एक राजकीय हत्या आणि शिवसेनेच्या पहिल्या आमदाराचा विजय

बाळासाहेब ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बाळासाहेब ठाकरे
    • Author, नामदेव काटकर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

एका हत्येमुळे 52 वर्षांपूर्वी शिवसेनेला पहिला आमदार मिळाला होता, हे वाचायला थोडं विचित्र वाटत असलं, तरी हे खरंय आणि शिवसेनेच्या याच पहिल्या आमदाराच्या निवडीची गोष्ट मी तुम्हाला या लेखातून सांगणार आहे.

1966 च्या जून महिन्यात शिवसेनेची स्थापना झाली. मराठी माणसांच्या हक्कांसाठी लढणारी मुंबईतील एक संघटना अशी आणि इतकीच सुरुवातीच्या काळात शिवसेनेची ओळख होती.

स्थापनेच्या दोनच वर्षात म्हणजे 1968 साली शिवसेनेनं मुंबईत आपलं वजन दाखवूनही दिलं. कारण 1968 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत प्रजा समाजवादी पक्षासोबत युती करून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या शिवसेनेनं पहिल्याच फटक्यात 42 नगरसेवक निवडून आणले.

मुंबई महापालिका निवडणुकीनंतर शिवसेनेची दखल राज्यस्तरावर घेतली गेली. मात्र, राज्याच्या सभागृहाचा म्हणजे विधानसभेचा उंबरठा अजूनही शिवसेनेनं ओलांडला नव्हता. पण त्यासही फार दिवस वाट पाहावी लागली नाही. कारण 1970 साली तो दिवस उजाडला.

1970 चा ऑक्टोबर महिना. शिवसेना पक्ष स्थापन होऊन चार वर्षे झाली होती. याच महिन्यात वामनराव महाडिक यांच्या रूपात महाराष्ट्राच्या विधानसभेत शिवसेनेच्या पहिल्या आमदारानं पाय ठेवला.

शिवसेनेनं पुढे सत्तेपर्यंत मजल मारली. पण त्याची सुरुवात एका आमदाराच्या विजयानं झाली होती.

मात्र, या पहिल्या आमदाराचा विजय सर्वसामान्य स्थितीत झाला नव्हता. कारण एका हत्येनंतर झालेल्या पोटनिवडणुकीतून शिवसेनेचा पहिला आमदार जिंकला होता आणि त्या हत्येचा आरोपही शिवसेनेवर करण्यात आला होता. त्यामुळे शिवसेनेच्या पहिल्या आमदाराच्या निवडीची गोष्ट सांगताना त्या हत्येची घटना समजून घेणं आवश्यक आहे.

कॉ. कृष्णा देसाईंची हत्या आणि बाळासाहेबांवर आरोप

6 जून 1970 रोजीची वर्तमानपत्रं मुंबईकरांच्या दारात पडली ते मुंबईला हादरवणारी बातमी घेऊन. खरंतर या दिवशी शालान्त परीक्षेच्या निकालाची बातमी वर्तमानपत्रांचा मथळा ठरणार होती, पण मथळा ठरला 'कॉम्रेड कृष्णा देसाईंची हत्या'.

रत्नागिरीतल्या संगमेश्वर तालुक्यातील फुणगूसमधील कृष्णा देसाई चाकरमानी म्हणून मुंबईत आले आणि डाव्या चळवळीत सक्रिय झाले. क्रांतिकारी कम्युनिस्ट पक्ष नावानं त्यांनी पक्षही काढला. पुढे 1967 साली ते विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडूनही आले. त्यापूर्वी सलग चारवेळा मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते.

बाळासाहेब ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बाळासाहेब ठाकरे

कॉ. कृष्णा देसाईंबद्दल प्रकाश अकोलकर 'जय महाराष्ट्र' या त्यांच्या पुस्तकात लिहितात की, कॉ. कृष्णा देसाई यांचं व्यक्तिमत्त्व आडदांड होतं आणि शैली आक्रमक दादागिरीची होती.

ते लालबाग परिसरात राहत आणि तिथल्याच ललित राईस मिलमध्ये ते बसत. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीही ते इथेच करत.

5 जूनच्या रात्रीही ते असेच बसले होते. कार्यकर्त्यांसोबत दुसऱ्या दिवशी सहलीला जाणार होते, त्याचं नियोजन तिथं सुरू होतं. तेवढ्यात तिथं काहीजण आले आणि कृष्णा देसाईंना बाहेर बोलावून नेलं.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

ललित राईस मिलच्या बाहेरील परिसरातील दिवे गेले होते. खरंतर घालवले गेले होते. प्रचंड काळोख पसरला होता. कृष्णा देसाई बोलावण्यासाठी आलेल्या लोकांसोबत बाहेर गेल्यानंतर त्या काळोखातच त्यांच्यावर गुप्तीने वार करण्यात आले.

6 जूनला वर्तमानपत्रांमधून कॉ. कृष्णा देसाईंच्या हत्येची बातमी कळताच मुंबई हादरली. गिरणगावात बंद पुकारण्यात आला. कॉ. देसाईंच्या अंत्ययात्रेला जवळपास 10 हजार जण जमले. तिथं या हत्येमागे शिवसेनेचा हात असल्याची चर्चा दबक्या आवाजात होत होती. या चर्चेला जाहीरपणे तोंड फोडलं ते लाल निशाण गटाचे कॉ. यशवंत चव्हाण यांनी.

कारण स्मशानभूमीजवळ झालेल्या शोकसभेत काही वक्त्यांनी भाषणं केली. तिथं कॉ. यशवंत चव्हाणांनी वसंतराव नाईक आणि बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतलं.

मग 'मराठा' दैनिकानं आठ कॉलमी बातमी छापली आणि मथळा दिला - 'कॉ. कृष्णाचे खरे खुनी बाळ ठाकरे आणि वसंतराव नाईक'

शिवसेना, कम्युनिस्ट, कृष्णा देसाई, वामनराव महाडिक

फोटो स्रोत, Mint

फोटो कॅप्शन, शिवसेना

या हत्येचा बाळासाहेब ठाकरेंनीही निषेध नोंदवला. हत्येत सहभागी असल्याचे ते कायम नाकारत आले.

मात्र, डाव्या चळवळीतले कायम त्यांच्यावर हत्येचा आरोप करत आले. शेकापचे उद्धवराव पाटील, दाजीबा देसाईंसारख्या नेत्यांनी चौकशीची मागणीही केली. पण बाळासाहेब ठाकरेंचा हात असल्याचं कधीच सिद्ध झालं नाही. मात्र, आरोप आणि संशय आजवर मिटले नाहीत.

ज्याच्या हत्येचा आरोप, त्याच्याच जागी पहिला आमदार...

कॉ. कृष्णा देसाई हे परळमधून आमदार होते. जूनमध्ये त्यांची हत्या झाली आणि त्याच वर्षी म्हणजे 18 ऑक्टोबर 1970 रोजी परळच्या जागी पोटनिवडणूक जाहीर झाली.

या पोटनिवडणुकीत डाव्या पक्षांनी कॉ. कृष्णा देसाईंच्या पत्नीलाच म्हणजे सरोजिनी देसाईंना उमेदवारी दिली. सरोजिनी देसाईंना समाजवादी आणि काँग्रेस (R) नंही पाठिंबा जाहीर केला. एकूण 13 पक्ष सरोजिनी देसाईंच्या बाजूनं उभे राहिले होते.

तर शिवसेनेकडून परळमधून नगरसेवक असलेले वामनराव महाडिक यांना उमेदवारी देण्यात आली. वामनराव महाडिक हे बाळासाहेब ठाकरेंचे विश्वासू म्हणून ओळखले जात.

वामनराव महाडिकांसाठी 20 सप्टेंबर 1970 रोजी परळच्या कामगार मैदानात बाळासाहेब ठाकरेंनी सभा घेतली आणि या सभेत डाव्यांवर जोरदार टीका केली. डावे पक्षाचे लोक हे राष्ट्रवादाचे विरोधक असल्याची टीका केली.

शिवसेना, कम्युनिस्ट, कृष्णा देसाई, वामनराव महाडिक

फोटो स्रोत, Getty Images

29 सप्टेंबर 1970 रोजी परळच्या नरे पार्कमध्ये सरोजिनी देसाईंच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत कॉ. श्रीपाद अमृत डांगे (कम्युनिस्ट पार्टी), बाबुराव सामंत (संयुक्त सोशालिस्ट पार्टी), सदानंद वर्दे (प्रजा समाजवादी पार्टी), टी. एस. कारखानीस (शेकाप) आणि दत्ता देशमुख (लाल निशाण) अश दिग्गजांची भाषणं झाली.

इंडिकेट काँग्रेस उघड पाठिंबा सरोजिनी देसाईंना दिला नसला, तर परळमध्ये मोहन धारियांनी सभा घेतली होती. त्यांची भूमिका होती की, कुणीही जिंकला तरी चालेल, पण शिवसेनेचा उमेदवार जिंकता कामा नये.

कम्युनिस्ट नेते ए. बी. बर्धन यांनीही देसाईंच्या बाजूनं प्रचार केला होता.

दुसरीकडे, शिवसेनेच्या उमेदवारासाठी म्हणजे वामनराव महाडिकांसाठी एकूण 28 प्रचारसभा झाल्या. त्यातील 15 सभांमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे उपस्थित होते आणि त्यांनी भाषणं केली.

डावी चळवळ असो वा शिवसेना असो, दोघांसाठीही ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. कारण दोन्हींसाठी या निवडणुकीतला विजय-पराजय भविष्यातील वाटचाल ठरवणार होता.

निवडणूक अशीच अटीतटीची झाली. डाव्यांना विजयाची खात्री असताना निकालानं पुन्हा एकदा मुंबईसह महाराष्ट्राला हादरा दिला. कारण कॉ. कृष्णा देसाईंच्या पत्नी सरोजिनी देसाई या पराभूत झाल्या.

20 ऑक्टोबर 1970 रोजी संध्याकाळी जाहीर झालेल्या निकालात सरोजिनी देसाईंना 29 हजार 913 मतं, तर शिवसेनेच्या वामराव महाडिकांना 31 हजार 592 मतं मिळाली. 1679 मतांच्या फरकरानं वामराव महाडिक विजयी झाले.

परळ पोटनिवडणुकीनं केवळ डाव्यांना हादरा दिला नाही, तर महाराष्ट्राच्या विधानसभेत वामनराव महाडिकांच्या रुपात शिवसेनेच्या पहिल्या आमदाराची एन्ट्री झाली.

पहिल्या आमदराच्या विजयाची सभा शिवाजी पार्कात

वामनराव महाडिकांच्या विजयानंतर दुसऱ्याच दिवशी बाळासाहेब ठाकरेंनी दादरच्या शिवाजी पार्कात सभा घेतली होती.

या सभेत शिवसैनिकांनी डाव्यांविरोधात घोषणाबाजी केली. 'जला दो, जला दो, लाल बावटा जला दो' आणि या घोषणेला उत्तर दिलं जाई 'जल गया, जल गया, लाल बावटा जल गया'.

बाळासाहेब ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बाळासाहेब ठाकरे

परळ पोटनिवडणुकीला बाळासाहेबांनी या सभेत 'धर्मयुद्ध' असं नाव दिलं.

"देशाशी गद्दारी करणाऱ्या सगळ्यांना शिवसेना नेस्तनाबूत करेल. कम्युनिस्टांविरोधात आम्ही ठोकशाहीची पद्धत वापरू. कारण त्यांना लोकशाहीची भाषा कळत नाही. जनसंघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि स्वतंत्र पार्टीचे आभार की त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला," असं शिवाजी पार्कातील या सभेत बाळासाहेब म्हणाले होते.

वामनराव महाडिक कोण होते?

डाव्यांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडून शिवसेनेचा पहिला आमदार म्हणून विधानसभेत एन्ट्री करणारे वामनराव महाडिक नेमके कोण होते? तर त्यांचाही प्रवास इतर सर्वसामान्य शिवसैनिकांसारखाच होता. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला नेता.

मुंबई महापालिकेत क्लार्क म्हणून काम करणाऱ्या वामनराव महाडिकांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रभाव होता. मात्र, परळमधील बाळासाहेब ठाकरेंच्या एका सभेनंतर ते शिवसेनेत काम करू लागले.

वामनराव महाडिक

फोटो स्रोत, Loksabha Website

फोटो कॅप्शन, वामनराव महाडिक

15 जुलै 1925 रोजी सिंधुदुर्गातल्या कणकवलीतील तळेरे गावात जन्मलेले वामनराव महाडिक शिक्षणासाठी मुंबईत आले. पुढे मुंबई महापालिकेत काम करत असताना कामगार संघटनांमध्ये काम करू लागले. नंतर शिवसेनेत प्रवेशानंतर राजकारणात सक्रीय झाले.

मुंबई महापालिकेत 16 वर्षे ते नगरसेवक होते. 1978 साली ते मुंबईचे महापौर झाले.

परळ पोटनिवडणुकीत आमदार म्हणून विधानसभेत गेल्यानंतर पुढे 1980-86 या काळात ते विधानपरिषदेत आमदार म्हणून गेले होते.

नवव्या लोकसभेत म्हणजे 1989 साली दक्षिण-मध्य मुंबईतून खासदार म्हणूनही वामनराव महाडिकांनी प्रवेश केला होता. त्यांनी केंद्राच्या अनेक समित्यांवर काम केलं. 1991 साली त्यांनी राजापूरमधून लोकसभा निवडणूक लढवली. मात्र ते पराभूत झाले. नंतर ते राजकारणातून काहीसे दूर होत गेले. मात्र, शेवटपर्यंत शिवसेनेच्या सोबत राहिले.

12 ऑक्टोबर 1999 रोजी वामनराव महाडिकांचं मुंबईत निधन झालं.

संदर्भ :-

  • जय महाराष्ट्र - प्रकाश अकोलकर (मनोविकास प्रकाश)
  • बाल ठाकरे अँड राईज ऑफ द शिवसेना - वैभव पुरंदरे (हार्पर कोलिन्स)
  • सम्राट : हाऊ द शिवसेना शिवसेना चेंज्ड मुंबई फॉरेव्हर - सुजाता आनंदन (रोली बुक्स)
  • लोकसभा संकेतस्थळ

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)