातील लहान आणि स्टार्ट अप कंपन्यांनी यात भाग घेतला होता. त्यातील भारताच्या 11 कंपन्यांची निवड झाली. त्यात शेती विभागातून ग्रामहितला कामाची पावती मिळाली.
त्यानंतर यवतमाळ पासून जवळपास 70 किलोमीटर अंतरावर आर्णी तालुक्यातलं छोटंसं वरूड गाव जगभरात पोहचलं. 650 लोकसंख्या असणाऱ्या या गावातील शेतकरी पुत्रांनी सुरू केलेली 'ग्रामहित' कंपनी अवघ्या दोन वर्षांपूर्वी उभी राहिली आहे.
शेतकऱ्याला योग्य भाव कसा मिळाला?
पंकज महल्ले आणि श्वेता ठाकरे- महल्ले यांनी 'ग्रामहित' ही डिजिटल प्लॅटफॉर्म असलेली कंपनी 2020 मध्ये सुरू केली. शेतकऱ्यांच्या गुंतागुंतीच्या समस्या दूर करून शेतमालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी ही कंपनी काम करते. पीक काढणीनंतर व्यापाऱ्यांचं मार्केटमध्ये होणारं शोषण थांबवण्यास ही कंपनी मदत करते असं महल्ले दाम्पत्याचं म्हणणं आहे.

पंकज आणि श्वेता हे दोघंही शेतकरी कुटुंबातले असून उच्चशिक्षित आहेत. पंकज यांनी TISS मधून पदव्युत्तर शिक्षण घेतलंय. तर श्वेता यांनी आयआयटी हैदराबादमधून मास्टर्स केलंय.
शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक त्यांनी आपल्या बालपणापासूनच अनुभवली. आई-वडील शेतात राबायचे पण शेतमालाचा योग्य मोबदला मिळत नसे.
या कठीण परिस्थितीतून पंकज यांनी उच्च शिक्षण घेतले आणि कॉर्पोरेट कंपनीत नोकरीवर लागले. पण आपल्या मातीतल्या समस्या त्यांना स्वस्थ बसू देत नव्हत्या. ग्राम विकास आणि शेतकऱ्यांचं हित कस साध्य होईल यावर त्यांनी विचार केला. त्यातून ग्रामहितची कल्पना सुचल्याचं ते सांगतात.
फार कमी सोयी-सुविधा असणाऱ्या गावात घरातील पहिल्या मजल्यावर काही संगणक आणि लॅपटॉपवर या डिजिटल प्लॅटफॉर्मचं काम चालतं. घराशेजारी जिथे कधी काळी गुरांचा गोठा होता तिथे गोडाऊन तयार केलं. त्यावर ठळक अक्षरात ग्रामहितचा बोर्ड दिसतो.
10 शेतकऱ्यांपासून सुरूवात
ग्रामहितची स्थापना करण्यासाठी पंकज आणि श्वेता यांनी चांगल्या पगाराची नोकरी सोडून गाव गाठलं. वरुडमध्ये 2018 ला ते आले आणि कंपनी सुरू झाली.
सुरुवातीच्या काळाबद्दल पंकज माहिती देतात, "सुरुवातीला कंपनीशी 10 शेतकरीच जोडले गेले. आधी गावकऱ्यांचा विश्वास संपादन करणे यावर आम्ही भर दिला. शेतकऱ्यांना आमच्याकडून फायदा होत गेला, तसे शेतकऱ्यांची संख्या वाढली.
"आज कंपनीशी यवतमाळमधीलच नाही तर वाशिमचे जवळपास 3 हजार शेतकरी जोडलेले आहेत. हे बहुतांश शेतकरी अल्पभूधारक आहेत. 'ग्रामहित'मुळे शेतकऱ्यांच्या एकूण उत्पन्नामध्ये 30 ते 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे," पंकज सांगतात.

फोटो स्रोत, paresh3d
शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. APMC मध्ये गुणवत्तेनुसार न मिळणारा भाव, किंवा व्यापाऱ्यांनी पाडून मागितलेला शेतमाल यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या श्रमाचा पैसा मिळत नाही.
महल्ले यांनी गावातच मोठी साठवण क्षमता असणार गोडाऊन तयार केलं.

ते म्हणतात "या गोडाऊनमध्ये येणाऱ्या शेतमालावर किंवा गावपातळीवर साठवणूक केलेल्या शेतमालावर आम्ही तारण कर्ज आणि तेथूनच थेट त्यांचा माल बाहेर विक्री साठी व्यवस्था उभी करून दिली.
"यासाठी आम्ही गावपातळीवर असणाऱ्या कम्युनिटी बेस संस्था, FBO किंवा बचतगट आहेत. त्यासोबत गावात व्हिलेज ट्रेड सेंटर उभारतो. आणि त्या सेंटरच्या माध्यमातून आम्ही तीन सेवा म्हणजेच साठवणूक, पोस्ट हार्वेस्ट क्रेडिट आणि मार्केटशी जोडलेल्या सेवा डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सुविधा पुरवतो," पंकज सांगतात.
पुढे ते म्हणतात, "ग्रामहितकडून मिळणारा सुविधांचा फायदा शेतकऱ्यांना दोन स्तरावर होतो. एक म्हणजे होल्डिंग कॅपॅसिटी वाढल्यामुळे त्रासदायक विक्रीपासून शेतकऱ्यांना मुक्ती मिळते आणि दुसरं म्हणजे 2-3 महिन्यांनंतर शेतकऱ्यांना वाढीव भाव मिळतो."
"शेतमाल जेव्हा मंडीमध्ये नेऊन विकायचा असतो तेव्हा त्यांना परत शेतमाल घरी आणणे परवडणारं नसतं. पण ग्रामहितमुळे जर शेतकऱ्यांना भाव पटला नाही तर ते शेतमालाची साठवणूक करून कधीही विक्री करू शकतात," पंकज सांगतात.

ग्रामहित शेतकऱ्यांना माल कधी विकायचा, कोणाला विकायचा आणि कोणत्या किमतीला विकायचा या तिन्ही गोष्टी एकाच वेळी साध्य करुन देतं.
भारतात सगळं तंत्रज्ञान विकसित झालं असतानाही शेतमालाची भाव ठरवण्याची पद्धत अनौपचारिक आहे. त्यातून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात शोषण होतं. त्याला थांबवणं गरजेचे आहे हे ओळखून पंकज यांनी गावपातळीवरच शेतमालाच्या शास्त्रीय गुणवत्ता चाचणीचं व्यवस्थापन केलंय.
या माध्यमातून शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक थांबली आहे, असं ते समजावून सांगतात.
'शेतकरी बाप तिकडे आत्महत्या करतोय'
कॉर्पोरेट नोकरीवर असताना सहकऱ्यांकडून नेहमी विचारल्या जाणाऱ्या एका प्रश्नावर ते दुःखी व्हायचे. तो प्रश्न म्हणजे तुम्ही कुठे राहता?.
पंकज म्हणतात "यवतमाळ जिल्ह्याचं नाव सांगितलं की एकतर जिल्ह्याची माहिती नसायची आणि जिल्ह्याची सर्वाधिक आत्महत्या असणारा जिल्हा ही ओळख त्यांना माहित असायची.
"यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचलतात हे आम्ही पाहिलं होतं. आम्ही इकडे ऐशोआरामाचं आयुष्य जगतोय आणि आमचा शेतकरी बाप तिकडे आत्महत्या करतोय. त्यामुळं आमच्या शेतकऱ्यांना या दुष्टचक्रातून आम्हाला बाहेर काढायचं होतं," पंकज सांगतात.

ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना शेतमाल साठवणुकीची मोठी अडचण असते. ही अडचण लक्षात घेता घरातच साठवण क्षमता असणारी सुलभ आणि परवडणारी स्टोरेज सुविधा त्यांनी तयार केली.
त्यात अत्याधुनिक हवाबंद साठवणूक तंत्रज्ञान, धान्य निरीक्षणासाठी लॉट आणि सेन्सर आधारित तंत्रज्ञान विकसित केलंय.
"शेतमालाचे भाव निश्चित नसतात. शेतकऱ्यांचा माल बाजारात आला की भाव पाडले जातात. पण शेतकऱ्यांकडे दुसरा पर्याय नसतो. मिळेल तो भाव घेऊन तो शेतमाल विकतो. कारण त्याच्याकडे साठवणुकीची व्यवस्था नसते. आम्ही त्यावर तोडगा काढून तशी व्यवस्था त्यांच्याच घरी तयार केली. म्हणजे भाव वाढले तेव्हा त्यांना शेतमाल विकता यावा.
"ग्रामीण भागात पायाभूत सुविधांचा अभाव असतो. रस्ते, वीज, शाळा या गोष्टी आवश्यक तर आहेच, पण भारत हा कृषिप्रधान देश असल्यामुळे गाव तिथे गोदाम असायला हवं. दुर्दैवाने ते नसल्यामुळे भारतात अन्नधान्याची नासाडी होते. तुलनात्मकदृष्ट्या विचार केल्यास ऑस्ट्रेलियाचं वर्षभराचं एकूण उत्पन्ना इतकी ही नासाडी असते," अस पंकज महल्ले यांचं म्हणणं आहे.
महाराष्ट्रातील विदर्भातल्या चार जिल्ह्यांमध्ये कामाचा विस्तार करण्याचा ग्रामहितचा मानस आहे. शिवाय कर्नाटक आणि तेलंगणासारख्या राज्यांतूनही त्या भागात काम करण्यासाठी मागणी येतेय.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









