संतोष बांगर: उद्धव ठाकरेंचे 'हनुमान' ते एकनाथ शिंदेंचे निष्ठावान, असा आहे प्रवास

फोटो स्रोत, SANTOSH BANGAR/TWITTER
- Author, प्रतिनिधी
- Role, बीबीसी मराठी
शिंदे गटाचे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर अमरावती दौऱ्यावर असताना त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. यावेळी शिवसैनिकांकडून त्यांच्या गाडीचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला.
'50 खोके एकदम ओके' अशी घोषणाबाजीही शिवसैनिकांनी यावेळी दिली.
ऑगस्ट महिन्यात संतोष बांगर यांनी शिवसैनिकांना आव्हान दिलं होतं. "माझ्या गाडीला हात जरी लावून दाखवलं तरी संतोष बांगर राजीनामा देईल," असं ते म्हणाले होते.
बांगर यांच्या या आव्हानानंतर अमरावतीतील अंजनगाव सुर्जी याठिकाणी शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर हात मारले आणि गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला.
नेमकं काय झालं?
आमदार संतोष बांगर यांचा अमरावती जिल्ह्यात दौरा होता. रविवारी (25 सप्टेंबर) ते अंजनगाव सुर्जी येथे आले होते.
यावेळी शिवसैनिकांनी संतोष बांगर यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. गाडीत ड्रायव्हरच्या बाजूला पुढच्या सीटवर ते बसले होते. गाडीच्या काचा बंद होत्या.
काही शिवसैनिकांनी गाडीवर हाताने हल्ला केला. तसंच यावेळी '50 खोके एकदम ओके' अशा घोषणाही देण्यात आल्या.

फोटो स्रोत, ANI
या हल्ल्यानंतर माध्यमांशी बोलताना संतोष बांगर म्हणाले, "हा भ्याड हल्ला आहे. अजूनही मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. माझ्या गाडीला टच करून दाखवा. माझी पत्नी आणि बहीण माझ्यासोबत गाडीत होत्या. त्यांनी मला रोखलं नाहीतर मी त्यांना दाखवलं असतं, संतोष बांगर कोण आहे. मी एक घाव दोन तुकडे केल्याशिवाय राहणार नाही. मी तक्रार करणारा शिवसैनिक नाही."
दरम्यान, अमरावतीमध्ये पोलिसांनी या प्रकरणी 11 जणांना ताब्यात घेतलं आहे. तसंच गाडी अडवणाऱ्या जवळपास 15 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वादग्रस्त भूमिका
खरंतर ही पहिलीच वेळ नाही जेव्हा आमदार संतोष बांगर चर्चेत आले आहेत. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर प्रकाशझोतात आलेले संतोष बांगर यापूर्वी अनेकवेळा आपली वादग्रस्त विधानं आणि आपल्या भूमिकांमुळे चर्चेत राहीले आहेत.
शिंदे गटात सर्वांत शेवटी दाखल झालेले आमदार म्हणजे संतोष बांगर. पण त्यापूर्वी पक्षात बंड झाल्यानंतर आणि एकामोगामाग एक आमदार शिंदे गटात सामील होत असताना संतोष बांगर यांनी जाहीर कार्यक्रमात आपण उद्धव ठाकरे यांची साथ कधीही सोडणार नाही, अशी घोषणा केली होती.

फोटो स्रोत, SANTOSH BANGAR/TWITTER
एवढंच नाही तर यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते आणि उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ भाषण करताना ते भावूक झाले. पण यानंतर काही दिवसातच संतोष बांगर शिंदे गटात सामील झाले. यावरून त्यांच्यावर तीव्र टीका सुद्धा झाली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर सरकारच्या विश्वासमतासाठी विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं होतं. त्यावेळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संतोष बांगर उद्धव ठाकरे यांच्या बाजूने होते. परंतु दुसऱ्या दिवशी एका रात्रीत संतोष बांगर यांनी ठाकरेंची साथ सोडली आणि ते शिंदे गटात सामील झाले.
शिवसेनेकडून शिंदे गटातील आमदारांना गद्दार म्हटलं जातं. शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांनीही शिंदे गटावर गद्दार म्हणतच टीका केली आहे.
आपल्याला गद्दार म्हणून दाखवावं, असंही आव्हान संतोष बांगर यांनी दिलं होतं. "आपण शिवसैनिक आहोत. आम्हाला कोणी गद्दार म्हणत असेल तर माझ्या शिवसैनिकांनी त्यांच्या कानाखाली आवाज काढण्याचं काम करावं. आम्ही बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहोत," असं बांगर म्हणाले होते.
तसंच काही दिवसांपूर्वी हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी माध्यान्ह भोजन योजना राबवणाऱ्या संस्थेच्या केंद्रात जाऊन तिथल्या अन्नाची पाहणी केली. यावेळी अन्नाचा दर्जा खराब असल्याचं सांगत त्यांनी तिथल्या मॅनेजरला शिवीगाळ करत मारहाण केली. त्यांच्या या कृत्याबद्दल अनेकांनी त्यांच्यावर टीका केली.
संतोष बांगर कोण आहेत?
संतोष बांगर हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार आहेत. 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत ते निवडून आले.
वंचित बहुजन आघाडीच्या अजित मागेर यांचा 16 हजार 378 मतांनी पराभव केला होता.
2017 मध्ये त्यांची हिंगोली जिल्हा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून नेमणूक झाली होती.
42 वर्षीय संतोष बांगर यांचं शिक्षण सातवीपर्यंत झालेलं आहे.
त्यांच्याकडे एकूण 92,83,596 रुपयांची संपत्ती आहे.
त्यांच्यावर सरकारी कामात व्यत्यय आणणे, बेकायदेशीर कृत्य करणे, बदनामी करणे, दंगल घडवून आणणे आणि इतर गुन्हेगारी स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








