'शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकते, फक्त त्यासाठी...' शिवसेनेच्या माजी मंत्र्यांचं उद्धव ठाकरेंना आवाहन, #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, GETTY IMAGES/FACEBOOK
आज सकाळी विविध वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया,
1. 'शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकते, फक्त त्यासाठी...'
"उद्धव ठाकरे यांनी ठरवलं तर अजूनही शिवसेना पुन्हा एक होऊ शकते. मातोश्रीने फक्त संजय राऊतांसारख्यांना बाजुला केलं पाहिजे," असं विधान शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी केलं आहे. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिलीय.
"संजय राऊतांनी शिवसेनेची वाट लावली, मी अजून शिवसेनेतच आहे," असंही विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे.
शिवसेनेच्या बंडखोर नेत्यांपैकी फक्त शिवतारेच नाही तर अनेक आमदारांनी आतापर्यंत संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत हे शरीराने शिवसेनेत आणि मनाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असल्याची टीका बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी केली आहे.
माध्यमांशी बोलताना केसरकर म्हणाले की, "माझं असं मत आहे की, संजय राऊत हे शिवसेनेचे प्रवक्ते असले तरी ते शरीराने शिवसेनेत आणि मनाने राष्ट्रवादीत आहेत. त्यामुळे ते असं बोलतात. हे माझं मत आहे. ते खरं आहे की खोटं, हे मला माहीत नाही. ही काही टीका नाहीये, पण ज्याप्रमाणे ते वर्तन करत आहेत. त्यांनी पुढे जाऊन असं वर्तन करून नये."
2. ऑक्टोबरपासून महागाईत घसरणीची शक्यता - गव्हर्नर दास
चालू आर्थिक वर्षांच्या उत्तरार्धात, ऑक्टोबरपासून किमती स्थिरावू लागतील आणि महागाईसंबंधी स्थिती हळूहळू सुधारताना दिसेल, असा विश्वास रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी शनिवारी व्यक्त केला.

फोटो स्रोत, Getty Images
मजबूत आणि शाश्वत विकास साधण्यासाठी महागाईला रोखण्यासाठी उपाययोजना मध्यवर्ती बँकेकडून सुरूच राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.
देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर जनतेचा विश्वास आणि भरवशाच्या मोजमापाचे परिमाण म्हणून चलनवाढीकडे पाहायला हवे, असे दास यांनी कौटिल्य आर्थिक परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी प्रतिपादन केले.
पुरवठय़ाच्या आघाडीवर अनुकूल स्थिती दिसत असून, एप्रिल ते जून २०२२ या पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेची फेरउभारी दर्शविणारे ठळक निर्देशकांची आकडेवारी पाहता, आर्थिक वर्ष २०२२-२३च्या उत्तरार्धात महागाईत हळूहळू उतार दिसू शकेल, असे मध्यवर्ती बँकेचे अनुमान असल्याचे गव्हर्नरांनी सांगितले.
3. आता ईडीच्या कार्यालयाला कुलूप लावा - छगन भुजबळ
राज्यात जे काही कांड झालं त्यामागे ईडी असून अडीच वर्षे आता ईडीच्या कार्यालयाला कुलूप लावा, कारण आता तुमचं सरकार आलं आहे असा टोला छगन भुजबळांनी लगावला. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.

फोटो स्रोत, FACEBOOK
प्रताप सरनाईक आणि यामिनी जाधव म्हणाले असतील, आता दिल्लीला गेलो आणि सुटलो रे बाबा असंही भुजबळ म्हणाले.
नाशिकमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात छगन भुजबळ बोलत होते.
4. 'या' मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयावर ईडीची धाड; सापडलं पैशांचं घबाड; अधिकारी चक्रावले
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे निकटवर्तीय हेमंत सोरेन यांचे निकटवर्तीय पंकज मिश्रा यांच्याशी संबंधित मालमत्तांवर सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी छापे टाकले.
मिश्रा आणि त्यांच्याशी संबंधित काही जणांच्या मालमत्तांवर ईडीनं धाडी टाकल्या. एकूण 18 ठिकाणी छापे टाकण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. साहिबगंज जिल्ह्यातील बरहेट आणि राजमलमध्ये धाडी टाकण्यात आल्या.
ईडीनं 18 ठिकाणी छापे टाकत तब्बल 3 कोटी रुपयांची रोकड जप्त केली. ईडीनं हस्तगत केलेल्या नोटांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. खाण घोटाळा प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र टाईम्सनं ही बातमी दिलीय.
5. एमपीएससी:पूर्वपरीक्षेसाठी शुक्रवारपर्यंत अर्जसंधी
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे राज्य शासनाच्या विभागांतर्गत विविध संवर्गातील 800 पदांची भरती होणार आहे. त्यासाठी आयोगातर्फे महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब संयुक्त पूर्वपरीक्षा 2022 ही 8 ऑक्टोबर रोजी घेतली जाणार आहे.
राज्यातील 37 जिल्हा केंद्रांवर ही परीक्षा होणार असून या परीक्षेसाठी शुक्रवारपर्यंत (15 जुलै) अर्ज करता येईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करू इच्छिणाऱ्या तसेच इतर विद्यार्थ्यांनाही या परीक्षेसाठी अर्ज करण्याची संधी असेल.
दिव्य मराठीनं ही बातमी दिलीय.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








