काँग्रेस अध्यक्षपद निवडणूक: शशी थरुर वादग्रस्त पण तरुणांमध्ये लोकप्रिय

शशी थरुर, काँग्रेस,

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शशी थरुर
    • Author, इम्रान कुरेशी
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

(शशी थरूर आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारीचा अर्ज भरला आहे. सुरुवातीपासूनच शशी थरुर हे निवडणूक लढवतील ही चर्चा होती. त्यांच्या विरोधातील उमेदवार मात्र बदलत राहिले. त्या निमित्ताने शशी थरुर यांची ओळख करून देणारा हा लेख.)

बोलणं आणि कृतीने मित्रांना, समर्थकांना, विरोधकांना चकित करण्यात ते मागे हटत नाहीत. काहीच नसेल तर ते असा इंग्रजी शब्द उच्चारतात ज्याची अनेक दिवस चर्चा होते.

काँग्रेस अध्यक्षपदासाठी ते पुढाकार घेणार नाहीत अशी चर्चा होती. त्यांनी आपल्या मित्रांना, टीकाकारांना चुकीचं सिद्ध केलं आहे.

शशी थरुर यांच्यासंदर्भात एका राजकीय भाष्यकाराने केलेले भाष्य असं होतं. बॉलीवूड चित्रपटाच्या नायकाप्रमाणे दिसत असल्याने ते याद्वारे छाप उमटवू शकतात. तेच थरुर काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. ते ही निवडणूक जिंकतील की नाही हा मुद्दा अलाहिदा.

काँग्रेस नेतृत्वाला विरोध असल्यामुळे G-23चा भाग असणारे आणि पत्र लिहिणाऱ्यांमध्ये शशी थरुर यांचा समावेश होता. राहुल गांधी यांच्या पद्धतीच्या राजकारणाशी त्यांचं साधर्म्य नाही.

तरी ते राहुल गांधी यांच्या भारत जोडो आंदोलनात दिसले आहेत. सोनिया गांधी यांची भेट घेऊन काँग्रेस अध्यक्षपदासाठी उत्सुक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

पण जे लोक थरुर यांना ओळखतात, ज्या लोकांनी त्यांच्याबरोबर काम केलं आहे त्यांच्यामते थरुर असेच आहेत. हीच त्यांची काम करण्याची पद्धत आहे.

G23 चा भाग असल्यामुळे त्यांच्या नावासंदर्भात ज्या शंका कुशंका निर्माण झाल्या होत्या त्यांचं त्यांनी सोनिया गांधींना भेटून निराकरण केलं आहे. ही भेट केवळ औपचारिकता होती का हे कुणालाच माहिती नाही. काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांच्याबरोबर आहेत का याचाही कोणाला अंदाज नाही.

राजकीय भाष्यकार एमजी राधाकृष्णन यांनी सांगितलं, "त्यांची राजकीय शैली वेगळी आहे. त्यांना अहंकार नाही. जगातले मोठे नेते, उद्योगपती, बुद्धिजीवी यांच्यासह पक्षाच्या कोणत्याही माणसाशी अहंकाराविना बोलतात."

केरळ काँग्रेसचा पाठिंबा नाही

लोकांशी थेट संवादामुळे थरुर यांनी 2009 मध्ये तिरुवनंतपुरम इथून लोकसभेची निवडणूक जिंकली. त्यावेळी त्यांची उमेदवारी मजबूत मानली जात नव्हती.

याच मतदारसंघातून त्यांनी विजयाची हॅटट्रिक केली आहे. परंतु याचा अर्थ केरळ काँग्रेसचा त्यांना पाठिंबा आहे असं नाही. म्हणूनच केरळ काँग्रेसने एक ठराव पास केला आहे तो म्हणजे ज्या उमेदवाराला हायकमांडचा पाठिंबा असेल त्याला समर्थन दिलं जाईल.

शशी थरुर, काँग्रेस,

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शशी थरुर

खासदार के. मुरलीधर यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "थरुर यांना स्वत:चं मत मिळेल. पीसीसीने निर्णय घेतला आहे की नेहरू कुटुंबीयांबरोबर असलेल्या व्यक्तीला पाठिंबा दिला जाईल."

खासदार बेनी बेहनान यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "काँग्रेस अध्यक्षपदासंदर्भात ते गंभीर आहेत असं मला वाटत नाही. त्यांनी याबाबत मित्रांनाही काही सांगितलेलं नाही. मी त्यांचा मित्र आहे. याबाबत ते काहीही बोलले नाहीत. कोणीही राज्य काँग्रेसच्या प्रस्तावाच्या विरोधात जाणार नाही."

थरुर यांचं गुणकौशल्यं सोनिया गांधी यांना माहिती आहेत का?

ते पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत याचा अर्थ राज्य सरकार पाठिंबा देत नाहीये असं नाही. अनेकवेळा पिनराई विजयन यांच्या सरकारचं थरुर यांनी कौतुक केलं आहे. पक्षाने याचा विरोध केला आहे.

काही दिवसांपूर्वीच शिवरलाईन रेल्वे प्रकल्पासंदर्भात थरुर यांना आपलं वक्तव्य मागे घ्यावं लागलं होतं. मुख्यमंत्र्यांचा हा खास प्रकल्प मानला जातो. एलडीएफ आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील या वातावरणात अशी वक्तव्यं पक्षाचं नुकसान करू शकतात.

राजकीय भाष्यकार राधिका रामाशेषन सांगतात, "सोनिया गांधींना त्यांची गुणकौशल्यं माहिती आहेत. सोनिया गांधी यांच्याशी वैयक्तिक ओळख असूनही थरुर पूर्ण कॅबिनेट मंत्री होऊ शकलेले नाहीत. तसंच काँग्रेस वर्किंग कमिटीचेही सदस्य होऊ शकलेले नाहीत. ते वादविवादात होते. यामुळेच मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळातून त्यांना राजीनामा द्यावा लागला."

सोपा नव्हता प्रवास

सेंट स्टीफन्स महाविद्यालयातून शिक्षण घेतलेल्या थरुर यांची देशातल्या अग्रगण्य बुद्धिजीवी लोकांमध्ये गणना होते. त्यांनी विदेशातही शिक्षण घेतलं आहे.

अगदी लहान वयात ते संयुक्त राष्ट्र संघटनेत काम करत होते. संयुक्त राष्ट्र संघटनेत अंडर सेक्रेटरी जनरल झाले. भारताने सेक्रेटरी जनरल पदासाठी त्यांच्या नावाला समर्थन दिलं होतं. पण ते झाले नाहीत.

शशी थरुर, काँग्रेस,

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शशी थरुर

परराष्ट्र खात्यातील अधिकारी म्हणून दिमाखदार कारकीर्दीदरम्यान त्यांनी पुस्तक लिखाण सोडलं नाही. दहाव्या वर्षापासून ते लिहित आहेत. त्यांनी दोन डझनहून अधिक पुस्तकं लिहिली आहेत.

त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. राजकारण, धर्म, अशा असंख्य विषयावर त्यांनी पुस्तकं लिहिली आहेत.

थरुर आणि वाद

संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सर्वोच्च पदी निवड न झाल्यानंतर थरूर यांनी देशातील अग्रगण्य वर्तमानपत्रांसाठी तसेच आंतरराष्ट्रीय मासिक- शोधपत्रिकांसाठी लिहिलं.

शशी थरुर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शशी थरुर

काँग्रेसच्या विचारसरणीशी साधर्म्य असल्याने त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सोनिया गांधींनी त्यांना तिरुवनंपुरम इथून तिकीट दिलं.

त्यांना परराष्ट्र मंत्रालयात राज्यमंत्रिपद देण्यात आलं. पण आयपीएलच्या कोची संघाला पाठिंबा देण्यात हितसंबंध गुंतले असल्याचं सांगण्यात आलं. त्या टीममध्ये सुनंदा पुष्कर यांचेही समभाग होते.

काही काळानंतर थरुर आणि सुनंदा पुष्कर यांचं लग्न झालं. त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदी यांनी थरुर यांच्यावर 50 कोटीची गर्लफ्रेंड अशी टीका केली होती.

थरुर यांनी मोदी यांना जोरदार प्रत्युत्तर देताना म्हटले होते, 'माझी बायको मूल्यवान आहे. कोणाच्याही 50 कोटींच्या कल्पनेपेक्षाही जास्त. पण हे समजण्यासाठी तुम्हाला कोणावर तरी प्रेम करण्यास सक्षम व्हावं लागेल.'

शशी थरुर, काँग्रेस,

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शशी थरुर

प्रदीर्घ काळानंतर थरुर यांनी मनुष्यबळ मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून पुनरागमन केलं. युट्यूबवर थरुर यांनी केलेलं एक भाषण आजही वारंवार पाहिलं जातं. ब्रिटनने भारताला नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी ते करत होते.

1700 मध्ये जीडीपीचा दर 27 टक्के होता. ब्रिटिशांनी भारताची लूट करून, शोषण करून सगळी संपत्ती लुटली. भारताला आत्यंतिक गरीब देश केलं आणि मग सोडून गेले असं थरुर म्हणाले.

या भाषणाचं सोशल मीडियावर कौतुक झालं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या भाषणाचं कौतुक केलं होतं. मात्र याच्या एक दिवस आधी सोनिया गांधी यांनी घोटाळ्यासंदर्भात संसदेचं कामकाज ठप्प झाल्याने सार्वजनिक पातळीवर त्यांच्यावर टीका केली होती.

सुनंदा पुष्कर

फोटो स्रोत, PRAKASH SINGH

थरुर यांनी स्वच्छ भारत अभियानाला पाठिंबा दिला होता. काँग्रेसने यावर नाराजी व्यक्त केली होती.

पत्नी सुनंदा पुष्कर यांचा संदिग्ध मृत्यू झाल्यानंतर थरुर पुन्हा चर्चेत आले. सुनंदा यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. पण न्यायालयाने त्यांची सुटका केली.

तरुणांमध्ये प्रसिद्ध

वादविवादांमध्ये अडकूनही थरुर नेहमी तरुणांमध्ये चर्चेत असतात. शहरांमध्ये राहणाऱ्या युवा पिढीला ते भावतात. फर्डं इंग्रजी बोलतात. जेव्हा जेव्हा त्यांचं व्याख्यान असतं तेव्हा तरुणांची सर्वाधिक गर्दी असते.

शबरीमला मंदिरासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय त्यांना पटला नाही. अनेकांसाठी थरुरांची ही भूमिका हैराण करणारी होती.

शशी थरुर, काँग्रेस,

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शशी थरुर

मासिक पाळी आलेली असताना मुली तसंच महिलांना शबरीमला मंदिरात प्रवेश करण्यास न्यायालयाने मान्यता दिली होती. त्यांच्या पक्षाने 50 पेक्षा कमी वयाच्या महिलांना मंदिरात जाऊ न देण्याच्या परंपरेचं समर्थन केलं होतं.

स्वत:ला हिंदू मानणाऱ्या थरुर यांना चर्चचंही समर्थन आहे. त्यांच्या मतदारसंघातील महिलांना त्यांना पाठिंबा दिला होता.

राधाकृष्णन सांगतात, "ते लोकांना सहजपणे भेटतात. मध्यमवर्गाला ते आवडतात. ते वर्तमानकाळात जगणारे नेते आहेत. त्यांनी मतदारसंघासाठी काही विशेष केलं नाही याचं मला वाईट वाटतं.

पण आता निवडणुका झाल्या तर ते निवडून येतील कारण त्यांचं संवादकौशल्य वादातीत आहे. उत्तर प्रदेश आणि उत्तरेकडच्या राज्यांमध्ये त्यांचा प्रभाव कमी आहे".

थरुर यांना काय हवंय?

राधिका रामशेषन सांगतात, "देशभरात त्यांचे चाहते आहेत. ते हिंदीतूनही बोलतात जेणेकरून हिंदीबहुल क्षेत्रातील लोक त्यांना मतदान करतील पण तसं होण्याची शक्यता कमी आहे. काँग्रेसने के.कामराज, एस.निजलिंगप्पा, पी.व्ही. नरसिंह राव हे सगळे दक्षिण भारतातले नेते होते पण त्यांच्यापैकी कुणालाही काँग्रेस अध्यक्ष केलं नाही."

शशी थरुर, काँग्रेस,

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शशी थरुर

गेहलोत जेव्हा जेव्हा उमेदवारीसाठी उभे आहेत, तेव्हा गांधी कुटुंबाशी निष्ठा असलेले पीसीसी प्रमुख थरुर यांना पाठिंबा देण्याची शक्यता कमी आहे.

दिल्लीस्थित काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितलं की थरुर यांच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढण्याचा कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही.

त्यांच्या मते, "थरुर गांधी कुटुंबाला आव्हान देत नाहीयेत. ते अध्यक्षपदासाठी उभे राहिल्याने असा संदेश जातोय की पक्षातलं कुणीही उमेदवारी मांडू शकतो. हा मोठा संदेश बाहेर जातो आहे. G23 मधले जेवढे उमेदवार असतील तेवढा हा संदेश प्रखरणपणे बाहेर जाईल.

थरुर यांना फार मतं मिळणार नाहीत. ते समजूतदार आहेत आणि हे त्यांनाही माहिती आहेत. अध्यक्षपदाची निवडणूक लढणाऱ्या महत्त्वाच्या नेत्यांमध्ये त्यांचं नाव आहे असा याचा अर्थ घ्यायचा".

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)