सुरेश प्रभू : बाळासाहेब ठाकरेंनी मंत्री केलं आणि 'अनफिट' ठरवून काढलंही, कारण...

फोटो स्रोत, Getty Images
- Author, नामदेव काटकर
- Role, बीबीसी मराठी
भारतीय राजकारणात निवृत्तीची घटना ही फार दुर्मिळ बनलीय. शेवटपर्यंत मिळेल ते पद पदरात पाडून घेण्याची संधी शोधणारे खोऱ्याने असताना माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या राजकारणातून निवृत्तीची घटना काही महिन्यांपूर्वी बातमीचा विषय ठरली होती.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना सोडणाऱ्यांचीही चर्चा होते. सुरेश प्रभू हे त्यातील एक.
हेच निमित्त साधत सुरेश प्रभू यांच्या सार्वजनिक आयुष्यातील काही प्रसंगांचा आढावा.
बाळासाहेब 'एलिस इन वंडरलँड' म्हणाले ती घटना
20 ऑगस्ट 2002 रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सांगण्यावरून सुरेश प्रभू यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिला. ते ऊर्जामंत्री होते.
सुरेश प्रभू 'मिस्टर क्लिन' म्हणून तेव्हाही ओळखले जात. पक्ष चालवायला पैसे लागतात आणि सुरेश प्रभूंकडून ते शक्य नसल्याचे बाळासाहेब जाहीर बोलून दाखवत असत. पक्षनिधीसाठी कुठेही मंत्रिपदाचा वापर करण्यास सुरेश प्रभूंनी नकार दिल्याचा संताप बाळासाहेबांना होता, असं ज्येष्ठ पत्रकार सुजाता आनंदन सांगतात.
या राजीनाम्याच्या काही दिवस आधीच इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत बाळासाहेब ठाकरेंनी सुरेश प्रभूंना 'एलिस इन वंडरलँड' म्हटलं होतं.
एलिस इन वंडरलँड परीकथा आहे. एलिस नामक मुलगी अशा ठिकाणी जाते, जिथं सर्व अद्भूत असतं, ती तिथं गोंधळून जाते.
या परीकथेची उपमा देऊन बाळासाहेबांना सूचवायचं होतं की, प्रभू मंत्रिपदावर योग्य नाहीत.
बाळासाहेबांची मुलाखत आणि सुरेश प्रभूंचा राजीनामा हा आठवड्याच्या अंतरानं घडलेल्या घटनांनंतर 23 ऑगस्ट 2002 रोजी ज्येष्ठ पत्रकार सुचेता दलाल यांनी प्रभूंच्या राजीनाम्यावर लेख लिहिला होता आणि त्याचा मथळा होता - 'एंड ऑफ द फेरी टेल'.
बाळासाहेबांनी सुरेश प्रभूंचं वर्णन करण्यासाठी केलेला 'एलिस इन वंडरलँड' या परीकथेचा मथळा आणि बाळासाहेबांच्या नाराजीनंतर प्रभूंना तेव्हा द्यावा लागलेल्या राजीनाम्यानंतर सुचेता दलाल यांनी 'एंड ऑफ द फेरी टेल' म्हणत 'परीकथेचा शेवट' म्हणणं, या दोन्ही गोष्टी सुरेश प्रभू यांच्या 'आदर्श राजकारणा'चं, मात्र त्याचवेळी भारतातील राजकारणात ते किती 'अनफिट' होते, याचं वर्णन करणाऱ्या आहेत.
या घटनेनंतर बरोबर 20 वर्षांनी म्हणजे 2 फेब्रुवारी 2022 रोजी सुरेश प्रभूंनी राजकारणातून निवृत्तीची घटना घडली, त्यावेळीही एका चांगल्या राजकारण्याला आपण बाहेरचा रस्ता दाखवल्याची भावना उमटली. 2002 च्या प्रसंगांचीही अनेकांनी आठवण काढली.
11 जुलै 1953 रोजी जन्मलेल्या सुरेश प्रभूंचं राजकीय आयुष्य अवघं 26 वर्षांचं आहे.
या 26 वर्षांत चारवेळा लोकसभेत आणि दोनवेळा राज्यसभेत, तसंच रेल्वे मंत्रालय, वाणिज्य मंत्रालय, ऊर्जा मंत्रालय, अर्थ मंत्रालय अशा पहिल्या पाच-सहात मानल्या जाणाऱ्या मंत्रिपदं त्यांच्या पदरात पडली.
भारतावर दूरगामी वाटचालीत महत्त्वाच्या ठरणाऱ्या नदीजोड प्रकल्प असेल, उडाण प्रकल्प असेल किंवा इलेक्ट्रिसिटी बिल असेल, अशा महत्वाच्या गोष्टी त्यांच्या कारकीर्दीत घडल्या.
पण या राजकीय क्षेत्राच्या पलिकडेही सुरेश प्रभू यांचं काम आहे. त्यांचाही यातून आढावा घेणार आहोत. राजकारणाव्यतिरिक्त क्षेत्रात मात्र ते कधीच 'एलिस इन वंडरलँड' ठरले नाहीत.
सीएच्या परीक्षेत देशभरात अव्वल
प्रभूंचा जन्म मुंबईतलाच. शिक्षणही मुंबईतलंच. दादरची प्रसिद्ध शारदाश्रम विद्यामंदिर ही त्यांची प्राथमिक आणि माध्यमिक शाळा. त्यानंतर त्यांनी विलेपार्ल्यातील म. ल. डहाणूकर महाविद्यालयातून बी. कॉम (ऑनर्स) ची पदवी घेतली.
त्यानंतर मुंबईतल्याच न्यू लॉ कॉलेजमधून एलएलबीचं शिक्षण घेतलं.
त्यानंतर चार्टर्ड अकाऊंटंटचं शिक्षणही घेतलं. या इंटर सीए परीक्षेत त्यांनी देशात अव्वल स्थान पटकावलं.
या शिक्षणानंतर स्वत:ची सीए फर्म सुरू केली आणि बँकिंग क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. यातील बँकिंग क्षेत्रातील त्यांची कामगिरी अनेकांच्या चर्चेचा विषय असतो. कारण वयाच्या तिशी-पस्तिशीत त्यांनी मोठमोठ्या सहकारी बँकांच्या मोठ्या पदावर काम केलं.
शरद पवारांनी सुरेश प्रभूंना सहकार क्षेत्रात आणलं
सुरेश प्रभूंनी सारस्वत बँकेचे अध्यक्ष असतानाचा एक किस्सा एबीपी माझावरील माझा कट्टा या कार्यक्रमात सांगितला होता.
शंकरराव कोल्हे हे तेव्हा महाराष्ट्राचे सहकार मंत्री होते. त्यावेळी दत्त शिरोळ साखर कारखान्यात एक सहकार परिषद झाली. त्यावेळी त्यांनी सुरेश प्रभूंना व्याख्यान द्यायला बोलावलं.

फोटो स्रोत, Getty Images
सुरेश प्रभू सांगतात, "मी चहात सुद्धा साखर घेत नाही. त्यामुळे साखरेचा तसा काही संबंध नाही. पण सहकारमंत्रीच सांगतायेत म्हटल्यावर बोलावं लागेल. राजकारणात पुढे आलो, त्याचं हे एक कारण असेल. ज्यात काही माहीत नाही, त्यातही बोलायची सवय झाली असेल मला.
तर तिथं भाषण केलं. शरद पवारसाहेब समोर बसले होते. तिथं ते मला ऐकत होते. त्याआधी त्यांचा आणि माझा अजिबात परिचय नव्हता. त्यांना एकदाही भेटलो नव्हतो. पण मग त्यांनी मला राज्य सहकारी बँकेवर त्यांचं नॉमिनी नेमलं."
इथून मग पुढे सुरेश प्रभू यांचं सहकार क्षेत्रातला वावरही वाढला.
सहकार क्षेत्रात येण्याआधी ते बँकिंग क्षेत्रात सक्रीय होतेच. सारस्वत बँकेचे ते सर्वांत तरुण अध्यक्ष होते. वयाच्या 31 व्या वर्षी त्यांनी सारस्वत बँकेचं प्रमुखपद सांभाळलं होतं.
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय समित्या, कॉन्फरन्स, संस्था इत्यादींमध्ये सुरेश प्रभू कार्यरत होते आणि आजही आहेत. या सर्वांच्या निमित्तानं ते जगातील जवळपास 150 देशांमध्ये फिरले आहेत.
ऋतुरंग दिवाळी अंकासाठी मुलाखत घेण्यासाठी एकदा गेलो असता, त्यांनी माझ्याशी बोलताना म्हटलं होतं की, "कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी जी-20 च्या बैठकीसाठी सौदी अरेबियातून परतल्यानंतर होम क्वारंटाईन व्हावं लागलं, तेव्हा बराच वेळ एकट्याला मिळाला. तेव्हा 30-40 वर्षांची डायरी पाहिली, तर लक्षात आलं एकाच शहरात मी दोन-तीन दिवस सलग थांबलो नाही. माझे मित्र म्हणायचे की, तू संन्यासी आहेस. मला हे काहीप्रमाणात मान्यही आहे."
सुरेश प्रभू राजकारणात कसे आले?
बँकिंग आणि सहकार क्षेत्रात काम करत असताना, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या संस्थांसोबत जोडले जात असताना, सुरेश प्रभू अचानक राजकारणात कसे आले, हा अनेकांसाठी प्रश्न असतो.
सुरेश प्रभू राजकारणातला प्रवेश योगायोगानं किंवा अचानकपणे झाल्याचं सांगतात. मात्र, ज्येष्ठ पत्रकार सुजाता आनंदन यांना तसं वाटत नाही.
सुरेश प्रभू अनेक ठिकाणी त्यांच्या राजकीय प्रवेशाबाबत सांगतात की, त्यावेळी गॅट करार आणि डंकेल प्रस्तावाची सर्वत्र चर्चा सुरू होती. मुंबईतील चेंबुरमध्ये बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा भरवला होता आणि तिथं बोलण्यासाठी मला विचारलं. तिथून मग बाळासाहेबांशी सुद्धा ओळख झाली.
पण सुजाता आनंदन सांगतात की, सुरेश प्रभूंना त्यापूर्वी राजकारणात प्रवेशाची इच्छा नव्हती, असं म्हणणं धाडसाचं ठरेल. असं कुणी अचानक राजकारणात येत नाही. त्यातही सुरेश प्रभूंनी आपला वारसा पुढे चालवावा असं मधू दंडवतेंना वाटत असे. कारण सुरेश प्रभूंची प्रतिमा ही दंडवतेंसारख्या माणसांना आवडत होती.
मात्र, पुढे शिवसेनेनं सुरेश प्रभूंना मधू दंडवते खासदार असायचे, त्या राजापूर मतदारसंघातूनच लोकसभेसाठी उतरवलं आणि नारायण राणेंवर त्यांच्या विजयाची जबाबदारी देऊन त्यांना जिंकवूनही आणलं. मात्र, या घटनेनं मधू दंडवतेंना मोठा धक्का बसला, असं सुजाता आनंदन सांगतात.
हे वर्ष होतं 1996. राज्यात शिवसेना-भाजप युतीचं सरकार होतं. राजापूर मतदारसंघातून पहिल्यांदा सुरेश प्रभू खासदार झाले.
बाळासाहेबांनी मंत्री केलं आणि मंत्रिपदावरून काढलंही
1996 सालच्या लोकसभा निवडणुकीनतंर केंद्रात अटलबिहारी वाजपेयींचं सरकार आलं. हे वाजपेयींचं 13 दिवसांचं सरकार.
वाजपेयींचं पुढेही जेव्हा जेव्हा सरकार आलं, तेव्हा युतीतला साथीदार म्हणून शिवसेनेला एक मंत्रिपद दिलं जायचं. तिन्हीवेळा शिवसेनेकडून हे मंत्रिपद सुरेश प्रभूंना दिलं गेलं.
1996 साली सुरेश प्रभू केंद्रीय उद्योगमंत्री झाले, 1998 साली पर्यावरणमंत्री झाले आणि नंतर 1999 साली ऊर्जामंत्री झाले.
मात्र, तिसऱ्यांदा मंत्रिपदानंतर सुरेश प्रभूंबाबत बाळासाहेबांनी नाराजी वाढत गेली आणि परिणामी त्यांना 'एलिस इन वंडरलँड' म्हणत पद सोडायला लावलं. त्यानुसार 20 ऑगस्ट 2002 रोजी सुरेश प्रभूंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला.
प्रभूंच्या जागी शिवसेनेकडून अनंत गीते यांची वर्णी लावण्यात आली. मात्र, सुरेश प्रभूही शिवसेनाप्रमुखांचा आदेश मानत पक्षकार्य करू लागले.

फोटो स्रोत, Getty Images
मात्र, वाजपेयींना सुरेश प्रभूंचं महत्त्व कळलं होतं आणि त्यांनी सुरेश प्रभूंकडे 2002 साली राष्ट्रीय नदीजोड प्रकल्पाचं प्रमुखपद दिलं. सुरेश प्रभूंच्या कारकीर्दीतील महत्त्वाच्या कामांची यादी करताना नदीजोड प्रकल्पातल्या त्यांच्या कामाचा उल्लेख आवर्जून केला जातो.
या काळात प्रभू लोकसभेत मात्र सक्रीय राहिले. ते 1996 ते 2009 या काळात सलग चारवेळा लोकसभेत खासदार म्हणूनही निवडून गेले. संसदेच्या पब्लिक अकाऊंट कमिटीपासून विविध देशांसोबतच्या पार्लमेंटरी फोरमच्या सदस्यांपर्यंत ते कार्यरत राहिले.
मात्र, 2009-10 नंतर मात्र सुरेश प्रभू राजकारणातून काहीसे दूर गेले. शिवसेना त्यांनी अधिकृतपणे सोडली नव्हती. मात्र, ते सक्रियही राहिले नाहीत. त्यानंतर सक्रीय राजकारणात त्यांचं पुनरागमन सर्वांसाठी आश्चर्याचा धक्का देणारं ठरलं.
उद्धव ठाकरेंचा विरोध डावलून मोदींनी प्रभूंना केलं मंत्री
2014 साली सुरेश प्रभू पुन्हा राजकारणात सक्रीय झाले आणि ही घटना सर्वांसाठी धक्कादायक ठरली.
खारमधल्या आपल्या निवासस्थानी पत्नी उमा प्रभू आणि मुलगा अमेय प्रभू यांच्यासोबत राहत असलेले सुरेश प्रभू यांच्यासाठी हे वर्ष सुखद धक्का देणारं ठरलं.
2014 साली केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेला त्यांच्या वाट्याची जागा देण्याची वेळ आली, तेव्हा सुरेश प्रभू यांना द्यायचं भाजपनं ठरवलं. मात्र, शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना हे नामंजूर होतं अशी चर्चा त्यावेळी झाली.
टीव्ही 9 मराठीचे संपादक उमेश कुमावत सांगतात की, शिवसेनेकडून अनिल देसाई हेच मंत्री असतील, असं उद्धव ठाकरे यांनी जवळपास ठरवलं होतं. त्यानुसार अनिल देसाई दिल्लीतही पोहोचले होते. मात्र, शपथ घेणाऱ्या मंत्र्यांच्या यादीत अनिल देसाईंचं नावच नव्हतं. सुरेश प्रभूंचं नाव होतं.
त्यानंतर मग उद्धव ठाकरे नाराज झाले आणि मग भाजपनं सुरेश प्रभूंना पक्षात घेतलं. सुरेश प्रभू भाजपचे मंत्री म्हणून गणले गेले. नंतर पहिल्या विस्तारात शिवसेनेकडून अनंत गीते मंत्रिमंडळात सहभागी झाले.
2014 ते 2019 या मोदी सरकारच्या पहिल्या पाच वर्षांत पहिले तीन वर्षे रेल्वेमंत्री, नंतर वाणिज्य आणि नागरी विमान वाहतूक अशी मंत्रिपदं त्यांनी सांभाळली.
2014 ते 2017 य काळात सुरेश प्रभू केंद्रीय रेल्वेमंत्री म्हणून काम पाहत होते. ही कारकीर्द अनेक कारणांमुळे चर्चेच राहिली. रेल्वेस्थानकांवरील एलिव्हेटर, प्रवाशांच्या तक्रारींची निवारण इत्यादी अनेक गोष्टींमुळे ते चर्चेत राहिले.
मात्र, या काळात झालेल्या रेल्वे अपघातांच्या मालिकांमुळे त्यांच्यावर टीकाही झाली. रेल्वे अपघातांच्या मालिकांनंतरच त्यांचा राजीनामा या समस्येला दुजोरा देणाराच ठरला.
राजकारणातून निवृत्तीच्या दिशेनं
2019 साली केंद्रात पुन्हा भाजपचं सरकार आल्यानंतर, नरेंद्र मोदी यांच्या या नव्या मंत्रिमंडळात मात्र सुरेश प्रभूंना स्थान मिळालं नाही. त्यांना भाजपनं आंध्र प्रदेशातून राज्यसभेवर पाठवलं होतं. मात्र, मंत्रिपदी वर्णी लागली नाही.
जपानमधील ओसाका इथं नियोजित जी-20 समिटसाठीचे भारताकडून पंतप्रधानांचे शेर्पा म्हणून त्यांनी काम पाहिलं. मात्र, त्यापलिकडे त्यांच्याकडे मोठी कुठली जबाबदारी दिल्याचे दिसून आलं नाही.

फोटो स्रोत, Getty Images
आणि 2 फेब्रुवारी 2022 रोजी आपण राजकारणातूनच निवृत्त होत असून, पर्यावरणासाठी यापुढे काम करणार असल्याचे जाहीर केलं आणि सर्वांना पुन्हा एकदा धक्का दिला.
भारतीय राजकारणात लौकीकार्थानं 'अनफिट' असलेले सुरेश प्रभूंनी 26 वर्षं राजकारणात घालवली. विविध पदं मिळवली. या काळात संयमीपणे काम करत राहण्याच्या त्यांच्या शैलीमुळे अनेकांच्या पसंतीसही उतरले.
बँकिंग क्षेत्रात आणि सहकार क्षेत्रात काम करणारा माणूस राजकारणात येतो आणि राजकारणातलं आपलं काम इथवरच होतं म्हणून निवृत्ती स्वीकारतो, हे आजच्या घडीला आपल्याकडे तसं दुर्मिळ झालंय.
राजकारणातून निवृत्त झाल्यानंतर सुरेश प्रभू आता पर्यावरण क्षेत्रात काम करणार आहेत. राजकारणातून निघता पाय निघत नाही म्हणतात, मात्र प्रभूंचे पाय निघाले. त्यांचे मित्र त्यांना 'संन्यासी' म्हणतात. पदांच्या लालसेत न अडकता निवृत्ती घेणं हे प्रभूंच्या संन्यासी प्रवृत्तीला साजेसंच म्हणायला हवं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









