या महिला मासिक पाळीच्या तारखांचा तक्ता घराच्या दारावर का लावत आहे?

फोटो स्रोत, SHAHBAZ ANWAR/BBC
- Author, शहबाज अनवर
- Role, बीबीसी हिंदीसाठी
मेरठ, हाशिमपुरा इथे राहणारी अलफिशाने घराच्या दरवाज्यावर स्वत:च्या मासिक पाळीचं वेळापत्रक लिहिलं आहे. तिच्या घरी बाबा आणि भाऊही आहेत. येता जाता त्यांची नजर या चार्टवर जाते. पण त्यांना आता हा चार्ट सरावाचा झाला आहे. ते याकडे बघतात आणि त्यांचं काम सुरू राहतं.
अलफिशाने बीबीसीशी बोलताना सांगितलं, "महिलांना मासिक पाळीदरम्यान अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यांची चिडचिड होते. त्यांना अशक्तपणा जाणवतो. आरोग्याच्या अन्य समस्याही जाणवतात. पण मी जेव्हापासून घरात मासिक पाळीचा हा तक्ता लावला तेव्हापासून घरच्यांना माझी मासिक पाळी केव्हा आहे याची माहिती असते. मी स्वत:सुद्धा आता काळजी घेऊ लागली आहे. मलाही लक्षात राहतं की मासिक पाळी केव्हा येणार आहे".
असाच एक तक्ता मेरठमधल्या आलिमाने घरातल्या एका दरवाज्यावर लावला आहे. आलिमाच्या घरी भाऊबहीण आणि वडील यांच्यासह एकूण सातजण राहतात. पण आता घरच्यांना तिच्या मासिक पाळीविषयी ठाऊक असतं.
आलिमा सांगतात, "मी शिक्षिका आहे. नोकरीच्या निमित्ताने मी घराबाहेर असते. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने घराबाहेर असणाऱ्या महिलेला मासिक पाळीदरम्यान कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं याची मला कल्पना आहे. तक्ता लावल्यानंतर कमीत कमी माझ्या घरच्यांना मासिक पाळीच्या तारखेबद्दल ठाऊक असतं. या काळात ते माझी काळजी घेतात. हा अनुभव माझ्यासाठी सुखद आहे".
तक्त्यामुळे बदल घडून येतोय का?
मेरठमध्ये वेगवेगळ्या ठिकाणच्या मिळून 65 ते 70 घरांमध्ये मासिक पाळीचा तक्ते लागले आहेत. पण हे अचानक कसं शक्य झालं, लग्न झालेल्या आणि लग्न न झालेल्या महिला, मुली घरात मासिक पाळीबद्दल खुलेपणाने कशा बोलू शकल्या? याचं उत्तर 'सेल्फी विद डॉटर' या स्वयंसेवी संस्थेचे संचालक सुनील जागलान यांनी दिलं.
ते सांगतात, "2017 मध्ये आमच्या संस्थेची स्थापना झाली. महिलांच्या हितासाठी आम्ही अनेक गोष्टी हाती घेतल्या. 2020 पासून मासिक पाळीच्या तक्त्यासंदर्भात आम्ही हिमाचल प्रदेश, राजस्थान आणि हरियाणात सक्रिय आहोत.

फोटो स्रोत, SHAHBAZ ANWAR
महिलांचं आरोग्य, अधिकार, आर्थिक स्वातंत्र्य या मुद्यांवर आम्ही काम करत आहोत. मासिक पाळीदरम्यान महिलांना ज्या त्रासाला सामोरं जावं लागतं त्याविषयी मी विचार केला. घरातल्या अनेक महिलांना या त्रासाला सामोरं जाताना पाहिलं. या प्रश्नावर काय करता येईल असा विचार सुरू केला. काहीतरी वेगळं करावं लागेल असं डोक्यात आलं. काही डॉक्टर, सहकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर मासिक पाळीचा तक्ता घरात लावण्याचं सुचलं."
250 पैकी 180 तक्ते फाडून टाकले
मेरठमधल्या घरांमध्ये मासिक पाळीचा तक्ता लावण्याचा उपक्रम 2021 मध्ये सुरू करण्यात आला. शहराच्या वेगवेगळ्या भागात याची पोस्टर्स लावण्यात आली. शाळा-महाविद्यालयांमध्ये याबाबत जनजागृती करण्यात आली. मुलींना या उपक्रमाबद्दल सविस्तरपणे सांगण्यात आलं.
सुनील जागलाना सांगतात, "डिसेंबर 2021मध्ये मेरठमध्ये आम्ही ही मोहीम सुरू केली. आमच्या टीममध्ये अनेक राज्यांमध्ये काम केलेल्या 30-35 महिला होत्या. आम्ही मुलींच्या शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थिंनीशी संपर्क केला. लाडो पंचायतमधील काही मुलींना बोलावलं. घरोघरी गेलो. त्यांचे मोबाईल नंबर घेतले. व्हॉट्सअप ग्रुपही तयार केले. याकामी अनेक पुरुषांनीही मदत केली".

फोटो स्रोत, SHAHBAZ ANWAR/BBC
"सुरुवातीला आम्ही अडीचशे तक्ते मुलींना, महिलांना मिळून वाटले. नंतर आमच्या सदस्यांनी मिळून आढावा घेतला तेव्हा 65 ते 70 घरांमध्येच हे तक्ते शिल्लक राहिले होते. बहुतांश घरांमध्ये हे तक्ते फाडून टाकण्यात आले होते. काही घरांमध्ये मुलींना पुन्हा हे तक्ते लावायला परवानगी मिळाली नाही. पण काही घरांमध्ये तरी सदस्यांनी घरातल्या महिलेच्या मासिक पाळीची तारीख जाणून घेतली. त्या महिलांना मासिक पाळीदरम्यान मदत मिळत असावी अशी आम्हाला आशा आहे. जागरुकता वाढल्यावर ही संख्या वाढेल असा आम्हाला विश्वास आहे", असं त्यांनी सांगितलं.
मासिक पाळीच्या तक्त्यांना विरोध करणारे आणि पाठिंबा देणारे समाजाच्या सर्व वर्गातले आहेत.
मासिक पाळीच्या तक्त्यांनी महिलांची तब्येत सुधारेल?
मासिक पाळीच्या तक्त्यांचा एक उद्देश महिलांच्या आरोग्याबाबत जागरुकता वाढवणे हाही आहे. संचालक सुनील जागलान यासंदर्भात सांगतात, "मासिक पाळीदरम्यान महिलांना त्रासाला सामोरं जावं लागतं. या कालावधीत घरच्या सदस्यांनी थोडी मदत करावी असं त्यांना वाटतं. त्यांच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देणं आवश्यक असतं. काही महिलांची मासिक पाळी अनियमित असते त्यासंदर्भातही घरच्यांना कल्पना मिळते".

फोटो स्रोत, SHAHBAZ ANWAR/BBC
तक्ता लावणाऱ्या महिलांकडून वर्षभर ही माहिती दिली जाईल. मासिक पाळीच्या तारखांमध्ये अनियमितता आढळली तर त्याची यादी सरकारला दिली जाईल. आशा आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांकडून महिलांना मदत मिळू शकेल.
अनेक ठिकाणी विरोध, आक्षेपार्ह टिप्पण्या
मासिक पाळीची माहिती देणाऱ्या कोष्टकासंदर्भात स्वयंसेवी संस्थेकडून जनजागृती करण्यात आली. ऑनलाईन लाडो पंचायत घेण्यात आली. राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा या राज्यांमध्ये प्रत्यक्ष भरलेल्या पंचायत सभा घेण्यात आल्या.
अनेक ठिकाणी विरोध झाला. लोकांनी महिलांवर आक्षेपार्ह शेरेबाजी केली, याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. यासंदर्भात सर्व धर्माच्या धर्मगुरूंची मदत घेण्यात आली. अनेकांनी सर्वतोपरी सहकार्य केलं.
सुरुवातीला धीर झाला नाही पण आता सरावले
घरातल्या लोकांसमोर मासिक पाळीचं कोष्टक लावताना अनेकींना अवघडल्यासारखं झालं. मेरठच्या आलिया यांनी बीबीसीशी बोलताना त्यांचा अनुभव सांगितला.
"मी एक गृहिणी आहे. घरात नवऱ्याव्यतिरिक्त दीर, सासरे तसंच अन्य पुरुष नातेवाईकांचं येणंजाणं असतं. अशा परिस्थितीत मासिक पाळीच्या कोष्टकाविषयी कळलं तेव्हा हे कसं शक्य आहे याविषयी साशंकता होती. नवऱ्याशी याबाबत बोलले. त्यांनी धीर दिला. मग मी याबाबत सासूशी बोलले आणि त्यांनीही पाठिंबा दिला.
मासिक पाळीचा तक्ता लावल्यानंतर घरातल्या लोकांचा दृष्टिकोन बदलला का असं विचारल्यावर आलिया यांनी सांगितलं, हो. मासिक पाळीची तारीख असते त्या काळात घरातले माझी काळजी घेऊ लागले. आधी असं नव्हतं," असं त्यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, SHAHBAZ ANWAR/BBC
मनीषा नावाच्या महिलेने सांगितलं की, "हे आमच्या आरोग्याशी निगडीत आहे. मासिक पाळीदरम्यान महिलेला कशाला सामोरं जावं लागतं याची माहिती घरातल्या मंडळींना असायला हवी. या काळात उदभवणाऱ्या आजारपणामुळे महिलेचं भांडण होतं. मासिक पाळीदरम्यान महिलांची चिडचिड होऊ शकते हे कळलं तर त्याविषयी जनजागृती होईल. लोक त्याकडे दुर्लक्ष करतील."
मी बायकोला सांगितलं, तू लाव तक्ता
मेरठमधल्या हाशिमपुरा इथे राहणारे जुबैर अहमद यांनी मासिक पाळीचा तक्ता लावायला पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. ते केशकर्तनालय चालवतात. ते सांगतात, "मासिक पाळीदरम्यान महिलांवर दडपण टाकायला नको. लोक काय विचार करतात याचा महिलांनी विचार करू नये. कोणाला ना कोणाला सुरुवात करणं आवश्यक होतं.
मी माझ्या बायकोला सांगितलं की संकोच न करता मासिक पाळीचा तक्ता लाव. घरातल्या कोणत्याही दरवाज्यावर तू हा तक्ता लावू शकतेस. मी अनेक मित्रांनाही याबाबत सांगितलं आहे".
हिमाचल प्रदेशची रिश्दा आहे मासिक पाळीच्या तक्त्याची सदिच्छादूत
मासिक पाळीच्या तक्त्यासंदर्भात एक शॉर्ट फिल्म तयार करण्यात आली आहे. या माहितीपटासाठीचा खर्च संचालक सुनील जागलान यांनीच उचलला आहे. या माहितीपटात हिमाचल प्रदेशच्या रिश्दाने मुख्य भूमिका साकारली आहे.
रिश्दाने बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "एप्रिल 2021 मध्ये मासिक पाळीच्या तक्त्यासंदर्भात माहितीपटात काम करण्याचा प्रस्ताव आला. मी लगेच तयार झाले. मी पटकथा वाचली आणि या विषयाने एकदमच भारावून गेले. सुनील जागलान यांच्याबरोबर मी याविषयावर चर्चा केली. त्यांनी मोहिमेशी मला जोडलं. मला उपक्रमाची सदिच्छादूत केलं. मी अनेक राज्यांमध्ये या विषयाबाबत जनजागृती करते."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








