एकनाथ शिंदे बंड : ‘उद्धव ठाकरेंनी ‘या’ 2 चुका केल्या, ज्या देवेंद्र फडणवीसांनी टाळल्या होत्या’

फोटो स्रोत, Getty Images
"24 तासांत तुम्ही मुंबईत या आणि तुमचं म्हणणं आमच्यासमोर मांडा. तुमचं म्हणणं असेल तर महाविकास आघाडीतून शिवसेना बाहेर पडायला तयार आहे. व्हॉट्सअपवर पत्र पाठवू नका. मुंबईत येऊन तुमची भूमिका मांडा. तुमच्या भूमिकेचा नक्की विचार केला जाईल," असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय.
या वक्तव्याचा राजकीय अर्थ म्हणजे, "शिवसेना भाजपसोबत सत्तास्थापन करणार असा होतो,"असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
पृथ्वीराज चव्हाण यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा देणार का? शिवसेनेसोबत आघाडी करून काँग्रेसने चूक केली का? उद्धव ठाकरे 'डबल गेम' खेळतायत का? उद्धव ठाकरे यांच्याकडून कोणती मोठी चूक झाली? या आणि अशा काही प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिली आहेत.
प्रश्न - शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडायची तयारी दाखवली आहे. आता काँग्रेसची भूमिका काय?
पृथ्वीराज चव्हाण - या वक्तव्याचा राजकीय अर्थ म्हणजे ते भाजपसोबत जाणार आहेत. पण कुठल्या टर्मवर जाणार. भाजप त्यांना मुख्यमंत्रिपद देणार आहे का? पण आघाडीतून बाहेर पडणार असतील तर शिवसेना भाजप सोबत सरकार स्थापन करणार का? दुय्यम भूमिका घेणार का?
दुसरा मुद्दा म्हणजे मला यात काही व्यावहारिक वाटत नाही. सरकारच राहणार नाही तर महाविकास आघाडी राहणार नाही.
प्रश्न - काँग्रेस पुढे काय करणार?
पृथ्वीराज चव्हाण - मला याचा अर्थच उलगडत नाहीय की काय चाललं आहे. आघाडीतून बाहेर पडायचं म्हणजे उद्धव ठाकरे काय करणार? महाविकास आघाडी आपला स्वतंत्र गट तयार करणार का की प्रत्येक पक्षाने स्वतंत्र व्हायचं आहे?
प्रश्न - एकाच पक्षातले 40 आमदार फुटतात तरी नेतृत्व गाफील राहतं, उद्धव ठाकरे यांची कुठे चूक झाली असं वाटतं?
पृथ्वीराज चव्हाण - गृहखातं आणि वित्तखातं मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडे ठेवलं नाही ही त्यांची चूक झाली. ज्या ज्या वेळेला आघाडी होते तेव्हा गृह खातं आणि वित्त खातं मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडे ठेवायचं असतं. मी प्रभारी असताना काही आघाड्या केल्या आहेत. पण असं कुठे झालेलं नाही. त्यामुळे ही दोन खाती मुख्यमंत्र्यांकडे नसतील तर काय होतं त्याचा प्रत्यय आपण पाहतोच आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी हे बरोबर केलं होतं. त्यांनी ही दोन्ही खाती आपल्याकडे ठेवली होती.

फोटो स्रोत, facebook
आता एवढे आमदार बाहेर जात असताना गृह खात्याला माहित होतं की नव्हतं की त्यांनी सांगितलं नाही हे मला माहिती नाही.
प्रश्न - शिवसेना 'डबल गेम' खेळतेय असं वाटतं का?
पृथ्वीराज चव्हाण- उद्धवजींच्या मनात असं काही असतं तर ते काल बोलले असते. पण रात्रीत काय भूमिका बदलली असली तर ते सांगतील. पुन्हा फेसबुक लाईव्ह करतील आणि माहिती देतील.
पण जो निर्णय घ्यायचा आहे त्यासाठी ते स्वतंत्र आहेत.
प्रश्न - मग काँग्रेस विरोधात बसायला तयार आहे का?
पृथ्वीराज चव्हाण - काँग्रेस पहिल्यापासून विरोधात बसायला तयार आहे. आम्हाला जनतेने जनादेश दिलेला नाहीय. पण भाजपची सत्ता येऊ नये यासाठी जर काही पर्याय असतील तर आम्ही त्याचा नक्की विचार करू.
प्रश्न - एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा देणार का? एकनाथ शिंदे मुंख्यमंत्री बनले तर काँग्रेसचा पाठिंबा असेल का?
पृथ्वीराज चव्हाण- भाजपच्या विचाराला बाहेर ठेवण्यासाठी आम्ही निश्चित पर्यायांचा विचार करू. जर त्यांना एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायचं असेल आणि उद्धव ठाकरेंना बाजूला करायचं असं शिवसेनेचं ठरलं तर आमची हरकत नाही. आम्हाला बाजूला करायचं असेल तरी आम्ही बाहेरून पाठिंबा द्यायला तयार आहोत.
एकनाथ शिंदे शिवसेनेचे मुख्यमंत्री असतील तर आम्ही पाठिंबा देऊ. आमच्या पक्षात मतभेद झालेत असं शिवसेनेने सांगितलं आणि त्यांनीच तसे बदल केले तर विचार करता येईल.
प्रश्न - शिंदे गटाची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार का?
पृथ्वीराज चव्हाण - आमचा शिवसेनेच्या बंडखोर आमदारांशी काहीच संबंध नाही. ते आमचं ऐकतील अशी काही परिस्थिती नाही. त्यांना अडीच वर्षं विचारधारा चालाली आता त्यांना चालत नाही.

फोटो स्रोत, facebook
समजा भाजपकडे राज्यसभेच्या मतांइतके आमदार आहेत म्हणजे 123 आणि गुवाहटीचे 42 आमदार हा आकडा पाहिला तर निश्चितच ते एकत्र येत सत्ता स्थापन करू शकतात. तर काय प्रश्न राहील.
मुद्दा हा आहे की ते एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रिपद देतील. पण इतरांच्या मंत्रिपदांचं काय? भाजपचे नेते 33-34 मंत्रिपदं घेणार. मग इतर आमदारांचं काय? भाजपकडून सत्ता स्थापनेची ऑफर अजून गेलेली नाही ही माझी माहिती आहे.
प्रश्न - उद्धव ठाकरेंची भूमिका काय असेल असं वाटतं?
पृथ्वीराज चव्हाण - शिवसेनेने भाजपसोबत हातमिळवणी केली तर पटणार नाही. पण उद्धव ठाकरेंची भूमिका अजून स्पष्ट नाही.
महत्त्वाचा प्रश्न म्हणजे गुवाहटीत 42 आमदार असतील तर ते सत्तास्थापनेचा दावा का करत नाही की त्यांना भीती आहे मुंबईत आल्यावर आमदार पळून जातील. तसं असेल आणि इथे आल्यावर काही आमदार जरी फुटले आणि 37 हा आकडा त्यांना पूर्ण करता आला नाही तर त्यांचीही अडचण आहेच.
प्रश्न - आपल्या विचारधारेपासून परस्पर विरोधी भूमिका असलेल्या शिवसेनेशी आघाडी करणं काँग्रेसची चूक झाली असं वाटतं का?
पृथ्वीराज चव्हाण - भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आलो होतो. पण कोणी महाविकास आघाडीत राहण्यासाठी बांधील नाही. बाहेर पडायचं असेल तर आमचं कोणावर बंधन नाही.
आमची 100 ट्क्के चूक झालेली नाही. कारण भाजपसारख्या जातीयवादी आणि धर्मावरून राजकारण करणाऱ्या पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आलो होतो. आणि अडीच वर्षं आम्ही त्यांना दूर ठेवलं सुद्धा. त्यामुळे काँग्रेसची अजिबात चूक झालेली नाही.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








