एकनाथ शिंदे बंड : राजकारणातल्या 'आयाराम-गयाराम'च्या जन्माची गोष्ट

एकनाथ शिंदे, आयाराम गयाराम, शिवसेना, बंड

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, स्नेहल माने
    • Role, बीबीसी मराठीसाठी

राजकीय गप्पांचा फड रंगला की एक किस्सा हमखास सांगितला जातो. तो म्हणजे, कोण्याएका पत्रकाराने राज्यातल्या धूर्त नेत्याला सहज प्रश्न केला, 'दोन अधिक दोन किती?'

यावर त्या नेत्याने वेळ न दवडता त्या पत्रकारालाचं प्रतिप्रश्न केला, 'द्यायचे की घ्यायचे?'

आज हे सांगायचं कारण म्हणजे, गेल्या चार दिवसांत महाराष्ट्रातली राजकीय गणितं बदलू पाहतायेत. शिवसेनेचे वरिष्ठ नेते एकनाथ शिंदेंनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिलंय.

एकनाथ शिंदेंनी शिवसेनेचे 40 हून अधिक आमदार फोडत बंडखोरी केली. आ

पण राज्यात हा जो राजकीय काही खेळ सुरू आहे, त्याला जनतेच्या भाषेत या गणिताला 'आयराम-गयारामांचा खेळ' म्हणतात.

आता ही 'आयाराम-गयाराम' संस्कृती काही आजची नाही. तर स्वातंत्र्यपूर्व काळापासून ही संस्कृती भारतीय राजकारणाचा अविभाज्य भाग होती. राजकीय कोलांट्या उड्या मारण्याच्या या संस्कृतीला 'आयाराम गयाराम' हेच नाव कसं पडलं? ते आपण जाणून घेऊया.

हरियाणात उगम

'आयाराम-गयाराम' या शब्दप्रयोगाच्या उगमाचा किस्सा घडला होता हरियाणात.

तर या आयराम गयाराम संस्कृतीचे नायक होते 15 पंधरा दिवसांत तीनदा पक्ष बदलणारे तत्कालीन आमदार गयालाल.

तो महिना होता फेब्रुवारी 1967 सालचा. इंदिरा काँग्रेसने 520 पैकी 283 जागांवर विजय मिळवला होता आणि पहिल्यांदाच इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली केंद्रात काँग्रेसचं सरकार सत्तेवर आलं होतं.

1967 सालच्या संसदीय निवडणुकांसोबतच विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. या निवडणुकीत बिहार, उत्तरप्रदेश, राजस्थान, पंजाब, पश्चिम बंगाल, ओडिसा, मद्रास या राज्यात काँग्रेसला मोठा हादरा बसला होता.

इंदिरा गांधी

फोटो स्रोत, PHOTO DIVISION

फोटो कॅप्शन, इंदिरा गांधी

1 नोव्हेंबर 1966 साली पंजाबमधून फुटून स्थापन झालेल्या हरियाणा राज्याची स्थिती काही फारशी वेगळी नव्हती.

1967 साली लागलेली विधानसभा निवडणूक हरियाणाच्या स्थापनेनंतरची पहिलीच निवडणूक होती. या निवडणुकीत राव बिरेंद्र सिंह, भागवत दयाल शर्मा आणि देवीलाल यांची नाव चर्चेत होती.

पण काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार होते राव बिरेंद्र सिंह. ते दक्षिण हरियाणातील अहिरवाल पट्ट्यातले एक प्रभावशाली नेते होते. तसेच ते राव तुलाराम यांच्या राजघराण्यातून होते. साहजिकच मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत राव बिरेंद्र सिंह असल्याचा इशारा इंदिरा गांधींनी भागवत दयाल शर्मा यांना दिला होता.

पण राव विधानसभेचे सदस्यही नाहीत. त्यामुळे चिंता करण्याचं कारण नसल्याचा प्रतिवाद भागवत दयाल शर्मांनी केला होता.

तसेच बहुसंख्य आमदारांनी मुख्यमंत्री होण्यासाठी आपल्याला (शर्मांना) पाठिंबा दिला असताना राव बिरेंद्र सिंह यांना मुख्यमंत्रिपदी बसवणं कसं चुकीचं ठरेल ही गोष्ट इंदिराजींना पटवून देण्यात शर्मांना यश आलं होतं.

देवीलाल

फोटो स्रोत, COURTESY KC YADAV

फोटो कॅप्शन, देवीलाल

धूर्त राजकारणी असलेल्या इंदिराजींना वाऱ्याची दिशा कळत होती. मात्र त्यांनी शर्मांच्या मुख्यमंत्री होण्याला विरोध केला नाही.

देवीलाल यांच्या बाबतीत, त्यांनी पहिली निवडणूक लढवली नव्हती. कारण हरियाणाला राज्याचा दर्जा मिळावा यासाठी त्यांनी अनेकदा काँग्रेसविरोधी भूमिका घेतली होती. त्यामुळे त्यांना काँग्रेसचे तिकीट अथवा कोणतही पद मिळालं नव्हतं. देवीलाल यांचा मुलगा प्रताप सिंग यांना मात्र काँग्रेसने एलेनाबाद मतदारसंघातून तिकीट दिलं होतं. साहजिकच देवीलाल शर्मांना धडा शिकवण्याच्या संधीच्या शोधात होते.

हरियाणाच्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 81 पैकी 48 जागा मिळवत अल्पमतातलं सरकार स्थापन केलं होतं. या निवडणुकीत भारतीय जनसंघाला 12, स्वतंत्र पार्टीला 3 तर रिपब्लिक पार्टीला 2 जागा मिळाल्या होत्या.

यात अपक्षांचा एक गट होता. ज्यांना 16 जागा मिळाल्या होत्या. हा गट दुसऱ्या क्रमांकावर होता.

निवडणुकीत बहुमत मिळालेली काँग्रेस हरियाणात सत्तारूढ झाली. 10 मार्च 1967 रोजी भागवत दयाल शर्मा यांनी काँग्रेसकडून मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

आठवड्याभरात बंडखोरी झाली...

पुढे सत्तास्थापनेच्या आठवडाभरातच बंडखोरी झाली. शर्मांना विरोध करणारे बरेच आमदार पक्षात होते.

विधानसभेची कार्यवाही सुरू करण्यासाठी घटनात्मक पदी सभापती नेमण्याची आवश्यकता होती. या निवडीतच बंडखोरीचं बीज दडलेलं होतं. नव्या मुख्यमंत्र्यांनी सभापतीपदासाठी लाला दयाकिशन यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाला विरोध म्हणून काँग्रेसचे जेष्ठ आमदार चंद राम यांनी राव बिरेंद्र सिंह यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला.

शेवटी यावर मतदान झालं. राव बिरेंद्र सिंह हे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार लाला दयाकिशन यांना 3 मतांनी हरवत सभापतीपदावर विराजमान झाले.

खरं तर या सर्व घडामोडींमागे होते देवीलाल.

देवीलाल

फोटो स्रोत, COURTESY CHAUTALA FAMILY

17 मार्च रोजी देवीलाल आणि राव बिरेंद्र सिंह यांनी मिळून ही योजना आखली होती. मात्र मुख्यमंत्री असलेल्या भागवत शर्मा यांना या सगळ्याची कल्पनाच नव्हती.

लवकरच राव बिरेंद्र सिंह गटातील काँग्रेसच्या 12 असंतुष्ट आमदारांनी पक्षांतर करत हरियाणा काँग्रेस नावाने नवा पक्ष स्थापन केला.

इतर अपक्षांसह, हरियाणा काँग्रेस, भारतीय जनसंघ, स्वतंत्र पक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांनी मिळून युनायटेड फ्रंट नावाचा गट स्थापन केला. या आमदारांची संख्या 48 वर पोहोचली.

या गटाने देवीलाल यांच्या अध्यक्षतेखाली एक समन्वय समिती स्थापन केली. शिक्षणमंत्री हरदवारी लाल यांनीही मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आणि इतर तिघांसह राव यांच्या छावणीत सामील झाले.

लवकरच, मुख्यमंत्री असलेल्या भागवत शर्मा यांना पदच्युत करून 24 मार्च 1967 रोजी राव बिरेंद्र यांना राज्यपाल बी. एन. चक्रवर्ती यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ दिली. आणि युनायटेड फ्रंटचे सरकार सत्तारूढ झाले.

एकनाथ शिंदेंचं बंड

फोटो स्रोत, EKNATHSHINDEOFFICE

पण त्यानंतरही आमदारांचे दलबदल हा हरियाणाच्या राजकारणातील नित्याचाच क्रम झाला. परिणामी राव बिरेंद्र सिंह यांचे सरकारही काही महिन्यांतच अस्थिर झाले. विधानसभा बरखास्त होऊन राष्ट्रपती राजवट लागू झाली.

'आया राम, गया राम'

या घटनाक्रमात एक अपक्ष आमदार होते गयालाल.

गयालाल हे हसनपूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचं प्रतिनिधित्व करत होते. 1967 च्या निवडणूकीत काँग्रेसने गयालाल यांना तिकीट नाकारलं होत. साहजिकच गयालाल यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला पराभूत करून विजय मिळवला.

आमदार गयालाल यांनी मुख्यमंत्रिपदासाठी भागवत दयाल शर्मा यांच्या नावाला तीव्र विरोध दर्शवला होता. त्यामुळे काँग्रेसने चौधरी चंद राम यांना मुख्यमंत्री केलं जाईल, असं सांगून गयालाल यांना पक्षात आणलं होतं. मात्र काँग्रेसने काही तासांतच भागवत दयाल यांच्या उमेदवारीची घोषणा केली. त्यामुळे संतापलेल्या गयालाल यांनी काँग्रेसला रामराम ठोकला.

30 ऑक्टोबर रोजी पुन्हा गयाराम काँग्रेसमध्ये आले आणि 9 तासांच्या आत युनायटेड फ्रंटवासी झाले.

भागवत दयाल शर्मा यांच्या हकालपट्टीनंतर चंदीगडमधील पत्रकार परिषदेत गयालाल यांची ओळख करून देताना राव बिरेंद्र यांनी प्रथमच 'गया राम अब आया राम है' असं वाक्यप्रयोग केला.

त्यानंतर संसदेत केंद्रीय मंत्री यशवंतराव चव्हाण यांनी हरियाणाच्या राज्यपालांच्या अहवालावर भाषण केलं. 21 नोव्हेंबर रोजी त्यांनी भाषण केले तोपर्यंत गयालाल यांनी पुन्हा बाजू बदलली आणि चव्हाण म्हणाले, 'अब तो गया लाल भी गया'

यशवंतराव चव्हाणांच्या या वाक्यप्रयोगानंतर पक्षांतर करणाऱ्यांसाठी 'आया राम, गया राम ' हा शब्द वापरला जाऊ लागला.

दरम्यान, गयालाल यांचा पक्ष बदलाचा कार्यक्रम सुरूच होता. युनायटेड फ्रंटनंतर, गयालाल आर्य सभेत गेले. दोन वर्षांनंतर चरणसिंग यांच्या नेतृत्वाखालील लोकदलात त्यांना स्थान मिळालं. यानंतर त्यांनी 1977 मध्ये त्यांनी जनता दलाच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा.

गयालाल यांनी 1982 मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून शेवटची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोर जावं लागलं.

म्हणूनच, राजकारणाच्या या गणितांचं उत्तर, वरवर वाटतं तितकं सरळ नसतं. म्हणूनच, 'दोन अधिक दोन किती' या प्रश्नाचं उत्तर कधी 'तीन येईल, तर कधी पाच.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)