क्युरेटिंग किंवा गर्भपिशवी साफ करणे म्हणजे काय? ते केव्हा करावं लागतं?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठी
'क्युरेटिंग' म्हणजे बोली भाषेत गर्भपिशवी साफ करणे. वैद्यकीय भाषेत याला 'डायलेशन अॅंड क्युरेटाज' (Dilatation and Curettage) असं म्हणतात.
स्त्रीरोगतज्ज्ञांच्या माहितीनुसार, 'क्टुरेटिंग' एक छोटी शस्त्रक्रिया आहे असून वयाची पस्तिशी (35) ओलांडलेल्या महिलांना सामान्यत: क्युरेटिंग करण्याची आवश्यकता भासते.
स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. डिंपल चुडघर सांगतात, "क्टुरेटिंग अनेक महिलांसाठी जीव वाचवणारी शस्त्रक्रिया आहे. अतिरक्तस्राव होत असेल आणि योग्य उपचार झाले नाहीत कॅन्सर होण्याची शक्यता असते."
क्युरेटिंग म्हणजे काय? ते केव्हा करावं लागतं? याबाबत स्त्रीरोग तज्ज्ञांकडून आपण जाणून घेऊया.
क्युरेटिंग म्हणजे काय? ही शस्त्रक्रिया कशी केली जाते?
महिलांना अनेक कारणांमुळे गर्भपिशवी (Uterus) साफ करावी लागते. गर्भपिशवी साफ करण्याच्या शस्त्रक्रियेला क्युरेटिंग म्हणतात. गर्भाशयाचं तोंड (Cervix) उघडून गर्भपिशवी साफ केली जाते.
मुंबईतील सर जे.जे. रुग्णालयाच्या स्त्रीरोगविभागाचे प्रमुख डॉ. अशोक आनंद सांगतात, "गर्भपिशवीच्या आतील आवरण काढण्यासाठी करण्यात येणारी शस्त्रक्रिया म्हणजे क्टुरेटिंग."
या शस्त्रक्रियेत गर्भाशयाच्या आतल्या बाजूला असणाऱ्या पेशी काढण्यात येतात.
क्युरेटिंग करताना गर्भाशयाचं तोंड उघडण्यासाठी डॉक्टरांकडून विशिष्ट उपकरणांचा वापर केला जातो. त्यानंतर 'क्युरेट' (एक प्रकारचं उपकरण) गर्भाशयाच्या आत घातलं जातं. "क्युरेट गर्भाशयाच्या आत घालून गर्भाशय खरवडून काढण्यात येतं," डॉ. अशोक आनंद पुढे सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
क्युरेटिंग ही छोटी शस्त्रक्रिया आहे. त्यामुळे महिलांना जास्तवेळ रुग्णालयात रहावं लागत नाही. मुंबईतील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. डिंपल चुडगर सांगतात, "काही महिला दुपारच्या ब्रेकमध्ये ही शस्त्रक्रिया करून घेतात. ही अत्यंत सुरक्षित शस्त्रक्रिया आहे."
ही शस्त्रक्रिया करताना संपूर्ण भूल दिली जाते किंवा स्थानिक भूल देऊन क्युरेटिंग शस्त्रक्रिया करण्यात येते.
क्युरेटिंग केव्हा केलं जातं?
मुंबईतील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. डिंपल चुडगर क्युरेटिंगची का करावं लागतं याची कारणं सांगतात.
- महिलेला गर्भ राहिला पण त्याची वाढ होत नसेल आणि मूल आतमध्येच राहिलं तर धोका असतो त्यावेळी क्युरेटिंग केलं जातं
- मूल होत नसेल तर गर्भपिशवी साफ करून तपासणी केली जाते
- गर्भपातानंतर गर्भाचा तुकडा गर्भाशयात राहिला असेल तर गर्भपिशवी साफ करणे गरजेचं
- एखादी महिला गर्भवती राहिली पण तिला मूल नको असेल तर पिशवी साफ केली जाते
- योगीमार्गातून होणारा अतिरक्तस्राव थांबत नसेल तर आपात्कालीन उपचारांची गरज असते. अशावेळी क्युरेटिंगने गर्भाशयातील चामडी काढून तपासली जाते.
स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अशोक आनंद पुढे म्हणाले, "गर्भाशयाच्या कॅन्सरचा संशय असेल तर गर्भपिशवीचा नमुना घेण्यासाठी क्युरेटिंग केलं जातं."
क्युरेटिंग निदान आणि उपचारासाठी करण्यात येणारी शस्त्रक्रिया आहे. गर्भवती नसलेल्या महिलांमध्ये गर्भाशयातील पडद्याची वाढ झाल्यामुळे अतिरक्तस्राव होतो. अशावेळी पडदा खरवडून काढल्यानंतर रक्तस्राव होत नाही.

फोटो स्रोत, Getty Images
डॉ. डिंपल चुडगर पुढे सांगतात, "क्टुरेटिंग अनेक महिलांसाठी एक जीव वाचवणारी शस्त्रक्रिया आहे. एखाद्या महिलेला अतिरक्तस्राव होत असेल आणि योग्य उपचार झाले नाहीत तर तिला कॅन्सर होण्याची शक्यता असते."
काही महिलांना पाळी सामान्यापेक्षा जास्त दिवस रहाते. पाळी लवकर किंवा उशीरा येते अशा महिलांना नक्की काय आजार आहे हे जाणून घेण्यासाठी क्युरेटिंग करावं लागतं.
फोर्टिस रुग्णालयाच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुष्मा तोमर सांगतात, "गर्भपिशवी साफ करणं आजाराचं निदान करण्यासाठी आणि रक्तस्राव जास्त होत असेल तर उपचार म्हणून केलं जातं."
तर, काही महिलांमध्ये रजोनिवृत्तिनंतर (Menopause) रक्तस्राव सुरू होतो. त्यामुळे रक्तस्रावाचं योग्य निदान करण्यासाठी क्युरेटिंग केलं जातं.
क्युरेटिंग शस्त्रक्रियेत धोका आहे का?
क्युरेटिंग ही सामान्यत: केली जाणारी आणि सुरक्षित शस्त्रक्रिया आहे. पण ही शस्त्रक्रिया करताना काही धोके नक्कीच आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
डॉ. डिंपल चुडगर या संभाव्य धोक्यांबाबत माहिती देतात.
- गर्भपिशवी साफ केल्यांनंतर जंतुसंसर्गाची शक्यता असते
- अतिरक्तस्राव होऊ शकतो
- गर्भपिशवीत छोटे-छोटे पडदे तयार होताात. ज्यामुळे महिला गर्भवती राहू शकत नाही. पण हा त्रास एखाद्याच महिलेमध्ये दिसून येतो
डॉ. अशोक आनंद सांगतात, "अयोग्य पद्धतीने शस्त्रक्रिया केली. गर्भपिशवी पाठी किंवा पुढे असेल तर, पिशवीचं तोंड उडत नाही. अशीवेळी गर्भाशयाला भोक पडण्याची शक्यता असते."
कोणाला ही शस्त्रक्रिया करावी लागते?
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, क्युरेटिंगची गरज साधारणत: पस्तिशी ओलांडलेल्या महिलांना जास्त असते. त्याआधी क्युरेटिंगची गरज पडत नाही.
डॉ. अशोक आनंद पुढे सांगतात, "क्युरेटिंग करण्याआधी आम्ही हिस्टरोस्कोपी करतो. यात एक नळी गर्भपिशवीत घालून तपासणी केली जाते. त्यानंतर गरज असल्यास गर्भपिशवी साफ करण्यात येते."
तज्ज्ञ सांगतात, की बऱ्याचवेळा गर्भपिशवी साफ केल्यानंतर महिला गर्भवती रहाते. हा क्युरेटिंगचा फायदा आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








